पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्‍ये प्रसारमाध्‍यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन

Posted On: 11 SEP 2025 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025


पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम जी,

उभय देशांच्या प्रतिनिधी मंडळांचे सदस्य

प्रसारमाध्‍यमांतील मित्रांनो,

नमस्‍कार !

माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काशी हे अनादी काळापासून भारताच्या सभ्यतेचे आणि सांस्कृतिक आत्म्याचे प्रतीक आहे.

आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत  आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या  गंगेच्या अखंड, अविरत  प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे  स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.

मित्रांनो,

मॉरिशस हा भारताच्या 'शेजारी प्रथम' नीतीचा  आणि  ‘व्हिजन महासागर' या धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. मार्चमध्ये मला मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात सहभागी होण्याचे सद्भाग्य लाभले. त्यावेळी आम्ही आपल्या  संबंधांना 'वर्धित धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा दिला. आज आम्ही द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा तपशीलवार आढावा घेतला. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आम्ही आपले विचार सामायिक केले.

मित्रांनो,

चागोस सामंजस्य कराराबद्दल मी पंतप्रधान रामगुलाम  जी यांचे आणि मॉरिशसच्या जनतेचे मनापासून  हार्दिक अभिनंदन करतो. मॉरिशसच्या सार्वभौमत्वासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. भारताने नेहमीच वसाहतवादमुक्ती आणि मॉरिशसच्या सार्वभौमत्वाला पूर्ण मान्यता देण्याचे समर्थन केले आहे. आणि यामध्ये, भारत मॉरिशसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.

मित्रांनो,

मॉरिशसच्या विकासामधला भारत एक विश्वासार्ह आणि प्रमुख  भागीदार असणे, ही गोष्‍ट अभिमानाची आहे. आज, आम्ही मॉरिशसच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन एक विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील,  रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आरोग्यविषयक सुविधा बळकट होतील.

भारताबाहेरील पहिले जनऔषधी केंद्र आता मॉरिशसमध्ये स्थापन झाले आहे. आज, आम्ही निर्णय घेतला आहे की, भारताच्या सहयोगाने  मॉरिशसमध्ये आयुष उत्कृष्‍टता केंद्राचे -500  खाटांचे  सर शिवसागर रामगुलाम राष्ट्रीय रुग्णालय सुरू करण्‍यात येईल तसेच  पशुवैद्यकीय विद्यालय  आणि प्राणी रुग्णालयही उभारण्यात येईल.

याबरोबरच आम्ही  चागोस सागरी  संरक्षित क्षेत्र;  एसएसआर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एटीसी म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, तसेच महामार्ग आणि रिंग रोड- वर्तुळाकार मार्गाचा विस्तार यासारख्या प्रकल्पांचे काम पुढे नेणार आहोत.

हे पॅकेज म्हणजे सहाय्यनाही. ही आपल्या सामायिक भविष्यातील गुंतवणूक आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी, मॉरिशसमध्ये यूपीआय  आणि रूपे कार्ड सुरू करण्यात आले होते. आता आम्ही स्थानिक चलनात व्यापार सक्षम करण्याच्या दिशेने काम करू.

उर्जा सुरक्षा आपल्या भागीदारीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारत, मॉरीशसच्या उर्जा संक्रमणात सहकार्य करत आहे. मॉरिशसला 100 विद्युत बस दिल्या जात आहेत, ज्यापैकी 10 पोहोचल्या आहेत. ऊर्जेच्या क्षेत्रात झालेल्या सर्वसमावेशक भागीदारी करारामुळे याला अधिक बळ मिळेल. आम्ही तमारिंड  फॉल्स (धबधबा) क्षेत्रात 17.5 मेगावॉटचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात सहकार्य करण्याचा निर्णयही घेतला आहे.

मनुष्यबळाच्या विकासातही आम्ही बऱ्याच काळापासून सहकार्य देत आलो आहोत. आतापर्यंत 5000 हून अधिक मॉरिशसच्या नागरिकांना भारतात प्रशिक्षण मिळाले आहे. माझ्या मार्चमधील दौऱ्यादरम्यान 500 नागरी सेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मला खूप आनंद आहे की, यातील पहिली तुकडी सध्या मसूरीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

आज आपण मिळून निर्णय घेतला की, मॉरिशसमध्ये एक नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालय स्थापित केले जाईल. आणि, लवकरच आम्ही मॉरिशसमध्ये मिशन कर्मयोगीची प्रशिक्षण प्रारुपेही सुरू करणार आहोत.

भारताच्या आयआयटी मद्रास तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंटने  मॉरीशस विद्यापीठासोबत सोबत करार केले आहेत. हे करार संशोधन, शिक्षण आणि नवोन्मेषातील परस्पर भागीदारीला नवी उंची गाठून देतील.

मित्रहो,

मुक्त, खुला, सुरक्षित, स्थिर, आणि समृद्ध हिंद महासागर आपले सामायिक प्राधान्य आहे. याच अनुषंगाने मॉरिशसच्या  आर्थिक स्वामित्व सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आणि सागरी क्षमता बळकट करण्यासाठी भारत पूर्णतः वचनबद्ध आहे.

भारत हिंद  महासागर क्षेत्रामध्ये नेहमीच प्रथम प्रतिसाद देणारा आणि परिपूर्ण सुरक्षा पुरवणारा एक देश म्हणून उभा राहिला आहे.

मॉरिशसच्या तटरक्षक जहाजाची दुरुस्ती भारतात केली जात आहे. त्यांच्या 120 अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षणही दिले जात आहे.

आज जल सर्वेक्षणच्या क्षेत्रात सहकार्यावर करार करण्यात आला आहे. आणि, पुढील 5 वर्षांपर्यंत विशेष आर्थिक क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण, दिशादर्शक  तक्ते, आणि जलवैज्ञानिक माहितीसाठ्याबाबत परस्परांसोबत सहकार्यही केले जाणार आहे.

महामहीम,

भारत आणि मॉरीशस दोन देश आहेत, पण आपली स्वप्ने आणि प्रारब्ध एकच आहे.

या वर्षी आपण सर शिवसागर रामगुलाम यांची एकशे पंचविसावी जयंती साजरी करत आहोत. ते केवळ मॉरिशसचे राष्ट्रपिताच नाहीत, तर भारत आणि मॉरीशसमधील अतुट दुव्याचे  संस्थापकही होते. त्यांची ही जयंती, आपल्याला परस्परांसोबत मिळून, आपल्या संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.

मी पुन्हा एकदा प्रतिनिधिमंडळाचे मनापासून स्वागत करतो.तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद.


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165666) Visitor Counter : 2