अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेअंतर्गत पात्र कर्मचारी आणि निवृत्त झालेल्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025
विशिष्ट अटींना अधिन राहून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेमधून राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थे मध्ये परत येण्याची एकवेळ मर्यादेची सुविधाही उपलब्ध
Posted On:
18 SEP 2025 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2025
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचना क्र. F. No. FX-1/3/2024-PR नुसार एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेविषयी (Unified Pension Scheme - UPS) सूचना जारी केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेअंतर्गत (National Pension System) अंतर्गत पात्र कर्मचारी आणि यापूर्वी निवृत्त झालेल्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजने निवडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे, असे या सूचनेअंतर्गत आर्थिक सेवा विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यांच्या विनंतींवर वेळेवर प्रक्रिया करता यावी यासाठी, अंतिम मुदतीपूर्वीच यासंदर्भातला पर्याय निवडावा, असे आवाहन विभागाने केले आहे. जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये राहण्याचा निर्णय घेतील, त्यांना या नमूद तारखेनंतर एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडता येणार नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
याव्यतिरिक्त, 25 ऑगस्ट 2025 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापन क्र. 1/3/2024-PR नुसार एक-वेळ, एक-मार्गी बदलाची सुविधाही विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ज्यांनी आधीच एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडली आहे अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. याअंतर्गत त्यांना खालील विशिष्ट अटींच्या अधिन राहून राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये परत येण्याची मुभा दिली जाईल:
एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र कर्मचारी फक्त एकदाच राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये परत येऊ शकतात, आणि परत एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेमध्ये जाऊ शकत नाहीत.
हा बदल सेवानिवृत्तीच्या किमान एक वर्ष आधी किंवा ऐच्छिक सेवानिवृत्तीच्या तीन महिने आधी, यापैकी जे लवकर असेल त्या कालावधीत करणे आवश्यक असेल.
शिक्षा म्हणून सेवेतून काढून टाकणे, बडतर्फी किंवा सक्तीची सेवानिवृत्ती यांसारख्या प्रकरणांमध्ये, किंवा ज्या प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कार्यवाही चालू आहे किंवा प्रस्तावित आहे, अशा परिस्थितीत ही बदलाची सुविधा दिली जाणार नाही.
जे कर्मचारी विहित वेळेत बदलाचा पर्याय निवडणार नाहीत, ते आपोआप एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेमध्येच राहतील.
जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये राहण्याचा निर्णय घेतील, त्यांना 30 सप्टेंबर 2025 नंतर एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडता येणार नाही.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचे नियोजन करण्यासाठी माहितीपूर्ण निवडीचा पर्याय उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडल्याने कर्मचारी भविष्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेमध्ये परत येण्याचा आपला पर्याय राखून ठेवू शकतील.
शिल्पा पोफाळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168048)