पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण


समाजहितासाठी जर पवित्र हेतूने आणि निर्मळ भावनेने प्रयत्न केले, तर दैवी शक्ती आपोआप सोबत येते आणि समाज स्वतः दैवी शक्तीमध्ये रूपांतरित होतो: पंतप्रधान

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण कौशल्य विकासावर सर्वाधिक भर: पंतप्रधान

देशभरात पायाभूत सुविधांचा विकास विक्रमी गतीने होत आहे: पंतप्रधान

आज जग भारताच्या श्रमशक्तीला व प्रतिभेला मोठा सन्मान देत असून, त्यामुळे विविध देशांमध्ये असंख्य संधी निर्माण होत आहेत: पंतप्रधान

भारताने आत्मनिर्भर व्हायलाच हवे; समाजाने स्वदेशी उत्पादनांचा दृढ विश्वासाने स्वीकार करावा: पंतप्रधान

स्वदेशी चळवळ हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून भविष्याला बळकटी देणारी मोहीम आहे. समाजाने विशेषतः युवकांनी तिचे नेतृत्व करायला हवे: पंतप्रधान

Posted On: 24 AUG 2025 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी  येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कन्या वसतिगृह टप्पा –2 चे भूमिपूजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधानांनी सांगितले की, समाजाच्या समर्पित प्रयत्नांमुळे 3 हजार मुलींसाठी उत्तम सोयीसुविधांसह भव्य वास्तू उभी राहिली आहे. याशिवाय बडोद्यात 2 हजार विद्यार्थ्यांसाठीचे  वसतिगृह देखील पूर्णत्वाकडे जात आहे. सूरत, राजकोट आणि मेहसाणा येथेही शिक्षण व प्रशिक्षण केंद्रे उभारली जात आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे  मोदी यांनी अभिनंदन केले. समाजाच्या सामर्थ्यामुळे राष्ट्र प्रगती करते, असे पंतप्रधान म्हणाले.  यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादनही केले.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, गुजरातचा विकास म्हणजे भारताचा विकास असे त्यांना नेहमी वाटायचे. 25-30 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अनेक चिंताजनक संकेतक होते. समाजातील आव्हाने पेलण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज होती. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हे ऐकून धक्का बसला की, मुलींच्या शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली होती, अनेक कुटुंबे मुलींना शाळेत पाठवीत नसत किंवा पाठवले तरी लवकरच त्या शाळा सोडत असत. 25 वर्षांपूर्वी समाजाच्या पाठिंब्यामुळे परिस्थिती बदलली. कन्या शिक्षण रथयात्रेची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, 40-42 अंशांच्या कडक उन्हात गावोगाव जाऊन मुलींना प्रत्यक्ष शाळेत नेले गेले. या यात्रेमुळे मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये प्रवेश झाला, या प्रयत्नांमुळे झालेल्या बदलाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. परिणामी शालेय पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, आधुनिक साधने उपलब्ध झाली, शिक्षकांची भरती झाली आणि संपूर्ण व्यवस्था मजबूत झाली.  त्या काळी प्रवेश घेतलेल्या अनेक मुली आज डॉक्टर, अभियंता झाल्या. शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण घटले, आणि ज्ञानाची भूक संबंध गुजरातमध्ये पसरली, असे त्यांनी सांगितले.

आणखी एका गंभीर प्रश्नाला उद्देशून बोलताना, मोदी यांनी स्त्री भ्रूणहत्येचा निषेध केला. हा समाजावरील एक कलंक आहे, असे संबोधले. या विषयाभोवती असलेल्या सामाजिक चिंतेची आणि त्याविरुद्ध चळवळ सुरू करण्यासाठी त्यांना मिळालेल्या पाठिंब्याची त्यांनी आठवण काढली. सुरतपासून उमिया मातापर्यंत झालेल्या प्रवासाने लिंगसमानतेच्या भावनेला बळ मिळाले, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, उमिया माता, खोडियार माता, काली माता, अंबा माता किंवा बहुचार माता अशा स्त्रीशक्तीची पूजा करणाऱ्या गुजरात या भूमीवर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक राहू नये, ही भावना समाजात जागृत झाल्यानंतर तसेच तिला व्यापक पाठिंबा मिळाल्यानंतर, गुजरातने मुलगा–मुलगी जन्मदरातील दरी यशस्वीरित्या कमी करण्यास सुरुवात केली., असे त्यांनी नमूद केले.

समाजहितासाठी जर पवित्र हेतूने व निर्मळ भावनेने प्रयत्न केले, तर दैवी शक्ती सोबत येते आणि समाज स्वतः दैवी शक्तीमध्ये रूपांतरित होतो, असे मोदी म्हणाले. अशा प्रयत्नांचे परिणाम नक्कीच मिळतात, असे अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, आज समाजात एक जागृती निर्माण झाली आहे. मुलींना शिक्षण देण्यासाठी, त्यांचा सन्मान वाढविण्यासाठी, त्यांच्यासाठी वस्तीगृहासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी लोक आता सक्रियपणे पुढे येत आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले की, गुजरातमध्ये सुरु झालेल्या या चळवळीने आता देशव्यापी स्वरूप घेतले आहे.  “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या उपक्रमाच्या रूपाने एक जनआंदोलन बनले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी संपूर्ण देशभर ऐतिहासिक कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, आता मुलींच्या आवाजाला आणि त्यांच्या क्षमतेला मान्यता मिळत आहे. त्यांनी गावागावातील लखपती दीदींचे उदाहरण दिले आणि सांगितले की, 3 कोटींच्या लक्ष्यापैकी 2 कोटींवर आपण आधीच पोहोचले आहोत. 'ड्रोन दीदी' सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागाचा महिलांविषयीचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे, असे त्यांनी नमूद केले. 'बँक सखी' आणि 'बीमा सखी' यांसारख्या योजनांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, भारताच्या मातृशक्तीच्या प्रयत्नांतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे उपक्रम सक्रियपणे राबविले जात आहेत.

शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींना घडवणे आणि त्यांच्या क्षमता वाढवणे हे असून, आजच्या वेगवान वातावरणात हे उद्दिष्ट अधिक प्रासंगिक बनले आहे,यावर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भर दिला.

समाजाची खरी ताकद त्याच्या कौशल्यांमधे असते, हे लक्षात घेऊन त्यांनी कौशल्य आणि प्रतिभा यांच्याद्वारे  स्पर्धात्मक भावना निर्माण करण्याचे आवाहन सर्वाना केले.मोदी यांनी भारतातील कुशल मनुष्यबळाला जागतिक स्तरावर असलेल्या मागणीवर प्रकाश टाकला आणि मागील सरकारांनी अनेक दशकांपासून राबवलेल्या कालबाह्य शिक्षण पद्धतीवर टीका केली.

जुन्या कालबाह्य पद्धती  दूर सारून आणि शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत,मोदींच्या सरकारने महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत,असे त्यांनी नमूद केले. जगापुढे वृद्ध लोकसंख्येचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे आणि त्यासाठी तरुण प्रतिभेची आवश्यकता आहे - असे क्षेत्र जिथे भारताकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे,असेही त्यांनी अधोरेखित केले.नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्याधारित विकासावर सर्वाधिक भर देत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, कौशल्य भारत अभियानांतर्गत, सरकार विविध क्षेत्रांमध्ये लाखो तरुणांना कुशल मनुष्यबळ म्हणून विकसित करण्यासाठी काम करत आहे. जगभरात जेष्ठ नागरीकांची संख्या वाढत असल्याने कुशल‌ मनुष्यबळाचा युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

11 वर्षांपूर्वी भारतात मोजकेच स्टार्टअप्स होते, तर आज ही संख्या दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे हे लक्षात घेऊन, श्री. मोदी यांनी नमूद केले की आता द्वितीय आणि तृतीय स्तरावरील (Tier 2 and Tier 3 cities)  शहरांमध्येही स्टार्टअप्स उदयास येत आहेत.

ज्यामुळे युवकांना कोणत्याही हमीशिवाय बँक कर्ज मिळू शकेल,अशा प्रकारच्या मुद्रा योजनेच्या सुविधेवर त्यांनी प्रकाश टाकला,ज्याअंतर्गत, स्वयंरोजगारासाठी तरुणांना 33 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे लाखो तरुणांना आत्मनिर्भर होण्यास आणि इतरांना रोजगार देण्यास; सक्षम झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी त्यावेळी 1लाख कोटी रुपयांच्या,प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची-घोषणा केली असल्याचे-आणि  या उपक्रमांतर्गत  त्याची त्वरित अंमलबजावणी होत असल्याचा उल्लेख केला. 

या उपक्रमांतर्गत, जर एखाद्याला खाजगी क्षेत्रात नोकरीवर ठेवले तर सरकार त्याच्या सुरुवातीच्या पगारासाठी ₹15,000 देते,अशी सुविधा उपलब्ध आहे.

"देशभरात पायाभूत सुविधांचा विकास विक्रमी वेगाने होत आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सौर यंत्रणेची स्थापना सक्रियपणे केली जात आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. भारताच्या ड्रोन आणि संरक्षण उद्योगांमध्ये सतत वाढ होत आहे असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.सरकारचे प्रमुख लक्ष जोरदारपणे उत्पादन करणे यावर आहे,यावर पंतप्रधानांनी भर दिला. या सर्व उपक्रमांमुळे गुजरातमध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे  त्यांनी नमूद केले. 

"आज जग भारताच्या श्रम आणि प्रतिभेचा खूप आदर करत असून  त्याचे मूल्य ओळखत आहे. परिणामी, विविध देशांमध्ये असंख्य संधी निर्माण होत आहेत", असे  मोदी म्हणाले. आरोग्यसेवा, शिक्षण आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रात भारतीय तरुण जागतिक स्तरावर आपली उल्लेखनीय छाप उमटवत आहेत - त्यांच्या क्षमता आणि कामगिरीने जग आश्चर्यचकित होत आहे,यावर त्यांनी भर दिला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वावलंबन आणि स्वदेशी उत्पादनावर भर देण्यास  सांगितल्याचे स्मरण पंतप्रधानांनी करून दिले. भारताने स्वयंपूर्ण व्हावे आणि समाजाला स्वदेशी उत्पादने दृढनिश्चयाने स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.

उपस्थितांना संबोधित करताना,पंतप्रधानांनी लोकांनी दिलेल्या  योगदानाची प्रशंसा केली आणि सांगितले की, श त्यांनी भूतकाळात ज्यांच्यावर कामे सोपवली असली तरी, त्यांनीच ती कामे पूर्ण केली आहेत आणि परिणाम दाखवले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंतच्या त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात अशी एकही घटना घडली नाही जिथे त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि हा विश्वास नवीन जबाबदाऱ्या सोपवण्याच्या त्यांच्या इच्छेला समर्थन देत आहे.

आजच्या अस्थिर जागतिक वातावरणात, भारताने आत्मनिर्भर व्हावे हाच,सर्वोत्तम मार्ग असल्याचे मत  मोदी यांनी व्यक्त केले. स्वावलंबन म्हणजे स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे आणि मेक इन इंडिया उपक्रमासाठी उत्साह वाढवणे., असे त्यांनी स्पष्ट केले.

"स्वदेशी चळवळ ही शतकानुशतकांपासूनची जुनी मोहीम नाही तर भविष्याला बळकटी देणारी मोहीम आहे आणि तिचे नेतृत्व समाजातून - विशेषतः तरुणांकडून आले पाहिजे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित करत  सांगितले.

आपल्या घरात कोणतीही परदेशी वस्तू येऊ नये असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी नागरीकांना केले. मेड इन इंडियाचे आवाहन ऐकल्यानंतर लोकांनी परदेशात लग्न साजरे करण्याचे रद्द करून भारतातच साजरे करण्याचा पर्याय निवडला असल्याची उदाहरणे त्यांनी दिली. अशा विचारांमुळे स्वाभाविकपणे देशभक्तीची भावना जागृत होते असे त्यांनी नमूद केले.

"मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यामधील यश हे सर्वांचे यश आहे आणि ती एक सामूहिक शक्ती असून. ती भविष्यातील पिढ्यांचा पाया आहे", असे उद्गार मोदी यांनी काढले. एकदा लोकांनी भारतीय उत्पादने निवडण्यास सुरुवात केली की, बाजारपेठेतील स्पर्धा, चांगले पॅकेजिंग आणि परवडणारी क्षमता यामुळे गुणवत्ता आपोआप सुधारेल,असे ते म्हणाले.

भारतीय चलन देशाबाहेर जाऊ देणे योग्य नाही, यावर त्यांनी यावेळी भर दिला.  त्यांनी सोपवलेले छोटेसे काम समाज जागरूकतेच्या माध्यमातून पूर्ण करेल आणि त्यामुळे राष्ट्राला नवीन शक्ती  प्राप्त होईल,असा  विश्वास  पंतप्रधानांनी व्यक्त केला. आजचा समाज केवळ कृषीप्रधान नाही तर उद्योजकही आहे हे लक्षात घेऊन त्यांनी व्यापाऱ्यांनाही आवाहन केले."येथे फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातात" असे फलक लावण्याचा सल्ला त्यांनी व्यापाऱ्यांना दिला.

ग्राहकांना भारतीय वस्तू खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे आणि फक्त स्वदेशी वस्तू विकण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करणे, हे देखील देशभक्तीचे कृत्य आहे - केवळ ऑपरेशन सिंदूरच नाही तर स्वदेशीचा स्वीकार करणे हे देखील राष्ट्रीय सेवेचे एक रूप आहे,,यावर मोदींनी  भर दिला. 

ही भावना लोकांपर्यंत पोहोचवत, पंतप्रधानांनी त्यांच्या कडून वचन आणि योगदानाची मागणी केली. आपल्या भाषणाचा समारोप करताना, लोकांमध्ये  मिसळून जाण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, सर्वांना शुभेच्छा देत सर्व मुलींना मनापासून आशीर्वाद दिले

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

 

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/सोनल तुपे/राज दळेकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160734)