राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचे वितरण

Posted On: 26 SEP 2025 12:48PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भूविज्ञान क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठीचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. आज (26 सप्टेंबर 2025) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात हा समारंभ पार पडला.  

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीच्या विकासात खनिजांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भूगर्भात मिळणाऱ्या खनिजांनी मानवी जीवनाचा पाया रचला आहे, तसेच आपल्या व्यापारउदीमाला आकार दिला आहे. अश्म युग, धातू युग आणि लोह युग या मानव संस्कृतीच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांना खनिजजांची नावे दिली गेली. लोह आणि कोळसा या खनिजांशिवाय औद्योगिकरणाची कल्पना शक्य नव्हती. 

आर्थिक विकासासाठीचा स्रोत खाणींकडून पुरवला जातो आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतात. तथापि या उद्योगाचेही स्थानिकांचे स्थलांतर, जंगले नष्ट होणे आणि हवा, पाण्याचे प्रदूषण यासारखे बरेच दुष्परिणामदेखील आहेत. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी खाणकामामध्ये सर्व नियमांचे केकोर पालन व्हायला हवे. खाणी बंद करताना रहिवासी आणि वन्यप्राणी यांना इजा होणार नाही याची खात्री बाळगण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

आपल्या देशाला तीन बाजूंनी सागरी किनारपट्टी लाभली आहे असे त्यांनी अधोरेखित केले. या सागरांच्या तळाशी अनेक मौल्यवान खनिजांचा साठा आहे. या स्रोतांच्या देशाच्या विकासासाठी उपयोग करण्यामध्ये भूवैज्ञानिक महत्त्वाची भूमिका बजावतात. सागरी जैवविविधतेला धक्का न लावता देशाच्या भल्यासाठी सागरतळाशी असलेल्या या स्रोतांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना केले.  

राष्ट्रपती म्हणाल्या की,भूवैज्ञानिकांचे काम खनिजांपुरते मर्यादित नाही. त्यांनी खाणकामाचा भू-पर्यावरणीय शाश्वततेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणेदेखील गरजेचे आहे. खनिज उत्पादनांचा पुरेपूर वापर करुन त्यांचे वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि अमलात आणण्याची गरज आहे. शाश्वत खनिज विकासासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. खाण मंत्रालय शाश्वतता आणि नवोन्मेष याप्रती वचनबद्ध असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मंत्रालय खाण उद्योगात कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग आणि ड्रोनद्वारे सर्वेक्षण यांना प्रोत्साहन देत असल्याबद्दलही त्यांनी संतोष व्यक्त केला. खाणींमधल्या मौल्यवान द्रव्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी मंत्रालय करत असलेल्या उपाययोजनांची त्यांनी प्रशंसा केली.

राष्ट्रपती म्हणाल्या, दुर्मिळ खनिजे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा आहेत. स्मार्ट फोन, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण प्रणाली आणि हरित उर्जा पर्याय या सर्वांनाच बळ देण्याचे काम ही खनिजे करतात. सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत भारतानं खनिज निर्मितीत आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामध्ये आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय आवश्यक आहे. दुर्मिळ खनिजे केवळ ती कमी आहेत म्हणून दुर्मिळ मानली जात नाहीत तर त्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि त्यांना वापरास योग्य बनवण्याची प्रक्रिया कमालीची गुंतागुंतीची आहे म्हणून ती दुर्मिळ आहेत असे त्यांनी अधोरेखित केले. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे देशहिताच्या दृष्टीने खूप मोठे योगदान असेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

***

शिल्पा पोफळे / सुरेखा जोशी / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171749) Visitor Counter : 26