अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्ड फूड इंडिया 2025


शिखर परिषदेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी 1 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील भागधारकांना सहभागी करून 25+ ज्ञानार्जन सत्रे संपन्न

Posted On: 27 SEP 2025 1:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2025

 

वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या दुसऱ्या दिवशी, शाश्वतता, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यावर केंद्रित चर्चा झाली. यात भविष्यातील ग्लोबल फूड बास्केट म्हणून भारताला स्थान देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संवाद झाला. भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात उच्चस्तरीय जागतिक नियामक, उद्योग जगतातील धुरीण, स्टार्टअप्स आणि धोरणकर्ते सहभागी झाले.

उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड आणि बिहार या भागीदार आणि केंद्रस्थानी असलेल्या राज्यांची सत्रे; न्यूझीलंड, व्हिएतनाम, जपान आणि रशिया या देशांची सत्रे, तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय, APEDA आणि जागतिक बँकेने आयोजित केलेली सत्रे यांचा आज समावेश आहे. याव्यतिरिक्त, MOFPI  ने विविध विषयांवर तेरा सत्रे आयोजित केली, ज्यामध्ये पाळीव प्राण्यांचे अन्न, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष अन्नघटक, अल्कोहोलिक पेये आणि वनस्पती-आधारित अन्न यांसारखे पाच प्रमुख विषय होते.

या शिखर परिषदेदरम्यान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या 21 कंपन्यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांचे एकूण मूल्य 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. शिखर परिषदेचा एक भाग म्हणून, शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने रशिया आणि पोर्तुगालच्या आंतरराष्ट्रीय समकक्षांसोबत शासकीय स्तरावरील बैठका घेण्यात आल्या.

वर्ल्ड फूड इंडियासोबतच दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. FSSAI द्वारे तिसरी ग्लोबल फूड रेग्युलेटर्स शिखर परिषद होत आहे, जिचा उद्देश जागतिक नियामकांना अन्न सुरक्षा मानकांसंदर्भात संवाद साधण्यासाठी आणि नियामक स्तरावरील सहकार्य मजबूत करण्यासाठी अनोखे व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. तर, सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) द्वारे 24 वा इंडिया इंटरनॅशनल सीफूड शो (IISS) होत आहे, जो भारताच्या सीफूड निर्यातीच्या वाढत्या क्षमतेवर आणि जागतिक बाजारपेठेतील संबंधांवर लक्ष केंद्रित करतो.

या कार्यक्रमात उद्योग जगतातील सर्व भागधारकांना अन्न प्रक्रिया क्षेत्रांशी संबंधित नव्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे ग्रहणक्षम आणि गुंतवणुकीसाठी सज्ज असलेले ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट झाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रांमधील अभिनव उपक्रमांचा लाभ घेण्याचे, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि ज्ञानाच्या सामायिकरणात सहयोग करण्याचे, तसेच अन्न सुरक्षेपासून पोषण सुरक्षेपर्यंतच्या भारताच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन जागतिक भागधारकांना करण्यात आले.

 

* * *

शैलेश पाटील/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172110) Visitor Counter : 16