रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे मंत्री हिरोमासा नाकानो यांनी ‘मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल’ प्रकल्पाच्या मार्गावरील सुरत आणि मुंबई येथील स्थळांना भेट दिली


सुरत एचएसआर साइटवर जे-स्लॅब बॅलास्ट-लेस ट्रॅक बसवण्याच्या जलद गतीने प्रगती करत असलेल्या कामाची मंत्र्यांनी केली पाहणी

मुंबईत बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकाचे काम पूर्णत्वाच्या जवळ,  84% खोदकाम पूर्ण, तीन मजली स्थानक मेट्रो आणि रस्ते मार्गांना जोडणार 

पालघर जिल्ह्यातील 7 बोगद्यांचे खोदकाम प्रगतीपथावर

जपानच्या मंत्र्यांच्या भेटीमुळे पहिल्या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवरील भारत-जपान दरम्यानचे मजबूत सहकार्य अधोरेखित झाले

Posted On: 03 OCT 2025 8:46PM by PIB Mumbai


 

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे जमीन, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्री हिरोमासा नाकानो यांनी आज मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरत आणि मुंबईमध्ये सुरु असलेल्या बांधकामाच्या स्थळांना भेट दिली.

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाकानो यांचे पारंपरिक गरबा नृत्याने स्वागत करण्यात आले.सुरतचे खासदार मुकेश दलाल, महापौर दक्षेश मावानी, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वेचे उच्चपदस्थ  अधिकारी, एनएचएसआरसीएल आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जपानच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

सुरत येथे ट्रॅकची स्लॅब टाकण्याच्या जागेला भेट: मंत्र्यांनी सुरत हाय-स्पीड रेल साइटवरील ट्रॅकच्या बांधकाम ठिकाणाला  भेट दिली. या ठिकाणी त्यांनी व्हायडक्टवर जे-स्लॅब बॅलास्ट-लेस ट्रॅक सिस्टम बसवण्याच्या कामाची पाहणी केली. ट्रॅक स्लॅब बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

अलिकडेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सुरत एचएसआर स्टेशनजवळच्या पहिल्या रूळ सांधेबदल यंत्रणेच्या स्थापनेचे निरीक्षण केले.

मुंबईतील बीकेसी उच्च-गती रेल्वे स्थानक भेट

मंत्र्यांनी सुरतवरून वंदे भारत एक्सप्रेसमधून मुंबई गाठली आणि तिथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली. मंत्री नाकानो आणि जपानी चमूने वंदे भारत रेल्वेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.

मुंबईतील बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाची वैशिष्ट्ये

मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरीडॉरवरील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक भूमिगत असेल. इथले उत्खनन 30 मीटर खोल म्हणजे 10 मजली इमारतीइतके असून त्याचे सुमारे 84 टक्के काम आधीच पूर्ण झालं आहे. या स्थानकात 3 स्तर असतील – प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सेवा मजला. स्थानकाला रस्ते आणि मेट्रो या दोन्ही प्रकारच्या जोडण्या मिळणार आहेत. प्रवेश आणि निर्गमासाठी एक मेट्रो स्थानकाजवळ आणि दुसरा एमटीएनएल इमारतीजवळ असे 2 मार्ग असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त जागा, आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट्सची सोय असणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती (सप्टेंबर 2025)

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 323 किलोमीटर व्हायडक्टचे  काम पूर्ण झाले आहे, तसेच 399 किलोमीटर पीयर  कामही पूर्ण झाले आहे. पूल बांधकामातील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये नदीवर असलेले 17  पूल, 5 पीएससी पूल आणि 9 पोलादी पूल पूर्ण झाले आहेत. एकूण 211 किलोमीटर ट्रॅक बेड टाकण्यात आला आहे आणि संपूर्ण मार्गावर 4 लाखांहून अधिक ध्वनीरोधक बसवले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात डोंगरातून जाणाऱ्या 7 बोगद्यांचे उत्खनन सुरू असून बीकेसी–शीळफाटा या 21 किलोमीटर एनएटीएम बोगद्यातल्या 5 किलोमीटर भागाचे काम पूर्ण झाले आहे. सुरत आणि अहमदाबाद इथल्या रोलिंग स्टॉक डेपोंचे बांधकाम सुरू आहे. गुजरातमधील सर्व स्थानकांवर सुपरस्ट्रक्चर काम प्रगत टप्प्यात असून महाराष्ट्रातील 3 उन्नत स्थानकांवर काम सुरू झाले आहे.

जपानी मंत्र्यांच्या या भेटीतून,, भारतातल्या पहिल्या उच्च-गती रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीत दोन्ही देशांमधला  मजबूत सहयोग  अधोरेखित झाला  आहे.

***

निलिमा चितळे / राजश्री आगाशे / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2174677) Visitor Counter : 15