पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
Posted On:
02 OCT 2025 8:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी पंडितजींना भारतीय कला आणि संस्कृतीसाठी जीवनभर समर्पित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविले.
पंडितजी बनारस घराण्याचे अग्रगण्य प्रतिनिधी होते. काशीच्या परंपरेत रुजलेले हे घराणे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यांच्या गायकीतून काशीच्या संगीत परंपरेचा सार उमटत असे. त्यांनी काशीत असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे काशीची संगीत परंपरा जतन व पुढे सुरू राहिली. त्यांचे वाराणसीतील घर हे शिक्षण, साधना आणि कलात्मकतेचे केंद्र बनले होते.
पंतप्रधानांनी पंडितजींशी असलेले आपले वैयक्तिक संबंध आठवत सांगितले की, त्यांचे आशीर्वाद व पाठिंबा मिळणे ही आपल्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती. विशेषतः 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी प्रस्तावक म्हणून कार्य केले होते. हे त्यांच्या वाराणसीशी असलेल्या नात्याचे आणि शहराच्या सांस्कृतिक वारशावरील गाढ प्रेमाचे प्रतीक होते.
मोदी यांनी अनेकदा पंडितजींच्या स्नेह आणि आशीर्वादांचा उल्लेख केला असून, त्यांना वैयक्तिक संपत्ती मानले आहे. त्यांचे संबंध हे भारताच्या शास्त्रीय परंपरेबद्दलची समान आदरभावना, अध्यात्मिक गहनता आणि संस्कृतीच्या परिवर्तनकारी शक्तीचे प्रतीक आहेत.
पंडित छन्नूलाल मिश्र यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील थोर योगदानाबद्दल भारत सरकारने 2020 साली देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान केला होता.
पंडितजींची परंपरा आगामी पिढ्यांतील संगीतकार, कलाकार आणि रसिकांना प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
सामाजिक संपर्क माध्यम `एक्स` वरच्या आपल्या संदेशामध्ये मोदी यांनी लिहिले आहे :
“सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र जींच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. ते जीवनभर भारतीय कला आणि संस्कृतीच्या समृद्धीसाठी समर्पित राहिले. त्यांनी शास्त्रीय संगीताला जन-जनांपर्यंत पोहोचवतानाच भारतीय परंपरेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीही अमूल्य योगदान दिले. मला सदैव त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभत राहिला, हे माझे सौभाग्य आहे. 2014 साली ते वाराणसी मतदारसंघातून माझे प्रस्तावक देखील राहिले होते. शोकाच्या या क्षणी मी त्यांच्या कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ॐ शांती!”
***
जयदेवी पुजारी स्वामी /नितीन गायकवाड / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174041)
Visitor Counter : 5