पंतप्रधान कार्यालय
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेच्या संयुक्त सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
04 JUL 2025 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2025
महामहिम पंतप्रधान कमला परसाद-बिसेसर,
सिनेटचे माननीय अध्यक्ष वेड मार्क,
आदरणीय सभापती जगदेव सिंह,
सन्माननीय मंत्री महोदय,
सन्माननीय संसद सदस्य,
नमस्कार!
सुप्रभात !
एक गौरवशाली लोकशाही आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्राच्या निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनो, आपल्या समोर उभे राहण्याची संधी मिळाली, याचा मला खूप अभिमान वाटतो.
मी भारतातील 1.4 अब्ज लोकांकडून शुभेच्छा घेऊन आलो आहे. मी इथे येण्यापूर्वी भेट दिलेल्या घानाच्या लोकांकडूनही मी शुभेच्छा घेऊन आलो आहे.
या प्रतिष्ठित ‘रेड हाऊस’ मध्ये तुमच्याशी संवाद साधणारा मी पहिला भारतीय पंतप्रधान असल्याचा मला अभिमान आहे. या ऐतिहासिक वास्तूने त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठीचा संघर्ष आणि बलिदान पाहिले आहे. गेल्या सहा दशकांमध्ये, तुम्ही एक न्याय्य, समावेशक आणि समृद्ध लोकशाही उभारताना ‘रेड हाऊस’ कायम मजबूतीने उभे राहिले आहे.
मित्रांनो,
या महान राष्ट्राच्या लोकांनी दोन महिला नेत्यांची उल्लेखनीय निवड केली आहे - राष्ट्रपती आणि पंतप्रधान. त्या अभिमानाने स्वतःला परदेशस्थ भारतीय कन्या म्हणवतात. त्यांना त्यांच्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. भारतात, आम्ही त्यांचे नेतृत्व, धैर्य आणि दृढनिश्चयाचे कौतुक करतो. त्या आपल्या देशांमधील संबंधांचे जिवंत प्रतीक आहेत. हे संबंध सामायिक पाळेमुळे आणि सामायिक स्वप्ने यांच्यावर विणले गेले आहेत.
सन्माननीय सदस्यांनो,
आपण दोन्ही राष्ट्रे वसाहतवादी राजवटीच्या सावलीतून बाहेर पडून मोठ्या धैर्याने पुढची वाटचाल करताना साहसाची शाई वापरून लोकशाहीसारख्या लेखणीने यशोगाथा लिहीत आहोत.
आज, आपली दोन्ही राष्ट्रे आधुनिक जगात अभिमानास्पद लोकशाही आणि शक्तीचे आधारस्तंभ म्हणून उभी आहेत. काही महिन्यांपूर्वी, तुम्ही निवडणुकीत सहभागी होवून लोकशाहीचा उत्सव साजरा केला. मी या देशातील जनतेचे त्यांच्या हुशारीचे आणि शांतता, स्थिरता आणि समृद्धीविषयक दूरदृष्टीसाठी अभिनंदन करतो. मी या सभागृहातील सन्माननीय नवनिर्वाचित सदस्यांचेही अभिनंदन करतो.
पुन्हा एकदा सरकार स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान कमलाजींना विशेष शुभेच्छा देतो आणि या महान राष्ट्राला शाश्वत विकास आणि समृद्धीकडे नेण्यासाठी त्यांना यश मिळावे, अशा मी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
ज्यावेळी मी सभापतींच्या खुर्चीवर कोरलेले सोनेरी शब्द पाहतो:
"FROM THE PEOPLE OF INDIA TO THE PEOPLE OF TRINIDAD AND TOBAGO",
("भारतातील लोकांपासून त्रिनिदाद आणि टोबागोच्या लोकांपर्यंत")
मला भावनांची खोली जाणवते. ती खुर्ची केवळ फर्निचरची एक वस्तू नाही, तर आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री आणि विश्वासाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे शब्द एका लोकशाहीला, दुसऱ्या लोकशाहीबद्दल जाणवणारे बंधन व्यक्त करतात.
तुम्हा सर्वांना माहिती आहे...
भारतीयांसाठी लोकशाही हे केवळ एक राजकीय ‘मॉडेल’ नाही.
आमच्यासाठी ती एक जीवनशैली आहे...
आमचा हजारो वर्षांचा एक महान वारसा आहे.
या संसदेत असे अनेक सहकारी आहेत... ज्यांचे पूर्वज बिहारचे आहेत...
हे बिहार राज्य म्हणजे, महाजनपदांची प्राचीन प्रजासत्ताकांची भूमी आहे.
भारतात, लोकशाही ही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही. आमच्यासाठी ती एक जीवनशैली आहे. तुमच्या संसदेत असे काही सदस्य आहेत, ज्यांचे पूर्वज भारतातील बिहार राज्यातले आहेत. हे राज्य वैशालीसारख्या जागेसाठी प्रसिद्ध आहे.
मित्रांनो,
आपल्या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये एक नैसर्गिक उबदारपणा आहे. मला इथे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ते म्हणजे; भारतीय वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे सर्वात उत्साही चाहते आहेत! ज्यावेळी ते भारताविरुद्ध खेळत असतात, तो काळ सोडला तर आम्ही त्यांचा मनापासून जयजयकार करतो आणि त्यांचे उत्साहवर्धन करतो.
आपल्या दोन्ही देशांमधील संबंध शतकानुशतके जुन्या बंधांच्या पायावर रोवलेले आहेत. 180 वर्षांपूर्वी, एका लांब आणि कठीण प्रवासानंतर पहिले भारतीय या भूमीवर आले. समुद्रापार दूर, भारतीय सूर कॅरिबियन लयीत सुंदरपणे मिसळले होते.
येथे, भोजपुरीने क्रिओलबरोबर संतुलन स्थापन केलेले दिसून येते.
दाल पुरी आणि डबल्स यांची गाठभेट झाली.
तसेच तबला आणि स्टीलच्या भांड्याची जोडी जमली !
आज, भारतीय वंशाचे लोक लाल, काळा आणि पांढरा रंगाच्या ध्वजाचे अभिमानाने वाहक बनले आहेत!
राजकारणापासून ते कविता, क्रिकेटपासून ते वाणिज्य, कॅलिप्सो ते चटणी, अशा प्रत्येक क्षेत्रात मूळ भारतीय मंडळींचे योगदान आहे. तुम्ही सर्वजण ज्या विविधतेचा आदर करता त्याचा ते अविभाज्य भाग आहेत. एकत्रितपणे, तुम्ही एक असे राष्ट्र निर्माण केले आहे. "एकत्रितपणे आपण आकांक्षा बाळगतो, एकत्रितपणे आपण साध्य करतो" या तुमच्या बोधवाक्याचे पालन करीत हे राष्ट्र पुढे जात आहे.
मित्रांनो,
आज सकाळी, महामहिम राष्ट्रपतींनी मला देशाचा हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने मी नम्रतेने तो स्वीकारला.
आता, अपार कृतज्ञतेने, मी हा पुरस्कार आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील शाश्वत मैत्री आणि पूर्वजांच्या नात्यांना समर्पित करतो.
मित्रांनो,
या सभागृहात इतक्या महिला सदस्यांना पाहून मला आनंद झाला. महिलांचा आदर भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. आपल्या महत्त्वाच्या पवित्र ग्रंथांपैकी एक, स्कंद-पुराण म्हणते:
दशपुत्र समा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन् |
यत् फलं लभते मर्त्यः तत् लभ्यं कन्या एकया ||
याचा अर्थ, एक मुलगी 10 मुलांइतकाच आनंद देते. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आपण महिलांचे हात बळकट करत आहोत.
अंतराळापासून क्रीडा, स्टार्टअप्स ते विज्ञान, शिक्षण ते उद्योग, विमान वाहतूक ते सशस्त्र दल, विविध क्षेत्रात ते भारताला एका नवीन भविष्याकडे घेऊन जात आहेत. तुमच्यासारखीच, आमच्याकडे एक महिला आहे, त्या सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आमच्या राष्ट्रपती बनल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी, भारतीय संसदेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. आम्ही संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण सुनिश्चित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे येणाऱ्या पिढ्यांमध्ये, अधिकाधिक महिला देशाचे भवितव्य आणि दिशा ठरवतील याची खात्री होते.
भारतातील तळागाळातील महिला नेत्याही मोठ्या संख्येने आता पुढे येत आहेत. सुमारे 1.5 दशलक्ष निवडून आलेल्या महिला स्थानिक प्रशासन संस्थांना बळकटी आणत आहेत. आपण महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या युगात आहोत. आमच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात आम्ही ज्या महत्त्वाच्या विषयांना पुढे नेले त्यापैकी हा एक महत्त्वाचा विषय होता.
आम्ही भारतात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे एक नवीन मॉडेल विकसित करत आहोत. आमच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही या मॉडेलचे यश जगासमोर दाखवून दिले.
मान्यवर सदस्यांनो,
आज, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक समाज या विकासाच्या गाथेचा भाग आहे.
भारताचा विकास सर्वसमावेशक आणि लोककेंद्रित आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अलिकडच्या अहवालात असे नमूद केले आहे की, भारताच्या सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी छत्राखाली 950 दशलक्ष लोक आहेत. म्हणजे जवळजवळ 1 अब्ज लोक, जे जगातील बहुतेक देशांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे!
अशा समावेशक विकासाचे आमचे स्वप्न आमच्या सीमांपुरते मर्यादित नाही. आम्ही आमच्या विकासाकडे इतरांप्रती असलेली जबाबदारी म्हणून देखील पाहतो. आणि आमचे प्राधान्य नेहमीच ‘ग्लोबल साऊथ’ला असेल.
त्याच भावनेने, आम्ही त्रिनिदाद आणि टोबॅगोशी आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत. आमचा व्यापार वाढतच राहील. आम्ही आमच्या व्यवसायांना या देशात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू. आमची विकास भागीदारी वाढेल. प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि कौशल्य विकास मानवी विकासाला केंद्रस्थानी ठेवतील. आरोग्य आमच्या भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि राहील. अनेक भारतीय डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी येथे वैशिष्ट्यपूर्ण सेवा देत आहेत. तुम्ही भारतीय वैद्यकीय मानकांना मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे सर्वांना उच्च दर्जाची, परवडणारी औषधे उपलब्ध होतील.
यूपीआय डिजिटल पेमेंट सिस्टीम स्वीकारण्याच्या तुमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हे एक मोठे पाऊल आहे. यूपीआय ने भारतात डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणली आहे.
या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, भारत जगात सर्वाधिक रिअल टाइम डिजिटल पेमेंट करणारा देश बनला आहे. आज भारतात, आंबा विक्रेत्यांकडेही क्यूआर कोड आहेत. जर तुम्ही त्यांना रोखीने पैसे देण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला यूपीआय वापरण्यास सांगतील, कारण त्यांच्याकडे चिल्लर/सुटे पैसे नाहीत!
आम्ही इतर डिजिटल नवोपक्रमांवरही सहकार्य करण्यास उत्सुक आहोत. दक्षिणेमध्ये वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञाचलित साधने विकसित करत असताना, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे आमच्यासाठी प्राधान्य असलेले राष्ट्र असेल. आम्ही शेती, फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आमचे कौशल्य सामायिक करू. भारतातील यंत्रसामग्री तुमच्या कृषी उद्योगाला पाठिंबा देईल. आणि विकास हा सन्मानाचा विषय असल्याने, आम्ही येथे दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम अवयव बसवण्याचे शिबिर आयोजित करू.
आमच्यादृष्टीने, तुमच्यासोबतच्या सहकार्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांवर आम्ही नेहमीच लक्ष केंद्रित करू.
मित्रांनो,
आपल्या देशांच्या दरम्यान असलेल्या एकतानतेमध्ये अमर्याद आश्वासने दडलेली आहेत. कॅरिबियन क्षेत्रातील महत्त्वाचा देश आणि लॅटिन अमेरिकेला जोडणारा सेतू म्हणून त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये फार मोठी क्षमता आहे. मला खात्री आहे की, आपल्या देशांतील बंध आपल्याला विस्तृत भागाशी अधिक सशक्त नाते निर्माण करण्यात मदत करतील.
दुसऱ्या भारत-कॅरीकॉम परिषदेच्या घडामोडींच्या आधारावर, आम्ही व्यापार आणि गुंतवणूक वाढवणाऱ्या, पायाभूत सुविधा तसेच गतिशीलता विषयक सुविधा उभारणाऱ्या, समुदाय विकास प्रकल्प लागू करणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात क्षमता निर्मिती, प्रशिक्षण तसेच कौशल्य विकास करणाऱ्या उपक्रमांसाठी एकमेकांशी सहयोगी संबंध जोडण्यास उत्सुक आहोत.
मित्रांनो,
मी आपल्या भागीदारीकडे अधिक मोठ्या जागतिक चौकटीतून देखील बघतो. जगात सध्या बदलांचे प्रमाण आणि वेग अभूतपूर्व आहे. राजकारण आणि सत्ता यांच्या स्वरूपांमध्ये देखील मूलभूत स्थित्यंतरे घडून येत आहेत. मुक्त व्यापार तणावाखाली आहे. जागतिक विभाजने, विवाद आणि विषमता यांचे प्रमाण वाढत आहे.
हे जग हवामान बदल, अन्न, आरोग्य आणि उर्जा सुरक्षा याविषयीच्या आव्हानांना तोंड देत आहे. दहशतवादाचा एक गंभीर धोका आहे. भूतकाळातील वसाहतवादी शासन संपले असले तरीही त्यांच्या गडद सावल्या नव्या स्वरुपात अजूनही रेंगाळत आहेत.
अवकाश आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात नवी आव्हाने उभी रहात आहेत. कृत्रिम प्रज्ञेचे क्षेत्र नव्या संधींसोबत नव्या जोखमींचा धोका देखील वाढवत आहे. जुन्या संस्था शांतता आणि प्रगती प्रस्थापित करण्यासाठी झगडत आहेत.
त्याच वेळी, जगाच्या दक्षिणेकडील देश उदयाला येत आहेत. या देशांना नवी आणि अधिक चांगली जागतिक व्यवस्था निर्माण झालेली पाहण्याची इच्छा आहे. जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 75 वर्षे झाली, तेव्हा विकसनशील जगात मोठे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. या देशांचा दीर्घकाळ प्रलंबित सुधारणा प्रत्यक्षात होण्याची आशा, त्यांचा आवाज शेवटी ऐकला जाण्याची आशा लागली होती.मात्र ही आशा आता निराशेत रुपांतरीत झाली आहे. विकसनशील विश्वाचा आवाज अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. भारताने नेहमीच ही दरी सांधण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतासाठीची महासागर- प्रदेशांदरम्यान सुरक्षितता आणि वृद्धीसाठी परस्पर आणि समग्र प्रगती – ही संकल्पना जगाच्या दक्षिणेकडील देशांसाठी मार्गदर्शक दृष्टीकोन ठरली आहे. आम्हाला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा आम्ही जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या मतांना महत्त्व दिले आहे.
आमच्या जी-20 अध्यक्षतेच्या कालावधीत आम्ही जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या समस्यांना जागतिक निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. जागतिक महामारीच्या दरम्यान, आमच्या 1.4 अब्ज लोकांची काळजी घेतानाच, भारताने जगातील 150 हून अधिक देशांना लसींचा तसेच औषधांचा पुरवठा केला. कोणत्याही आपत्तीच्या काळात आम्ही मदतसाहित्य, बचावकार्य आणि ऐक्यभावनेसह तातडीने प्रतिसाद दिला आहे. आपली विकासविषयक भागीदारी मागणी-प्रेरित आणि कोणत्याही अटींशिवाय स्थापन झालेली आहे.
सन्माननीय सदस्यांनो,
आता आपण जगाच्या दक्षिणेकडील देशांना योग्य मंचावर योग्य स्थान मिळवून देण्यासाठी, एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. हवामानासंदर्भातील न्याय सुनिश्चित करताना, हवामानविषयक समस्या निर्माण करण्यात ज्यांचा सर्वात कमी वाटा आहे, त्यांच्यावर उपाययोजनांचे ओझे लादले जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. या प्रयत्नात त्रिनिदाद आणि टोबॅगो यांना आम्ही आमचे महत्त्वाचे सहकारी मानतो.
मित्रांनो,
आपले दोन देश आकार आणि भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे असतील, मात्र आपण आपल्या मूल्यांच्या बाबतीत तीव्रतेने एकरूप झालेले आहोत. आपण लोकशाहीचा अभिमान बाळगणारे देश आहोत. आपण चर्चा, सार्वभौमत्व, बहुपक्षीयता आणि मानवी प्रतिष्ठा यांच्यावर विश्वास ठेवतो. संघर्षांच्या या काळात, आपण आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. या ‘रेड हाऊस’ ने स्वतःच दहशतवादाच्या जखमा आणि निष्पाप लोकांचा रक्तपात पाहिला आहे. दहशतवादाला कोणताही आश्रय किंवा जागा देणे ठामपणे नाकारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहायला हवे. दहशतवादाविरोधातील आमच्या लढ्यात आमच्यासोबत उभे राहिल्याबद्दल आम्ही या देशाची जनता आणि सरकारचे आभार मानतो.
मित्रांनो,
आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला, त्याग केला आणि भावी पिढ्यांसाठी अधिक चांगल्या जीवनाची स्वप्ने पाहिली. भारत तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन्ही देशांनी आपापल्या जनतेला ज्या भविष्याचे वचन दिले आहे त्या दिशेने प्रवास करत फार मोठा पल्ला गाठला आहे. पण अजूनही आपल्याला बरेच काही करून दाखवायचे आहे – तेही स्वतःहून आणि एकत्र येऊन.
ते भविष्य घडवण्यात संसदेचे सदस्य म्हणून तुम्हा सर्वांची फार महत्त्वाची भूमिका आहे. अयोध्या ते अरिमा, गंगेच्या घाटांपासून ते परियाच्या आखातापर्यंत, आपले बंध अधिकाधिक दृढ व्हावीत आणि आपल्या स्वप्नांनी अधिक उंची गाठावी.
याच विचारासह, मी या सन्मानासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जसे तुम्ही येथे कृपा आणि अभिमानाने म्हणता – “रिस्पेक्ट ड्यू.’’
धन्यवाद. खूप खूप आभार.
* * *
सुवर्णा बेडेकर/हेमांगी कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168312)
Visitor Counter : 14
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam