पंतप्रधान कार्यालय
अर्थसंकल्पानंतरच्या रोजगार निर्मितीला चालना देण्याविषयीच्या वेबसत्रामधील पंतप्रधानांचे भाषण
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2025 3:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2025
नमस्कार!
या अर्थसंकल्पावरील महत्त्वपूर्ण वेबसत्रामध्ये सर्वांचे स्वागत आणि अभिवादन! देशातले लोक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यात गुंतवणूक – हा विषय विकसित भारताचा मार्गदर्शक आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसतो. त्यामुळे, हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्याचा एक नकाशा म्हणून समोर आला आहे. आपण पायाभूत सुविधा आणि उद्योगांमध्ये गुंतवणुकीला जेवढे प्राधान्य दिले आहे, तेवढेच देशातले लोक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यांना दिले आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, देशाच्या प्रगतीसाठी क्षमता निर्मिती आणि प्रतिभेची जोपासना हे पायाभरणीचे काम करते. त्यामुळे, आता विकासाच्या पुढील टप्प्यात, या क्षेत्रांत अधिक गुंतवणूक करावी लागेल. यासाठी सर्व भागधारकांना पुढे यावे लागेल. कारण, हे देशाच्या आर्थिक यशासाठी आवश्यक आहे आणि प्रत्येक संस्थेच्या यशाचा आधारही आहे.
मित्रांनो,
देशातल्या लोकांमधील गुंतवणुकीचा दृष्टिकोन तीन आधारस्तंभांवर उभा आहे – शिक्षण, कौशल्य आणि आरोग्यसेवा! आज तुम्ही पाहत आहात की, भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अनेक दशकांनंतर मोठे बदल होत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण, आयआयटींचा विस्तार, शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा समावेश, कृत्रिम बुद्धिमत्तेचा पूर्ण उपयोग, पाठ्यपुस्तकांचे डिजिटायझेशन, 22 भारतीय भाषांमध्ये शिक्षण साहित्य उपलब्ध करणे, असे अनेक प्रयत्न मोहिमेच्या पातळीवर सुरू आहेत. यामुळे, आज भारताची शिक्षण व्यवस्था 21व्या शतकाच्या जागतिक गरजा आणि निकषांशी जुळवून घेत आहे.
मित्रांनो,
2014 पासून सरकारने 3 कोटींहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. आम्ही 1,000 आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि 5 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. युवकांचे प्रशिक्षण असे असावे की, ते आपल्या उद्योगांच्या गरजा पूर्ण करू शकतील, हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही जागतिक तज्ज्ञांची मदत घेत आहोत आणि आमचे युवक जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील याची खात्री करत आहोत. या सर्व प्रयत्नांमध्ये उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा सर्वात मोठा वाटा आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकमेकांच्या गरजा समजून घ्याव्यात आणि त्या पूर्ण कराव्यात. युवकांना वेगाने बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांना प्रत्यक्ष शिक्षणासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे. यासाठी सर्व भागधारकांना एकत्र यावे लागेल. आम्ही पीएम-इंटर्नशिप योजना सुरू केली आहे, ज्यामुळे युवकांना नवीन संधी आणि प्रत्यक्ष कौशल्ये मिळतील. या योजनेत जास्तीत जास्त उद्योगांनी प्रत्येक स्तरावर भाग घ्यावा याची खात्री करावी लागेल.
मित्रांनो,
या अर्थसंकल्पात 10,000 अतिरिक्त वैद्यकीय जागांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात 75,000 जागांची भर घालण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेली-मेडिसिन सुविधांचा विस्तार केला जात आहे. डे-केअर कॅन्सर केंद्रे आणि डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांद्वारे आम्ही दर्जेदार आरोग्यसेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. यामुळे लोकांच्या जीवनात किती मोठा बदल होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. यामुळे युवकांसाठी अनेक नवीन रोजगार संधीही निर्माण होतील. या सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला तितक्याच वेगाने काम करावे लागेल. तरच आम्ही अर्थसंकल्पातील घोषणांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकू.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांत आम्ही अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीकडे भविष्यवादी दृष्टिकोनातून पाहिले आहे. 2047 पर्यंत भारताची शहरी लोकसंख्या 90 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे हे तुम्हाला माहित आहेच. अशा मोठ्या लोकसंख्येसाठी नियोजित शहरीकरण आवश्यक आहे. यासाठी आम्ही 1 लाख कोटींच्या शहरी आव्हान निधीची सुरुवात केली आहे. यामुळे प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्थैर्य यावर लक्ष केंद्रित होईल आणि खासगी गुंतवणूक वाढेल. आपली शहरे शाश्वत शहरी गतिशीलता, डिजिटल एकीकरण आणि हवामान लवचिकता योजनेसाठी ओळखली जातील. आपल्या खासगी क्षेत्राने, विशेषतः स्थावर मालमत्ता आणि उद्योगांनी, नियोजित शहरीकरणावर लक्ष केंद्रित करावे आणि ते पुढे न्यावे. अमृत 2.0 आणि जल जीवन मिशन यासारख्या मोहिमांना पुढे नेण्यासाठी सर्वांना एकत्र काम करावे लागेल.
मित्रांनो,
आज जेव्हा आपण अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीबद्दल बोलत आहोत, तेव्हा पर्यटन क्षेत्रातील संभाव्यतेवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्राचा आपल्या जीडीपीमध्ये 10% पर्यंत योगदान अपेक्षित आहे. या क्षेत्रात कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. त्यामुळे, या अर्थसंकल्पात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. पर्यटनावर लक्ष केंद्रित करून देशभरातील 50 ठिकाणांचा विकास केला जाईल. या ठिकाणी हॉटेलांना पायाभूत सुविधांचा दर्जा देण्यामुळे पर्यटनाची सुलभता वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. होम-स्टेसाठी मुद्रा योजनेचा विस्तारही करण्यात आला आहे. ‘हील इन इंडिया’ आणि ‘लँड ऑफ द बुद्धा’ या मोहिमांद्वारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. भारताला जागतिक स्तरावरील पर्यटन आणि आरोग्य केंद्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मित्रांनो,
पर्यटनाबद्दल बोलताना, हॉटेल उद्योग आणि वाहतूक क्षेत्राव्यतिरिक्त, पर्यटनात इतर क्षेत्रांसाठीही नवीन संधी आहेत. म्हणूनच मी म्हणेन की, आपल्या आरोग्य क्षेत्रातील भागधारकांनी आरोग्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक करावी, ही संधी साधावी. आपण योग आणि आरोग्य पर्यटनाचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. शिक्षण पर्यटनातही आपल्याकडे खूप संधी आहेत. या दिशेने सविस्तर चर्चा व्हावी आणि आपण यासाठी एका मजबूत योजनेसह पुढे जावे अशी माझी इच्छा आहे.
मित्रांनो,
देशाचे भविष्य नवोन्मेषातील गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीय अर्थव्यवस्थेला लाखो कोटींची वाढ देऊ शकते. त्यामुळे, या दिशेने आपल्याला वेगाने पुढे जावे लागेल. या अर्थसंकल्पात एआय-चालित शिक्षण आणि संशोधनासाठी 500 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. भारत एआय च्या क्षमता विकसित करण्यासाठी राष्ट्रीय मोठे भाषा मॉडेल तयार करेल. या दिशेने आपल्या खासगी क्षेत्रानेही जगापेक्षा एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे. जग अशा एका विश्वासार्ह, सुरक्षित आणि लोकशाही असणाऱ्या देशाची वाट पाहत आहे जो एआय क्षेत्रामध्ये किफायतशीर सेवा देऊ शकेल. तुम्ही या क्षेत्रात आता जितकी गुंतवणूक कराल, तितका फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल.
मित्रांनो,
आता भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. या अर्थसंकल्पात स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 1 लाख कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे डीप टेक, फंड ऑफ फंड्ससह उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढेल. आयआयटी आणि आयआयएससीमध्ये 10,000 संशोधन शिष्यवृत्तींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे संशोधनाला चालना मिळेल आणि प्रतिभावान युवकांना संधी मिळतील. राष्ट्रीय भू-स्थानिक मिशन आणि राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान यामुळे नवनिर्मितीला गती मिळेल. संशोधन आणि नवनिर्मिती क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्तरावर एकत्र काम करावे लागेल.
मित्रांनो,
ज्ञान भारतम मिशनद्वारे भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचे संरक्षण करण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. या मिशनद्वारे एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर केले जाईल. त्यानंतर एक राष्ट्रीय डिजिटल भांडार तयार केले जाईल, त्यामुळे जगभरातील विद्वान आणि संशोधकांना भारताच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक ज्ञान आणि शहाणपणाची माहिती मिळेल. भारताच्या वनस्पती अनुवांशिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सरकार राष्ट्रीय जीन बँक स्थापन करत आहे. या उपक्रमाचा उद्देश पुढील पिढ्यांसाठी अनुवांशिक साधनसंपत्ती आणि अन्न सुरक्षेची खातरजमा करणे हा आहे. अशा प्रयत्नांचा विस्तार आपल्याला करावा लागेल. आपल्या विविध संस्था आणि क्षेत्रांनी या प्रयत्नांमध्ये भागीदार बनावे.
मित्रांनो,
फेब्रुवारीमध्येच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. या अहवालानुसार, 2015 ते 2025 या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेने 66 टक्के वाढ नोंदवली आहे. भारत आता 3.8 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला आहे. ही वाढ अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे. लवकरच भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. आपल्याला योग्य दिशेने पुढे जावे लागेल, योग्य गुंतवणूक करावी लागेल आणि आपली अर्थव्यवस्था या प्रकारे विस्तारित करावी लागेल. यात अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणीही मोठी भूमिका बजावते. यात तुम्हा सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे.
माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि मला खात्री आहे की, गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्प जाहीर करून आपण "तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे करतो" ही परंपरा मोडली आहे. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी आम्ही तुमच्यासोबत असतो, अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतरही आम्ही तुमच्यासोबत असतो आणि अंमलबजावणीसाठी एकत्र काम करतो. कदाचित असे सार्वजनिक सहभागाचे मॉडेल खूप दुर्मिळ आहे. आणि मला आनंद आहे की, हा विचारमंथनाचा कार्यक्रम दरवर्षी गतीमान होतो आहे, लोक त्यात उत्साहाने सहभागी होत आहेत, आणि अर्थसंकल्पापूर्वी आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो त्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतात असे प्रत्येकाला वाटत आहे. मला खात्री आहे की, हे सामूहिक विचारमंथन 140 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावेल. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
धन्यवाद.
* * *
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2169482)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam