कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत कर्मचारी संकल्प संमेलनाला केले संबोधित
Posted On:
21 AUG 2025 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे भव्य 'कर्मचारी संकल्प संमेलन' आयोजित करण्यात आले होते.

आपल्या जीवनात प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. "राष्ट्र उभारणी हे आपले कर्तव्य आहे आणि सांघिक भावनेतून काम केल्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाला बळ प्राप्त होईल," असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षापासून या परिषदेचे नाव 'कर्मयोगी संकल्प संमेलन' असे ठेवण्याची सूचना त्यांनी केली. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो आदर व सन्मानास पात्र आहे यावर त्यांनी भर दिला.

देशाच्या विकासात कृषी तसेच ग्रामीण विकास मंत्रालय यांची महत्त्वपूर्ण भूमिका चौहान यांनी अधोरेखित केली. खरीप हंगामासाठी राबविण्यात आलेले 'विकसित कृषी संकल्प अभियान' ऐतिहासिक ठरले,असे त्यांनी सांगितले. या अभियानाने कृषी विकासात उल्लेखनीय भूमिका बजावली. प्रथमच इतकी मोठी मोहीम हाती घेण्यात आली, ज्यामध्ये शास्त्रज्ञांच्या 2,170 पथकांनी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमातून 500 हून अधिक संशोधन विषय पुढे आले, हे एक मोठे यश आहे, असे चौहान म्हणाले.

देशात अन्नधान्याचा साठा विपुल प्रमाणात असला तरी, डाळी, तेलबिया आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यात तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यातली आव्हाने अजूनही आहेत, असे ते म्हणाले. राज्य सरकारे केंद्र सरकारसोबत एक व्यापक कृषी आराखडा तयार करण्यासाठी काम करत आहेत, सामूहिक प्रयत्नांतून कृषी क्षेत्र अधिक बळकट होईल, अशी आशा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली.

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत झालेल्या प्रगतीकडे चौहान यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. "मला हे सांगताना खूप अभिमान आणि आनंद होत आहे की आपण हे लक्ष्य वेळेपूर्वी साध्य करण्याच्या जवळ आहोत, जवळजवळ 2.8 कोटी महिला आधीच लखपती दीदी बनल्या आहेत," असे चौहान यांनी सांगितले.
गावांमध्ये लोकांना घरे उपलब्ध करून देण्याचे कामही वेगाने सुरू आहे. ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात वेगाने प्रगती होत असून 114 दिवसांच्या विक्रमी वेळेत घरे बांधली जात आहेत.ग्रामीण रस्ते व गृहनिर्माण क्षेत्रात वेगाने प्रगती होत असल्यामुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत, असे ते म्हणाले.

सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन करण्यास त्यांनी सांगितले आणि स्वदेशी उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्पही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिला. यामुळे गरजूंसाठी रोजगार निर्माण होईल आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल असे ते म्हणाले.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2159420)