पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
25 AUG 2025 10:35PM by PIB Mumbai
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे!
गुजरातचे राज्यपाल श्रीयुत आचार्य देवव्रत जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सी आर पटेल, गुजरात मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, अहमदाबादच्या महापौर प्रतिभा जी, अन्य लोकप्रतिनिधी गण आणि अहमदाबादमधील माझ्या बंधू भगिनींनो!
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.
मित्रांनो,
सध्या देशभरात गणेशोत्सवाचा एक अद्भुत उत्साह संचारलेला आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या विकासाशी संबंधित अनेक योजनांचा देखील श्री गणेश झाला आहे. हे माझे परम भाग्य आहे की आज मला विकासाचे अनेक प्रकल्प तुम्हा सर्व जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करण्याचे, तुमच्या हाती सुपूर्द करण्याचे भाग्य लाभले आहे. या सर्व विकास कार्यांसाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
या पावसाळ्यात गुजरातमध्ये देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. देशात अनेक ठिकाणी ज्या प्रकारे ढगफुटीच्या घटना एकामागोमाग एक घडत आहेत, आणि दूरचित्रवाणीवर जेव्हा या विनाशलीलेची दृश्य पाहायला मिळतात तेव्हा अतीव दुःख होते. या घटनांमुळे प्रभावित झालेल्या सर्व परिवारांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. निसर्गाचा हा प्रकोप संपूर्ण मानव जातीसाठी, संपूर्ण विश्वासाठी, संपूर्ण देशासाठी एक आव्हान बनला आहे. सर्व राज्य सरकारांच्या सोबतीने केंद्र सरकार मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहे.
मित्रांनो,
गुजरातची ही भूमी, मोहन नावाच्या दोन महान व्यक्तींची भूमी आहे. एक सुदर्शन चक्रधारी मोहन म्हणजेच आपले द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि दुसरे म्हणजे चरखाधारी मोहन म्हणजेच साबरमतीचे संत, पूज्य बापू. या दोघांनी दाखवलेल्या मार्गांवर वाटचाल करत भारत आज निरंतर बळकट होत आहे. सुदर्शन चक्रधारी मोहनने आपल्याला शिकवले की देशाचे, समाजाचे संरक्षण कसे केले जाते. त्यांनी सुदर्शन चक्राला न्याय आणि सुरक्षेचे कवच बनवले, जे शत्रूला पाताळात देखील शोधेल आणि शिक्षा देईल. हीच भावना आज भारताच्या निर्णयात संपूर्ण देशाला अनुभवायला मिळत आहे. ही भावना केवळ देशच नाही तर संपूर्ण जग देखील अनुभवत आहे. आपल्या गुजरातने आणि अहमदाबादने पूर्वी कसले दिवस पाहिले आहेत. जेव्हा दांडगाई करणारे, चक्का चालवणारे लोक पतंगाबाजी दरम्यान भांडण करून लोकांना मारून टाकत होते. संचारबंदीमध्ये आयुष्य कंठावे लागत होते. तळाच्या उत्सवाच्या काळात अहमदाबाद ची भूमी रक्तरंजित होत होती. अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांमुळे शहरात सामान्य माणसाच्या रक्ताचे पाट वाहत होते, अशावेळी दिल्लीमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे सरकार निष्क्रिय रहायचे. मात्र आज दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांची कसलीही गय केली जात नाही, मग ते कोठेही लपलेले असोत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने कशाप्रकारे घेतला हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. केवळ 22 मिनिटात अनेक तळ उध्वस्त करण्यात आले आणि शेकडो किलोमीटर आत जाऊन, निश्चित केलेल्या लक्ष्यावर निशाणा साधून वार करण्यात आले, दहशतवाद्यांच्या मर्मस्थानी आपण वार केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ आपल्या सैन्याच्या शौर्याचे आणि सुदर्शन चक्रधारी मोहनाच्या भारताच्या इच्छाशक्तीचे प्रतीक बनले आहे.
मित्रांनो,
चरखाधारी मोहन म्हणजे आपल्या पूज्य बापूंनी भारताच्या समृद्धीचा मार्ग स्वदेशी मधून जात असल्याचे सांगितले होते. आपल्या इथे साबरमती आश्रम आहे. हा आश्रम या गोष्टीचा साक्षीदार आहे की ज्या पक्षाने बापूंचे नाव घेऊन कैक दशके सत्तेचे सुख उपभोगले त्या पक्षाने बापूंच्या आत्म्याला चिरडून टाकले. त्या पक्षाने बापूंनी दिलेल्या मंत्राचे काय केले ? मागील अनेक वर्षात जे दिवस-रात्र गांधीजींचे नाव घेऊन आपली सत्ता सूत्रे वापरत होते त्यांच्या तोंडून तुम्ही एकदा तरी ‘स्वच्छता’ हा शब्द ऐकला होता का ‘स्वदेशी’ हा शब्द ऐकला होता का? या पक्षाच्या समजुतीला काय झाले आहे, हे देश अजूनही समजू शकलेला नाही. 60 - 65 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने भारताला दुसऱ्या देशांवर निर्भर ठेवले, जेणेकरून ते सरकार बसल्या ठिकाणावर आयातीमधून देखील पैसा कमवू शकेल, घोटाळे करू शकेल. परंतु आज भारताने आत्मनिर्भरतेला विकसित भारताच्या उत्पादनाचा आधार बनवले आहे. आपले शेतकरी, आपले मच्छीमार, आपले पशुपालक, आपले उद्योजक यांच्या जोरावर भारत जलद गतीने विकासाच्या मार्गावर आगेकुच करत आहे. आत्मनिर्भरतेच्या रस्त्यावर भरधाव वेगाने पुढे जात आहे. आपल्या गुजरातमध्ये पशुपालकांची संख्या खूप मोठी आहे. आपल्या दूध उत्पादन क्षेत्राची ताकद लक्षात घ्या. मी नुकतीच फिजीच्या पंतप्रधानांबरोबर बैठक करून आलो आहे. त्यांनी देखील आपल्या दुग्ध उत्पादन क्षेत्राचे आणि सहकार चळवळीचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांच्या देशात देखील असे घडावे अशी इच्छा व्यक्त केली. मित्रांनो आपले पशुपालक बंधू आणि भगिनींननी या विकासात सर्वाधिक योगदान दिले आहे. भगिनींनी पशुपालन करून आपल्या दुग्ध उत्पादन क्षेत्राला बळकटी दिली आहे, आत्मनिर्भर बनवले आहे आणि आज चारी दिशांना या यशाचे जयगान गायले जात आहे.
परंतु मित्रांनो,
आज जगात सुरू असलेले आर्थिक स्वार्थाचे राजकारण, आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यात लिप्त असलेले लोक आपण सर्वजण पाहतच आहोत. मी अहमदाबादच्या या भूमीवरून आपल्या लघु उद्योजकांना सांगू इच्छितो, माझ्या छोट्या छोट्या दुकानदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो, माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, माझ्या पशुपालक बंधू भगिनींना सांगू इच्छितो, आणि हो! हे सर्व मी गांधीजीच्या भूमीवरून बोलत आहे, माझ्या देशातील लघुउद्योजक असो, शेतकरी असो, पशुपालक असो, प्रत्येकासाठी, लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा वचन देतो, मोदीसाठी आपल्या सर्वांचे हित सर्वोपरी आहे. माझे सरकार लघु उद्योजकांचे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे कधीही अहित होऊ देणार नाही. कितीही दबाव पडला तरीही तो झेलण्याची आपली ताकद आपण वृद्धिंगत करत राहू.
मित्रांनो,
आज आत्मनिर्भर भारत अभियानाला गुजरातमधून खूप जास्त पाठिंबा मिळत आहे, यांचे कारण म्हणजे यासाठी गेली दोन दशके घेण्यात आलेली मेहनत. आजच्या या तरुण पिढीने ते दिवस पाहिले नाहीत जेव्हा येथे रोजच संचारबंदी लागू केली जात असे. येथे व्यापार-उदीम करणे खूपच कठीण बनवले जात होते, सर्वत्र अशांतता पसरवली जात होती. मात्र आज अहमदाबाद देशातील सुरक्षित शहरांपैकी एक आहे. आणि हे तुम्ही सर्वांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे.
मित्रांनो,
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणाचे सुखद परिणाम आपल्याला सर्वत्र दिसत आहेत. आज गुजरातच्या भूमीवर सर्व प्रकारचे उद्योग विस्तारत आहेत. आपले राज्य उत्पादन केंद्र कसे बनले आहे हे पाहून संपूर्ण गुजरातला अभिमान वाटतो. तुमच्यात जे ज्येष्ठ बंधू आणि भगिनी आहेत, तुम्हाला माहीत असेलच की जेव्हा गुजरात वेगळे करण्याची महागुजरात चळवळ सुरू होती तेव्हा अनेकांनी आम्हाला सांगितले होते की गुजरात वेगळे करून तुम्ही काय करू इच्छिता, तुम्ही उपासमारीने मराल, ते म्हणत असत - तुमच्याकडे काय आहे, तिथे खनिजे नाहीत, बारमाही नद्या नाहीत, दहापैकी सात वर्षे दुष्काळ पडतो, खाणी नाहीत, असा एखादा उद्योग नाही, शेती नाही, आणि त्यातही एका बाजूला वाळवंट आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान आहे, काय कराल तुम्ही अशा परिस्थितीत, असे म्हणायचे, मीठाशिवाय तुमच्याकडे काय आहे, ते म्हणत असत, आपली चेष्टा करत असत. पण जेव्हा गुजरातवर जबाबदारी आली की आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, तेव्हा गुजरातचे लोक मागे हटले नाहीत आणि तुमच्याकडे काय आहे असे जे म्हणत, त्यांना आज सांगू शकतो की आमच्याकडे हिरे नाहीत भाऊ, एकही हिऱ्याची खाण नाही, पण जगातील दहापैकी नऊ हिरे आमच्या गुजरातच्या भूमीतून पुढे जातात.
मित्रांनो,
काही महिन्यांपूर्वी मी दाहोदला आलो होतो. तिथल्या रेल्वे कारखान्यात शक्तिशाली इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिने बनवली जात आहेत. आज गुजरातमध्ये बनवलेले मेट्रो डबे इतर देशांमध्ये निर्यात केले जात आहेत. याशिवाय, मोटारसायकली असोत किंवा मोटारगाड्या, गुजरातमध्ये त्या मोठ्या प्रमाणात निर्माण आणि उत्पादित केल्या जात आहेत. देश आणि जगातील मोठ्या कंपन्या येथे कारखाने उभारत आहेत. विमानांचे वेगवेगळे भाग बनवण्याचे आणि त्यांची निर्यात करण्याचे काम गुजरातमध्ये आधीच सुरू झाले होते. आता वाहतूक विमाने बनवण्याचे काम वडोदरामध्येही सुरू झाले आहे. आपल्या गुजरातमध्ये विमाने बनवली जात आहेत, याचा तुम्हाला आनंद वाटतो की नाही? आता गुजरात देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे खूप मोठे केंद्र बनत आहे. मी उद्या 26 तारखेला हंसलपूरला जात आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीबाबत तेथे एक खूप मोठा उपक्रम हाती घेतला जात आहे. आज कोणतीही आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार होत असली तरी ती सेमीकंडक्टरशिवाय बनवता येत नाहीत. गुजरात आता सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठे नाव कमावणार आहे. कापड असो, रत्ने असोत किंवा दागिने असोत, गुजरात आता त्यांच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध झाला आहे. औषधे असोत किंवा लसी असोत, औषध उत्पादनातील देशाच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात गुजरातमधून होते.
मित्रांनो,
आज भारत सौर, पवन आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. यामध्ये गुजरातचा सर्वाधिक सहभाग आहे. मी नुकताच विमानतळावरून येत होतो, तुम्ही एक भव्य रोड शो केला, व्वा! तुम्ही खूप छान काम केले, रोड शो भव्य होता पण लोक छतावर, बाल्कनीत उभे होते, स्वाभाविकच मी त्यांना आदराने नमस्कार केला, पण माझे डोळे इकडे तिकडे फिरत होते आणि मी पाहिले की जवळजवळ बहुतेक सर्व घरांच्या छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प दिसत होते. गुजरात देखील हरित ऊर्जा आणि पेट्रो-रसायनांचे एक मोठे केंद्र बनत आहे.
देशाच्या पेट्रोकेमिकल गरजा पूर्ण करण्यात गुजरातदेखील मोठी भूमिका बजावत आहे. आपल्या प्लास्टिक उद्योगाचा, सिंथेटिक फायबरचा, खतांचा, औषधांचा, रंग उद्योगाचा, सौंदर्यप्रसाधनांचा सर्वात मोठा आधार म्हणजे पेट्रोकेमिकल क्षेत्र. गुजरातमध्ये जुने उद्योग विस्तारत आहेत. मला आठवते की आपण बराच काळ डोक्यावर हात ठेवून रडत होतो. 30 वर्षांपूर्वीचे दिवस तुम्हाला आठवत असतीलच, रडायला काय झाले होते, गिरण्या बंद झाल्या आहेत, गिरण्या बंद झाल्या आहेत, गिरण्या बंद झाल्या आहेत, हीच गोष्ट दररोज चालायची. जेव्हा जेव्हा कोणताही नेता यायचा तेव्हा वर्तमानपत्रातील लोक विचारायचे, मला सांगा, गिरण्या बंद झाल्या आहेत, तुम्ही काय करणार? तेव्हा काँग्रेस होती, पण तोच विषय, आज गुजरातमध्ये ते बिगुल (गिरण्यांचे भोंगे) थांबले असतील, पण विकासाचा झेंडा प्रत्येक कोपऱ्यात फडकला आहे. नवीन उद्योगांचा पाया रचला जात आहे आणि हे सर्व प्रयत्न आत्मनिर्भर भारताला बळकटी देत आहेत. यामुळे गुजरातच्या तरुणांसाठी सतत रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
उद्योग असो, शेती असो किंवा पर्यटन असो, या सर्वांसाठी उत्कृष्ट संचारसंपर्क खूप महत्त्वाचा आहे. गेल्या 20-25 वर्षांत गुजरातचे संचारसंपर्क क्षेत्रही बदलले आहे. आजही येथे अनेक रस्ते आणि रेल्वेशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. वर्तुळाकार रस्ता म्हणजेच सरदार पटेल रिंग रोड आता रुंद होत आहे. आता तो सहा पदरी रुंद रस्ता बनत आहे. यामुळे शहरातील सर्वाधिक गर्दीच्या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. त्याचप्रमाणे विरमगाम-खुदड-रामपुरा रस्त्याचे रुंदीकरण केल्याने येथील शेतकरी आणि उद्योगांना सुविधा मिळेल. हे नवीन अंडरपास, रेल्वे ओव्हरब्रिज यांच्यामुळे शहराचा संचारसंपर्क आणखी सुधारेल.
मित्रांनो,
एक काळ असा होता की फक्त जुन्या लाल बसगाड्या धावत असत. लाल बस, तुम्ही कुठेही जाल तिथे लाल बसमधूनच जावे लागे. पण आज बीआरटीएस जनमार्ग आणि एसी-इलेक्ट्रिक बस येथे नवीन सुविधा देत आहेत. मेट्रो रेल्वेचाही वेगाने विस्तार होत आहे आणि यामुळे अहमदाबादवासीयांसाठी प्रवासाची सुलभता सुनिश्चित झाली आहे.
मित्रांनो,
गुजरातमधील प्रत्येक शहराजवळ एक मोठा औद्योगिक कॉरिडॉर आहे. परंतु 10 वर्षांपूर्वीपर्यंत बंदरे आणि अशा औद्योगिक वसाहतीमध्ये चांगल्या रेल्वे जोडणीचा अभाव जाणवत असे. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही मला दिल्लीला पाठवले तेव्हा मी गुजरातची ही समस्या सोडवण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. 11 वर्षांत गुजरातमध्ये सुमारे तीन हजार किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले आहेत. गुजरातमधील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. आज गुजरातला मिळालेल्या रेल्वे प्रकल्पांचा फायदा शेतकरी, उद्योग आणि भाविकांना होईल.
मित्रहो,
आपले सरकार, शहरात राहणाऱ्या गरीबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी वचनबद्ध आहे. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपला रामापीर नो टेकऱो, आपला रामापीरचा टिळा, विमानतळावरून ये-जा करताना दिसणारा रामापीरचा टिळा. पूज्य बापूंनी गरीबाच्या सन्मानाला नेहमीच प्राधान्य दिले. आज साबरमती आश्रमाच्या प्रवेशद्वारावर उभारलेली गरिबांची नवी घरे, त्याचे एक जिवंत उदाहरण आहेत. गरिबांना 1500 पक्की घरे मिळणे म्हणजे असंख्य नवीन स्वप्नांची पायाभरणी होणे. या वेळच्या नवरात्रीत, दिवाळीत या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरची आनंदाची लखलख अधिकच वाढेल. यासोबतच पूज्य बापूंना खरी श्रद्धांजली म्हणून साबरमती आश्रमाचे नूतनीकरणही होत आहे. आपल्या दोन महापुरुषांपैकी सरदार साहेबांचा भव्य पुतळा आम्ही उभारून पूर्ण केला. तेव्हाच मला साबरमती आश्रमाचे काम करायचे होते, पण केंद्र सरकार तेव्हा आमच्यासाठी अनुकूल नव्हते, कदाचित गांधीजींच्यासाठीही अनुकूलही नव्हते, त्यामुळे ते काम पुढे नेणे शक्य झाले नाही. पण जेव्हापासून तुम्ही मला तिकडे पाठवले, तेव्हापासून जसे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक देश-विदेशासाठी प्रेरणेचे केंद्र बनले आहे, तसेच जेव्हा साबरमती आश्रमाचे नूतनीकरण पूर्ण होईल, तेंव्हा होईल. माझे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, जगासाठी शांततेची सर्वात मोठी प्रेरणाभूमी म्हणून आपला साबरमती आश्रम उदयास येणार आहे.
मित्रहो,
आपल्या श्रमिक कुटुंबांना चांगले जीवन मिळावे, हा आमचा ध्यास राहिला आहे. म्हणून अनेक वर्षांपूर्वी आम्ही गुजरातमध्ये झोपडपट्टीवासीयांसाठी पक्क्या सुरक्षित वसाहती बांधण्याचे काम हाती घेतले. गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये झोपडपट्ट्यांच्या जागी घरे बांधण्याचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि हे अभियान सतत सुरूच आहे.
मित्रहो,
ज्याला कोणी विचारले नाही, त्याची मोदीने पूजा केली. मी या वेळी लाल किल्ल्यावरून सांगितले होते, मागासांना प्राधान्य, शहरी गरिबांचे जीवन सोपे करणे, हीसुद्धा आमची मोठी प्राथमिकता आहे. टपऱ्यांवर- पदपथावर काम करणाऱ्या बांधवांना कोणीच विचारले नव्हते. आमच्या सरकारने त्यांच्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू केली. आज या योजनेमुळे देशातील जवळजवळ सत्तर लाख टपरीवर –पदपथांवर विक्री करणाऱ्या आणि फेरीवाल्या बांधवांना बँकेकडून कर्ज मिळणे शक्य झाले आहे. गुजरातमधील लाखो लोकांनाही याचा लाभ झाला आहे.
मित्रहो,
गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर पडले आहेत. इतका मोठा आकडा म्हणजे जगासाठीही एक चमत्कार आहे. 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले, यावर आज जगातील सर्व अर्थतज्ज्ञ चर्चा करत आहेत.
मित्रहो,
हा गरीब जेव्हा गरिबीतून बाहेर पडतो, तेव्हा तो नवमध्यमवर्ग म्हणून एक नवीन शक्ती बनतो. आज हा नवमध्यमवर्ग आणि आपला जुना मध्यमवर्ग, हे दोन्ही देशाची मोठी ताकद बनत आहेत. नवमध्यमवर्ग आणि मध्यम वर्ग दोघांनाही सशक्त करणे, हा आमचा सतत प्रयत्न आहे की. आपल्या अहमदाबादच्या बंधूंसाठी तर खास खुशखबर आहे, अर्थसंकल्पामध्ये 12 लाखांच्या उत्पन्नावर प्राप्ती कर माफ केला , हे केल्यावर विरोधकांना समजलंच नाही की हे कसे झाले.
मित्रहो,
तयारी करा, आमचे सरकार जीएसटीमध्येही सुधारणा करत आहे आणि या दिवाळीपूर्वी तुमच्यासाठी मोठी भेट तयार होत आहे. जीएसटी सुधारणांमुळे आपल्या लघुउद्योजकांना मदत होईल आणि अनेक वस्तूंवर करही कमी होणार आहे. या वेळच्या दिवाळीत व्यापारी वर्ग असो किंवा इतर कुटुंबीय, सगळ्यांना आनंदाचा दुप्पट बोनस मिळणार आहे.
मित्रहो,
मी आता पीएम सूर्य घर योजनेबद्दल बोलत होतो. आता पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे आम्ही वीजबिल शून्य करत आहोत. गुजरातमध्ये आतापर्यंत या योजनेत जवळजवळ सहा लाख कुटुंबे सहभागी झाली आहेत. फक्त गुजरातमधील या कुटुंबांना सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. त्यामुळे त्यांची दर महिन्याला वीजबिलात मोठी बचत होत आहे.
मित्रहो,
अहमदाबाद शहर आज स्वप्नांचे आणि संकल्पांचे शहर होत आहे. पण एक काळ असा होता की लोक अहमदाबादला गर्दाबाद म्हणून चेष्टा करत. चारही बाजूला धुळीचे ढग, कचऱ्याचे ढीग, हेच शहराचे दुर्दैव झाले होते. मला आनंद आहे की आज स्वच्छतेच्या बाबतीत अहमदाबादने देशात नाव कमावले आहे. हे प्रत्येक अहमदाबादकराच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.
पण मित्रहो,
ही स्वच्छता, हा स्वच्छतेचे अभियान एक दिवसाचे नाही, ही पिढ्यानपिढ्या रोज करायची गोष्ट आहे. स्वच्छतेला सवय बनवा, तेव्हाच अपेक्षित परिणाम मिळतील.
मित्रहो,
आपली ही साबरमती नदी, काय हाल होते? एक कोरडा नाला झाला होता, त्यात सर्कस व्हायची, मुले क्रिकेट खेळायची. अहमदाबादच्या लोकांनी ठरवले की ही स्थिती बदलायची. आता इथला साबरमती नदीकाठ या शहराचा अभिमान वाढवत आहे.
मित्रहो,
कांकरिया तलावाचे पाणीही पूर्वी रानटी जल वनस्पतीमुळे हिरवे व दुर्गंधीयुक्त झाले होते. आसपास फिरणेही अवघड होते आणि ही असामाजिक घटकांची आवडती जागा झाली होती, तिथून कोणी जायची हिम्मत करत नसे. आज ते फिरण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण झाले आहे. तलावात नौकाविहार असो, किंवा बालनगरीमध्ये मुलांसाठी मजा आणि ज्ञानाचा संगम, हे सगळे अहमदाबादच्या बदलत्या रूपाचे प्रतीक आहे. कांकरिया कार्निवल तर अहमदाबादचे मोठे आभूषण झाले आहे, त्याने अहमदाबादला नवी ओळख दिली आहे.
मित्रहो,
अहमदाबाद आज पर्यटनाचे एक आकर्षक केंद्र म्हणून उदयास येत आहे. अहमदाबाद, युनेस्को जागतिक वारसा शहर आहे. जुने द्वार असोत, साबरमती आश्रम असो किंवा येथील इतर वारसा, आज आपले हे शहर जगाच्या नकाशावर चमकत आहे. आता पर्यटनाच्या नव्या आणि आधुनिक पद्धतींचाही येथे जलद विकास होत आहे. आपण जेव्हा पर्यटनाबद्दल बोलतो, तेव्हा गुजरातच्या दशादा कार्यालयात याचे नावही नव्हते. पर्यटनाची चर्चा आली की गुजरातचे लोक म्हणायचे, चला जरा आबू जाऊया, आणि दक्षिण गुजरातचे लोक दीव-दमणला जायचे. हेच आपले छोटेसे जग होते. धार्मिकदृष्ट्या पर्यटन करणारे लोक सोमनाथ, द्वारका किंवा अंबाजीला जायचे. ही चार–पाच ठिकाणेच आपली पर्यटन मर्यादा होती. आज गुजरात पर्यटनासाठी एक महत्त्वाचे स्थान झाले आहे. कच्छच्या रणात, पांढरे रण पाहण्यासाठी जग वेडे झाले आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याची इच्छा होते, बेट द्वारकेचा पूल पाहण्यासाठी लोक येतात, गाडीतून उतरून पायी चालतात. एकदा ठरवले की मित्रांनो, परिणाम दिसून येतोच. आज अहमदाबाद कॉन्सर्ट्स (संगीत - सोहळे) अर्थकारणाचे एक मोठे केंद्र बनू लागले आहे. काही महिन्यांपूर्वी जो कोल्डप्ले संगीत सोहळा इथे झाला, त्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली आहे. एक लाख आसन क्षमतेसह, अहमदाबादचे स्टेडियम देखील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हे दिसून येते की अहमदाबाद मोठ्या संगीत सोहळ्यांचेही आयोजन करू शकते आणि मोठ मोठ्या क्रीडाविषयक उपक्रमांसाठीही सज्ज आहे.
मित्रहो,
सुरुवातीला मी तुमच्यापाशी सणांचा उल्लेख केला होता. हा सणांचा हंगाम आहे. आता नवरात्री, विजयादशमी, धनत्रयोदशी, दीपावली, हे सर्व सण येणार आहेत. हा आपल्या संस्कृतीचा उत्सव तर आहेच, ते आत्मनिर्भरतेचेही उत्सव व्हायला हवेत आणि म्हणूनच मी तुम्हाकडे पुन्हा एकदा माझा आग्रह पुन्हा सांगू इच्छितो आणि आज पूज्य बापूंच्या भूमीतून देशवासियांनाही मी पुन्हा पुन्हा आग्रह करतो आहे, आपल्याला आयुष्यात एक मंत्र तयार करायचा आहे, आपण जे काही खरेदी करू, ते मेड इन इंडिया असेल, स्वदेशी असेल. घराच्या सजावटीसाठीची जी काही साधने असतील, ती मेड इन इंडिया असतील. मित्र - मैत्रिणींना भेट म्हणून काही द्यायचे असेल, भेटवस्तू तीच जी भारतात बनलेली असेल, भारताच्या लोकांनी बनवलेली असेल. आणि मी विशेषतः दुकानदार बंधू-भगिनींना सांगू इच्छितो, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो, या देशाला पुढे नेण्यात तुम्ही खूप मोठे योगदान देऊ शकता. तुम्ही निश्चय करा, परदेशी माल विकणार नाही आणि मोठ्या अभिमानाने फलक लावा की माझ्याकडे स्वदेशी विकले जाते. आपल्या या छोट्या-छोट्या प्रयत्नांनी हे उत्सव भारताच्या समृद्धीचे महोत्सव बनतील.
मित्रहो,
अनेक वेळा, सुरुवातीला लोकांनी कदाचित निराशा जास्त पाहिली असेल त्यामुळे मला आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा रिव्हर फ्रंटची गोष्ट मांडली होती, तेव्हा सर्व लोकांनी ते चेष्टेत घेतले होते. रिव्हर फ्रंट झाला की नाही? झाला की नाही? स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी मी एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा सर्वांनी माझे केस उपटले होते. सर्वजण म्हणत होते की हे तर निवडणूक आली, म्हणून मोदी साहेब घेऊन आले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी बनला की नाही मित्रांनो? जग बघून आश्चर्यचकित होते की नाही? कच्छचा रणोत्सव, लोक म्हणत होते की साहेब या कच्छमध्ये कोण जाणार? वाळवंटात कोणी जातो का? आज रांग लागते. नोंदणी, लोक 6-6 महिने आधी नोंदणी करतात. झाले की नाही झाले? गुजरातमध्ये विमानाचा कारखाना उभा राहतो, कोणी कल्पना केली होती? मला आठवते जेव्हा मी गिफ्ट सिटीची कल्पना मांडली होती. तेव्हा जवळपास सर्वांनी त्याची चेष्टा केली होती. असे सर्व कुठून होईल, हे सर्व अशा इमारतीतून कसे होईल? हे सर्व कसे होईल इथे? आज गिफ्ट सिटी देशाची सर्वात मोठी गौरवगाथा रचत आहे. आणि या सर्व गोष्टींच मी तुम्हाला यासाठी स्मरण करून देत आहे, तुम्ही बारकाईने बघा या देशाच्या सामर्थ्याची ज्याची तुम्ही पूजा कराल तर तुमच्या संकल्पाला देशवासी कधीही अयशस्वी होऊ देणार नाहीत. देशवासी रक्त आणि घाम आटवतील, इतके सारे दहशतवादी हल्ले झाले, शत्रूंचे काहीही होणार नाही असे मानत होते. सर्जिकल स्ट्राइक केला, त्यांचे तळ उध्वस्त केले. हवाई हल्ला (एअर स्ट्राइक) केला, त्यांचे प्रशिक्षण केंद्र उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर केले, त्यांच्या शरीरावर जाऊन वार केला. चंद्रयान, शिव शक्ती पॉईंट, जिथे कोणी गेले नाही, तिथे भारताचा तिरंगा ध्वज पोहोचला. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर शुभांशु शुक्ला जाऊन आले. आणि आता गगनयानची तयारी सुरू आहे. स्वतःचे अवकाश स्थानक बनावे या दिशेने काम सुरू आहे. मित्रहो एक एक घडामोड सांगते की जर संकल्प करतो, संकल्पाप्रति श्रद्धा असेल, समर्पण असेल, जनता जनार्दन, जे ईश्वराचे रूप आहे, त्यांचे आशीर्वादही मिळतात, त्यांची साथही मिळते. आणि त्याच विश्वासाने मी म्हणतो, हा देश आत्मनिर्भर बनून राहील. या देशाचा प्रत्येक नागरिक व्होकल फॉर लोकलचा सारथी बनेल. या देशाचा प्रत्येक नागरिक स्वदेशीच्या मंत्र जगेल आणि नंतर आपल्यावर कधीही आश्रित बनण्याची वेळ येणार नाही.
मित्रांनो,
जेव्हा कोविडची परिस्थिती होती, कुठे लस बनली होती, तेव्हा आपल्या देशात येता येता चाळीस-चाळीस वर्षे निघून जायची, लोक म्हणत होते, कोविडमध्ये काय होईल, अरे या देशाने निर्धार केला आणि स्वतःची लस बनवली आणि देशाच्या 140 कोटींपर्यंत लस पोहोचवली. या देशाचे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या विश्वासाने, गुजरातच्या माझ्या मित्रांना सांगतो, की तुम्ही मला जी शिकवण दिली आहे, तुम्ही मला जे शिकवले आहे, तुम्ही माझ्यात जो जोश भरला आहे, जी ऊर्जा भरली आहे, 2047 देश जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा हा देश विकसित भारत बनलेला असेल.
म्हणूनच मित्रहो,
विकसित भारत बनवण्यासाठीचा एक महत्त्वाचा महामार्ग स्वदेशी आहे, महत्त्वाचा महामार्ग आत्मनिर्भर भारत आहे आणि जे लोक वस्तू बनवतात, उत्पादन घेतात, उत्पादन करतात, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही उत्तरोत्तर तुम्ही आपली गुणवत्ता अधिक सुधारा, त्याची किंमत आणखी कमी करा, तुम्ही बघा हिंदुस्तानचा माणूस कधी बाहेरून काहीही घेणार नाही. ही भावना आपण जागृत करुया आणि जगासमोर हे उदाहरण ठेऊ या आणि जगातील अनेक देश आहेत, मित्रहो, की जेव्हा संकटे येतात, तेव्हा छाती पुढे करून उभे राहतात, ते परिणाम घडवून राहतात. आपल्यासाठी संधी निर्माण झाली आहे, संकल्पाला पूर्ण करण्याचे सामर्थ्य घेऊन निघायचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे, गुजरातने जशी नेहमी माझी साथ दिली आहे, देशही माझी साथ देईल आणि देश विकसित भारत बनून राहील. तुम्हा सर्वांना विकासाच्या या अमूल्य भेटींसाठी खूप-खूप शुभेच्छा! गुजरात खूप प्रगती करो, नवी उंची गाठो, गुजरातची ताकद आहे, तो करून दाखवेलच. तुमच्या सर्वांचे खूप-खूप आभार! माझ्यासोबत पूर्ण ताकदीने बोला, भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
धन्यवाद!
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/नंदिनी मथुरे/नितीन गायकवाड/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161301)
Visitor Counter : 34
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam