कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशभरातल्या कृषी क्षेत्राच्या स्थितीचा घेतला आढावा
Posted On:
01 SEP 2025 5:38PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथे देशभरातल्या कृषी क्षेत्राच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या उच्च-स्तरीय बैठकीत, चौहान यांनी विविध राज्यांमधील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि पंजाबच्या काही भागांतला पूर आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यावर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार पंजाबमधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे त्यांनी निराश होऊ नये, असेही चौहान यावेळी म्हणाले. परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि पीडित शेतकऱ्यांना भेटून त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण लवकरच पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला कृषी सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मंत्र्यांना देशभरातील कृषी क्षेत्राची सविस्तर माहिती दिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणी क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
मंत्र्यांनी अन्नधान्य पिकांबरोबरच फलोत्पादन क्षेत्राच्या प्रगतीचाही आढावा घेतला. त्यांनी विशेषतः बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या उत्पादन आणि किमतींची माहिती मागवली. अधिकाऱ्यांनी त्यांना राज्यांमध्ये झालेल्या पावसाची आणि जलाशयांच्या स्थितीची माहिती दिली. अनेक राज्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तो पिकांसाठी फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराज सिंह यांनी अधिकाऱ्यांना एकात्मिक शेती स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले. अन्नधान्याच्या पिकांबरोबरच फळांची लागवड केली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन शेतीत केवळ अन्नधान्य उत्पादन न करता, पर्यायी उपायांनीही सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या दृष्टीने बागायती आणि एकात्मिक शेती हे प्रभावी मार्ग आहेत. त्यांनी ‘एकात्मिक शेती प्रणाली’चा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचेही निर्देश दिले.
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162848)
Visitor Counter : 2