पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज-9 जागतिक शिखर परिषदेला संबोधित केले


ही शिखर परिषद भारत-जर्मनी भागीदारीतील एक नवीन अध्याय आहेः पंतप्रधान

2024 हे वर्ष भारत-जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे 25 वे वर्ष आहे, त्यामुळे ते एक ऐतिहासिक वर्ष बनले आहेः पंतप्रधान

जर्मनीचा "फोकस ऑन इंडिया" दस्तऐवज दर्शवितो की जग भारताचे धोरणात्मक महत्त्व ओळखत आहे: पंतप्रधान

भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात देश अग्रगण्य बनला आहेः पंतप्रधान

भारत भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वेगाने प्रगती करत आहे: पंतप्रधान

भारताची गतिशीलता आणि जर्मनीची अचूकता यांच्यात भागीदारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 22 NOV 2024 11:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीतील स्टुटगार्ट येथे न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही शिखर परिषद भारत-जर्मनी भागीदारीतील एक नवीन अध्याय आहे. पंतप्रधान म्हणाले, "मला आनंद आहे की, भारतातील माध्यमांचा  गट आजच्या माहितीच्या युगात जर्मनी आणि जर्मन लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारतातील लोकांना जर्मनी आणि जर्मनीच्या लोकांना समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ देखील मिळेल.”

पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या टीव्ही 9 द्वारे जर्मनीतील एफएयू स्टुटगार्ट आणि बाडेन-वुर्टेमबर्ग यांच्या सहकार्याने ही शिखर परिषद आयोजित केली जात आहे. "भारत-जर्मनीः शाश्वत विकासासाठी एक आराखडा" ही या शिखर परिषदेची संकल्पना असून ती भारत आणि जर्मनी यांच्यातील विश्वासार्ह भागीदारीचे प्रतिबिंब आहे,” असं पंतप्रधान म्हणाले. उपस्थितांनी गेल्या दोन दिवसांत आर्थिक मुद्यांवर तसेच क्रीडा आणि करमणुकीशी संबंधित विषयांवर फलदायी चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील व्यापक सहकार्य अधोरेखित केले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 

पंतप्रधान मोदी यांनी विशेषतः भू-राजकीय संबंध, व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत युरोपचे भारतासाठीचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. ज्यामध्ये जर्मनी हा भारताचा एक प्रमुख भागीदार आहे. 2024 हे वर्ष इंडो-जर्मन धोरणात्मक भागीदारीचे 25 वे वर्ष आहे, ज्यामुळे ते एक ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. चॅन्सेलर स्कोल्झ यांचा तिसरा भारत दौरा आणि 12 वर्षांनंतर दिल्लीत होत असलेल्या जर्मन व्यवसायांच्या आशिया-प्रशांत परिषदेसह उल्लेखनीय कार्यक्रमांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  जर्मनीने "फोकस ऑन इंडिया" दस्तऐवज आणि त्याचे पहिले देश-विशिष्ट 'भारतासाठी कुशल कामगार धोरण' देखील जारी केले, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

इंडो-जर्मन धोरणात्मक भागीदारी 25 वर्षांपासून सुरू असली तरी दोन्ही देशांमधील संबंध शतकानुशतके जुने असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. विशेष म्हणजे, एका जर्मन व्यक्तीने युरोपमधली पहिली संस्कृत व्याकरण पुस्तके लिहिली आणि जर्मन व्यापाऱ्यांनी युरोपमध्ये तामिळ आणि तेलुगू मुद्रण सुरू केले. पंतप्रधान म्हणाले, "जर्मनीत आज सुमारे 3 लाख भारतीय राहतात, त्यापैकी 50,000 भारतीय विद्यार्थी तिथे शिकत आहेत. भारतात, 1,800 हून अधिक जर्मन कंपन्यांनी गेल्या 3-4 वर्षांत 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे". दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 34 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि भागीदारी मजबूत झाल्यामुळे येत्या काही वर्षांत हा व्यापार वाढतच राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, जिच्याबरोबर विकासासाठी भागीदारी करण्यात जगाला रस आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. जर्मनीच्या 'फोकस ऑन इंडिया' दस्तऐवजात असे दिसून आले आहे की, जग भारताचे धोरणात्मक महत्त्व ओळखत आहे. हा बदल गेल्या दशकातील भारतात झालेल्या सुधारणांमुळे झाला आहे, ज्यामुळे व्यवसायाची परिस्थिती सुधारली आहे, नोकरशाही कमी झाली आहे आणि सर्व क्षेत्रांतील धोरणांचे आधुनिकीकरण झाले आहे. जीएसटी सह कर प्रणाली सुलभ करणे, 30,000 हून अधिक अनुपालन दूर करणे आणि बँकिंग क्षेत्र स्थिर करणे या प्रमुख सुधारणांमध्ये समाविष्ट आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या प्रयत्नांनी भारताच्या भविष्यातील विकासासाठी एक मजबूत पाया घातला आहे आणि जर्मनी या प्रवासात एक प्रमुख भागीदार म्हणून कायम आहे.

जर्मनी ज्याप्रकारे उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात प्रगती करत आहे, त्याचप्रकारे भारत जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत देश उत्पादकांना उत्पादन संबंधित प्रोत्साहन देत आहे. भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आघाडीवर आहे, जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक आणि स्टील आणि सिमेंटचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. हा बदल जागतिक उत्पादनात भारताचे वाढते महत्त्व दर्शवितो.

पंतप्रधान म्हणाले की, भारत हा चार चाकी वाहनांचा चौथा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि त्याचा सेमीकंडक्टर उद्योग जागतिक यशासाठी सज्ज आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, लॉजिस्टिक खर्च कमी करणे, व्यवसाय सुलभ करणे आणि स्थिर शासन सुनिश्चित करणे या उद्देशाने सरकारच्या अलीकडील धोरणांमुळे ही प्रगती झाली आहे. भारत भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वेगाने प्रगती करत आहे, ज्याचा त्याच्या नाविन्यपूर्ण डिजिटल तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर लक्षणीय परिणाम झाला आहे. भारताला आता जगातील सर्वात अनोख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आधीच स्थापन झालेल्या जर्मन कंपन्यांना त्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि ज्या अद्याप भारतात आलेल्या नाहीत, त्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले. भारताच्या विकासाशी जुळवून घेण्याची ही योग्य वेळ आहे यावर भर देत पंतप्रधानांनी भारताची गतिशीलता आणि जर्मनीची अचूकता, अभियांत्रिकी आणि नवोन्मेष यांच्यातील भागीदारीचे आवाहन केले. एक प्राचीन संस्कृती म्हणून भारताने नेहमीच जागतिक भागीदारीचे स्वागत केले आहे आणि जगासाठी समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी सर्वांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे यावर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

 

* * *

आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175373) Visitor Counter : 10