पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतरत्न डॉ. भुपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामच्या गुवाहाटी येथील समारंभातील संबोधन

Posted On: 13 SEP 2025 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2025

 

मी म्हणेन भुपेन दा! आपण म्हणा अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! भुपेन दा, अमर रहे! अमर रहे! आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा जी, अरुणाचल प्रदेश के युवा मुख्यमंत्री पेमा खांडू जी, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वांनंद सोनोवाल जी, व्यासपीठावर उपस्थित भूपेन हजारिका जी यांचे बंधू श्री समर हजारिका जी, भूपेन हजारिकाजींची बहिण श्रीमती कविता बरुआ जी, भूपेन दा यांचे पुत्र श्री तेज हजारिका जी, तेज, केम छो! उपस्थित इतर मान्यवर आणि आसामधील माझ्या बंधू आणि भगिनींनो!

आजचा दिवस विलक्षण आहे आणि हा क्षणही बहुमूल्य आहे. मी जे दृश्य इथे पाहिले, उत्साह, समन्वय मला येथे पहायला मिळाला, भुपेन संगीताची लय दिसली, भुपेन दा यांच्या शब्दांत जर मला सांगायचे तर, माझ्या मनात सतत एकच गोष्ट येत होती, ती म्हणजे समय ओ धीरे चलो! समय ओ धीरे चलो! भुपेन संगीताची ही लाट अशीच प्रत्येक दिशेने वहात राहो, वहात राहो, असेच मनात येत होते. या संगीत आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मी कौतुक करतो. आसामचे वैशिष्ट्यच आहे की, अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये नवीन विक्रम नोंदवले जातात. आजही झालेल्या कार्यक्रमाची मोठी तयारी दिसून येत होती. आपल्या सर्वांचे अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा!

मित्रांनो,

काही दिवसांपुर्वी, म्हणजे आठ सप्टेंबर रोजी भुपेन हजारिका यांचा जन्मदिवस होता. त्या दिवशी भूपेन दा यांना समर्पित एका लेखातून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्यच आहे. आत्ता, हेमंत बिस्वा म्हणत होते की मी इथे येऊन उपकार केले, पण ते उलट आहे! अशा पवित्र प्रसंगी उपस्थित राहणे हे माझे सौभाग्य आहे. भुपेन दा यांना आपण सर्वच प्रेमाने शुधा कॉन्ठो म्हणत असू. भारताच्या भावनांना आवाज देणाऱ्या, संगीताला संवेदनाशी जोडणाऱ्या, संगीतामध्ये भारताच्या स्वप्नांना फुलवणाऱ्या आणि ज्यांनी माँ गंगा हिच्या माध्यमातून मां भारतीची करुणा व्यव्क्त करणाऱ्या शुधा कॉन्ठोचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 

गंगा बहती हो क्यो?, गंगा बहती हो क्यो?

मित्रांनो, 

भुपेनदा यांनी अनेक अमर रचना रचल्या, आपल्या स्वरांतून भारताला जोडत राहिल्या, भारतातल्या पिढ्यांना धक्का देत राहिल्या. 

बंधू-भगिनींनो, 

भुपेनदा, शरीराने आपल्यात राहिले नाही, परंतु त्यांची गाणी, त्यांचे सूर आजही भारताच्या विकास प्रवासाचे साक्षीदार आहेत, त्याला ताकद देत आहे. आमचे सरकार अभिमानाने भुपेनदांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करते आहे. आम्ही भुपेन हजारिकाजींच्या गीतांना, त्यांच्या संदेशांना आणि त्यांचा जीवन प्रवास घराघरांत पोहोचवतो आहोत. आज इथे त्यांचे आत्मचरित्रदेखील इथे प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी मी डॉक्टर भुपेन हजारिका यांना श्रद्धेने नमस्कार करतो. आसामच्या प्रत्येक भारतीयाला भुपेनदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देतो. 

मित्रांनो,

भुपेन हजारिकाजींनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. संगीत जेव्हा साधना होते, तेव्हा ते आपल्या आत्म्याला स्पर्श करते आणि जेव्हा संगीत संकल्प होतो, तेव्हा ते समाजाला नवीन दिशा देणारे माध्यम होते. भुपेनदांचे संगीत म्हणून वैशिष्टपूर्ण होते. त्यांनी जगलेले आदर्श, घेतलेले अनुभव आपल्या गीतांमधून गायले. त्यांच्या गीतांमध्ये आपल्याला भारतमातेसाठी एवढे प्रेम यासाठीच दिसू शकते कारण, ते स्वतःच एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना जगत होते. आपण पहाल, त्यांचा जन्म ईशान्य भारतात झाला, ब्रह्मपुत्र नदीच्या पवित्र लाटांकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी ते काशीला गेले, ब्रह्मपुत्रेच्या लाटांपासून सुरू झालेली भुपेनदांच्या संगीत साधनेला गंगेच्या खळखळाटाने त्याचे सामर्थ्यामध्ये रूपांतर झाले. काशीच्या गतिमानतेने त्यांच्या आयुष्यात एक अखंड प्रवाह निर्माण झाला. ते भटके प्रवासी झाले, त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यानंतर पीएचडी अभ्यासासाठी अमेरिकेतही जाऊन आले! परंतु, आयुष्याच्या या प्रत्येक टप्प्यावर ते सच्च्या सुपुत्राप्रमाणे आसामच्या भूमीशी नाळ जोडून राहिले आणि म्हणूनच, ते पुन्हा भारतात परतले. इथे आल्यावर चित्रपटांमध्ये सामान्य माणसाचे आवाज झाले, त्यांच्या जीवनवेदनांना आवाज दिला. आजही तो आवाज आपल्याला हलवतो, त्यांचे गीत मानुहे मानुहोर बाबे, जोदिहे ऑकोनु नाभाबे, ऑकोनि होहानुभूतिरे, भाबिबो कोनेनु कुआ? म्हणजे जर मनुष्याच्या सुख-दुःख, वेदना-त्रास यांच्याविषयी माणूसच विचार करणार नसेल, तर या जगात एकमेकांची काळजी कोण घेणार? विचार ही गोष्ट किती प्रेरणादायी आहे. हाच विचार अंगीकारत, आज देश, गाव, गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींचे आयुष्य सुकर करण्याच्या प्रयत्नात आहे. 

मित्रांनो,

भुपेनदा, भारताची एकता आणि अखंडतेचे महान नायक होते. दशकांपुर्वी, जेव्हा ईशान्य भारत उपेक्षित राहिला होता, तेव्हा ईशान्य भारताला हिंसा आणि अलिप्ततावादाच्या आगीत होरपळण्यासाठी सोडून दिले होते, त्या कठीण काळातही भुपेनदांनी भारताच्या एकतेला साद घालत राहिले. त्यांनी समृद्ध ईशान्य भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी निसर्गाच्या अद्भूत सौंदर्यांने नटलेल्या ईशान्य भारतासाठी गीत गायले होते. त्यांनी आसामसाठी गीत गायले होते - "नाना जाती-उपोजाती, रहोनीया कृष्टि, आकुवाली लोई होइशिल सृष्टि, एई मोर ऑहोम देश’ जेव्हा आपण हे गाणे गुणगुणतो, तेव्हा आसामच्या विविधतेचा आम्हांला अभिमानच वाटतो. आम्हाला आसामच्या सामर्थ्य आणि क्षमता यांचा अभिमान वाटतो. 

मित्रांनो,

अरुणाचल प्रदेशाविषयीही त्यांना प्रेम होते आणि म्हणूनच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्र्यांची आज विशेष उपस्थिती आहे. भुपेनदा यांनी लिहिले होते, अरुण किरण शीश भूषण भूमि सुरमयी सुंदरा, अरुणाचल हमारा, अरुणाचल हमारा।

मित्रांनो,

खऱ्या राष्ट्रभक्त व्यक्तीच्या हृदयातून निघालेली साद कधीच निष्फळ ठरत नाही. आज ईशान्य भारताप्रती असलेले त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करत आहोत. 

भूपेनदा यांना भारतरत्न देऊन, आमच्या सरकारने ईशान्येकडील लोकांच्या स्वप्नांचा आणि स्वाभिमानाचा आदर केला, तसेच  ईशान्येकडील भागाला  प्राधान्य दिले. ज्यावेळी आम्ही देशातील सर्वात लांब पुलांपैकी एक, आसाम आणि अरुणाचलला जोडणारा पूल बांधला त्‍यावेळी  आम्ही त्या पूलाचे नामकरण -  ‘भूपेन हजारिका सेतू’ असे  ठेवले. आज आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील प्रदेश वेगाने प्रगती करत आहेत. विकासाच्या प्रत्येक परिमाणामध्‍ये  नवीन विक्रम होत आहेत. विकासाची  अशी कामगिरी म्हणजेच देशाकडून भूपेनदा यांना खरी श्रद्धांजली आहे.

मित्रांनो,

आपल्या आसामने, आपल्या ईशान्येने नेहमीच भारताच्या सांस्कृतिक विविधतेत मोठे योगदान दिले आहे. या भूमीचा इतिहास, इथले सण, उत्सव,  कला, संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, दिव्य आभा आणि या सर्वांसह, भारतमातेच्या सन्मानासाठी  आणि संरक्षणासाठी इथल्या लोकांनी केलेले बलिदान यांचे कधीही विस्मरण होवू शकणार नाही; आपल्या महान भारताची कल्पनाही या सर्वााच्‍या स्‍मरणाशिवाय  करू शकत नाही. आपला ईशान्य हा देशासाठी नवीन प्रकाशाची  भूमी आहे. देशाच्या दृष्‍टीने  सर्वात प्रथम  सूर्यदेवाचे दर्शनही येथेच होते. सर्वात प्रथम ही भूमि प्रकाशमान होते.  भूपेन दा यांनी त्यांच्या "अहोम अमर रूपोही, गुणोरू नै हेश, भरोतोरे पूर्वो दिखौर, हुरजो उठादेश" या गीतामधून  इथल्‍या  भावनेला आवाज दिला होता! म्हणून, बंधू आणि भगिनींनो,जेव्हा आपण आसामचा इतिहास साजरा करतो,  तेव्हाच भारताचा इतिहास पूर्ण होतो.  तेव्हाच भारताचा आनंद पूर्ण होतो आणि याचा अभिमान बाळगत,  आपण पुढे जात राहिले पाहिजे.

मित्रांनो, ज्यावेळी आपण कनेक्टिव्हिटीबद्दल बोलतो त्यावेळी  लोक अनेकदा रेल्वे-रस्ते किंवा हवाई संपर्क व्यवस्थेचा संदर्भ घेतात. पण देशाच्या एकतेसाठी आणखी एक ‘कनेक्टिव्हिटी’ खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सांस्कृतिक कनेक्टिव्हिटी. गेल्या 11 वर्षांत देशाने ईशान्येकडील विकासासोबतच सांस्कृतिक कनेक्टिव्हिटीला खूप महत्त्व दिले आहे. ही एक मोहीम आहे, जी निरंतर  सुरू आहे. आज या कार्यक्रमात आपल्याला या मोहिमेची झलक दिसत आहे. काही काळापूर्वी आपण राष्ट्रीय स्तरावर वीर लसित बोरफुकन यांची 400  वी जयंती देखील साजरी केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातही आसाम आणि ईशान्येकडील अनेक सेनानींनी अभूतपूर्व बलिदान दिले! ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ दरम्यान, आपण ईशान्येकडील सेनानींना, या ठिकाणाच्या इतिहासाला पुनरुज्जीवित केले. आज संपूर्ण देश आपल्या आसामच्या इतिहासाविषयी  आणि योगदानाविषयी  परिचित होत आहे. काही काळापूर्वी आम्ही दिल्लीत अष्टलक्ष्मी महोत्सवाचे  आयोजनही केले होते. या कार्यक्रमामध्‍ये आसामच्या  ताकद दर्शन सर्वांना झाले. आसामचे कौशल्य दाखवण्यात आले.

मित्रांनो,

परिस्थिती काहीही असो, आसामने नेहमीच देशाच्या स्वाभिमानाला आवाज दिला आहे. भूपेन दा यांच्या गाण्यांमध्येही आपल्याला तोच आवाज ऐकायला मिळतो. 1962 चे युद्ध झाले तेव्हा आसाम त्या लढाईचे प्रत्यक्ष साक्षीदार होते, त्यावेळी  भूपेनदा यांनी देशाची प्रतिज्ञा अधिक बळकट केली होती, त्यांनी त्यावेळी गायले होते, "प्रोति जोबान रक्तॉरे बिंदु हाहाहॉर अनंत हिंधू, सेइ  हाहाहॉर दुर्जोय लहरे, जाशिले प्रतिज्ञा जयरे,’’  या  प्रतिज्ञा गीतामुळे  देशवासीय नव्या  उत्साहाने भारले होते. मित्रांनो, ती भावना, ती आवड अजूनही देशवासीयांच्या हृदयात आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही आपण हे पाहिले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना देशाने असे उत्तर दिले की, भारताच्या ताकदीचा प्रतिध्वनी संपूर्ण जगापर्यंत पोहोचला. आपण दाखवून दिले आहे की,  भारताचा शत्रू कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित राहणार नाही. नवीन भारत कोणत्याही किंमतीवर आपल्या सुरक्षेशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही.

मित्रांनो,

आसामच्या संस्कृतीचा प्रत्येक पैलू अद्भूत, असामान्य आहे आणि म्हणूनच मी अनेकदा म्हणतो की, आता तो दिवस दूर नाही; ज्यावेळी  देशातील मुले 'ए' म्हणजे आसाम असे  वाचतील. येथील संस्कृती आदर आणि स्वाभिमानाचा स्रोत आहे तसेच अनंत शक्यतांचाही स्रोत आहे. आसामची वेशभूषा, खाद्यपदार्थ,  पर्यटन, येथील उत्पादने, यांना  आपल्याला केवळ देशातच नाही,  तर संपूर्ण जगात ओळख मिळवून द्यायची आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी स्वतः आसामच्या गमोशाचे ब्रँडिंग मोठ्या अभिमानाने करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आसामचे प्रत्येक उत्पादन जगाच्या कोनाकोपऱ्यात घेऊन जायचे आहे.

मित्रांनो,

भूपेन दा यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या ध्येयांसाठी समर्पित होते. आज, भूपेन दा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, आपल्याला देशासाठी स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञा करायची आहे. मी आसाममधील माझ्या बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की, आपल्याला ‘व्होकल फॉर लोकल’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणजेच ‘शुभंकर’ बनले पाहिजे. आपण  स्वदेशी गोष्टींचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण फक्त स्वदेशी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि फक्त स्वदेशी वस्तू विकल्या पाहिजेत. आपण अशा  स्‍वदेशीच्या मोहिमेला जितकी गती देऊ,  तितकेच लवकर विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

मित्रांनो,

भूपेन दा यांनी वयाच्या 13 व्या वर्षी एक गाणे लिहिले होते, "अग्निजुगोर फिरिंगोति  मोय, नोतुन भारत गॉढिम, हर्बोहारार हरर्बोश्‍वो  पुनॉर फिराय आनिम, नोतुन भारत गॉढिम.’’

मित्रांनो, 

या गाण्यात त्यांनी स्वतःला आगीच्या ठिणगीसारखे मानून एक नवीन भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. असा एक नवीन भारत जिथे प्रत्येक पीडित आणि वंचितांना त्यांचे हक्क परत मिळतील.

माझ्या बंधू आणि भगिनींनो, 

भूपेन दा यांनी पाहिलेले नवीन भारताचे स्वप्न आज देशाचा संकल्प बनले आहे. आपल्याला या संकल्पाशी स्वतःला जोडायचे आहे. आज वेळ आली आहे की, आपण 2047 च्या विकसित भारताला प्रत्येक प्रयत्नाच्या आणि प्रत्येक संकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. भूपेनदा यांच्या गाण्यांमधून, त्यांच्या जीवनातून आपल्याला यासाठी प्रेरणा मिळते.  आपले हे संकल्प भूपेन हजारिकाजींचीस्वप्ने सत्यात उतरवतील. या भावनेने,  मी पुन्हा एकदा सर्व देशवासीयांना भूपेन दा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की, तुमचा मोबाईल फोन काढावा  आणि मोबाईल फोनचा फ्लॅश लाईट चालू करून भूपेन दा यांना आदरांजली वहावी. हजारो लोक आज भूपेन दा यांच्या अमर आत्म्याला आदरांजली वाहत आहेत. आजची पिढी त्यांचा आवाज प्रकाशाने सजवत आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !

 

* * *

हर्षल आकुडे/सुवर्णा बेडेकर/विजयालक्ष्‍मी साळवी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167830)