गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजना- शहरी 2.0 (पीएमएवाय-यू 2.0) अंतर्गत अंगिकार 2025 अभियानाची सुरुवात
अंगिकार 2025: पीएमएवाय-यू 2.0 संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत माहिती पोहोचवणारे अभियान
Posted On:
05 SEP 2025 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते काल, दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान आवास योजना- शहरी 2.0 (पीएमएवाय-यू 2.0) अंतर्गत सदर योजनेची माहिती शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या “अंगिकार 2025” या अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयूए) सचिव श्रीनिवास कटिकिथला, सर्वांसाठी घरे (एचएफए) अभियानाचे संयुक्त सचिव आणि अभियान संचालक (जेएस आणि एमडी) कुलदीप नारायण यांच्यासह मंत्रालयातील इतर अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अंगिकार 2025 हे एक माहितीचा प्रसार करण्यासाठीचे अभियान असून ते पीएमएवाय-यू 2.0 योजनेबाबत देशभरात विस्तृत प्रमाणात जागरुकता निर्माण करून या योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देईल. पीएमएवाय-यू 2.0 योजनेसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांची वेगवान पडताळणी करणे आणि सदर योजनेतून याआधीच मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामाला वेग देणे या उद्देशाने देखील अंगिकार 2025 अभियानाची रचना करण्यात आली आहे.
अंगिकार 2025 उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे संबंधित भागधारकांना कमी उत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माणासाठी कर्ज जोखीम हमी निधी विश्वस्त योजनेची (सीआरजीएफटीएलआयएच) माहिती देणे. सक्रीय सामाजिक जागृती, लक्ष्यित सहभाग आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांसह एकत्रीकरण यांच्या माध्यमातून हे अभियान सदर योजनेची माहिती अगदी शेवटच्या टप्प्यातील नागरिकापर्यंत पोहोचणे सुनिश्चित करेल.त्याव्यतिरिक्त, पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजनेचे लाभ देखील पीएमएवाय-यूच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत आणि पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या विशेष लक्ष्यित गटांतील लाभार्थ्यांच्या घरासंबंधीच्या गरजांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पीएमएवाय-यू अंतर्गत 120 लाख घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 94.11 लाख पक्क्या घरांचे बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे आणि ही घरे लाभार्थ्यांकडे हस्तांतरित देखील करण्यात आली आहेत. इतर उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अंगिकार 2025 अभियानाद्वारे सुलभता निर्माण करण्यात येईल. ‘सर्वांसाठी घरे’ या उद्दिष्टाला अनुसरून, पीएमएवाय-यू योजनेची पुनर्रचना करण्यात येऊन सप्टेंबर 2024 मध्ये ही योजना पीएमएवाय-यू 2.0 या नव्या स्वरुपात सुरु करण्यात आली. पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत, देशाच्या शहरी भागातील अतिरिक्त 1 कोटी कुटुंबांना शहरांमध्ये पक्की घरे बांधण्यासाठी अथवा विकत घेण्यासाठी 2.50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
अंगिकार 2025 ही मोहीम अंमलबजावणीतील अंतर भरून काढून कल्याणकारी योजना जनतेच्या अधिक जवळ नेण्याच्या शासनाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करते. तसेच ही मोहीम समाजातील दुर्बल घटकांपर्यंत गृहयोजनेचे लाभ पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणार आहे.
अंगिकार 2025 ही मोहीम 4 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या दोन महिन्यांच्या कालावधीत देशभरातील 5,000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (एलबीएस) राबवली जाणार आहे.

यामध्ये देशभरात घरोघरी जाऊन व्यापक जनजागृती केली जाईल तसेच इतर प्रचार माध्यमे आणि समुदाय सशक्तीकरणाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल.
या उपक्रमांतर्गत कॅम्प, कर्ज मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून संभाव्य लाभार्थी आणि संबंधित भागधारकांना 'जनभागीदारी' चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
अंगिकार 2025 च्या प्रारंभानंतर, संयुक्त सचिव आणि मिशन संचालक, एचएफए कुलदीप नारायण, यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रणनीती आणि कार्यपद्धतींवर चर्चा केली.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, 17 सप्टेंबर 2025 रोजी 'पीएमए-यू आवास दिवस' साजरा केला जाणार आहे, जो पीएमए-यू 2.0 च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त असेल.
तसेच, 'पीएम आवास मेळा – शहरी' या नावाने एक मुख्य कार्यक्रम जिल्हा मुख्यालयांवर आयोजित केला जाईल. तसेच मोठ्या शहरांमध्ये, पीएम आवास मेळा, शहरी महापालिका स्तरावर आयोजित केला जाईल.
या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन दोन टप्प्यांमध्ये करण्यात येईल – पहिला टप्पा: 17 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025; दुसरा टप्पा: 16 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान कोणताही एक दिवस. हा प्रमुख कार्यक्रम पीएमए-यू आणि पीएमए-यू 2.0 च्या लाभांचे वितरण आणि सादरीकरण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल, तसेच स्थानिक पातळीवर समन्वय आणि समुदायाशी संपर्क साधण्यासाठी सहाय्यक ठरेल.
पीएम आवास मेळा – शहरी अंतर्गत विविध सेवा आणि समुदाय सहभागाचे उपक्रम आयोजित करण्यात येतील.
पीएम आवास मेळा – शहरी व्यतिरिक्त, यूएलबीएस द्वारे वार्ड / क्लस्टर / शहर पातळीवर विविध कार्यक्रम / उपक्रम राबवले जातील, जे अंगिकार 2025 मोहिमेच्या प्रचारास गती देतील.
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164229)
Visitor Counter : 2