सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित क्षमतेचे लोकार्पण; पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण


शिवाजी महाराजांचे अनुयायीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करू शकतात, औरंगजेबाच्या अनुयायांमध्ये एवढी हिंमत नाही

मोदी सरकार सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतकरी कल्याणाचे कार्य करत आहे

पद्मश्री पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला, त्यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर अनेक राज्यांतील शेतकरी समृद्ध झाले

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ मजबूत केली आणि शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सहकाराच्या नफ्यातून विकासाची नवी परंपरा सुरू केली

मोदी सरकारने 2025-26 मध्ये अतिवृष्‍टीग्रस्त महाराष्ट्राला 3,132 कोटी रुपये, तर राज्य सरकारने 2,215 कोटी रुपये, 10 हजार रुपये रोख आणि 35 किलो धान्य दिले, त्याचा लाभ 31 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे

Posted On: 05 OCT 2025 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात अहिल्यानगर इथे प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित क्षमतेचे लोकार्पण केले. तसेच, त्यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी शिर्डी साई धाम इथे साईबाबांचे दर्शन घेऊन सर्व देशवासियांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

IMG_1343.JPG

अहिल्यानगर इथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, शिवाजी महाराजांचे अनुयायीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवू  शकतात, औरंगजेबाच्या अनुयायांमध्ये एवढी हिंमत नाही. यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची 60 लाख हेक्टरहून अधिक जमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्राच्या वाट्याअंतर्गत महाराष्ट्राला 3,132 कोटी रुपये देण्यात आले आहेत, त्यापैकी 1,631 कोटी रुपये मोदी सरकारने एप्रिल महिन्यातच दिले होते, असे शाह यांनी सांगितले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्रिमूर्तीनेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक पुढाकार घेतले आहेत असे शाह यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांचे मदत पॅकेज दिले, त्यामुळे 31 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळाली. 10 हजार रुपये रोख आणि 35 किलो धान्य देण्याचा उपक्रमही महाराष्ट्र सरकारने राबवला. अल्पमुदतीच्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती, भूराजस्व  मधेही  सूट देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला आश्वासन देतो की, राज्य सरकारने एक सविस्तर अहवाल पाठवावा, पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करायला अजिबात विलंब करणार नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार निवडल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

CR5_2684.JPG

अमित शाह म्हणाले की, आज इथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण झाले आहे. पद्मश्री विखे पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भागातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे भारतातल्या सहकार चळवळीच्या आद्यप्रवर्तकांपैकी एक होते. महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता या त्रिमूर्तीने राज्यात सहकाराचा पाया रचला. पद्मश्री पाटील यांनी एक प्रकारे  जगातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला, त्यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांतले शेतकरी समृद्ध झाले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखान्यांचा नफा व्यापाऱ्यांच्या घरी जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाण्याची व्यवस्था करणारे प्रणेते होते, असे शाह यांनी सांगितले.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केवळ सहकार चळवळीला बळकटी दिली नाही, तर सहकारी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सहकारातून निर्माण झालेल्या नफ्याचा उपयोग विकासासाठी करण्याची नवी परंपरा सुरू केली.

CR3_5508.JPG

अमित शाह म्हणाले की, आज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरणही करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, 1950-51 मध्ये जेव्हा या कारखान्याची स्थापना झाली, तेव्हा त्याची गाळप क्षमता प्रतिदिन 500 टन ऊस प्रक्रिया करण्याची होती. आज ती वाढून प्रतिदिन 7200 टनांपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळात ही क्षमता 7200 टनांवरून वाढवून 15 हजार टन प्रतिदिन करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सहकार मंत्रालयाची स्थापना केली, तेव्हा सहकारी साखर कारखान्यांना बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) योजना सुरू करण्यात आली आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या युनिट्सना  आर्थिक सहाय्य देण्यात आले. त्यामधूनच आज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा विस्तार होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील साखर कारखान्यांची संख्या 67 ने वाढली आहे, साखर उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनांची वाढ झाली आहे. डिस्टिलरींची संख्या दुपटीने वाढली आहे, इथेनॉल उत्पादन क्षमता पाचपट वाढली असून त्याचा पुरवठा दहापट वाढला आहे. याशिवाय पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या सहकारी साखर कारखान्यांना किती मोठा फायदा झाला आहे हे यातून दिसून येते असे ते म्हणाले . त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांचा 10 हजार कोटी रुपयांहून अधिक प्राप्तीकर माफ करून सर्वात मोठे काम केले आहे. तसेच मोदीजींनी कर सेटलमेंटमध्ये  सहकारी क्षेत्राला कंपन्या प्रमाणे समान स्थान दिले.सहकार मंत्र्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे आता सहकारी साखर कारखान्यांवर दरवर्षी 4400 कोटी रुपयांचे ओझे येणार नाही.

CR5_2492.JPG

अमित शाह यांनी सहकारी साखर कारखान्यांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या इथेनॉल प्रकल्पांना मल्टीफीड इथेनॉल प्रकल्पांमध्ये रूपांतरित करावे आणि त्यात भाजीपाला अवशेष, मका आणि तांदुळापासून इथेनॉल तयार करण्याची व्यवस्था करावी. त्यांनी सांगितले की यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य एनसीडीसीकडून उपलब्ध करून दिले जाईल. त्यांनी सांगितले की, इथेनॉल खरेदीत सर्व सहकारी संस्थांना प्राधान्य दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की, आपण सर्वांनी या दिवाळीला संकल्प करावा की, आपल्या घरात कोणतीही परदेशी वस्तू आणली जाणार नाही. शाह म्हणाले की, जर 140 कोटी भारतीयांनी हा संकल्प केला की, आपण केवळ भारतात निर्मित वस्तूंचाच वापर करू, तर 2047 पूर्वीच भारत जगात सर्वोच्च स्थानी पोहोचेल. त्यांनी सांगितले की, संपूर्ण जगातील लोकांना उत्पादनासाठी भारतात यावे लागेल, कारण आपल्याकडे 140 कोटी लोकसंख्येची मोठी बाजारपेठ आहे.

ते पुढे म्हणाले की, नाफेड आणि एनसीसीएफ सोबत करार करून सहकारी साखर कारखान्यांना बहुआयामी बनविण्याची गरज आहे.

CR3_5472.JPG

 

* * *

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/नितिन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175132) Visitor Counter : 5