भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने टपाल मतपत्रिका मोजणी प्रक्रियेत अधिक सुलभता आणली
Posted On:
25 SEP 2025 12:59PM by PIB Mumbai
1. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत 29 महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने, निवडणूक आयोगाने आपल्या तिसाव्या उपक्रमा अंतर्गत, मतमोजणीमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी आणि त्यामधील स्पष्टता वाढविण्यासाठी पोस्टल पोस्टल बॅलट (टपाला द्वारे पाठवलेल्या मतपत्रिका) मोजण्याची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. (परिशिष्ट)
2. मतमोजणीच्या प्रक्रियेचे दोन प्रमुख भाग आहेत:
a. टपाल मतपत्रिका/इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल मतपत्रिकांची (ईटीपीबी) मोजणी, आणि
b. ईव्हीएमद्वारे मतमोजणी
3. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8.00 वाजता टपाल मतपत्रिकांची मोजणी सुरु होईल आणि सकाळी 8.30 वाजता ईव्हीएमची मोजणी सुरू होईल. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, टपाल मतपत्रिकांची मोजणी कोणत्याही टप्प्यावर असली तरी, ईव्हीएम ची मतमोजणी सैद्धांतिकदृष्ट्या सुरु राहील, तसेच टपाल मतपत्रिका मोजणी पूर्ण होण्यापूर्वी ती पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
4. पीडब्ल्यूडी (दिव्यांग जन) आणि ज्येष्ठ नागरिकांना (85+) घर बसल्या मतदान करता यावे, म्हणून निवडणूक आयोगाने अलिकडच्या काळात घेतलेल्या पुढाकारामुळे, टपाल मतपत्रिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
5. टपाल मतपत्रिकांची मोजणी साधारणपणे ईव्हीएमच्या मोजणीपूर्वी पूर्ण होते, हे लक्षात घेता, मतमोजणी प्रक्रियेत एकसमानता आणि अत्यंत सुस्पष्टता असावी, यासाठी निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला आहे की, यापुढे, ज्या मतमोजणी केंद्रावर टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे, त्या ठिकाणी टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम / व्हीव्हीपॅट मोजणीची उपांत्य (शेवटून दुसरी) फेरी हाती घेतली जाईल.
6. आयोगाने असेही निर्देश दिले आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने टपाल मतपत्रिका असतील, तिथे पुरेशा संख्येने टेबल आणि मतमोजणी कर्मचारी असतील याची संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री करावी, जेणेकरून कोणताही विलंब होणार नाही आणि मतमोजणी प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल.
*****
परिशिष्ट
गेल्या सहा महिन्यांमधील 29 उपक्रम:
I. मतदारांची सोय
1. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मोबाईल डिपॉझिट सुविधा. (लिंक)
2. गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1,200 पर्यंत मर्यादित ठेवणे. (लिंक)
3. मतदार माहिती पावतीवर (व्हीआयएस) मतदारांचा अनुक्रमांक आणि विभाग क्रमांक अधिक ठळकपणे समाविष्ट करण्यासाठी पावतीच्या डिझाइन मध्ये सुधारणा करण्यात आली. (लिंक)
4. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर उमेदवारांना त्यांचे बूथ उभारण्याची परवानगी देण्यात आली. (लिंक)
5. चांगल्या दृश्यमानतेसाठी ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो असतील. (लिंक)
II. निवडणूक यंत्रणेत सुधारणा आणि यंत्रणेचे बळकटीकरण
6. नोंदणीच्या आवश्यक अटींची पूर्तता करण्यात सतत अपयशी ठरलेल्या 808 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दोन फेऱ्यात यादीतून काढून टाकणे. (लिंक)
7. संविधानातील लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 आणि 1951; मतदार नोंदणी नियम, 1960; निवडणूक नियमांची अंमलबजावणी 1961 आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार 28 भारतीय निवडणूक आयोग भागधारकांच्या भूमिका अधोरेखित करणे आणि त्यांची व्याप्ती निश्चित करणे.(लिंक)
8. बुथ स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले जाणारे मानक फोटो ओळखपत्र.(लिंक)
9. निवडणूक निकालांच्या घोषणेनंतर ईव्हीएममधील पुसलेल्या मेमरीच्या किंवा मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मार्गदर्शक सूचना. (लिंक)
10. भारतीय निवडणूक आयोगाच्या कायदेशीर चौकटीला बळकटी देण्यासाठी आणि पुनर्निर्देशित करण्यासाठी कायदेशीर सल्लागार आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर राष्ट्रीय परिषद. (लिंक)
11. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थासोबत (EMBs) भारताची भागीदारी मजबूत करण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका. (लिंक)
III. राजकीय पक्षांसोबत सक्रिय सहभाग
12. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर देशभरात 4,719 सर्वपक्षीय बैठका झाल्या. (लिंक)
13. आतापर्यंत 25 मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाच्या बैठका झाल्या. (लिंक)
IV. तंत्रज्ञानाचा वाढता वापर
14. मतदार आणि इतर भागधारकांसाठी 40 हून अधिक ॲप्स आणि वेबसाइट्स समाविष्ट करणारे वन-स्टॉप डिजिटल व्यासपीठ, ECINET लाँच केले. (लिंक)
15. मतदान प्रक्रियेच्या निरंतर निरीक्षणाची खात्री करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर 100% वेबकास्टिंग. (लिंक)
16. विलंब टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी पीठासीन अधिकारी मतदानाची टक्केवारी थेट नवीन ECINET ॲपवर नोंद करतील. (लिंक)
17. मतदारसंघ पातळीवर निवडणूक-संबंधित डेटा जलद सामायिक होईल याची खात्री करण्यासाठी सुव्यवस्थित इंडेक्स कार्ड आणि सांख्यिकीय अहवाल निर्मिती. (लिंक)
18. फॉर्म 17 सी आणि ईव्हीएममधील विसंगतीच्या प्रत्येक प्रकरणात व्हीव्हीपॅट मोजणीची खात्री करणे. (लिंक)
V. मतदार यादी दुरुस्ती
19. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि मतदार यादीत कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही याची खात्री करण्यासाठी बिहारमध्ये विशेष गहन पुनिरीक्षण. (लिंक)
20. सुमारे 2 दशकांत पहिल्यांदाच, 4 राज्यात पोटनिवडणुकीपूर्वी विशेष सारांश निरीक्षण. (लिंक)
21. नोंदणीकृत मृत्यूंबद्दल निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी मृत्यू नोंदणी डेटाची जोडणी. (लिंक)
22. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी एकाच EPIC क्रमांकाचा वापर रद्द केला जात आहे. (लिंक)
23. मतदार यादी अद्यतनित झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत EPIC वितरणाची खात्री करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना आणि वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर SMS द्वारे माहिती देण्याची सुविधा. (लिंक)
VI. क्षमता निर्माण
24. पहिल्यांदाच, 7,000 हून अधिक बुथ स्तरावरील अधिकारी आणि बीएलओ पर्यवेक्षकांना आयआयआयडीईएम, नवी दिल्ली येथे प्रशिक्षण देण्यात आले.(लिंक)
25. बिहार, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) साठी आयआयआयडीईएम, नवी दिल्ली येथे प्रथमच प्रशिक्षण देण्यात आले.(लिंक)
26. 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील माध्यम आणि संवाद अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सुविधा .(लिंक)
27. बिहारमध्ये निवडणूक तयारीसाठी पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण.(लिंक)
28. भारतीय निवडणूक आयोग मुख्यालयात शिस्त लागू करणे, कार्यप्रवाहाचे डिजिटायझेशन आणि संसाधनांचा योग्य वापर. (लिंक)
बुथ स्तरावरील अधिकाऱ्यांचे मानधन वाढवून दुप्पट करण्यात आले, तर, बीएलओ पर्यवेक्षक आणि मतदान आणि मतमोजणी कर्मचारी, सीएपीएफ, देखरेख पथके आणि सूक्ष्म निरीक्षकांचे मानधन वाढवण्यात आले. (लिंक)
***
यश राणे / राजश्री आगाशे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172014)
Visitor Counter : 6