पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले


आजच्या दिवशी देशाला सरदार पटेल यांच्या पोलादी इच्छाशक्तीचे झळाळते उदाहरण दिसले, जेव्हा भारतीय लष्कराने हैदराबादला अनन्वित अत्याचारांपासून मुक्ती मिळवून दिली आणि भारताला पुन्हा एकदा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

'माँ भारती'चा सन्मान, अभिमान आणि गौरव, यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही: पंतप्रधान

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ ही मोहीम आपल्या माता भगिनींसाठी समर्पित – पंतप्रधान

गरिबांची सेवा हेच माझ्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे: पंतप्रधान

सरकार वस्त्रोद्योगासाठी फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन, या 5F दृष्टीकोनाच्या वचनबद्धतेने काम करत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

‘मेक इन इंडिया’ च्या यशामागे विश्वकर्मा बंधू आणि भगिनी ही मोठी शक्ती असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

विकासाच्या प्रवासात जे मागे राहिले आहेत त्यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे: पंतप्रधान

Posted On: 17 SEP 2025 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वाग्देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत, भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.

धारच्या भूमीने नेहमीच शौर्याला प्रेरणा दिली आहे असे नमूद करून मोदी म्हणाले की, महाराजा भोज यांचे शौर्य आपल्याला देशाच्या अभिमानाच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण देते. ते पुढे म्हणाले की, महर्षी दधीची यांचे बलिदान आपल्याला मानवतेची सेवा करण्याचा संकल्प देते. या वारशापासून प्रेरणा घेत, आज देश भारतमातेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या भगिनी आणि मुलींचे सिंदूर उध्वस्त केले, असे सांगून ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट केले.

आपल्या शूर सैनिकांनी पाकिस्तानला क्षणार्धात गुडघे टेकायला भाग पाडले, यावर मोदी यांनी भर दिला. अलिकडच्याच एका घटनेचा उल्लेख करताना त्यांनी नमूद केले की, कालच एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत रडत आपली कथा सांगितली.

"हा नवा भारत आहे, जो कोणाच्याही अणु युद्धाच्या धमक्यांना घाबरत नाही आणि त्याच्या उगमस्थानावर थेट हल्ला करून प्रत्युत्तर देतो", पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की.  17 सप्टेंबर हा एक ऐतिहासिक दिवस आहे, जेव्हा देश सरदार पटेल यांच्या पोलादी  दृढनिश्चयाचा साक्षीदार बनला. आजच्या दिवशी भारतीय लष्कराने हैदराबादला अनन्वित अत्याचारांपासून मुक्त केले, आणि त्याला भारताशी जोडले. या अभूतपूर्व कामगिरीचा आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचा आता सरकारने औपचारिकपणे सन्मान केल्याचे मोदी यांनी नमूद केले. हा दिवस आता हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो, जो भारताच्या एकतेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. हैदराबाद मुक्ती दिन हा भारतमातेचा सन्मान, अभिमान आणि गौरवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही, याचे स्मरण करून देतो असे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, जीवनाचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित करायला हवा.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घेऊन आपले जीवन देशासाठी समर्पित केले हे अधोरेखित करून, मोदी म्हणाले की, त्यांचे स्वप्न एक विकसित भारत आहे, जो वसाहतवादी राजवटीपासून मुक्त असेल, आणि वेगाने प्रगती करेल. या वारशापासून प्रेरणा घेत आज 140 कोटी भारतीयांनी विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताची नारीशक्ती, युवाशक्ती, गरीब आणि शेतकरी, हे या प्रवासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत, असे नमूद करून, आजच्या कार्यक्रमाने विकसित भारताचे चारही आधारस्तंभ बळकट केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाला माता, भगिनी आणि कन्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याची नोंद घेत, महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले, आणि या व्यासपीठावरून 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आदी सेवा पर्व’चे पडसाद देशभरात विविध टप्प्यांमध्ये जाणवत आहेत हे नमूद करताना आजपासून मध्य प्रदेशमध्ये हे पर्व सुरू करण्याची घोषणा मोदींनी केली. ही मोहीम धारमधील आदिवासी समुदायांसह मध्य प्रदेशातील आदिवासी समुदायांना विविध सरकारी योजनांशी थेट जोडण्यासाठी एक सेतू म्हणून काम करेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

विश्वकर्मा जयंती आणि धारमधील भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कच्या पायाभरणीचे औचित्य साधून एका मोठ्या औद्योगिक उपक्रमाची घोषणा करताना, पंतप्रधानांनी सांगितले की हे पार्क  देशातील वस्त्रोद्योगाला नवीन उभारी देईल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळेल आणि मोठ्या संख्येने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यावर त्यांनी भर दिला. या प्रकल्पांसाठी आणि मोहिमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.

भारताची नारी शक्ती म्हणजे माता आणि भगिनी देशाच्या प्रगतीचा पाया आहे यावर भर देऊन, पंतप्रधानांनी नमूद केले की जर माता निरोगी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहते, परंतु जर ती आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. कोणत्याही महिलेला जागृती  किंवा संसाधनांच्या अभावी त्रास होऊ नये याकडे लक्ष वेधताना त्यांनी 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. उशिरा निदान झाल्यामुळे अनेक आजार, विशेषतः महिलांसाठी अति जोखीम असलेले आजार बळावतात असे मोदींनी निदर्शनास आणले. या मोहिमेअंतर्गत, रक्तदाब आणि मधुमेहापासून ते अशक्तपणा, क्षयरोग आणि कर्करोगापर्यंतच्या आजारांसाठी तपासणी केली जाईल आणि सर्व चाचण्या आणि औषधे सरकारी खर्चाने मोफत उपलब्ध करून दिली जातील. पुढील उपचारांसाठी, आयुष्मान कार्ड एक संरक्षक कवच म्हणून काम करेल. ही मोहीम आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत राबवली जाईल असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशभरातील माता, भगिनी आणि मुलींना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढण्याचे, या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि त्यांच्या समुदायातील इतर महिलांमध्ये जागरूकता पसरवण्याचे आवाहन केले. कोणतीही माता, कन्या यापासून वंचित राहू नये याकरिता सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

माता, भगिनी आणि मुलींचे आरोग्य हे राष्ट्रीय प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मुली आणि गर्भवती महिलांच्या  पोषणाची सुनिश्चिती व्हावी म्हणून सरकार मिशन मोडमध्ये काम करत असल्याबाबत त्यांनी अवगत केले. आजपासून आठवा राष्ट्रीय पोषण महिना सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. विकसनशील भारतात माता आणि बालमृत्यू दर कमी करण्याच्या आवश्यकतेवर मोदींनी भर दिला. हे साध्य करण्यासाठी, 2017 मध्ये सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर 5,000 रुपये आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6,000 रुपये बँक खात्यात थेट वर्ग केले जातात. आतापर्यंत 4.5 कोटी गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे, ज्यामध्ये 19,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, या दिवशीच 15 लाखांहून अधिक गर्भवती महिलांना एका क्लिकवर मदत पाठवण्यात आली असून त्याद्वारे 450 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

आदिवासी भागात सिकलसेल ॲनिमियाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी मध्य प्रदेशमधून सुरू झालेल्या आणखी एका मोठ्या आरोग्य उपक्रमावर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी सांगितले की सरकार आदिवासी समुदायांना या आजारापासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय अभियान राबवत आहे. 2023 मध्ये मध्य प्रदेशातील शाहडोल येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, जिथे पहिले सिकलसेल स्क्रीनिंग कार्ड जारी करण्यात आले होते. मोदी म्हणाले, “आज मध्य प्रदेशात एक कोटीवे स्क्रीनिंग कार्ड वितरित करण्यात आले आहे आणि या मोहिमेअंतर्गत देशभरात पाच कोटींहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे”. सिकलसेल तपासणी मुळे आदिवासी समुदायातील लाखो लोकांचे जीवन सुरक्षित राहण्यास मदत झाली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी आदिवासी माता आणि भगिनींना सिकलसेल ॲनिमियासाठी तपासणी करण्याचे विशेष आवाहन केले.

माता आणि भगिनींचे जीवन सोपे करण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आपले सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करून मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी शौचालये बांधणे, उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शनची तरतूद करणे आणि घरगुती पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन मिशन यासारख्या उपक्रमांमुळे महिलांसमोरील दैनंदिन आव्हाने लक्षणीयरीत्या कमी झाली आहेत यावर भर दिला. पंतप्रधानांनी असे स्पष्ट केले की आयुष्मान भारत योजनेअंतर्गत  ₹5 लाखांपर्यंतच्या  मोफत उपचारामुळे महिलांचे आरोग्य सुधारले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा उल्लेख करताना त्यांनी नमूद केले की मोफत रेशन योजनेमुळे कोविड-19 महामारीच्या कठीण काळातही गरीब मातांच्या घरातील चूल  विझली नाही याची खात्री करता आली. या योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणारी बहुतेक घरांची नोंदणी   महिलांच्या नावे आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करत आहे यावर भर देत मोदी म्हणाले की, मुद्रा योजनेद्वारे कोट्यवधी महिला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच उद्योग स्थापन करण्यासाठी कर्ज घेत आहेत. ते पुढे म्हणाले की, सरकार तीन कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्यासाठी सक्रियपणे काम करत असून यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांनी हा टप्पा आधीच गाठला आहे. बँक सखी आणि ड्रोन दीदी म्हणून प्रशिक्षित करून महिलांना ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणले जात आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून परिवर्तनाची एक नवीन लाट महिला आणत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या 11 वर्षांत गरिबांचे कल्याण आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. गरीबांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते या विश्वासाला त्यांनी दुजोरा दिला. गरिबांची सेवा कधीही व्यर्थ जात नाही; थोड्याशा पाठिंब्यानेही ते प्रचंड आव्हानांवर मात करण्याचे धाडस दाखवतात, असे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की त्यांनी वैयक्तिकरित्या गरिबांच्या भावना आणि संघर्ष अनुभवले आहेत, त्यांच्या वेदनांना स्वतःचे बनवले आहे. गरिबांची सेवा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे ध्येय आहे त्यानुसार, सरकार गरिबांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखत आणि अंमलात आणत आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सरकारच्या धोरणांचा परिणाम आता जगाला दिसत आहे, भारतातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत यावर भर देऊन पंतप्रधानांनी स्पष्ट केले की या परिवर्तनामुळे समाजात आत्मविश्वासाची एक नवीन भावना निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की हे प्रयत्न म्हणजे केवळ योजना नाहीत तर गरीब माता, भगिनी आणि मुलींच्या जीवनात बदल घडवून आणण्याची हमी आहेत. गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही आपली अढळ वचनबद्धता असल्याचे ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील महेश्वरी वस्त्राच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकत, देवी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरी साडीला एक नवीन आयाम दिला होता हे लक्षात घेऊन, अलिकडेच झालेल्या त्यांच्या 300 व्या जयंती उत्सवाचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि सांगितले की त्यांचा वारसा आता धार येथील पीएम मित्र पार्कद्वारे पुढे नेला जात आहे.

मोदी यांनी स्पष्ट केले की हे पार्क सुती आणि रेशमी यासारखे आवश्यक विणकाम साहित्य सहजपणे उपलब्ध करून देईल, गुणवत्ता तपासणी सुलभ करेल‌ तसेच बाजारपेठेचा संचारसंपर्क वाढवेल. त्यांनी भर दिला की  कताई,डिझाईन,  प्रक्रिया आणि निर्यात हे सर्व एकाच सुविधेखाली होईल, ज्यामुळे संपूर्ण कापड मूल्य साखळी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्यांनी कापड उद्योगासाठी 5 एफ व्हिजन - फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन - या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्यामुळे उत्पादनापासून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रवास जलद आणि अधिक सुरळीत होऊ शकेल. 

धार येथील पीएम मित्र पार्कसाठी अंदाजे 1,300 एकर जमीन वाटप करण्यात आली असून 80 हून अधिक औद्योगिक युनिट आधीच मंजूर  करण्यात आले आहेत याची दखल घेत  पंतप्रधानांनी सांगितले की पायाभूत सुविधांचा विकास आणि कारखान्यांची उभारणी एकाच वेळी सुरू राहील.औद्योगिक संकुलामुळे सुमारे तीन लाख नवीन रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या संकुलामुळे लॉजिस्टिक आणि उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि त्यामुळे भारतीय उत्पादने अधिक परवडणारी व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरतील. या उपक्रमाबद्दल त्यांनी मध्यप्रदेशातील जनतेचे विशेष अभिनंदन केले तसेच सरकार देशभरात आणखी सहा पीएम मित्र  संकुल उभारण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली.

पंतप्रधानांनी देशभरात होत असलेल्या विश्वकर्मा पूजेच्या उत्सवाचा उल्लेख करताना, हा क्षण पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचाही असल्याचे सांगितले. त्यांनी देशातील सर्व सुतारकाम करणारे, लोहार, सोनार, कुंभार, गवंडी, पितळ व तांबे कामगार तसेच इतर पारंपरिक कारागिर बंधू-भगिनींना विशेष शुभेच्छा दिल्या. आपल्या उत्पादनांद्वारे व कौशल्यांद्वारे ते खेडी आणि शहरे यांमधील दैनंदिन गरजा पूर्ण करतात, या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेत त्यांनी सांगितले की ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामागील प्रेरक शक्ती हेच कारागीर आहेत. पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले की अल्पावधीत पीएम विश्वकर्मा योजनेतून 30 लाखांहून अधिक कारागीर व शिल्पकारांना मदत मिळाली आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंगची सुविधा व आधुनिक साधने मिळाली आहेत. सहा लाखांहून अधिक विश्वकर्मा कारागिरांना नवी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या कामासाठी 4 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ त्या समाजघटकांना झाला आहे जे अनेक दशकांपासून उपेक्षित राहिले होते. गरीब विश्वकर्मा बांधवांकडे कौशल्य होते, परंतु त्यांच्या प्रतिभेचा विकास करण्यासाठी, त्यांचे जीवन सुधारण्यासाठी मागील सरकारांकडे कोणतीही योजना नव्हती, असे ते म्हणाले. विद्यमान सरकारने त्यांच्या कलेला प्रगतीत रूपांतर करण्याचे मार्ग निर्माण केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. मागे राहिलेल्यांना प्राधान्य देणे हीच सरकारची बांधिलकी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

या प्रसंगी पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील धार ही ज्येष्ठ नेते कुशाभाऊ ठाकरे यांची जन्मभूमी असल्याचे स्मरण केले. ‘राष्ट्र प्रथम ’ या भावनेने राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या कुशाभाऊ ठाकरे यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली व त्यांची राष्ट्रनिष्ठा आजही भारताच्या प्रगतीस प्रेरणा देत असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सणांचा काळ हा ‘स्वदेशी’च्या मंत्राला पुन्हा दृढ करण्याचाही काळ आहे. तुम्ही जे काही खरेदी कराल किंवा विकाल ते भारतात निर्मित झालेले असावे, त्यांनी नागरिकांना आवाहन केले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामासाठी ‘स्वदेशी’ला एक अस्त्र  बनवले होते; आता विकसित भारताच्या पायाभरणीसाठी हेच बळ ठरावे, असे त्यांनी सांगितले. स्वदेशी उत्पादनांविषयी अभिमान बाळगला तरच हे साध्य होईल, असे ते म्हणाले. मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले की, छोट्या वस्तूंपासून ते खेळणी, दिवाळीच्या मूर्ती, घर सजावटीच्या वस्तू, मोबाईल, टीव्ही, फ्रीज यांसारख्या मोठ्या खरेदीपर्यंत सर्वत्र भारतीय वस्तूंची निवड करावी. उत्पादने ‘मेड इन इंडिया’ आहेत का याची खात्री करण्यावर त्यांनी भर दिला. स्वदेशी वस्तूंची खरेदी केल्याने पैसा देशातच राहतो, भांडवलाचा बाहेरचा प्रवाह थांबतो आणि राष्ट्रीय विकासाला थेट हातभार लागतो. हाच पैसा रस्ते, ग्रामशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व गरीबांपर्यंत पोहोचणाऱ्या कल्याणकारी योजना उभारण्यासाठी उपयोगात येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आवश्यक असणाऱ्या वस्तू जेंव्हा देशात उत्पादित होतात, तेव्हा आपल्या नागरिकांसाठी रोजगार निर्माण होतो, असे त्यांनी अधोरेखित केले. 22 सप्टेंबरपासून, नवरात्रीच्या प्रारंभी लागू होणाऱ्या कमी केलेल्या जीएसटी दरांचा लाभ घेऊन स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात, असेही त्यांनी आवाहन केले. “अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे हा मंत्र कायम स्मरणात ठेवण्याचे व वारंवार उच्चारण्याचे त्यांनी आवाहन केले आणि सर्वांना सणांच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशाचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री सवित्री ठाकुर यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

​आरोग्य, पोषण, तंदुरुस्ती आणि स्वस्थ आणि सशक्त भारत या आपल्या वचनबद्धतेच्या पुर्ततेच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसंपन्न महिला, सक्षम कुटुंब (स्वस्थ नारी सशक्त परिवार) आणि 8 वा राष्ट्रीय पोषण माह  या दोन मोहिमांचा प्रारंभ केला आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत या मोहिमा सुरू राहतील. याअंतर्गत देशभरातील आयुष्यमान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन  केले जाईल. याअंतर्गत एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. या व्यापक आयोजनाच्या माध्यमातून हा महिला आणि मुलांसाठीचा देशातील सर्वात मोठा आरोग्यविषयक प्रचार प्रसार कार्यक्रम ठरणार आहे. याअंतर्गत देशभरातील सर्व सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये दररोज आरोग्य विषयक शिबिरांचे  आयोजन केले जाणार आहे.

​या देशव्यापी मोहीमांच्या माध्यमातून महिलांसाठी समुदाय पातळीवर प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक आणि उपचारात्मक आरोग्य विषयक सेवा पुरवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे संसर्गजन्य रोग, ॲनिमिया, क्षयरोग आणि सिकल सेल आजारांसंबंधीच्या तपासणी आणि चाचण्यांना तसेच या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान व्हायला आणि त्यांवरच्या उपचारांना बळकटी मिळेल. यासोबतच प्रसूतिपूर्व आरोग्यविषयक निगा, लसीकरण, पोषण, मासिक पाळीतील स्वच्छता, जीवनशैली आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता उपक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून माता, बालके आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याला चालना दिली जाईल. याअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, केंद्र सरकारची आस्थापने आणि खाजगी रुग्णालयांद्वारे स्त्रीरोग, बालरोग, डोळे, कान-नाक-घसा, दंत वैद्यकीय, त्वचा  आणि मानसोपचार यांसारख्या विशेष सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

​या मोहिमेअंतर्गत, देशभरात रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातील. रक्तदात्यांची ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी केली जाईल तसेच याकरता MyGov या पोर्टलच्या  माध्यमातून प्रतिज्ञा मोहीमही राबवली जाईल. लाभार्थींची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), आयुष्मान वय वंदना आणि आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) या योजनांअंतर्गत नोंदणीही केली जाईल. कार्ड तपासणी आणि तक्रार निवारणासाठी आरोग्य शिबिरांमध्ये मदत कक्षांची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला आणि कुटुंबांमध्ये सर्वांगीण आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी योग सत्रे, आयुर्वेद सल्ला आणि इतर आयुष सेवा सुविधा विषयक उपक्रमांचेही आयोजन केले जाईल. या मोहीमेच्या माध्यमातून समुदायांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी समुदायांना प्रोत्साहन दिले जाईल. या अनुषंगाने या मोहीमांमध्ये विशेषतः लठ्ठपणा प्रतिबंध, पोषण विषयक सुधारणा आणि ऐच्छिक रक्तदानाला महत्त्व दिले जाणार आहे. तसेच संपूर्ण सामुदायिक सहभागाच्या दृष्टीकोनाअंतर्गत क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण, समुपदेशन आणि आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून देता याव्यात या उद्देशाला समर्पित असलेल्या (www.nikshay.in या ऑनलाईन व्यासपीठावर नागरिकांनी स्वतःची निक्षय मित्र म्हणून नोंदणी करायलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने​पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत देशभरातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात, एका क्लिकद्वारे निधीचे थेट हस्तांतरण केले. याचा लाभ देशातील सुमारे दहा लाख महिलांना होणार आहे.

माता आणि बालकांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी सुमन सखी चॅटबॉटचाही प्रारंभ केला. या चॅटबॉटच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील गर्भवती महिलांना वेळेवर आणि अचूक माहिती आणि आवश्यक आरोग्य सेवा मिळू शकतील.

​सिकल सेल ॲनिमियाविरुद्धच्या देशाच्या सामूहिक लढ्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी राज्यातील एक कोटीवे सिकल सेल तपासणी आणि समुपदेशन कार्डही वितरित केले.

​आदि कर्मयोगी अभियानाचा भाग म्हणून यावेळी पंतप्रधानांनी मध्य प्रदेशसाठी आदिवासींचा स्वाभिमान आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेची प्रचिती देणार्‍या आदि सेवा पर्व या उपक्रमाचाही प्रारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत आदिवासी भागांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, कौशल्य विकास, उपजीविकेच्या साधनांचा विस्तार, स्वच्छता, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध मुद्द्यांवर भर असलेल्या सेवा आधारित उपक्रमांची मालिका राबवली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक गावासाठी दीर्घकालीन विकासाचे आराखडे तयार करण्याच्या उद्देशाने आदिवासी ग्राम कृती योजना आणि आदिवासी ग्राम दृष्टी 2030 या उपक्रमांवरही विशेष भर दिला जाणार आहे.

​Farm to Fibre (शेत ते धागा), Fibre to Factory (धागा ते कारखाना), Factory to Fashion (कारखाना ते फॅशन) and Fashion to Foreign (फॅशन ते परदेश) हा ​आपल्या 5F चा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी धार इथे प्रधानमंत्री मित्र पार्क या संकुलाचेही उद्घाटन केले. जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले हे संकुल 2,150 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात विस्तारलेले आहे. या संकुलात  औद्योगिक एककांमधले सांडपाणी प्रक्रिया करणारे कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक रस्ते आणि इतर सुविधांची सोय उपलब्ध आहे. यामुळे ते संकुल एक आदर्श औद्योगिक नगर म्हणून स्थान निर्माण करू शकेल. या संकुलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनानाही अधिक चांगले मूल्य मिळेल, विशेषतः या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

या संकुलाअंतर्गत आत्तापर्यंत ​विविध वस्त्रोद्योग कंपन्यांनी 23,140 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग उभे राहतील आणि परिणामी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. या सर्व माध्यमातून सुमारे 3 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि निर्यातीलाही लक्षणीय चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

या निमित्ताने पंतप्रधानांनी ​पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने, राज्यातील एका महिला बचत गटाच्या लाभार्थी महिलेला एक बगिया माँ के नाम या उपक्रमांतर्गत एक रोपटेही भेट दिले. या उपक्रमाअंतर्गत मध्य प्रदेशातील 10,000 पेक्षा जास्त महिला माँ की बगिया विकसित करणार आहेत. या बागांमधील रोपांच्या संरक्षणाची सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या सर्व महिला गटांना आवश्यक साधन सामग्री देखील पुरवली जाणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/वासंती जोशी/नंदिनी मथुरे/तुषार पवार/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167659) Visitor Counter : 2