पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममध्ये गोलाघाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन, पॉलिप्रोपिलिन युनिटची केली पायाभरणी


ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर भारताने वाटचाल सुरू केली आहेः पंतप्रधान

आज सौर ऊर्जेसंदर्भात भारताची गणना जगातील आघाडीच्या 5 देशांमध्ये होतेः पंतप्रधान

आत्मनिर्भर बनण्यासाठी भारताला ऊर्जा आणि सेमीकंडक्टर या दोन महत्त्वाच्या घटकांची गरज आहे. या प्रवासात आसाम महत्त्वाची भूमिका बजावत आहेः पंतप्रधान

आम्ही आसामची ओळख सातत्याने बळकट करत आहोतः पंतप्रधान

Posted On: 14 SEP 2025 4:45PM by PIB Mumbai

 

स्वच्छ ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गोलाघाट येथील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (NRL) मध्ये आसाम बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले आणि पॉलीप्रॉपिलीन प्लांटची पायाभरणी केली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी शारदीय दुर्गा पूजेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि आसामच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी महान आध्यात्मिक व्यक्तिमत्व श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीचे महत्त्व विशद केले आणि आदरणीय गुरुजनांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी सांगितले की ते गेल्या दोन दिवसांपासून ईशान्य भारतात आहेत आणि जेव्हा जेव्हा ते या प्रदेशाला भेट देतात, तेव्हा त्यांना अभूतपूर्व स्नेह आणि आशीर्वाद मिळतो. आसामच्या या भागात त्यांना एक वेगळीच आपुलकी आणि आपलेपणाची भावना जाणवत असल्याचे अधोरेखित करून त्यांनी जनतेचे आभार मानले.

आजचा दिवस विकसित आसाम आणि विकसित भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आसामसाठी सुमारे 18,000 कोटी रुपयांचे प्रकल्प जाहीर केले. आज सकाळी ते दरांगमध्ये होते, जिथे त्यांनी संपर्कव्यवस्था आणि आरोग्य-संबंधित प्रकल्पांची पायाभरणी केली, असे ते म्हणाले.  सध्याच्या ठिकाणी त्यांनी ऊर्जा सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे, ज्यामुळे आसामच्या विकासाचा मार्ग अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आसाम ही भारताच्या ऊर्जा क्षमतेला बळकटी देणारी भूमी आहे, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी म्हणाले की, आसाममधून उत्पादित होणारी पेट्रोलियम उत्पादने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात. आमचे सरकार ही क्षमता नवीन उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सध्याच्या कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी त्यांनी जवळच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात भाग घेतला, जिथे त्यांनी बांबूपासून बायो-इथेनॉल तयार करणाऱ्या आधुनिक प्लांटचे उद्घाटन केले अशी माहिती दिली आणि  आसामसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार काढले . इथेनॉल प्लांटच्या उद्घाटनासोबतच, त्यांनी पॉलीप्रॉपिलीन प्लांटची पायाभरणीही केली. हे प्रकल्प आसाममधील औद्योगिक वाढीला चालना देतील, राज्याच्या विकासाला गती देतील आणि शेतकरी व तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करतील, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी या उपक्रमांसाठी सर्वांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, “भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे,” आणि देशाची प्रगती होत असताना वीज, वायू आणि इंधनाची मागणीही वाढत आहे. भारत दीर्घकाळापासून या ऊर्जाविषयक गरजांसाठी परदेशी स्रोतांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वायू आयात करत आहे. परिणामी, देशाला दरवर्षी इतर देशांना लाखो कोटी रुपये द्यावे लागतात, ज्यामुळे परदेशातील रोजगार आणि उत्पन्न वाढत आहे, यावर त्यांनी भर दिला.  या परिस्थितीत बदल करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारताने आता आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भारतामध्ये कच्चे तेल आणि वायूचे  नवीन साठे शोधण्याचे काम सुरू आहे, त्याचबरोबर हरित ऊर्जेची क्षमताही वाढवली जात आहे, असे नमूद करून . मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'समुद्र मंथन' या उपक्रमाच्या घोषणेची आठवण करून दिली.

भारताच्या समुद्रांमध्ये तेल आणि वायूचे मोठे साठे असू शकतात याविषयी तज्ञांनी केलेल्या मूल्यमापनाचा संदर्भ त्यांनी दिला.  या साधन संपत्तीचा उपयोग देशाच्या विकासासाठी व्हावा यासाठी नॅशनल डीप वॉटर हे उत्खनन अभियान सुरू करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

भारत हरित ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. दशकभरापूर्वी भारत सौर ऊर्जा उत्पादनात खूप मागे पडला होता, पण आज भारत सौर ऊर्जेच्या क्षमतेच्या बाबतीत  जागतिक पातळीवर पहिल्या 5 देशांमध्ये पोचला असल्याचे  त्यांनी सांगितले.

आजच्या सातत्याने बदलत असलेल्या काळात, तेल आणि वायू इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला पर्यायी इंधनाची आवश्यकता असून यासाठी इथेनॉल हा एक व्यवहार्य पर्याय असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करणारा एक नवीन प्रकल्प आज सुरू केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. या उपक्रमामुळे आसाममधील शेतकरी आणि आदिवासी समुदायांना मोठा फायदा होईल असे ते म्हणाले.

जैव - इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी बांबूचा सातत्यपूर्ण पुरवठा होत राहील अशी व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार स्थानिक शेतकऱ्यांना बांबू लागवडीत मदत करेल आणि त्यांची थेट खरेदीही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रदेशात बांबूच्या चिप्सशी संबंधित छोटी केंद्रे उभारली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रासाठी  दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. या एकाच प्रकल्पामुळे या प्रदेशातील हजारो लोकांना फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत आता बांबूपासून इथेनॉल तयार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्ष सत्तेत असताना त्यांच्या राजवटीत बांबू तोडल्यावर तुरुंगवास होऊ शकत होता, त्या काळाचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. त्यावेळी आदिवासी समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बांबूवर निर्बंध होते, मात्र विद्यमान सरकारने बांबू तोडण्यावरील बंदी हटवली, आणि या निर्णयामुळे आता ईशान्येकडील लोकांना मोठा फायदा होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात बादल्या, मग, खोके, खुर्च्या, टेबल आणि वेष्टणाचे साहित्य  यांसारख्या अनेक प्लास्टिकच्या वस्तू वापरतात, या सर्व उत्पादनांसाठी पॉलीप्रॉपिलीनची आवश्यकता असते, याच्याशिवाय आधुनिक जीवनाची कल्पना करणेही कठीण झाले असल्याची जाणिव त्यांनी उपस्थितांना आपल्या संबोधनातून करून दिली. गालिचे, दोरखंड, पिशव्या, फायबर, मास्क, वैद्यकीय किट आणि कापड यांसारखी असंख्य उत्पादने तयार करण्यासाठी  पॉलीप्रॉपिलीनचा वापर केला जातो, याशिवाय  वाहन उद्योग, वैद्यकीय आणि कृषी उपकरणांच्या निर्मितीतही तो महत्त्वाची भूमिका बजावतो ही माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. अशावेळी आसामला एका आधुनिक पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाचे वरदान मिळाले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा प्रकल्प मेक इन आसाम आणि मेक इन इंडियाच्या पाया अधिक बळकट करेल, तसेच या प्रदेशातील इतर उत्पादन उद्योगांनाही त्यामुळे चालना मिळेल असे ते म्हणाले.

ज्याप्रमाणे आसाम आपल्या पारंपरिक गोमोशा , सुप्रसिद्ध एरी आणि मुगा सिल्कसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे आता पॉलीप्रॉपिलीनपासून बनवलेले  कापड देखील आसामची नवी ओळख बनेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आत्मनिर्भर भारत अभियानाप्रती देशात अभूतपूर्व वचनबद्धता दिसून येत असूनआसाम हे त्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आसामच्या क्षमतेवर आपला दृढ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळेच आसामची सेमीकंडक्टर मिशन सारख्या एका मोठ्या राष्ट्रीय उपक्रमासाठी निवड केली असल्याचे त्यांनी उपस्थितांवर सांगितले. आपला आसामवरील हा विश्वास, राज्याने सिद्ध करून दाखवलेल्या स्वतःच्या क्षमतेमुळेच निर्माण झाला असल्याची बाबही त्यांनी ठळकपणे नमूद केली. वसाहतवादाच्या कालखंडात आसामचा चहा फारसा कुणाला ठाऊक नव्हता, मात्र तरीदेखील याच आसाम टी ला अर्थात आसामच्या चहाला आसामच्या भूमीने आणि इथल्या जनतेने जागतिक ब्रँडमध्ये बदलून दाखवल्याचे यशस्वी उदाहरण त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.  या नवीन युगात भारताची आत्मनिर्भरता ऊर्जा आणि सेमीकंडक्टर या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवर अवलंबून आहे, आणि या दोन्ही क्षेत्रांच्या बाबतीत आसाम  महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

पंतप्रधान म्हणाले की, बँक कार्ड आणि मोबाईल फोनपासून ते मोटार, विमान आणि अंतराळ मोहिमांपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या केंद्रस्थानी एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक चिप असते. भारताने जर हे उत्पादन देशात तयार करण्याचा संकल्प केला  तर आपल्या स्वतःच्या चिपही तयार करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला .  हे साध्य करण्यासाठी भारताने सेमीकंडक्टर अभियान सुरू केले आहे आणि या उपक्रमासाठी आसाम एक महत्त्वाची पायाभूत भूमिका बजावत आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की, मोरीगाव येथे ₹27,000 कोटींच्या गुंतवणुकीतून सेमीकंडक्टर कारखाना जलदगतीने उभारला जात आहे. त्यांनी सांगितले की, ही आसामसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की विरोधी पक्षांनी दीर्घकाळ देशावर राज्य केले आणि ते अनेक दशके आसाममध्ये सत्तेत होते. त्या काळात विकासाची गती मंदावलेली होती आणि आसामच्या सांस्कृतिक वारशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी सांगितले की, आता केंद्र आणि राज्यातील त्यांची सरकारे आसामच्या पारंपरिक ओळखीला बळकटी देत असून तिला आधुनिक स्वरूपाशी जोडत आहेत. मोदी यांनी विरोधकांवर आसाम आणि ईशान्य भारतात फुटीरता, हिंसा आणि वाद आणल्याचा आरोप केला, तर त्यांच्या पक्षाने आसामला विकास आणि वारशाने समृद्ध अशा राज्यामध्ये रूपांतरित केले आहे. आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही याच सरकारने दिला आहे, असे पंतप्रधानांनी आवर्जुन सांगितले. त्यांनी समाधान व्यक्त केले की, आसाम सरकार नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची वेगाने अंमलबजावणी करत आहे आणि स्थानिक भाषांमधून शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे.

मोदी यांनी पुढे नमूद केले की विरोधी पक्षांनी ईशान्य भारत आणि आसामच्या थोर पुत्रांना योग्य सन्मान दिला नाही. त्यांनी सांगितले की, या भूमीत वीर लाचित बोरफुकनसारखे शूरवीर जन्माला आले, तरीसुद्धा विरोधकांनी त्यांना खऱ्या अर्थाने सन्मान दिला नाही. पंतप्रधानांनी सांगितले की, विद्यमान सरकारने लाचित बोरफुकन यांच्या वारशाला योग्य मान दिला आहे. त्यांनी माहिती दिली की, त्यांचा 400 वा जयंती सोहळा राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात आला आणि त्यांची चरित्रकथा 23 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यांनी हेही नमूद केले की, जोरहाट येथे लाचित बोरफुकन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी त्यांना लाभली. पंतप्रधानांनी सांगितले की ज्यांना विरोधकांनी दुर्लक्षित केले, त्यांनाच विद्यमान सरकार आता अग्रभागी आणत आहे.

शिवसागर येथील ऐतिहासिक रंगघर अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याचे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, त्याच्या जीर्णोद्धाराचे काम या सरकारने हाती घेतले आहे. त्यांनी सांगितले की, श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान बटद्रवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सरकार काम करत आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम संकुल आणि उज्जैनमधील महाकाल महालोक यांच्या विकासाशी साम्य दाखवत पंतप्रधानांनी जाहीर केले की, आसाममध्ये माँ  कामाख्या मार्गिका निर्माण केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार आसामच्या समृद्ध संस्कृती व इतिहासाशी निगडित अनेक प्रतीके आणि स्थळे पुढील पिढ्यांसाठी जतन करत आहे. त्यांनी नमूद केले की हा उपक्रम आसामच्या वारशाचा केवळ लाभ करून देत नाही तर राज्यातील पर्यटनाची व्याप्तीही वाढवत आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, पर्यटन वाढल्यामुळे आसाममध्ये युवकांसाठी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील.

पंतप्रधानांनी सांगितले की, चालू विकास प्रयत्नांदरम्यान आसामसमोर एक वाढती समस्या उभी आहे, बेकायदेशीर घुसखोरी. त्यांनी नमूद केले की, विरोधकांच्या राजवटीत घुसखोरांना जमिनी देण्यात आल्या आणि बेकायदेशीर अतिक्रमणांना संरक्षण देण्यात आले.

विरोधकांनी, मतपेढीच्या राजकारणासाठी आसामचे लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघवडल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी, त्यांचे सरकार, आसामच्या नागरिकांच्या सहकार्याने, या समस्येकडे सक्रियपणे लक्ष केंद्रित करत असल्याची पुष्टी केली. त्यांनी सरकार घुसखोरांकडून जमीन परत मिळवत आहे हे अधोरेखित करून आदिवासी कुटुंबीयांना जमीन पट्टे परत करत असल्याचे सांगितले. आसाम सरकार राबवत असलेल्या,लाखो कुटुंबियांना जमीन पट्टे याआधीच मिळवून देणाऱ्या, बसुंधरा मोहिमेचे त्यांनी  कौतुक केले.  काही आदिवासी भागातील अहोम, कोच राजबोन्गशी आणि गोरखा समुदायांचे जमीन हक्क मान्य करण्यात आले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की त्यांना संरक्षित वर्गाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी, आदिवासी समुदायांना तोंड द्याव्या लागलेल्या ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी त्यांचा पक्ष वचनबद्ध आहे, यांवर भर दिला.

"नागरिक देवो भव'हा आमच्या सरकारचा विकास मंत्र आहे, म्हणजे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये किंवा त्यांना मूलभूत गराजांसाठी इकडे तिकडे धावायला लागू नये. " असं पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षांच्या दीर्घ राजवटीत, गरिबांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांचे हक्क नाकारले गेले. कारण प्रशासन निवडणुकीत होणाऱ्या फायद्यांसाठी निवडक गटांच्या तुष्टीकरणावर अवलंबून होते. त्या उलट, मोदी यांनी त्यांचा पक्ष तुष्टीकरणावर नव्हे तर समाधानावर लक्ष केंद्रीत करतो तसेच कोणताही गरीब व्यक्ती किंवा प्रदेश मागे पडणार नाही. आसाममधील गरिबांसाठी कायमस्वरूपी घरांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे, 20 लाखांहून अधिक घरे याआधीच उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केले. आसाममधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजनाही वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा थेट फायदा आसामच्या चहा मळ्यांमधील बंधू आणि भगिनींना होत असल्याचं अधोरेखित करत, मोदी यांनी चहा मळ्यांमधे काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे यांवर भर दिला. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला आणि मुलांना लक्ष्यित मदत मिळत असल्याचं सांगून त्यामध्ये महिलांचे आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे, यांवर त्यांनी भर दिला. सरकार, माता आणि बालमृत्यू दरात घट होण्यासाठी योजना सक्रियपणे राबवत असल्याचे नमूद केले. विरोधी पक्षांच्या काळात, चहाच्या मळ्यातील कामगारांना चहा उत्पादक व्यवस्थापनाच्या दयेवर अवलंबून राहावे लागत होते. याउलट, त्यांचे सरकार त्या कामगारांच्या घराची गरज पूर्ण करत आहे, वीज आणि पाणी जोडणी सुनिश्चित करत आहे आणि त्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य देत आहे. कल्याणकारी योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची पुष्टी त्यांनी केली.

"आसामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे आणि आसाम व्यापार आणि पर्यटन यांचे मुख्य केंद्र होण्यास सज्ज झाले आहे," असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. विकसित आसाम आणि विकसित भारत निर्माण करण्याच्या सामूहिक संकल्पांची पुष्टी करून त्यांनी पुन्हा एकदा विकास प्रकल्पांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आसामचे मुख्यमंत्री, हिमंता बिस्वा सर्मा, केंद्रिय मंत्री सर्वानंद सोनोवाल, हरदीप सिंग पुरी आदींसह इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

गोलाघाट येथील नुमालीगड येथे, पंतप्रधानांनी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL)इथे आसाम जैवइथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचा उद्देश स्वच्छ उर्जेला प्रोत्साहन देणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. त्यांनी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL) येथे पॉलीप्रोपायलीन प्रकल्पाची पायाभरणीदेखील केली. यामुळे आसामच्या पेट्रोकेमिकल क्षेत्रात लक्षणीय वृद्धी होईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि या प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल.

***

सुषमा काणे / शैलेश पाटील / तुषार पवार / नितीन गायकवाड / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166557) Visitor Counter : 2