इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा : गुजरातच्या साणंद इथे भारतातील पहिली एंड-टू-एंड ओसॅट प्रायोगिक प्रकल्प सुविधा सुरू
Posted On:
28 AUG 2025 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या साणंद इथे सीजी पॉवर च्या भारतातील पहिल्या 'एंड-टू-एंड सेमीकंडक्टर ओसॅट प्रायोगिक प्रकल्प सुविधेचे (End-to-End Semiconductor OSAT Pilot Line Facility) अर्थात कंत्राटी बाह्य जुळवणी आणि चाचणी सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाची सुरुवात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाटचालीच्या ऐतिहासिक प्रारंभाचे प्रतिक ठरली आहे.

यावेळी अश्विनी वैष्णव यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन हे सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि त्या पुढील पातळीवरच्या क्षमता विकसित करण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल असल्याचे ते म्हणाले. गुजरात या बदलाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वैष्णव यांनी या ओसॅट प्रायोगिक प्रकल्पाची महत्त्वाची भूमिकाही आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. या प्रकल्पात तयार झालेल्या चिप्सचा वापर ग्राहक पात्रतेसाठी केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या चिप्सना मान्यता मिळाल्यानंतर, व्यावसायिक प्रकल्पांना प्रमाणित उत्पादनांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेता येणार असल्याचे त्यांनी सांगिले.
या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वही त्यांनी आपल्या संबोधनातून सांगितले. या क्षेत्रातील कुशल व्यावसायिक तज्ञांची जागतिक स्तरावर उपलब्धता सुनिश्चित करणे हा इंडिया सेमीकंडक्टर मिशनचा एक प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात 2032 पर्यंत, 10 लाख सेमीकंडक्टर व्यावसायिक तज्ञांची कमतरता भासेल असा अंदाज व्यक्त केला जात असून, यातला एक मोठा वाटा भरून काढण्याची संधी भारताला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
यादृष्टीनेच केंद्र सरकारने 270 विद्यापीठांशी भागीदारी केली असून, त्यांना अत्याधुनिक सेमीकंडक्टर डिझाइन साधनांनी सुसज्ज केले असल्याची माहिती त्यांनी दिली. 2025 या एका वर्षातच, या साधनांचा वापर 1.2 कोटींहून अधिक वेळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच मोहाली इथल्या सेमी-कंडक्टर प्रयोगशाळेत 17 संस्थांनी डिझाइन केलेल्या 20 चिप्सचे यशस्वी उत्पादन घेता आल्याची माहितीही त्यांनी दिली.
जगातील फारच मोजक्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रगत साधनांचा वापर करण्याची संधी मिळते ही बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील युवा वर्गाचे सक्षमीकरण घडून येईल, देशातील तंत्रज्ञान विषयक परिसंस्थेला अधिक बळकटी मिळेल आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून भारताची ओळख निर्माण होऊ शकेल असे ते म्हणाले.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161712)
Visitor Counter : 20