इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोएडा येथे मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन प्रकल्पाचे केले उद्घाटन
भारत ‘मेड इन इंडिया’ चिप्ससह मोबाईल फोनच्या प्रत्येक घटकाचे उत्पादन करणार : अश्विनी वैष्णव
Posted On:
30 AUG 2025 3:15PM by PIB Mumbai
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नोएडा येथे मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा उपक्रम ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्सने कॉर्निंग इनकॉर्पोरेटेड, यूएसए यांच्या सहकार्याने स्थापित केला असून जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या "इंजिनिअर्ड बाय कॉर्निंग" या ब्रॅण्ड अंतर्गत उच्च दर्जाचे टेम्पर्ड ग्लास तयार केले जाणार आहेत. ही उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुरवली जातील.

टेम्पर्ड ग्लास ही मोबाईल फोनसाठी एक महत्त्वाची ॲक्सेसरी आहे आणि त्याचे स्वदेशी उत्पादन हे मेक इन इंडियाच्या यशात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे याप्रसंगी बोलताना वैष्णव यांनी सांगितले. भारत टप्प्याटप्प्याने मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचे उत्पादन करेल, ज्यामध्ये चिप्स, कव्हर ग्लासेस, लॅपटॉप आणि सर्व्हर घटकांचा समावेश आहे. यामुळे देश इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर होईल, असेही ते म्हणाले. स्वावलंबनाकडे भारताच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असलेली मेड इन इंडिया चिप लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
गेल्या 11 वर्षात, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहा पटीने वाढून 11.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन मूल्यापर्यंत पोहोचले आहे. यापैकी निर्यात 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, हे वैष्णव यांनी अधोरेखित केले. यामुळे 2.5 कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील एकूण इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था वेगाने विकसित होत आहे आणि टप्प्याटप्प्याने मूल्यवर्धन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताची डिझाईन क्षमता ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. सरकार संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्यावर सातत्याने भर देईल, हे वैष्णव यांनी अधोरेखित केले. या संदर्भात उदाहरणे देत ते म्हणाले की, आयआयटी मद्रास-इनक्युबेटेड स्टार्टअपने भारताचा पहिला मायक्रोकंट्रोलर डिझाइन केला असून तो लवकरच भारतीय उत्पादनांमध्ये वापरला जाणार आहे, असे मंत्र्यांनी नमूद केले. भारतीय उत्पादक रेल्वे क्षेत्रात आधीच युरोपियन देशांना सर्वोच्च दर्जाच्या जागतिक मानकांची उपकरणे निर्यात करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
टेम्पर्ड ग्लासबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारतातील देशांतर्गत बाजारपेठ 50 कोटी नगांहून अधिक आहे ज्याची किरकोळ किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये आहे. हे देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधीचे दर्शक आहे. तर जागतिक बाजारपेठ 60 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
***
शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162376)
Visitor Counter : 23