वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते 'भारत बिल्डकॉन 2026' पूर्वावलोकनचे उद्घाटन
उद्योगांचे एकतर्फी कारवाईंपासून संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध: पीयूष गोयल
विकसित देशांसोबत अलिकडेच झालेले मुक्त व्यापार करार आणि अनेक देश तसेच समूहांबरोबर वेगाने सुरु असलेल्या वाटाघाटी यामागे उदयोन्मुख भारतासोबत व्यापार करण्याची त्यांची इच्छा हे कारण आहे: गोयल
गोयल यांनी भारतीय उद्योगांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी केले आमंत्रित, हे परिवर्तनकारी असल्याचे केले नमूद
Posted On:
29 AUG 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे भारत बिल्डकॉन 2026 साठी पूर्वावलोकन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी भारतातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना गोयल म्हणाले की, काही देशांच्या एकतर्फी कारवाईमुळे उद्योगांना अनावश्यक ताण किंवा अडचणीना सामोरे जावे लागणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. जिथे पर्यायी बाजारपेठांची आवश्यकता आहे अशी क्षेत्रे अधोरेखित करण्याचे आवाहन त्यांनी उद्योग प्रतिनिधींना केले. वाणिज्य मंत्रालय नवीन संधी निर्माण करण्यासाठी जगभरातील भागीदारांशी संपर्क साधत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच, देशांतर्गत खप वाढवणे याला प्राधान्य आहे यावर त्यांनी भर दिला. जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत मागणीत वेगाने वाढ करणाऱ्या आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवणे असो किंवा देशांतर्गत संधी बळकट करणे असो, कोणतेही क्षेत्र मागे राहू नये यासाठी उद्योगांना सहाय्य पुरवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, असे गोयल म्हणाले.
जागतिक स्तरावरील भारताचे वाढते स्थान अधोरेखित करताना, गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की या वर्षीची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल, जी भारतीय उद्योगाची वाढती स्पर्धात्मकता आणि लवचिकता दर्शवते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून "शून्य दोष, शून्य परिणाम" निर्मितीसाठी सातत्याने केलेल्या आवाहनाचा उल्लेख करत, त्यांनी पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या संदेशाची आठवण करून दिली ज्यात त्यांनी म्हटले होते , भारतीय उत्पादनांमध्ये "दाम कम, दम ज्यादा " म्हणजेच ती परवडणारी पण उत्तम असायला हवीत. गोयल यांनी अधोरेखित केले की पायाभूत सुविधा राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी आहेत.
ऑस्ट्रेलियामधील घरांच्या तीव्र कमतरतेकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधले. तिथे जवळपास 10 लाख घरांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियासाठी भारताकडून आर्थिक सहकार्य, तांत्रिक कौशल्य आणि कार्यबल समर्थन खुले असल्याचे सांगत भारतीय व्यवसाय, कामगार आणि तज्ज्ञांना या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. त्यांनी सांगितले की भारतीय व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियन मानके पूर्ण करता यावीत म्हणून प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र संधी देखील दिल्या जात आहेत."जर आपण ही संधी गमावली तर आपण स्वतःच यासाठी जबाबदार ठरू," असे त्यांनी स्पष्ट केले आणि भारताच्या बांधकाम आणि आर्थिक क्षेत्रांसाठी ही बाब कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता असल्याचे म्हटले.
गोयल यांनी ऑस्ट्रेलिया, युएई, स्वित्झर्लंड, नॉर्वे, लिकटेंस्टाईन, आइसलँड आणि यूके यासारख्या विकसित देशांसोबतच्या भारताच्या मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) विस्तारणाऱ्या जाळ्यावर प्रकाश टाकला, यात युरोपीय महासंघ आणि इतरांशी होतं असलेल्या वाटाघाटींचाही अंतर्भाव आहे. हे करार बांधकाम, पोलाद आणि संबंधित क्षेत्रांतील भारतीय उद्योगांसाठी जागतिक संधींची दारे आणखी उघडतील, असे ते म्हणाले.
गोयल यांनी पुढे अधोरेखित केले की अनेक विकसित देश भारतासोबत व्यापार संबंध वाढविण्यास उत्सुक आहेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) सारख्या देशांनी भारतासोबत मुक्त व्यापार करार (एफटीए) करण्यास उत्सुकता दर्शविली आहे. अशा भागीदारींमुळे केवळ भारताच्या निर्यात संधी आणि जागतिक बाजारपेठेच्या एकात्मिकतेलाच मोठी चालना मिळेल असे नाही तर स्वच्छ ऊर्जा आणि उत्पादन क्षमता वाढविण्याच्या देशाच्या प्रयत्नांना देखील त्या पूरक ठरतील, यावर त्यांनी भर दिला.
29 एप्रिल ते 2 मे 2026 दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात येणारे भारत बिल्डकॉन हे बांधकाम आणि बांधकाम साहित्य उद्योगासाठी भारतातील महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून स्थान मिळवत आहे. भारताच्या इमारत आणि बांधकाम बाजारपेठेचे मूल्य 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, हा कार्यक्रम सिमेंट, सिरॅमिक्स, टाइल्स, सॅनिटरीवेअर, पेंट्स, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स आणि इतर अशा 37 संलग्न क्षेत्रांमध्ये भारताच्या क्षमता अधोरेखित करण्यासाठी वन स्टॉप मंच प्रदान करेल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि भारताला एक विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यात हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल.
सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162108)
Visitor Counter : 14