पंतप्रधान कार्यालय
बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
Posted On:
02 SEP 2025 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली – दि. 2 सप्टेंबर, 2025
बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नीतीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, इतर मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बिहारच्या माझ्या लक्षावधी भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!
आज इथे माझ्यासमोर असलेल्या टी.व्ही.च्या पडद्यावर मी तुम्हा सर्वांना पहात आहे. लक्षावधी भगिनी उपस्थित असलेल्या मला दिसत आहे. आणि कदाचित बिहारमधल्या प्रत्येक गावांमध्ये हा एक खूप मोठा कार्यक्रम होत असल्यामुळे, हे एक असेच भव्य, अद्भूत असे दृश्य आहे. इतक्या मोठ्या संख्येने माता -भगिनींचे आशीर्वाद एकाच वेळी मिळत आहेत, यापेक्षा मोठे सद्भाग्य जीवनामध्ये दुसरे कोणतेही असू शकणार आहे?
मित्रांनो,
आज मंगळवार आहे. आजच्या मंगलदिनी या कामाला प्रारंभ होत आहे. बिहारच्या माता-भगिनींना आजपासून जीविका निधी साख सहकारी संघाची एक नवीन सुविधा मिळत आहे. यामुळे गावां-गावांमध्ये जीविकेशी संबंधित सर्व भगिनींना आता अधिक सुलभतेने निधी मिळू शकेल. त्यांना आर्थिक मदत मिळेल. यामुळे त्या जे काम करतात, व्यवसाय करतात त्याचा आणखी विस्तार करण्यासाठी मदत मिळेल. आणि ही जीविका निधीची व्यवस्था पूर्णपणे डिजिटल आहे, हे पाहून मला जास्त आनंद वाटत आहे. याचा अर्थ आता भगिनींना कुणाकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. सर्व कामे हातातल्या फोनवरून होवू शकतील. बिहारच्या माता -भगिनींना मी जीविका सहकारी संघाबद्दल खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि या अद्भूत आणि महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, बिहारचे एनडीए सरकार, यांचेही खूप -खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
विकसित भारताचा खूप मोठा, मजबूत आधार म्हणजे भारताच्या सक्षम, सशक्त महिला आहेत. आणि या महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी, त्यांना जीवनात सामोरे जावे लागत असलेली प्रत्येक प्रकारची संकटे, आव्हाने कमी करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही माता, भगिनी, कन्या, यांचे जीवन अधिकाधिक सुकर बनविण्यासाठी विविध स्तरावर काम करीत आहोत. यामध्ये अनेक प्रकारच्या कामांचा समावेश आहे. आम्ही महिलांना उघड्यावर शौचालयाला जाण्याची गरज पडू नये, त्यांना या संकटातून मुक्ती मिळावी म्हणून, आम्ही महिलांसाठी कोट्यवधी शौचालये बनविली. आम्ही प्रधानमंत्री घरकूल योजनेतून कोट्यवधी संख्येने पक्की घरी बांधली. इतकेच नाही तर, या घरांवर महिलांचे नाव लागले जावे, याकडे तितकेच काटेकोरपणे आम्ही लक्ष दिले. ज्यावेळी एखादी महिला घराची मालकीण होते, त्यावेळी तिच्या आवाजाला एक प्रकारे धार येते, तिच्या बोलण्याला वजन प्राप्त होते.
माता आणि भगिनींनो,
आम्ही स्वच्छ पेयजलाचे जे संकट आहे, ते संपुष्टात आणण्यासाठी ‘हर घर जल’ योजना राबवली. माता -भगिनींच्या औषधोपचाराची समस्या निर्माण होवू नये, यासाठी आम्ही 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा असलेली आयुष्मान योजना अंमलात आणली. केंद्र सरकार आजही मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची योजना राबवत आहे. या योजनेमुळे घरातल्या मुलांचे पोट आज मी कसे भरावे, अशी अनेक मातांची जी चिंता होती, त्यातून त्यांना मुक्त केले. महिलांचे उत्पन्न वाढावे, यासाठी आम्ही त्यांना लखपती दीदी, ड्रोन दीदी आणि बॅंक सखी बनवत आहोत. या सर्व योजना म्हणजे, माता-भगिनींची सेवा करण्यासाठी एक मोठा महायज्ञ आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये, मी आपल्याला विश्वास देतो की, आगामी काही महिन्यांमध्ये बिहारचे एनडीए सरकार, हे अभियान आणखी वेगाने राबविणार आहे.
मित्रांनो,
बिहार ही अशी भूमी आहे की, जिथे मातृशक्तीचा सन्मान, आदर केला जातो. मातेचा सन्मान नेहमीच सर्वोपरि असतो. इथे गंगामैय्या, कोसी मैय्या, गंडकी मैय्या, पुनपुन मैय्या अशा सर्व नद्यांची माता म्हणून पूजा केली जाते. आणि आपण सर्वजण अभिमानाने म्हणतो की, जानकीमाता या भूप्रदेशाची कन्या आहे. बिहारमधल्या संस्कारामध्ये पालन-पोषण होवून लहानाची मोठी झालेली इथली ‘सिया धिया’ म्हणजे अवघ्या दुनियेची सीता माता आहे. छठी मैय्याला वंदन करून आपण सगळेजण धन्य होतो. आता काही दिवसांनंतरच नवरात्राचा पवित्र उत्सव सुरू होणार आहे. संपूर्ण देशामध्ये नवदुर्गेची पूजा केली जाईल, देवी मातेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाईल, बिहार आणि पुरबियाच्या भागामध्ये नवदुर्गांबरोबरच सतबहिनी पूजेची परंपराही अनेक पिढ्यांपासून पाळली जात आहे. मातेच्या स्वरूपामध्ये सात भगिनींची पूजा करण्याची ही परंपरा आहे. मातेविषयीची श्रद्धा, विश्वास ही तर बिहारची विशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. आईसाठी असेही म्हटले गेले आहे की, ‘‘अपने सुखल-पाकल खाके, रखली सबके भरम बचा के, उनकर रोवां जे दुखाई, त भलाई ना होई, केहू कतनो दुलारी, बाकि माई ना होई!’’
मित्रांनो,
आमच्या सरकारसाठी मातेची प्रतिष्ठा, मातेचा सन्मान, आदर, तिचा स्वाभिमान या गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य आहे. माता तर आपली अवधी दुनिया असते. आई आपला स्वाभिमान असते. अशीच समृद्ध परंपरा असलेल्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे काही झाले, त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. बिहारच्या माझ्या कोणत्याही बंधू-भगिनींनीही अशी गोष्ट होईल, याची कल्पना केली नसणार. हिंदुस्तानातल्या कोणत्याही व्यक्तीने याबाबत कल्पना केली नसेल. बिहारमध्ये आरजेडी-कॉंग्रेस यांच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिव्या देण्यात आल्या. अशा पद्धतीने शिव्या देणे हा फक्त माझ्या आईचा अपमान नाही, तर या देशाच्या माता-भगिनींचा, कन्यांचा अपमान आहे. मला पूर्ण माहिती आहे की, याचा तुम्हा सर्वांना याचा त्रास झाला आहे. बिहारच्या प्रत्येक मातेला, बिहारच्या प्रत्येक कन्येला, बिहारच्या प्रत्येक बंधूला, हे पाहून, ऐकून किती वाईट वाटले असेल. यामुळे जितका त्रास माझ्या मनाला झाला आहे, तितकाच त्रास माझ्या बिहारच्या लोकांनाही झाला असणार, हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच आज, ज्यावेळी इतक्या मोठ्या संख्येने बिहारच्या लक्षावधी माता-भगिनींना मी भेटतो आहे, त्यांचे दर्शन करतो आहे, ज्यावेळी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात, त्यावेळी माझ्या भावना तुमच्यासमोर बोलू इच्छितो. कारण शेवटी मी पण एका मातेचा पुत्र आहे. ज्यावेळी इतक्या सर्व माता-भगिनी माझ्या समोर आहेत, त्यावेळी मी माझे दुःखं आपल्याला सांगत आहे. अशा टिप्पण्यांमुळे माझ्या मनाला झालेल्या यातना मी, तुम्हा सर्व माता-भगिनींच्या आशीर्वादाने पचवू शकणार आहे.
माता- भगिनींनो,
तुम्हां सर्वांना माहिती आहे की, मी जवळपास 50-55 वर्षांपासून समाज आणि देशाच्या सेवा कार्यामध्ये निरंतर कार्यरत आहे. राजकारणामध्ये मी तसा खूप उशिरा आलो होतो. समाजाच्या चरणी सेवा करताना, मला जे- जे काही करणे शक्य होते, त्या -त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करीत होतो. आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मी आपल्या देशासाठी, माझ्या देशवासियांसाठी, माझ्याकडून जे काही करणे शक्य आहे, ते करण्यासाठी मी व्यतीत केला आहे. अगदी एकाग्र चित्ताने, मनापासून मी परिश्रम करीत आलो आहे. आणि त्यासाठी मला माझ्या आईचे आशीर्वाद मिळाले आहेत. माझ्या या सर्व कार्यामध्ये, आयुष्यामध्ये माझ्या मातेने खूप मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका निभावली. मला भारतमातेची सेवा करायची होती, जणू यासाठीच जन्म देणा-या आईने मला तिच्याविषयीच्या दायित्वातून, जबाबदा-यांमधून मुक्त केले होते.
आणि आईने मला आशीर्वाद दिला की, ‘‘बेटा जा, देशातल्या कोट्यवधी मातांची सेवा तू करावी, देशातल्या गरीबांची सेवा तू करावी. त्या मातेच्याच आशीर्वादामुळे मी आपल्या सेवाकार्यासाठी बाहेर पडलो आणि म्हणूनच मला आज या गोष्टीविषयी खूप वेदना होत आहेत. ज्या आईने मला देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला, देशसेवा करण्यासाठी बाहेर पाठवले. त्याच आईसाठी वाईट बोलले गेले. प्रत्येक आईला आपल्या मुलाने आपली सेवा करावी, असे वाटत असते. प्रत्येक मातेला आपला मुलगा मोठा-महान व्हावा, असे वाटत असते, प्रत्येक मातेसाठी काही ना काही त्यांची मुले करीत असतात. परंतु माझ्या आईने, मला स्वतःपासून वेगळे केले आणि समाजासाठी, देशासाठी कार्य करण्याची परवानगी दिली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, आता माझी आई शरीराने या जगामध्ये नाही. काही दिवसांपूर्वी वयाची शंभरी पूर्ण करून ती आपल्या सर्वांना सोडून गेली. माझ्या आईचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही. माझी आई आता शरीराने या जगामध्ये अस्तित्वातही नाही. त्या दिवंगत मातेला आरजेडी , कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून वाईट शिव्या दिल्या गेल्या. माता-भगिनींनो, हे ऐकूनही तुम्हा सर्वांना किती वेदना होत आहेत, हे मला तुमच्या चेह-यावरून दिसून येत आहे. इथे काही मातांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याचे मला दिसून येत आहे. एका दिवंगत मातेला अशा पद्धतीने शिव्या देणे खूप दुःखदायक आहे, कष्टदायक आहे, वेदना देणारे आहे. त्या मातेने काय गुन्हा केला आहे? तिला अशा वाईट शिव्या का बरं दिल्या जाव्यात?
मित्रांनो,
प्रत्येक आई आपल्या मुलांना खूप तपस्या(कष्ट) करून वाढवते. माझ्यासमोर बसलेली प्रत्येक आई, तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच कष्टाने आपल्या मुलांना वाढवते. मुलांपेक्षा आईसाठी दुसरे काहीही मोठे नसते. मी पण लहानपणापासून माझ्या आईला याच रूपात पाहिले होते. खूप गरिबीत, खूप त्रास सहन करत तिने आपल्या कुटुंबाला, आम्हा भावंडांना वाढवले. मला आठवते, पावसाळा सुरू होण्यापूर्वी आईची हीच धडपड सुरू असायची, की छप्पर गळू नये, जेणेकरून तिची मुले शांतपणे झोपू शकतील. आई आजारी असायची, तरीही ती कुणाला कळू देत नव्हती, काम करत राहायची, कामावर जायची. तिला माहीत होते की, जर तिने एक दिवस जरी आराम केला, तर आम्हा मुलांना त्रास सहन करावा लागेल. आई तिच्या अडचणींची कल्पना माझ्या वडिलांनाही कळू देत नव्हती. ती स्वतःसाठी कधीही एक नवीन साडीही विकत घेत नव्हती, ती एक-एक पैसा जमा करत होती, जेणेकरून आपल्या मुलांसाठी एक जोड कपडे शिवू शकेल.
आणि जरी मी माझ्या आईबद्दल बोलत असलो, तरी माझ्या देशातील करोडो माता अशीच तपस्या करतात. माझ्यासमोर ज्या माता-भगिनी बसलेल्या आहेत, त्यांनीही इतकेच कष्ट सोसले आहेत. एक गरीब आई आयुष्यभर अशीच तप करून आपल्या मुलांना शिक्षण देते, उच्च संस्कार देते. म्हणूनच, आईचे स्थान देवी-देवतांपेक्षाही वर मानले जाते. हे बिहारचेच संस्कार आहेत आणि प्रत्येक बिहारीच्या तोंडून ती गोष्ट सहज निघते.
“माई के अ-स्थान देवता-पितर से भी ऊपर होला। काहे की आपन बाल-बच्चा खातिर, उ कौवनो देवी नियर परछाई बनके, पोस-पाल के बड़ करेली। खुदही दुख सहके देखावेली संसार। माई के बिना त कौवनो जिनगी भी ना पनप सकेला। एहिसे त बारी माई महान!”
म्हणूनच मित्रांनो,
काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून शिव्या, अतिशय वाईट शब्दांच्या शिव्या फक्त माझ्या आईलाच दिल्या गेल्या नाहीत. या घाणेरड्या शिव्या कोट्यवधी माता-भगिनींना दिल्या गेल्या आहेत.
मित्रांनो,
एका गरीब आईची तपस्या आणि तिच्या मुलाची वेदना, हे राजघराण्यांमध्ये जन्मला आलेले युवराज समजू शकणार नाहीत. हे नामदार लोक सोन्या-चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना असे वाटते की, देश आणि बिहारची सत्ता त्यांच्या घराण्याचा वारसा हक्क आहे. त्यांना वाटते की खुर्ची त्यांनाच मिळायला हवी! पण, तुम्ही देशाच्या जनतेने, सर्वसामान्यांनी, एका गरीब आईच्या कष्टकरी मुलाला आशीर्वाद देऊन प्रधान सेवक बनवले. ही गोष्ट या नामदारांना पचनी पडत नाहीये. कोणताही मागासलेला, अति-मागासलेला माणूस पुढे गेला, हे काँग्रेसला कधीच सहन झाले नाही! त्यांना वाटते की, नामदारांना काम करणाऱ्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे, म्हणूनच ते दररोज शिव्यांची लाखोली वाहत असतात.
माता-भगिनींनो,
तुम्ही ऐकले असेल, तुमच्याही कानावर आले असेल की मला यांनी कशा-कशा शिव्या दिल्या नाहीत. ही यादी खूप मोठी आहे आणि त्यांचा कोणताही मोठा नेता या शिव्या देण्यापासून मागे राहिलेला नाही. ही घृणा, हा नामदारांचा अहंकार एका कामगाराविरुद्ध शिवी बनून बाहेर पडत असतो. कधी ते मला नीच म्हणतात, घाणेरड्या गटारातील किडा म्हणतात, विषारी साप म्हणतात. तुम्ही आताच ऐकले असेल, इथे बिहारच्या निवडणुकीतही मला अपमानित करून, शिव्या देऊन त्यांची नामदार असलेली विचारसरणी वारंवार उघड होत आहे.
आणि याच विचारसरणीमुळे, आता हे लोक माझ्या दिवंगत आईला, जिचे शरीर आता नाही, जिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा माझ्या दिवंगत आईलाही आपल्या मंचावरून शिव्या देऊ लागले आहेत.
मित्रांनो,
आईला शिव्या देणारी, बहिणीला शिव्या देणारी मानसिकता महिलांना कमकुवत समजते. ही मानसिकता महिलांना शोषण आणि अत्याचाराची वस्तू मानते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा महिला-विरोधी मानसिकतेला सत्ता मिळाली आहे, तेव्हा सर्वात जास्त त्रास मातांना, भगिनींना, मुलींना आणि महिलांनाच सहन करावा लागला आहे. आणि ही गोष्ट बिहारमधील माझ्या माता-भगिनींपेक्षा जास्त कोण समजेल! आरजेडीच्या काळात जेव्हा बिहारमध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगार बेफाम झाले होते, जेव्हा खून, खंडणी आणि बलात्कार सामान्य गोष्ट होती. आरजेडी सरकार खुनी आणि बलात्काऱ्यांना संरक्षण देत होती, आरजेडीच्या त्या राजवटीचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला? बिहारमधील माझ्या मातांना, बिहारमधील माझ्या मुलींना, बिहारमधील माझ्या भगिनींना, आपल्या बिहारमधील महिलांना तो सोसावा लागला. महिला घरातून बाहेर पडताना सुरक्षित नव्हत्या. त्यांचे पती, त्यांचे मुलगे संध्याकाळपर्यंत जिवंत घरी परत येतील याची कोणतीही खात्री नव्हती! कधी त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होईल, कधी खंडणीसाठी त्यांना आपले दागिने विकावे लागतील, कधी एखादा माफिया त्यांना घरातून पळवून नेईल, कधी त्यांचे सौभाग्य हिरावले जाईल, प्रत्येक महिला याच भीतीने जगत होती!
बिहार मोठा संघर्ष करून त्या अंधारातून बाहेर पडला आहे. आरजेडीला हटवण्यात आणि वारंवार हरवण्यात बिहारमधील तुम्हा सर्व महिलांची खूप मोठी भूमिका राहिली आहे, म्हणूनच, आरजेडी असो किंवा काँग्रेस, हे लोक आज तुम्हा सर्व महिलांवर सर्वात जास्त संतापले आहेत. बिहारमधील प्रत्येक महिलेने त्यांचा हेतू समजून घेतला पाहिजे. या लोकांना तुमचा सूड उगवायचा आहे, ते संधीच्या शोधात आहेत, जेणेकरून तुम्हाला शिक्षा देऊ शकतील.
मित्रांनो,
आरजेडीसारखे पक्ष महिलांना कधीही पुढे जाऊ देणार नाहीत, आणि म्हणूनच त्यांनी महिला आरक्षणालाही जोरदार विरोध केला आहे. आणि जेव्हा एक महिला, एका गरीब घरातली महिला पुढे जाते, तेव्हाही त्यांचा चडफडाट दिसतो. म्हणूनच काँग्रेस, गरीब घरातल्या आदिवासी मुलीचा, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचा सतत अपमान करत आहे.
मित्रांनो,
महिलांबद्दलचा द्वेष आणि तिरस्काराच्या या राजकारणावर लगाम घालणे आवश्यक आहे. देशवासियांनी विचार करण्याची गरज आहे, की ही कोणत्या प्रकारची भाषा वापरली जात आहे?
माता-भगिनींनो,
आजपासून 20 दिवसांनी नवरात्री सुरू होत आहे. आणि 50 दिवसांनी छठी मातेची पूजा होईल, छठचा सण साजरा केला जाईल. मी बिहारच्या जनतेसमोर, आईला शिवीगाळ करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, मोदी तुम्हाला एकदा माफ करेलही, पण, भारताच्या भूमीने आईचा अपमान कधीच सहन केलेला नाही.
म्हणून आरजेडी आणि काँग्रेसने सात बहिणींची माफी मागायला हवी, छठ मातेची माफी मागायला हवी.
मित्रांनो,
मी बिहारच्या लोकांनाही सांगेन की, या अपमानाचे उत्तरदायित्व निश्चित करणे, ही बिहारमधील प्रत्येक मुलाचीही जबाबदारी आहे. आरजेडी-काँग्रेसचे नेते जिथेही जातील, ज्या गल्लीत, ज्या शहरात जातील, त्यांना चारी बाजूंनी एकच आवाज ऐकू आला पाहिजे. प्रत्येक माता-भगिनीने मैदानात उतरून त्यांच्याकडून उत्तर मागितले पाहिजे, प्रत्येक गल्ली-बोळातून एकच आवाज आला पाहिजे.
आईला शिवीगाळ, सहन करणार नाही, सहन करणार नाही.
इभ्रतीवर हल्ला, सहन करणार नाही, सहन करणार नाही.
आरजेडीचा अत्याचार, सहन करणार नाही, सहन करणार नाही.
काँग्रेसचा हल्ला, सहन करणार नाही, सहन करणार नाही.
आईचा अपमान, सहन करणार नाही, सहन करणार नाही.
मित्रांनो,
देशातील नारीशक्तीचे सबलीकरण, हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी एनडीए सरकार सतत काम करत आहे, आणि माता-भगिनींनो मी तुम्हाला वचन देतो, आम्ही न थकता, न थांबता तुमची सेवा करत राहू. तुम्ही सर्वजणी, एनडीए सरकारवर आपला आशीर्वाद कायम ठेवा, मी देशातील प्रत्येक आईला प्रणाम करत, आज आणखी एका प्रार्थनेची पुन्हा आठवण करून देतो. नुकताच १५ ऑगस्टला प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत एक मंत्र घुमत होता, 'घर-घर तिरंगा, हर घर तिरंगा'. आता काळाची गरज आहे, 'हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी'.
हा मंत्र माता-भगिनींना आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आहे आणि यासाठी माता-भगिनींनो, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. 'हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी' आणि मी प्रत्येक दुकानदाराला सांगेन की त्यांच्या दुकानावर बोर्ड लागलेला असावा, व्यापाऱ्याच्या दुकानावर बोर्ड लागला पाहिजे, 'गर्व से कहो यह स्वदेशी है', 'गर्व से कहो यह स्वदेशी है'. आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर आपल्याला मजबुतीने पुढे जायचे आहे. आणि माझे हे काम माता-भगिनींच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भारत मातेचे उज्ज्वल भविष्य तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. आणि तुम्हाला तर माहीत आहेच, हे नामदार लोक काय बोलत राहिले? ते तर इथेपर्यंत प्रश्न विचारत राहिले, 'भारत माता म्हणजे काय असते?' भारत मातेला जे शिव्या देतात, त्यांच्यासाठी मोदींच्या आईला शिव्या देणे तर डाव्या हाताचा खेळ आहे. आणि म्हणूनच अशा लोकांना ओळखणे खूप गरजेचे आहे.
माता-भगिनींनो,
जेव्हा लाखो माता-भगिनी माझ्यासमोर आहेत, तुमचा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असाच राहो. जेव्हा मी इतक्या माता-भगिनींसमोर उभा राहिलो, तेव्हा माझ्या मनात जे दुःख होते, ते तुमच्यासमोर सहजच व्यक्त झाले. माता आणि भगिनींनो, तुमच्या आशीर्वादाने मला असे दुःख सहन करण्याची ताकद मिळेल.
पण, ज्या आईचा कोणताही गुन्हा नाही, जी आपला देह सोडून गेली आहे, जिने कोणाकडून काहीही घेतले नाही, जिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. जेव्हा त्या आईला शिव्या दिल्या जातात, तेव्हा वेदना असह्य होते, दुःख असह्य होते. आणि म्हणूनच माता-भगिनींनो, ते दुःख तुमच्यासमोर एका मुलाच्या रूपात आले, म्हणून ते सहज बाहेर पडले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, तुमचे आशीर्वाद अशा प्रत्येक अत्याचाराला सहन करण्याची ताकद देतील आणि प्रत्येक अत्याचाराला हरवून माता-भगिनींची सेवा करण्याची एक नवीन ऊर्जा देतील, नवीन प्रेरणा देतील. मी माझे हे बोलणे इथेच थांबवतो. मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.
***
जयदेवी पुजारी - स्वामी / सुवर्णा बेडेकर / शैलेश पाटील / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163274)
Visitor Counter : 2
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam