गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिष्टचिंतन


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आणि लाखो देशवासीयांसाठी प्रेरणा आहेत

लाखो देशवासीयांच्या जीवनात कल्पनातीत परिवर्तन घडवून त्यांना 'विकसित' आणि 'आत्मनिर्भर भारत' निर्मितीच्या वाटचालीत सामावून घेणाऱ्या मोदीजींचा सर्व देशवासियांना अभिमान

गरिबांचे कल्याण आणि आर्थिक विकास एकाच वेळी साधता येतो हे पंतप्रधान मोदींनी केले सिद्ध

युद्धे, तणाव आणि जागतिक लॉबीच्या काळात, पंतप्रधान मोदींचा संवादसेतू म्हणून उदय

जगातील 27 देशांनी विश्व मित्र मोदीजींचा सर्वोच्च नागरी सन्मानाने केलेला गौरव म्हणजे त्यांच्या जागतिक नेतृत्वाचे द्योतक

Posted On: 17 SEP 2025 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक, लाखो देशवासीयांसाठी प्रेरणास्थान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पंतप्रधान मोदी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील पाच दशकांहून अधिक काळ देशवासीयांच्या कल्याणासाठी अविश्रांत परिश्रम घेत आहेत आणि प्रत्येक नागरिकासाठी ते  'राष्ट्र प्रथम' ची जाज्वल्य प्रेरणा आहेत असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांनी प्रशासनात सचोटी, निर्णयांमध्ये दृढता आणि धोरणांमध्ये स्पष्टता आणली आणि उपेक्षित, मागासलेले, गरीब, महिला आणि आदिवासी समुदायांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे संस्मरणीय कार्य केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शाह म्हणाले की, लाखो देशवासीयांच्या जीवनात कल्पनातीत परिवर्तन घडवून त्यांना 'विकसित' आणि 'आत्मनिर्भर भारत' निर्मितीच्या वाटचालीत सामावून घेणाऱ्या पंतप्रधान मोदींचा सर्व देशवासियांना अभिमान आहे.

गेल्या चार दशकांपासून मोदीजींना विविध भूमिकांमध्ये पाहिले असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. संघ प्रचारक, पक्षकार्यकर्ता, गुजरातचे मुख्यमंत्री किंवा गेल्या 11 वर्षांपासून भारताचे पंतप्रधान म्हणून, मोदीजींनी नेहमीच देशाला सर्वोपरी ठेवले आहे असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, माझ्यासारखे कार्यकर्ते भाग्यवान आहेत की मला त्यांच्यासोबत प्रत्येक भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली.

विकासाची कल्पनाही न केलेल्या आणि क्वचितच उल्लेख झालेल्या क्षेत्रांना गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदींनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आसाममधील सर्वात लांब पूल, काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल, सेमीकंडक्टर युनिट्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही सर्व मोदी सरकारच्या काळात भारत प्रत्येक क्षेत्रात अव्वल असल्याचे प्रतीक आहेत असा गौरवपूर्ण उल्लेख अमित शाह यांनी केला. शाह म्हणाले की, आज, जेव्हा रस्त्यावरील विक्रेते देखील अभिमानाने युपीआय चा अंगीकार करतात, तेव्हा नरेंद्र मोदींची खरी ओळख पटते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबी कल्याणासोबतच अर्थव्यवस्था  वृद्धीही साध्य होऊ शकते, हे जगाला दाखवून दिले, असे शाह  यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगातील 11 व्या अर्थव्यवस्थेवरुन चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंतची झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताला जागतिक अर्थव्यवस्थेतील उज्वल तारा  असे संबोधले असून, भारताचा विकासदर हा जगातील सर्वाधिक आहे. आज देशातील 60 कोटी लोक गरिबीच्या विळख्यातून बाहेर येत असून देश जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रणी होत आहे, असे शाह   यांनी सांगितले. ही किमया केवळ मोदी यांच्या युगातच शक्य झाली आहे, असे त्यांनी नमुद केले.

पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आणि अडचणींना दुर करण्यासाठी  त्यांची बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये असून, संपूर्ण जग त्यांना अडचण दुर करणारा नेता म्हणून ओळखत आहे, असे शाह  यांनी सांगितले. युद्ध, तणाव आणि जागतिक गटबाजीच्या काळातही पंतप्रधान मोदी जगासमोर संवादाचा पूल बनून उभे राहिले आहेत, असे ते म्हणाले. जगातील 27 देशांनी विश्वमित्र मोदीजींना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला असून, हे त्यांच्या जागतिक नेतृत्वाचे प्रत्यंतर आहे, असे शाह  यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक आकांक्षांचे केंद्र बनला आहे. स्वदेशी कोविड लस, स्वदेशी संरक्षण प्रणाली, स्टार्टअप्स, नवनिर्मिती, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळवून देणे आणि उत्पादन क्षेत्रातील मोहिम या सर्व माध्यमांतून पंतप्रधान मोदी आत्मनिर्भर भारत घडवत आहेत. नरेंद्र मोदी हे देशासाठी त्याग, संयम आणि संपूर्ण समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, असे अमित शाह  यांनी म्हटले आहे

 

 

 

 

 

 

 

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167860) Visitor Counter : 2