गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलभाई पटेल यांच्या केंद्रीय विधानसभेचे पहिले निर्वाचित भारतीय अध्यक्ष बनण्याच्या 100 वर्षांच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय विधानसभा अध्यक्ष परिषदेचे उद्घाटन
Posted On:
24 AUG 2025 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलभाई पटेल यांच्या केंद्रीय विधानसभेचे पहिले निर्वाचित भारतीय अध्यक्ष बनण्याच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली विधानसभेत आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय विधानसभा अध्यक्ष परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत राज्य /केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच विधान परिषदांचे सभापती आणि उपसभापती सहभागी झाले आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली विधानसभा परिसरात विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनालाही भेट दिली.

अमित शाह यांनी या परिषदेला संबोधितही केले. आजच्या दिवशीच देशाच्या कायदेमंडळ (लेजिस्लेटिव्ह) इतिहासाचा प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले. याच दिवशी, महान स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, त्यातूनच भारतीयांच्या नेतृत्वाखालील विधायी इतिहासाची सुरुवात झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. या सभागृहात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेत्यांनी आमदार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सभागृहात थोर व्यक्तिमत्त्वांनी दिलेली भाषणे संकलित करून ती देशभरातील सर्व विधानसभांच्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून द्यावीत, यामुळे आजच्या आमदारांना आणि तरुणांना दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्याची भावना कशी प्रज्वलित झाली हे समजू शकेल, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षांना केली.

दिल्ली विधानसभेने विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर एक उल्लेखनीय प्रदर्शन आयोजित केले आहे, असे शहा यांनी सांगितले. अशा प्रकारचे प्रदर्शन सर्व विधानसभांमध्ये आयोजित केले जावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रदर्शनामुळे विधिमंडळातील सदस्य, विधान परिषद सदस्य आणि देशातील युवकांना केवळ विठ्ठलभाईंचे जीवन आणि योगदानाविषयीच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाविषयी देखील माहिती मिळेल. या सभागृहांच्या ग्रंथालयांना समृद्ध करण्याची गरज देखील शहा यांनी अधोरेखित केली.
अमित शाह म्हणाले की, विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यकाळात, केंद्र आणि सर्व राज्यांमध्ये विधिमंडळ विभाग आणि विधानसभेचे सचिवालय स्थापन करण्यात आल्याचे अमित शहा यांनी सांगितले. त्यावेळी विठ्ठलभाईंनी केलेले हे विधान महत्त्वाचे होते यावर त्यांनी प्रकाश टाकला: कोणतेही विधिमंडळ निवडून आलेल्या सरकारांच्या नियंत्रणाखाली चालू शकत नाही. सभागृह स्वतंत्र राहिले पाहिजे तेव्हाच त्यामध्ये होणाऱ्या चर्चेला अर्थ प्राप्त होतो.

विठ्ठलभाई पटेल अध्यक्षपदी विराजमान होऊन शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपापल्या विधानसभांमध्ये अध्यक्षपदाच्या गौरवृद्धीसाठी काम करण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.आपापल्या राज्यांमध्ये लोकांच्या जनतेच्या आवाजासाठी एक निष्पक्ष व्यासपीठ स्थापन करावे, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात निष्पक्ष चर्चा व्हावी, तसेच सभागृहाचे कामकाज विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेच्या नियमांनुसार चालेल हे सुनिश्चित करावे असेही ते म्हणाले.
अमित शाह यांनी सांगितले की, भारतात सभापतींना एका संस्थेचा दर्जा दिला जातो. त्यांनी अधोरेखित केले की, सभागृहातील सर्वात आव्हानात्मक भूमिका ही अध्यक्षांची असते. ते एखाद्या राजकीय पक्षातून निवडून आलेले असतात, मात्र शपथ घेतल्यानंतर ते निष्पक्ष पंचाची भूमिका पार पाडतात. अमित शाह म्हणाले की, आपल्या संविधानाच्या 75 वर्षांच्या प्रवासात लोकसभेचे तसेच राज्य विधानसभांच्या अध्यक्षांनी सातत्याने सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, निष्पक्षता व न्याय हे अध्यक्षांच्या प्रतिष्ठेचे दोन स्तंभ आहेत. एका अर्थाने, अध्यक्षांना सभागृहाचे रक्षक तसेच सेवक मानले जाते.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांनी नमूद केले की, संसद व विधानसभांच्या दालनांत जर अर्थपूर्ण चर्चा घडून आली नाही, तर त्या केवळ निर्जीव इमारती ठरतील. या इमारतींमध्ये भावना व विचार व्यक्त करण्याचे कार्य हे अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्यांचे असते. तेव्हाच त्या इमारती राष्ट्र व राज्याच्या हितासाठी कार्य करणारे सजीव केंद्र ठरतात. अमित शाह यांनी अधोरेखित केले की, संसद व विधानसभांचे कामकाज राजकीय हितासाठी बंद पाडणे हा विवादाचा मुद्दा असू शकत नाही. आंदोलन हे संयमित असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, प्रत्येक कायदा हा जनतेच्या विश्वासातून उगम पावला पाहिजे आणि त्या दिशेने पुढे गेला पाहिजे याची आपण सर्वांनी खात्री करावी. त्यांनी म्हटले की, सभागृह हे लोकशाहीचे इंजिन आहे. जेव्हा येथे उचित परंपरा प्रस्थापित होतात, राष्ट्रीय धोरणे ठरवली जातात आणि राष्ट्रहिताचे कायदे बनवले जातात, तेव्हा राष्ट्राची दिशा आपोआप स्पष्ट होते.

* * *
सुषमा काणे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160373)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam