अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे झालेल्या 56 व्या जीएसटी परिषदेच्या निर्णयांबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)

Posted On: 03 SEP 2025 11:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2025

 

1. जीएसटी दरांमधील बदल कधीपासून लागू होतील?

जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीतील शिफारशींनुसार, सिगारेट, जर्दा सारखी चघळली जाणारी तंबाखू उत्पादने,  उत्पादित न केलेला तंबाखू आणि बीडी वगळता इतर सेवा आणि वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये बदल २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. सिगारेट, जर्दा, उत्पादित न केलेला तंबाखू आणि बीडी यासारख्या चघळणाऱ्या तंबाखू उत्पादनांसाठी, जीएसटी आणि भरपाई उपकराचे विद्यमान दर लागू राहतील आणि नवीन दर नंतर अधिसूचित केले जातील जे भरपाई उपकरामुळे संपूर्ण कर्ज आणि व्याज परतफेडीवर आधारित असतील.

2. सीजीएसटी कायदा, 2017 अंतर्गत वस्तूंसाठी आवश्यक असलेल्या नोंदणीच्या मर्यादेत काही बदल झाला आहे का?

नाही, सीजीएसटी कायदा, 2017 अंतर्गत वस्तूंसाठी आवश्यक असलेल्या नोंदणीच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.

3. कोणत्या अधिसूचनेत सुधारित दरांची तरतूद आहे?

जीएसटी दरांमधील बदलाची माहिती  दर अधिसूचनेत दिली जाईल.  अधिसूचना CBIC वेबसाइटवर उपलब्ध असेल. .

4. जर मी जीएसटी  दरांमध्ये बदल करण्यापूर्वी वस्तू/सेवा किंवा दोन्ही पुरवल्या असतील परंतु चालान  नंतर जारी केले असतील तर लागू असलेल्या कराच्या दराचे काय होईल?

सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम  14 (a)(i) नुसार, जर कर दरात बदल होण्यापूर्वी वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही  पुरवल्या गेल्या असतील आणि त्याकरिता चालान कराच्या दरात बदल झाल्यानंतर जारी केले गेले असेल, तर पुरवठ्याची वेळ म्हणजेच अशा पुरवठ्यावर कर भरण्याची देय  तारीख खालीलप्रमाणे असेल:

  1. जर कर दरात बदल झाल्यानंतर देयक प्राप्त झाले असेल, तर पुरवठ्याची वेळ ही देयक प्राप्त झाल्याची तारीख किंवा चालान जारी झाल्याची तारीख असेल, जी आधी असेल ती धरली जाईल.
  2. जर कर दरात बदल होण्यापूर्वी देयक प्राप्त झाले असेल, तर पुरवठ्याची वेळ ही देयक प्राप्त झाल्याची तारीख असेल.

5. जर मला वस्तू/सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्यासाठी आगाऊ रक्कम मिळाली असेल परंतु पुरवठा पूर्ण झाला नसेल किंवा चालान जारी केले नसेल तर जीएसटी  दर काय लागू असेल?

पुरवठ्याच्या वेळेच्या तरतुदींनुसार जीएसटी दर निश्चित केला जाईल. (सीजीएसटी  कायदा, 2017 चे  कलम 14 पहा).

6. जीएसटी दरांमध्ये बदल लागू होण्यापूर्वी केलेल्या खरेदीवरील आयटीसीचे काय होईल? आता मला कमी दराने आयटीसी मिळेल का?

सीजीएसटी कायद्याच्या कलम 16(1) नुसार नोंदणीकृत व्यक्तीला त्याच्या आवक पुरवठ्यावर आकारण्यात येणाऱ्या इनपूट कराचे  क्रेडिट घेण्याचा अधिकार आहे, ज्याचा उपयोग तो त्याच्या व्यवसायादरम्यान किंवा तो पुढे नेण्यासाठी करतो किंवा वापरण्याचा मानस ठेवतो , जो विहित केलेल्या अटी आणि निर्बंधांच्या अधीन आहे  आणि सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 49 अंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने त्याच्या ई-क्रेडिट लेजरमध्ये जमा केला जातो.

त्यानुसार, जर नोंदणीकृत व्यक्तीला आवक पुरवठा मिळाला आणि त्यावर योग्यरित्या कर आकारला गेला असेल, तर अशा पुरवठ्याच्या वेळी प्रचलित दराशी सुसंगत दराने, ती नोंदणीकृत व्यक्ती सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 49 मध्ये निर्दिष्ट केलेल्या इतर अटी/निर्बंध आणि पद्धतीच्या  अधीन राहून अशा भरलेल्या कराच्या क्रेडिटसाठी पात्र आहे.

7. वस्तूंच्या आयातीवरील  आयजीएसटी दरावर काय परिणाम होईल?

आयात केलेल्या वस्तूंवरील आयजीएसटी दर अधिसूचनेत सूचित केल्याप्रमाणे जीएसटी दर असतील, खेरीज  ती प्रकरणे वगळता जिथे  आयजीएसटी दरावर स्वतंत्रपणे सूट देण्यात आली आहे.

8. 22 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर केलेल्या वस्तू/सेवांच्या माझ्या बाह्य पुरवठ्यावर जीएसटी दर कमी करण्यात आला आहे परंतु माझ्याकडे आधीच लेजरमध्ये जीएसटीचा आयटीसी आहे जो जास्त दरामुळे जमा झाला आहे. मी असे क्रेडिट वापरणे सुरू ठेवू शकतो का?

ई-क्रेडिट लेजरमध्ये एकदा योग्यरित्या मिळवलेले इनपुट टॅक्स क्रेडिट सीजीएसटी कायद्याच्या कलम  49(4) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतुदींनुसार कोणत्याही आउटपुट कर दायित्वाच्या पूर्ततेसाठी वापरले जाऊ शकते.

9. माझा बाह्य पुरवठा नवीन दर वेळापत्रकानुसार सवलत-प्राप्त आहे. परंतु माझ्या लेजरमध्ये आधीच जीएसटी देयकांचा  आयटीसी मिळालेला  आहे. मला आयटीसी रिव्हर्स  करावा लागेल का?

21 सप्टेंबर 2025 पर्यंत केलेल्या वस्तू/सेवांच्या पुरवठ्यासाठी किंवा दोन्हीसाठी बाह्य दायित्व पूर्ण करण्यासाठी आयटीसीचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, 22 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर केलेल्या पुरवठ्यासाठी, जेव्हा दरातील  बदल लागू होतो, तेव्हा सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींनुसार आयटीसी रिव्हर्स करावा लागेल.

10. अधिसूचित  सुधारित दर लागू झाल्याच्या तारखेपर्यंत पुरवठ्यांसाठी उलट्या शुल्क रचनेमुळे उद्भवणाऱ्या संचित क्रेडिटचा परतावा  मला घेता येईल का ?

सदर मुद्दा 31.03.2020 (सुधारित केल्याप्रमाणे)  परिपत्रक क्रमांक १३५/०५/२०२०-जीएसटी द्वारे स्पष्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सीजीएसटी कायद्याच्या कलम 54(3)  च्या पहिल्या तरतुदीच्या कलम (ii) नुसार जमा झालेल्या आयटीसीचा परतावा, जेव्हा इनपुटवरील कराचा दर आउटपुट पुरवठ्यावरील कराच्या दरापेक्षा जास्त असल्याने जमा झाला असेल तेव्हा उपलब्ध आहे. मात्र , अशा प्रकरणांमध्ये इनपुट आणि आउटपुट समान असल्याने, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कर दर लागू होत असले तरी, सीजीएसटी कायद्याच्या कलम 54 च्या उप-कलम (3) च्या पहिल्या तरतुदीच्या कलम (ii) च्या तरतुदींखाली येत नाहीत

11. जर माझ्याकडे दर बदल लागू होण्याच्या तारखेला आधीपासूनचा साठा असेल, तर मी सुधारित दर लागू करावा का?

जीएसटी पुरवठ्यावर आकारला जातो. म्हणून, सुधारित जीएसटी दर अधिसूचित झाल्यानंतर किंवा त्यानंतर पुरवठा केलेल्या वस्तूंवर, वस्तू/सेवांच्या बाह्य पुरवठ्यावर किंवा दोन्हीवर नवीन जीएसटी दर लागू होतील.

12. नवीन दर लागू झाल्यावर ई-वे बिले रद्द करावी लागतील का ?  आणि ट्रान्झिटमध्ये असलेल्या वस्तूंवर नव्याने बिल बनवावे लागेल का?

सीजीएसटी नियम, 2017 च्या नियम 138 नुसार, वस्तूंचा पुरवठा/वाहतूक सुरू होण्यापूर्वी ई-वे बिल जनरेट करावे लागेल. नवीन दर लागू झाल्यावर ट्रान्झिटमध्ये असलेल्या वस्तूंसाठी ई-वे बिले रद्द करणे आणि नवीन जनरेट करणे अनिवार्य नाही. सध्या ट्रान्झिटमध्ये असलेली ई-वे बिले त्यांच्या मूळ वैधता कालावधीनुसार वैध राहतील.

13. युएचटी (अल्ट्रा हाय टेम्परेचर) दुधाला सूट देण्यात आली आहे. युएचटी  दुधाला दिलेल्या सवलतीत वनस्पती-आधारित दुधाचाही समावेश आहे  का?

युएचटी दुधाव्यतिरिक्त इतर सर्व डेअरी  दूध आधीच जीएसटी-मुक्त होते . म्हणून समान वस्तूंना समान कर आकारणीसाठी युएचटी दुधाला सूट देण्यात आली आहे. सोया मिल्क ड्रिंक्स वगळता वनस्पती-आधारित दुधाच्या पेयांवर 18% जीएसटी लागू होता तर सोया मिल्क ड्रिंक्सवर 12% जीएसटी होता. वनस्पती-आधारित मिल्क ड्रिंक्स आणि सोया मिल्क ड्रिंक्सवरील जीएसटी दर आता 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

14. ‘इतर नॉन-अल्कोहोलिक पेये’ वर 40% दर लावण्यामागचे कारण काय आहे?

अलीकडील दर सुसूत्रीकरणाच्या मागील तत्व हे आहे  की चुकीचे वर्गीकरण आणि वाद टाळण्यासाठी समान वस्तूंना समान दर ठेवणे. हे ‘इतर नॉन-अल्कोहोलिक पेये’ ना देखील लागू करण्यात आले आहे.

15. कोणत्याही तक्त्यात इतरत्र निर्दिष्ट न केलेल्या अन्नपदार्थांवर जीएसटी दर किती आहे?

इतरत्र निर्दिष्ट न केलेल्या अन्नपदार्थांवर 5% जीएसटी दर लागू होईल.

16. भारतीय ब्रेडच्या विशिष्ट प्रकारांवरच जीएसटी दरात बदल करण्याचे कारण काय?

ब्रेडला आधीच सूट होती तर पिझ्झा ब्रेड, रोटी, पोरोटा, पराठा इत्यादींसाठी वेगवेगळे दर होते. सर्व भारतीय ब्रेडना, कोणत्याही नावाने ओळखले जात असले तरी, सूट देण्यात आली आहे. उदाहरण म्हणून फक्त काही वस्तूंचा उल्लेख केला गेला आहे.

17. फळांचे  पेय किंवा फळांच्या रसासह कार्बोनेटेड पेये यांचे दर का वाढविण्यात आले आहेत?

या वस्तूंवर जीएसटी व्यतिरिक्त भरपाई उपकर लागू होता . भरपाई उपकर आकारणी समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे  कराच्या दरात सुधारणेपूर्वीचा स्तर राखण्यासाठी कर वाढविण्यात आला आहे.

18. पनीर आणि इतर पदार्थ  यांच्यात वेगवेगळी कर आकारणी का आहे?

दर सुसूत्रीकरणापूर्वी, प्री-पॅकेज्ड आणि लेबल केलेल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या पनीरवर शून्य दर होता. म्हणून प्री-पॅकेज्ड आणि लेबल केलेल्या स्वरूपात पुरवल्या जाणाऱ्या पनीरच्या बाबतीतच बदल करण्यात आले आहेत. पनीर हे एक भारतीय कॉटेज चीज आहे. हे बहुतेक लघु उद्योगात उत्पादित केले जाते. भारतीय कॉटेज चीजला प्रोत्साहन देण्यासाठी हा बदल  करण्यात आला आहे.

19. नैसर्गिक मध आणि कृत्रिम मध यांच्यासाठी वेगवेगळ्या कर व्यवस्थांचे  कारण काय आहे?

याचा उद्देश  नैसर्गिक मधाला प्रोत्साहन देणे  आहे.

20. सर्व कृषी यंत्रसामग्री / उपकरणांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे का?

शेती यंत्रसामग्री / उपकरणे जसे की स्प्रिंकलर, ठिबक सिंचन प्रणाली, माती तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी कृषी, बागायती किंवा वनीकरण यंत्रसामग्री; लॉन किंवा स्पोर्ट्स-ग्राउंड रोलर, कापणी किंवा मळणी यंत्रसामग्री, ज्यामध्ये पेंढा किंवा चारा बेलर समाविष्ट आहेत; गवत किंवा गवत कापण्याचे यंत्र, इतर कृषी, बागायती, वनीकरण, कुक्कुटपालन किंवा मधमाशी पालन यंत्रसामग्री, कंपोस्टिंग मशीन इत्यादींवरील जीएसटी दर, ज्यावर पूर्वी 12% जीएसटी लागत होता, आता 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

21. कृषी यंत्रसामग्रीला पूर्णपणे सूट का देण्यात आली नाही?

दर सुसूत्रीकरणाचा उद्देश वापरकर्ते आणि उत्पादक यांच्यात संतुलन राखणे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देताना, देशांतर्गत उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ नये हे महत्वाचे आहे. जर कृषी यंत्रसामग्रीला पूर्णपणे सूट दिली गेली, तर या वस्तूंचे उत्पादक/विक्रेते कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकणार नाहीत आणि त्यांना इनपुटवर भरलेला आयटीसी रिव्हर्स  करावा लागेल. यामुळे त्यांची प्रभावी कर तफावत आणि उत्पादन खर्च वाढेल. शेतकऱ्यांवर जास्त किमतीच्या स्वरूपात याचा भार पडेल यामुळे प्रतिकूल उपाय होईल.

22. औषधांवरील जीएसटी दर किती आहे?

शून्य दराने निर्दिष्ट केलेल्या औषधांव्यतिरिक्त, सर्व औषधांवर 5% सवलतीचा जीएसटी दर निश्चित करण्यात आला आहे.

23. सरसकट सर्व औषधांना जीएसटीमधून का वगळण्यात आले नाही?

जर द्रव्ये/औषधांना पूर्णपणे सूट देण्यात आली, तर उत्पादक/विक्रेते कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकणार नाहीत आणि त्यांना इनपुटवर भरलेला आयटीसी परत करावा लागेल. यामुळे त्यांची प्रभावी कर तफावत आणि उत्पादन खर्च वाढेल. परिणामी, ग्राहकांना/रुग्णांना जास्त किंमत मोजावी लागेल ज्यामुळे हा उपाय प्रतिकूल ठरेल.

24. सर्व वैद्यकीय उपकरणांवर 5% जीएसटी दर लागू होतो का?

विशेषत्वाने सूट दिलेल्या उपकरणांव्यतिरिक्त वैद्यकीय, शस्त्रक्रिया, दंत आणि पशुवैद्यकीय वापरात वापरली जाणारी सर्व वैद्यकीय साधने, उपकरणे, हत्यारे या सर्वांवर 5% दर लागू होतो.

25. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी दर कमी का करण्यात आला आहे? यामुळे शुल्क रचना उलट होणार नाही का?

या उपाययोजनेचा उद्देश आरोग्यसेवेचा खर्च कमी करणे आणि त्यामुळे रुग्णांना, विशेषतः गरिबांना फायदा व्हावा हा आहे. या उपाययोजनेमुळे कोणतीही नवीन उलटी शुल्क रचना तयार होत नाही कारण विद्यमान रचनेत आधीच उलटी शुल्क रचना होती, जरी या उपाययोजनेमुळे ही प्रक्रिया अधिक तीव्र होऊ शकते. तथापि, जीएसटी अंतर्गत, उलट्या शुल्क रचनेमुळे उद्भवणाऱ्या संचित इनपुट कर क्रेडिटचा परतावा उत्पादकांना उपलब्ध आहे. जीएसटी परिषदेने जलद परतफेड सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सुधारणांची शिफारस देखील केली आहे.

26. छोट्या पेट्रोल, एलपीजी, सीएनजी किंवा डिझेल मोटारींवरील सुधारित जीएसटी दर किती आहे? छोट्या मोटारींमध्ये काय काय समाविष्ट आहे?

सर्व लहान मोटारींवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. जीएसटीच्या उद्देशाने, लहान मोटार म्हणजे 1200 सीसी पर्यंत इंजिन क्षमता आणि 4000 मिमी पर्यंत लांबी असलेल्या पेट्रोल, एलपीजी किंवा सीएनजी मोटारी आणि 1500 सीसी पर्यंत इंजिन क्षमता आणि 4000 मिमी पर्यंत लांबी असलेल्या डिझेल मोटारी.

27. 1500 सीसी पेक्षा जास्त किंवा 4000 मिमी पेक्षा जास्त लांबीच्या वाहनांवर नवीन जीएसटी दर किती आहे? युटिलिटी  वाहनांवर जीएसटी दर किती आहे?

सर्व मध्यम आकाराच्या आणि मोठ्या मोटारींवर म्हणजेच 1500 सीसी पेक्षा जास्त किंवा 4000 मिमी पेक्षा जास्त लांबीच्या वाहनांवर जीएसटी दर 40% आहे. शिवाय, युटिलिटी व्हेइकल्सच्या श्रेणीतील मोटार वाहने, ज्यांना स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (एसयूव्ही), मल्टी युटिलिटी व्हेइकल्स (एमयूव्ही), मल्टी-पर्पज व्हेइकल्स (एमपीव्ही) किंवा क्रॉस-ओव्हर युटिलिटी व्हेइकल्स (एक्सयूव्ही) असे नाव दिले जाते, ज्यांची इंजिन क्षमता 1500 सीसी पेक्षा जास्त, लांबी 4000 मिमी पेक्षा जास्त आणि ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यावर कोणताही उपकर न आकारता 40% जीएसटी दर लागू होईल.

28. तीन चाकी वाहनांवर जीएसटी दर किती आहे?

एचएसएन 8703 अंतर्गत वर्गीकृत तीन चाकी वाहनांवरील जीएसटी दर 18% आहे. तो 28% वरून कमी करण्यात आला आहे.

29. बसेस आणि चालकासह 10 किंवा त्याहून अधिक व्यक्तींना वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी इतर वाहने जसे की बसेस, यांच्यावर जीएसटी दर किती आहे?

चालकासह दहा किंवा त्याहून अधिक व्यक्तींना वाहून नेण्यासाठी आरेखित केलेली आणि एच एस एन 8702 अंतर्गत वर्गीकृत केलेल्या सर्व मोटार वाहनांवर 18%जीएसटी दर लागू होईल. तो 28% वरून कमी करण्यात आला आहे.

30. रुग्णवाहिका म्हणून पुरवल्या जाणाऱ्या वाहनांवर जीएसटी दर किती आहे?

रुग्णवाहिका म्हणून मान्यताप्राप्त आणि कारखान्यातून मंजुरीच्या वेळी रुग्णवाहिकेसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक फिटिंग्ज, फर्निचर आणि पूरक सामग्रीसह सुसज्ज मोटार वाहनांवर 18% जीएसटी दर लागू होईल. तो 28% वरून कमी करण्यात आला आहे.

31. लॉरी आणि ट्रकसारख्या मालवाहतूक वाहनांवर जीएसटी दर किती आहे?

एचएसएन 8704 अंतर्गत वर्गीकृत केलेल्या तसेच वस्तूंच्या वाहतुकीसाठी आरेखित केलेल्या लॉरी आणि ट्रकसारख्या मोटार वाहनांवर 18% जीएसटी दर लागू होईल. तो 28% वरून कमी करण्यात आला आहे.

32. ट्रॅक्टरचे ट्रेलर्स आणि सेमी-ट्रेलर्स यावरील जीएसटी दर किती आहे?

1800 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या सेमी-ट्रेलर्सच्या रोड ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर ट्रॅक्टरवर 5% जीएसटी दर आहे. तथापि, 1800 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या सेमी-ट्रेलर्सच्या रोड ट्रॅक्टरवर 18% जीएसटी दर आहे. तो 28% वरून कमी करण्यात आला आहे.

33. मोटारसायकलींवर जीएसटी दर किती आहे?

350 सीसी पर्यंतच्या इंजिन क्षमतेच्या मोटारसायकलींवर 18% जीएसटी दर आहे तर 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या मोटारसायकलींवर 40% जीएसटी दर आहे.

34. 350 सीसी पर्यंतच्या मोटार सायकलींसाठी जीएसटी दर 18% आहे? यामध्ये 350 सीसी मोटार सायकलींचा समावेश आहे का?

40% दर केवळ 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकलींना लागू आहे. म्हणून 18% दर 350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या मोटार सायकलींना देखील लागू आहे.

35. सध्या, मध्यम-आकाराच्या आणि मोठ्या गाड्यांवर 28% जीएसटी आणि 17-22% पर्यंतचा भरपाई उपकर (compensation cess) लागतो, एकूण कर 45-50% पर्यंत असतो. नवीन दर काय असेल?

मध्यम-आकाराच्या आणि मोठ्या गाड्यांवरील नवीन जीएसटी दर 40% असेल, ज्यात कोणताही भरपाई उपकर  समाविष्ट नाही.

36. सायकली आणि त्यांच्या सुट्या भागांवरील जीएसटीच्या दरात कपात केली आहे का?

सायकली आणि त्यांच्या सुट्या भागावरील जीएसटीचा दर 12% वरून 5% इतका कमी करण्यात आला आहे.

37. लहान शेतकी ट्रॅक्टर्सना जीएसटीमधून पूर्णपणे का वगळण्यात आले नाही?

शेतकऱ्यांना दिलासा देत असतानाच,  देशांतर्गत उत्पादकांचा लाभ कमी होऊ नये, हा उद्देश आहे. छोट्या ट्रॅक्टर्सना पूर्णपणे करमुक्त केल्यास त्याचा उलटा परिणाम होईल. जेव्हा कोणत्याही वस्तूंवर कर दर शून्य असतो, तेव्हा पुरवठादार त्या वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या इनपुटवर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊ शकत नाहीत आणि त्यांना ते उलट करावे लागते. याचा अर्थ, उत्पादकांना हा खर्च स्वतः सोसावा लागतो, जो शेवटी खरेदीदारांवर लादला जातो.

38. 40% दराला 'विशेष दर' का म्हणतात? वस्तूंना विशेष दराच्या अधीन ठेवण्याचा आधार काय आहे?

विशेष दर हा केवळ काही निवडक वस्तूंवर लागू होतो, प्रामुख्याने 'sin goods' आणि काही 'luxury goods' वर, त्यामुळे तो एक विशेष दर आहे. यापैकी बहुतेक वस्तूंना जीएसटी व्यतिरिक्त  भरपाई उपकर  लागत होता. भरपाई उपकर समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, बहुतेक वस्तूंवरील कराचा भार कायम ठेवण्यासाठी भरपाई उपकर जीएसटी मध्ये विलीन केला जात आहे. इतर वस्तू आणि सेवांवर विशेष दर लागू केला गेला आहे, कारण त्यांना आधीच 28% सर्वाधिक जीएसटी दर लागत होता.

39. लाकडी लगद्यावर (wood pulp) वेगवेगळे कर दर का आहेत?

लाकडी लगदा (wood pulp) कागद आणि कापड बनवण्यासाठी वापरला जातो. कागद उद्योग साखळी आणि कापड उद्योग साखळी स्वतंत्रपणे चालतात. कापडाच्या बाबतीत, इतर कापड उत्पादनांशी समानता राखण्यासाठी कराची रचना केली जाते.

40. कच्च्या कापसावरील जीएसटी का काढण्यात आलेला नाही?

सध्या कापसावर रिव्हर्स चार्ज तत्वावर जीएसटी लागतो. याचा अर्थ असा की, जेव्हा शेतकरी कच्च्या कापसाचा पुरवठा करतात, तेव्हा त्यांना जीएसटी भरावा लागत नाही. कापसावर जीएसटी लावण्याचे कारण हे आहे की, इनपुट क्रेडिट साखळीत  खंड पडू नये आणि कापसावर भरलेला जीएसटी वस्त्रोद्योगासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट  म्हणून उपलब्ध असतो. याचा अंतिम फायदा ग्राहकांनाच होईल.

41. वस्त्रोद्योगासाठी, केमिकल डाईज, प्लॅस्टिक्स, धातू, मेटलाइज्ड यार्न, झिपर्स, इलॅस्टिक्स, रबराइज्ड यार्न, इलास्टिक कव्हर्ड यार्न, एम्बेलिशमेंट्स (embellishments) इत्यादींमध्ये वापरल्या जाणाऱ्या रबरवर दर कमी का केले नाहीत?

मानवनिर्मित मूल्य साखळीतील इन्व्हर्जन सुधारणे हा दर तर्कसंगत करण्याच्या प्रक्रियेचा उद्देश आहे. हे फायबर न्यूट्रल धोरणाशी  सुसंगत आहे. तथापि, नमूद केलेल्या वस्तू बहुपयोगी  आहेत. या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यासाठी 'अंतिम वापर-आधारित यंत्रणा' (end use-based mechanism) आवश्यक असेल, जी 'अंतिम वापर-आधारित सवलतींपासून' दूर जाण्याच्या सध्याच्या धोरणाच्या विरुद्ध आहे.

42. जिओटेक्स्टाईल्स आणि ऍग्रोटेक्स्टाईल्स यांसारख्या तांत्रिक टेक्स्टाईल्सना जास्त सखोल इन्वर्जनला तोंड द्यावे लागेल का कारण ते पॉलिइथिलिन आणि पॉलिप्रोपिलिन सारख्या प्लॅस्टिक घटकांचा वापर करत असतात?

जिओटेक्स्टाईल्स आणि ऍग्रो-टेक्स्टाईल्स सारख्या तांत्रिक टेक्स्टाईल्सना भारताने स्वीकारलेल्या जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या (World Customs Organisation) सुसंगत नामकरण प्रणालीनुसार (Harmonised System of Nomenclature) कापड म्हणून वर्गीकृत केले आहे, प्लास्टिक म्हणून नाही. उलट परिणाम (inversion) कदाचित अधिक खोल होऊ शकेल, परंतु जीएसटी अंतर्गत, उलट ड्युटीमुळे जमा झालेल्या क्रेडिटचा परतावा उपलब्ध आहे. त्यामुळे, जमा झालेले इनपुट टॅक्स क्रेडिट  परताव्याद्वारे न्यूट्रल होते. प्रक्रिया सुधारणा परताव्यांना त्वरित मंजुरी मिळेल हे सुनिश्चित करेल.

43. मेटलाईज्ड प्लास्टिक फिल्मपासून बनवलेल्या इमिटेशन जरीवर (imitation zari) इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा (inverted duty structure) परतावा प्रतिबंधित का आहे, तर प्लास्टिक किंवा रबरपासून बनवलेल्या इतर कापड उत्पादनांच्या परताव्यावर कोणतेही इतर बंधन नाही?

इमिटेशन जरीमधील प्लास्टिक/पॉलिस्टर फिल्मवरील आयटीसी (ITC) प्रतिबंधित करण्याचा निर्णय 52 व्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या जीएसटी दर तर्कसंगत करण्याच्या  प्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट जीएसटी दर सुलभ करणे हे आहे.

44. टॉयलेट सोप बारवर नवा जीएसटी दर किती आहे? लिक्विड सोप आणि साबणाची वडी(सोप बार) यांच्यात फरक का ठेवला आहे?

टॉयलेट सोप बारवर नवीन जीएसटी दर 5% आहे. निम्न मध्यमवर्गीय आणि समाजातील गरीब घटकांसाठी मासिक खर्च कमी करण्याच्या उद्देशाने असे केले आहे.

45. फेस पावडर आणि शॅम्पूवरील जीएसटी कमी करण्याचे कारण काय आहे? यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि लक्झरी ब्रँड्सना (luxury brands) फायदा होणार नाही का?

ही उत्पादने लोकसंख्येच्या जवळपास सर्वच स्तरांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत. जरी बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा लक्झरी ब्रँड्सद्वारे विकल्या जाणाऱ्या महागड्या फेस पावडर आणि शॅम्पूंनाही फायदा होणार असला, तरीही कर रचना आणखी सुलभ करणे हे दर तर्कसंगत करण्याच्या प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. कॉस्मेटिक्सच्या ब्रँड किंवा मूल्यावर आधारित कर व्यवस्थापन केल्यास कररचनेत गुंतागुंत निर्माण होईल, शिवाय प्रशासनासमोर आव्हाने उभी राहतील.

46. केवळ फेस पावडर आणि शेव्हिंग क्रीम सारख्या निवडक वस्तूंवर जीएसटी का कमी करण्यात आला आहे?

लोकसंख्येतील बहुतांश घटकांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तू असलेल्या काही विशिष्ट वस्तूंवरच जीएसटी दर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

47. माउथवॉशवर जीएसटी कमी का केला नाही, जो डेंटल फ्लॉससारखा घराघरात वापरला जातो?

जीएसटी कौन्सिलने टूथपेस्ट, टूथब्रश आणि डेंटल फ्लॉस यांसारख्या मूलभूत दंत स्वच्छतेच्या वस्तूंवरील जीएसटी दर 5% पर्यंत कमी करण्याची शिफारस केली आहे

48. कोळशावरील जीएसटी दर का वाढवला आहे? याचा विजेच्या खर्चावर परिणाम होणार नाही का?

दर तर्कसंगतीकरणापूर्वी, कोळशावर 5% जीएसटी + 400 रुपये/टन भरपाई उपकर  लागत होता. कौन्सिलने भरपाई उपकर  समाप्त करण्याची शिफारस केली आहे आणि त्यामुळे दर जीएसटी मध्ये विलीन करण्यात आला आहे. यामुळे कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही.

49. तेंदू पानांवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे का? दर का कमी करण्यात आला आहे?

तेंदू पानांवरील जीएसटी दर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे कारण तंबाखूच्या पानांवर आधीच 5% दर आहे. तेंदू पाने ही गौण वन उत्पादने (minor forest produce) देखील आहेत.

50. नवीकरणीय ऊर्जा उपकरणे/साधनांवर जीएसटी दर किती आहे?

नवीकरणीय ऊर्जा उपकरणे/साधनांवर,आधी 12% असलेला जीएसटी दर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

51. नवीकरणीय ऊर्जा उपकरणे/ साधनांवर जीएसटी दर का कमी करण्यात आला आहे? यामुळे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर (inverted duty structure) निर्माण होणार नाही का?

या वस्तूंना आधीच इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा सामना करावा लागत होता. जीएसटी दर 5% पर्यंत कमी केल्याने उलट परिणाम (inversion) वाढेल, परंतु इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमुळे निर्माण होणाऱ्या परताव्यासाठी (refund) यंत्रणा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, प्रक्रिया सुधारणांमुळे परतावे त्वरित मिळतील हे सुनिश्चित होईल. नवीकरणीय ऊर्जा उत्पादनांना प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

52. मार्बल आणि ट्रॅव्हर्टाइन ब्लॉक्स (marble and travertine blocks) आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील (granite blocks) जीएसटी दर का कमी करण्यात आला आहे?

पूर्वी, मार्बल आणि ट्रॅव्हर्टाइन ब्लॉक्स आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवर 12% जीएसटी दर लागत होता. या मध्यवर्ती वस्तू असल्यामुळे या वस्तूंवरील जीएसटी दर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

53. चष्मे आणि गॉगल्सवर (heading 9004) जीएसटी दर किती आहे?

दृष्टी सुधारण्यासाठीचे चष्मे आणि गॉगल्सवर आता 5% जीएसटी लागेल  (जो अनुक्रमे 12% आणि 18% वरून कमी केला आहे), तर दृष्टी सुधारण्यासाठी नसलेले चष्मे आणि इतर गॉगल्सवर 18% जीएसटी दर लागू राहील.

54. बॅटरीजवर (heading 8507) जीएसटी दर किती आहे?

पूर्वी, लिथियम-आयन बॅटरीजवर  18% जीएसटी आणि इतर बॅटरीजवर 28% जीएसटी लागत होता. आता, 8507 हेडिंगखालील सर्व बॅटरीजवर एकसमान 18% जीएसटी आकारला जाईल.

55. वातानुकूलक, दूरचित्रवाणी संच, मॉनिटर आणि भांडी धुण्याचे यंत्र यांवरील जीएसटी  दर किती आहे?

वातानुकूलक आणि भांडी धुण्याचे यंत्र यांवरील वस्तू आणि सेवा कर  28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यापूर्वी 32 इंचांपर्यंतच्या दूरचित्रवाणी संच आणि मॉनिटरवर 18% वस्तू आणि सेवा कर  लागत होता, तर मोठ्या दूरचित्रवाणी संच आणि मॉनिटरवर 28% वस्तू आणि सेवा कर लागत होता. आता सर्व दूरचित्रवाणी संच आणि मॉनिटरवर 18% दराने समान कर आकारला जाईल.

56. वस्तू आणि सेवा करातील (GST) सूट अंतर्गत जीवन विम्याच्या शिफारस केलेल्या कोणकोणत्या योजनांचा (पॉलिसींचा) समावेश आहे?

वस्तू आणि सेवा करातील  सूट अंतर्गत जीवन विम्याच्या शिफारस केल्या असलेल्या योजनांमध्ये सर्व वैयक्तिक जीवन विमा योजनांचा समावेश आहे, यात मुदत विमा, युनिट लिंक्ड विमा योजना (ULIP), बचत विमा योजना (endowment plans) आणि त्यांच्या पुनर्विमा सेवांचा (reinsurance services) समावेश आहे.

57. वस्तू आणि सेवा कर  सूट अंतर्गत आरोग्य विम्याच्या शिफारस केलेल्या कोणकोणत्या योजनांचा (पॉलिसींचा) समावेश आहे?

वस्तू आणि सेवा कर सूट अंतर्गत आरोग्य विम्याच्या शिफारस केल्या असलेल्या योजनांमध्ये सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसींचा समावेश आहे, यात कौटुंबिक एकत्रित विमा योजना (family floater plans) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना तसेच त्यांच्या पुनर्विमा सेवांचा समावेश आहे.

58. प्रवासी वाहतूक सेवांवर 18% दराने कर आकारला जाईल का?

नाही, प्रवासी वाहतूक सेवांवर  5% च्या सवलतीच्या दराने कर आकारला जाईल, ज्यात इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) लागणार नाही . मात्र, सेवा पुरवठादारांना 18% च्या मानक दराने शुल्क आकारण्याचा पर्याय असेल, यामुळे त्यांना पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा करता येईल.

59. हवाई वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन दरांचा समान पर्याय उपलब्ध आहे का?

हवाई वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, म्हणजेच, जर प्रवास इकॉनॉमी श्रेणीचा असेल, तर वस्तू आणि सेवा कराचा दर 5% असेल, अन्यथा वस्तू आणि सेवा कराचा  दर 18% असेल.

60. मालवाहतूक मधस्थांद्वारे (Goods Transport Agent-GTA) केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीला वस्तू आणि सेवा कराचा 18% दर लागू आहे का?

मालवाहतूक मधस्थांद्वारे (Goods Transport Agent-GTA) केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय 5% च्या सवलतीच्या दराने कर आकारणी सुरू राहील. तथापि, मालवाहतूक मध्यस्थाला (GTA) पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिटसह 18% च्या मानक दराने वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा पर्याय असेल.

61. कंटेनर ट्रेन ऑपरेटरद्वारे  (CTO) केल्या जाणाऱ्या कंटेनरमधील वस्तूंच्या वाहतुकीवर 12% दराने कर आकारला जाईल का?

नाही, कंटेनर ट्रेन  ऑपरेटर द्वारे केल्या जाणाऱ्या कंटेनरमधील वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवेला इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय 5% दर किंवा पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिटसह 18% दर आकारण्याचा पर्याय दिला जाईल.

62. मल्टिमोडल  वाहतूकदाराद्वारे केल्या जाणाऱ्या माल  वाहतुकीसाठी वस्तू आणि सेवा कर  दर किती आहे?

मल्टिमोडल  वाहतुकीद्वारे मालाच्या  वाहतुकीअंतर्गत जर त्यात हवाई वाहतुकीचा समावेश नसेल तर इनपुट टॅक्स क्रेडिटसह 5% वस्तू आणि सेवा कर (GST) आकारला जाईल. मात्र, जिथे हवाई वाहतुकीचा अंतर्भाव असेल, तिथे वस्तू आणि सेवा कराचा  दर पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिटसह 18% असेल.

63. या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता मालवाहतूक मध्यस्थ (GTA) सेवांना वस्तू आणि सेवा कर मधून पूर्णपणे सूट का दिली जात नाही?

जेव्हा एखाद्या सेवेला सूट दिली जाते, तेव्हा सेवा पुरवठादार इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी  दावा करू शकत नाही. यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होते आणि सेवा अधिक महाग होते. शिवाय, आवश्यकतेनुसार ग्राहकांसाठी कृषी उत्पादने, दूध इत्यादींसारख्या अत्यावश्यक वस्तूंची (B2C) वाहतूक यावर आधीच विशिष्ट सूट दिल्या गेल्या आहेत.

64. औषध उत्पादनांशी संबंधित जॉब वर्क सेवेसाठी शिफारस केलेला वस्तू आणि सेवा कर दर किती आहे?

या सेवांवर आता इनपुट टॅक्स क्रेडिटसह  5% दर लागेल. यापूर्वी यावर 12% कर लागत होता.

65. चॅप्टर 41 अंतर्गत येणाऱ्या कातडी आणि चामडी वस्तूमालाशी (hides and skins) संबंधित जॉब वर्क सेवेसाठी शिफारस केलेला वस्तू आणि सेवा कर  दर किती आहे?

वरील सेवांवर आता इनपुट टॅक्स क्रेडिट  सह 5% दर लागेल. यापूर्वी यावर 12% कर लागत होता.

66. कातडी आणि चामडी वस्तूमालाशी (hides and skins) संबंधित जॉब वर्कसाठी शिफारस केलेला 5% दराअंतर्गत चॅप्टर 42 किंवा 64 अंतर्गत येणाऱ्या चामड्याच्या वस्तू किंवा पादत्राणांच्या निर्मितीशी संबंधित जॉब वर्कचा देखील समावेश केलेला आहे का?

नाही, ही शिफारस चॅप्टर 42 किंवा 64 अंतर्गत येणाऱ्या चामड्याच्या वस्तू किंवा पादत्राणांच्या निर्मितीशी संबंधित जॉब वर्कचा समावेश केला गेलेला नाही.

67. मानवी उपभोग्य मद्याच्या निर्मितीशी संबंधित जॉब वर्क सेवांवरही 5% कमी दराने कर आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे का?

नाही, या सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) सह 18% दराने कर आकारणी सुरू राहील.

68. उर्वरित जॉब वर्क सेवांसाठी वस्तू आणि सेवा कर दर किती असेल?

उर्वरित जॉब वर्क सेवा, म्हणजे ज्या जॉब वर्क सेवांसाठी विशिष्ट दर अधिसूचित केलेला नाही, त्यावर सध्या 12% वस्तू आणि सेवा कर  दर लागतो. अशा सेवांवर आता 18% दराने वस्तू आणि सेवा कर  लागेल.

69. केवळ दर कमी करण्याऐवजी जॉब वर्कला पूर्णपणे करमुक्त का केले गेले नाही?

जॉब वर्क सेवांना करमुक्त केल्यास इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) साखळी तुटेल, ज्यामुळे खर्चात वाढ होईल. ही बाब विशेषतः जिथे जॉब-वर्कर्सचे अनेक स्तर समाविष्ट आहेत अशा क्षेत्रांसाठी अधिक महत्त्वाची आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटसह 5% चा कमी दरामुळे उद्योग व्यवसायांना पूर्ण क्रेडिट लाभ मिळतो, ज्यामुळे कर साखळीच्या भाराचा ताण टाळता येईल.

70. समुद्रातील (अपतटीय - ऑफशोर) तेल आणि वायू शोध आणि उत्पादनाशी (E&P) संबंधित बांधकाम कंत्राटी सेवांवर 18% दराने कर आकारला जाईल का?

होय, समुद्रातील (अपतटीय - ऑफशो) तेल आणि वायू शोध आणि उत्पादन (E&P) संबंधित कामांची कंत्राटे आणि संबंधित सेवांवर 18% वस्तू आणि सेवा कर लागेल.

71. जिथे पुरवठ्याचे मूल्य प्रति युनिट प्रति दिवस 7500 रुपयांपर्यंत किंवा समतुल्य आहे अशा हॉटेल निवास सेवांवर 18% दराने कर आकारला जाईल का?

नाही, या सेवेवर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) शिवाय 5% वस्तू आणि सेवा कर लागेल.

72. सौंदर्य आणि शारीरिक आरोग्याच्या सेवांवर शिफारस केलेला वस्तू आणि सेवा कर  दर किती आहे? या दरामध्ये कशाचा अंतर्भाव असेल?

आरोग्य विषयक क्लब, केशकर्तनालय (सलून), न्हावी, तंदुरुस्ती केंद्र, योग अशा संबंधीच्या सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य विषयक सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय 5% वस्तू आणि सेवा कर  लागेल. या सेवांवर यापूर्वी 18% वस्तू आणि सेवा कर  लागत होता.

73. लॉटरी तिकिटे, पैज लावणे, जुगार, घोड्यांची शर्यत आणि कसिनोवर 40% दराने वस्तू आणि सेवा कर  लागतो का?

होय, पैज लावणे, कॅसिनो, जुगार, घोड्यांची शर्यत, लॉटरी आणि ऑनलाइन पैसे वापरून खेळले जाणारे खेळ यांसह सर्व निर्दिष्ट कारवाईयोग्य दाव्यांसाठी  40% वस्तू आणि सेवा कराचा (GST) दर लागू होईल.

74. आयपीएल सारख्या क्रीडा स्पर्धांमधील प्रवेशासंबंधीच्या सेवांवर वस्तू आणि सेवा कराचा शिफारस केलेला दर किती आहे?

आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धांमधील प्रवेशावर 40% वस्तू आणि सेवा कर लागेल, तथापि, हा 40% दर मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांमधील प्रवेशासाठी लागू असणार नाही.

75. आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त इतर क्रीडा स्पर्धांमधील प्रवेशासाठी वस्तू आणि सेवा कर  दर किती असेल?

जिथे तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त नाही अशा मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांसह इतर क्रीडा स्पर्धांमधील प्रवेशासाठी सूट देणे सुरू राहील, आणि जर तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर 18% च्या मानक दराने कर आकारणी सुरू राहील.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163765) Visitor Counter : 47