पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2025 6:45PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी शांतनु ठाकुर जी, रवनीत सिंह जी, सुकांता मुजुमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते शुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सोबती शौमिक भट्टाचार्य जी, उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी गण, बंधू आणि भगिनींनो.
आज पुन्हा एकदा मला पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी मिळाली आहे. आत्ताच मी नोआपार ते जय हिंद विमानबंदर पर्यंत कोलकाता मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. या प्रवासादरम्यान मला अनेक मित्रांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. कोलकता शहरातील सार्वजनिक वाहतूक आता खऱ्या अर्थाने आधुनिक होत आहे याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. आज कोन या सहा पदरी उन्नत द्रुतगती मार्गाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हजारो कोटी रुपये मूल्याच्या या सर्व योजनांसाठी कोलकाता वासियांचे आणि संपूर्ण पश्चिम बंगालमधील जनतेचे खूप खूप अभिनंदन.
मित्रांनो,
कोलकात्यासारखी आपली शहरे भारताचा इतिहास आणि आपले भविष्य या दोन्हींचे एक समृद्ध प्रतीक आहेत. आज भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे अग्रेसर होत असताना दमदम, कोलकाता या शहरांची भूमिका खूप मोठी आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमातील संदेश, मेट्रोचे उद्घाटन आणि महामार्गाचे भूमिपूजन या सर्वांहून मोठा आहे. हा कार्यक्रम म्हणजे, आज भारत आपल्या शहरांचा कशाप्रकारे कायाकल्प करत आहे, याचा पुरावा आहे. आज भारतातील शहरांमध्ये हरित संपर्क सुविधांसाठी प्रयत्न केले जात आहेत, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स आणि इलेक्ट्रिक बसच्या संख्येत निरंतर वाढ केली जात आहे, कचऱ्यापासून समृद्धी (वेस्ट टू वेल्थ), शहरातून गोळा झालेल्या कचऱ्यामधून वीज निर्मिती करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मेट्रो सुविधा वाढवली जात आहे, मेट्रो जाळ्याचा विस्तार केला जात आहे. आज जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क भारतात आहे हे ऐकून सर्वांना अभिमान वाटतो. 2014 पूर्वी देशामध्ये केवळ 250 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होता. आज देशात मेट्रो मार्गाची लांबी 1,000 किलोमीटर हून अधिक झाली आहे. कोलकाता शहरात देखील मेट्रोचा निरंतर विस्तार होत आहे. आजच कोलकाता मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात सुमारे 14 किलोमीटर लांबीची नवीन मार्गिका जोडली गेली आहे. कोलकाता मेट्रो मध्ये नवीन सात स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व योजना कोलकातामधील रहिवाशांचे जीवनमान सुलभ करणाऱ्या तसेच त्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आहेत.
मित्रांनो,
21 व्या शतकातील भारताला 21 व्या शतकातील वाहतूक प्रणालीची देखील आवश्यकता आहे. म्हणूनच आज देशात रेल्वे पासून रस्त्यांपर्यंत, मेट्रो पासून विमानतळापर्यंत, आम्ही आधुनिक वाहतूक सुविधा विकसित करत आहोत आणि या सुविधा एकमेकांना जोडत देखील आहोत. जेणेकरून नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या घराजवळच अखंड वाहतूक व्यवस्था मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. याची झलक आपल्याला कोलकत्याच्या मल्टी मॉडेल संपर्क सुविधांमध्ये दिसून येते. जसे की हावडा आणि सियालदा ही देशातील दोन सर्वाधिक व्यस्त रेल्वे स्थानके आता मेट्रोशी जोडली गेली आहेत. यामुळे ज्या दोन स्थानकांमध्ये प्रवास करण्यासाठी पूर्वी दीड तासाचा वेळ लागत असे तिथे आता मेट्रोमुळे काही मिनिटात या स्थानकावरून त्या स्थानावर पोहोचता येईल. याच प्रमाणे हावडा स्थानक सब वे देखील मल्टी मॉडेल संपर्क सुविधा सुनिश्चित करत आहे. पूर्वी दक्षिण पूर्व रेल्वे किंवा पूर्व रेल्वे पकडण्यासाठी खूप मोठा वळसा घालून जावे लागत असे. हा सब वे तयार झाल्यानंतर मात्र इंटरचेंजसाठी खूप कमी वेळ लागेल. आज पासून कोलकाता विमानतळ देखील मेट्रोशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातल्या दूरवरच्या भागांमधून देखील विमानतळावर पोहोचणे सोपे होईल.
मित्रांनो,
पश्चिम बंगालच्या विकासासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज पश्चिम बंगालचा देशातील अशा राज्यांच्या यादीत समावेश झाले आहे जिथे रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुरुलिया ते हावडा दरम्यान मेमू ट्रेनची मागणी केली जात होती. भारत सरकारने जनतेची ही मागणी देखील पूर्ण केली आहे. आज पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या मार्गांवर नऊ वंदे भारत रेल्वे गाड्या धावत आहेत, या व्यतिरिक्त सर्वांसाठी दोन अमृत भारत रेल्वे गाड्या देखील चालवल्या जात आहेत.
मित्रांनो,
मागील अकरा वर्षात येथे भारत सरकारकडून अनेक मोठे महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. जेव्हा सहा पदरी कोना द्रुतगती मार्ग तयार होईल तेव्हा यामुळे बंदराची संपर्क सुविधा देखील वृद्धिंगत होईल. ही संपर्क सुविधा कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करेल. आत्तासाठी इतकेच.
मित्रांनो,
थोड्याच वेळात, येथे जवळच एक मोठी जनसभा होणार आहे, त्या सभेत तुम्हा सर्वांबरोबर पश्चिम बंगालचा विकास आणि भविष्यासंदर्भात विस्तारपूर्वक चर्चा होणार आहे, अजून इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होईल. तिथे अनेक लोक वाट पाहत आहे, म्हणून मी येथे माझ्या वाणीला विराम देतो.
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद!
***
निखिल देशमुख/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2160108)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam