रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शाश्वत राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी नवोन्मेषी धोरणात्मक उपायांवर कार्यशाळेचे आयोजन


“शहरांमध्ये सुलभ संपर्क व्यवस्थेसाठी रिंग रोड आणि बायपासच्या बांधकामावर सरकारचा भर”

Posted On: 03 SEP 2025 3:17PM by PIB Mumbai

 

भारताच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि शहरी वाहतूक सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सल्लामसलत कार्यशाळेचे अध्यक्षपद केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भूषवले. या कार्यशाळेला केंद्रीय राज्यमंत्री अजय टमटा, हर्ष मल्होत्रा, वरिष्ठ राज्य सरकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते.

या कार्यशाळेत जागतिक दर्जाची, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात आला. विशेषतः वेगाने वाढणाऱ्या शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी शहरी राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहतूक अडथळे टाळण्यासाठी रिंगरोड आणि बायपास रस्ते बांधण्यासह विविध नाविन्यपूर्ण धोरणात्मक उपायांवर चर्चा केली.

कार्यशाळेत शाश्वत निधी उभारणीसाठी व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग मॉडेल्सचा अवलंब करण्यावर आणि अखंड संपर्कासाठी शहराच्या मास्टर प्लॅन बरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाची सांगड घालण्यावर प्रमुख चर्चा झाली. या उपाययोजनांमुळे केवळ गतिशीलता वाढेल असे नाही तर रिंगरोड आणि बायपासच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये नियोजित आणि शिस्तबद्ध विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या उपक्रमांद्वारे आर्थिक विकासाला गती देणे, संपर्क व्यवस्था सुधारणे तसेच सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक शहरी विकासाची भक्कम पायाभरणी करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.

***

शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163352) Visitor Counter : 2