श्रम आणि रोजगार मंत्रालय
जागतिक आर्थिक मंचाच्या पाहणीनुसार भारताचा बेरोजगारी दर 2 टक्के; जी20 देशांमध्ये हा सर्वात कमी बेरोजगारी दर - डॉ.मनसुख मांडवीय
Posted On:
08 SEP 2025 5:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
जागतिक आर्थिक मंचाच्या, ‘दी फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मधील वाक्याचा उल्लेख करत केंद्रिय श्रम आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी भारताचा बेरोजगारी दर 2 टक्के असल्याचे सांगितले. जी 20 देशांमध्ये भारताचा बेरोजगारी दर सर्वात कमी असल्याचे ते म्हणाले. भारताच्या वेगवान आर्थिक विकासाबरोबरच सर्वच क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मितीदेखील वाढली आहे असे सांगून, सक्षमीकरणाच्या सरकारी योजनांचे यामध्ये उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आज नवी दिल्लीत आयोजित समारंभात केंद्रिय मंत्री बोलत होते. श्रम आणि रोजगार मंत्रालय, ‘मेन्टॉर टुगेदर आणि ‘क्विकर’ यांच्यात रोजगार संधी वाढविणे तसेच राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टलवरील रोजगार वृद्धी याबाबत हा सामंजस्य करार करण्यात आला.
आपल्या भाषणात डॉ. मांडवीय म्हणाले, “राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) मंचावर जवळपास 52 लाख रोजगारदात्यांनी, 5.79 कोटी रोजगार इच्छुकांनी नोंदणी केली असून 7.22 कोटींपेक्षा जास्त रोजगारांची नोंद झाली आहे. आता या मंचावर केवळ रोजगारांची नोंद होत नाही तर, रोजगाराशी संबंधित सर्व सेवा या एकाच मंचावर उपलब्ध आहेत. सध्या या मंचावर 44 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रालयाने ऍमेझॉन व स्विगीसह दहा प्रमुख कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. या भागीदारीमुळे सुमारे पाच लाख रोजगारांची नोंदणी झाली.”

सेवा, उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील विकासातून रोजगार निर्मितीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. स्वयं रोजगार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुद्रा व पीएम स्वनिधी यासारख्या परिवर्तनकारी योजना सुरू केल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

मंत्रालय आणि दोन्ही संस्था यांच्यातील सहकार्याचे स्वागत करताना डॉ. मांडवीय म्हणाले की या भागीदारीमुळे शाश्वत रोजगार निर्मिती होईल तसेच रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी रचनात्मक मार्गदर्शन उपलब्ध असेल. विशेषतः यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या दृष्टीने ते लाभदायक असेल. अंतिमतः अशा भागीदारीमुळे युवा पिढीसोबतच देशालाही व्यापक प्रमाणात लाभ होईल, असे ते म्हणाले. “या देशाचे आणि देशातील या पिढीचे भवितव्य उज्ज्वल असल्याची हमी यामुळे मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.
सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164705)
Visitor Counter : 2