गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याअंतर्गत दिल्ली सरकारच्या सुमारे 1,723 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
आज देशातील प्रत्येक नागरिक आणि जगभरात राहणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहेत - अमित शाह
भारतातील प्रत्येक नागरिकाने देशात बनलेल्या वस्तू खरेदी करण्याचा संकल्प करण्याची ही वेळ असून त्यातूनच समृद्ध भारत साकारता येईल - अमित शाह
Posted On:
17 SEP 2025 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सेवा पंधरवड्याअंतर्गत दिल्ली सरकारच्या सुमारे 1,723 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आज देशातील प्रत्येक नागरिक आणि जगभरातील भारतीय वंशाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा देत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून गेली 11 वर्षांपासून संपूर्ण देश 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सेवा पंधरवड्याअंतर्गत देशभरातील ग्रामपंचायती, जिल्हा पंचायती, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांद्वारे स्वच्छता अभियानासोबतच, गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचा प्रारंभ केला जातो असे शाह यांनी सांगितले. या सेवा पंधरवड्याची सुरुवात देशातील प्रत्येक तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेत, इतरांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीगेल्या 24 वर्षांच्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात कधीही सुट्टी घेतली नाही, त्यांनी देशाचा विकास आणि गरिबांच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षण अविरतपणे काम केले असल्याचे शाह यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. त्यांच्या याच समर्पणामुळे भारताची अर्थव्यवस्था आज जागतिक पातळीवर 11 व्या क्रमांकावरून 4 थ्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि, 2027 पर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचावी असे उद्दिष्ट पंतप्रधानांनी समोर ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत आहेत ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

यावेळी शाह यांच्या हस्ते दिल्लीमधील नरेला - बवाना इथल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्पाअंतर्गत दररोज 3,000 टन इतक्या कचऱ्यावर, तर ओखला इथल्या प्रकल्पात 2,000 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून, या प्रक्रियेतून वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती शाह यांनी दिली. यामुळे चक्रीय अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक भारतीयाने भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देणे हीच आपली सवय आणि समृद्ध भारताचे ध्येय साध्य करण्यासाठीचा सामूहिक संकल्प बनला पाहिजे, असे ते म्हणाले.
आपल्या मतदार याद्यांमधून घुसखोरांना वगळले पाहिजे की नाही, असा सवालही केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपस्थितांना विचारला. विरोधी पक्षांचा या देशातील नागरिकांवर विश्वास नाही आणि ते घुसखोरांच्या जोरावरच निवडणुका जिंकू इच्छितात, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167880)
Visitor Counter : 2