सांस्कृतिक मंत्रालय
तिरंगा अभियानात स्वयंसेवक म्हणून 5 लाखांहून अधिक तरुणांनी केली नावनोंदणी - गजेंद्र सिंह शेखावत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या चौथ्या आवृत्तीची संस्कृती मंत्रालयाने केली घोषणा
Posted On:
11 AUG 2025 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2025
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या हर घर तिरंगा मोहिमेच्या चौथ्या आवृत्तीची अभिमानाने घोषणा केली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट देशभरातील नागरिकांना - तिरंगा - या भारतीय राष्ट्रध्वजाला त्यांच्या घरात आणि हृदयात स्थान राखण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
यावर्षी, आपण तिरंगा मोहिमेची चौथी आवृत्ती साजरी करणार आहोत, ज्यासाठी 5 लाखांहून अधिक तरुणांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. हे तरुण तिरंगा अभियानासाठी लोकांना प्रेरित करतील, असे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

आज पत्रकार परिषदेत बोलताना शेखावत म्हणाले की, हर घर तिरंगा केवळ एक अभियान नाही - तर ही एक भावनिक चळवळ आहे जी 140 कोटी भारतीयांना आपल्या राष्ट्रध्वजाच्या कालातीत रंगांखाली एकत्र आणते. देशभक्ती जागृत करणे, नागरी अभिमान वाढवणे तसेच आपल्या लोकशाही आणि स्वातंत्र्याचे सजीव प्रतीक म्हणून तिरंगाचे महत्त्व, याबद्दल जागरूकता पसरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी एका सादरीकरणाद्वारे तिरंगा अभियानाचा तपशीलवार आढावा सादर केला.
नागरिक आणि राष्ट्रध्वज यांच्यातील नाते केवळ औपचारिक आणि संस्थात्मक मर्यादेतून बाहेर काढून ते एक वैयक्तिक बंधनात रूपांतरीत करण्याच्या उद्देशाने हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक भारतीयाने अभिमानाने आणि सन्मानाने तिरंगा फडकवावा हीच या मोहिमेची प्रेरणा आहे जेणेकरून भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल.
या उपक्रमाला अत्यंत प्रतीकात्मक महत्त्व आहे - तिरंगा घरी आणणे हे केवळ वैयक्तिक नात्याची अभिव्यक्ती नाही तर राष्ट्र उभारणीसाठी आपल्या सामायिक बांधिलकीचा पुनरुच्चार देखील आहे. हा ध्वज आपल्या भारतीय वीरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो आपल्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करून देतो तसेच एकता, अखंडता आणि प्रगती या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेण्यास प्रवृत्त करतो.

या मोहिमेसाठी सांस्कृतिक मंत्रालय हे नोडल मंत्रालय असून व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, शैक्षणिक संस्था, सामुदायिक संघटना आणि सामान्य नागरिक यांच्यासह घनिष्ठ सहकार्याने ही मोहीम राबवली जाते. नागरिकांना आपल्या घरांवर, कार्यालयांवर आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवण्यासाठी आणि #HarGharTiranga या हॅशटॅगचा वापर करून समाज माध्यमावर छायाचित्रे आणि कथांद्वारे त्यांचे उत्सव सामायिक करण्यास प्रोत्साहित केले जाते.
गेल्या तीन वर्षातील उत्साही सहभागामुळे, हर घर तिरंगा ही एक लोकचळवळ बनली आहे - ज्यामुळे स्वातंत्र्यदिन अधिक उत्साही, देशव्यापी आणि विविधतेत एकता साजरा करणारा सण ठरला आहे. 2025 च्या आवृत्तीचे उद्दिष्ट आपल्या राष्ट्रीय भावनेला आणि अभिमानाला दृढ करून अधिक उंचीवर नेण्याचे आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155334)