माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून सुरुवातीपासून आतापर्यंत 34.13 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न


यूट्यूब व ओटीटीसह डिजिटल माध्यमांवर ‘मन की बात’ च्या प्रेक्षक संख्येमध्ये लक्षणीय वाढ

Posted On: 08 AUG 2025 5:23PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशभरात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे दर्शन घडविणारे एक अद्वितीय व्यासपीठ ठरले आहे. देशाच्या विकास प्रवासात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी प्रोत्साहन देणारा  एक अद्वितीय मंच म्हणून हा कार्यक्रम काम करतो.

दर महिन्याच्या या रेडिओ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नवकल्पना, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रांत प्रभावी कार्य करणाऱ्या भारतीयांच्या प्रेरणादायी कथा मांडतात. यात युवक, शेतकरी, महिला, कारागीर, उद्योजक, खेळाडू, स्वयं-साहाय्य गट यांच्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या तळागाळातील उपक्रमांचा समावेश असतो. या कथा देशाच्या दुर्गम व विविध भागांतून येतात, ज्यातून राष्ट्राची समृद्ध आणि सर्वसमावेशक भावना प्रतिबिंबित होते. तसेच इतिहासातील अज्ञात नायकांचे योगदानही या कार्यक्रमात अधोरेखित केले जाते. कालांतराने ‘मन की बात’ हा कार्यक्रम राष्ट्रनिर्मितीचे  एक  बळकट साधन म्हणून विकसित झाला असून, भारताच्या विविधतेचा, जिद्दीचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणाऱ्या कथा सांगून जन संवादाला  दिशा देत आहे.

आकाशवाणीमार्फत हा कार्यक्रम संस्थेच्या विद्यमान मनुष्यबळ व संसाधनांचा उपयोग करून कोणताही अतिरिक्त खर्च न करता निर्मित करण्यात येतो आणि सुरूवातीपासून आतापर्यंत या कार्यक्रमाने 34.13 कोटी रुपयांहून अधिक  उत्पन्न प्राप्त केले आहे.

प्रेक्षकांचा सहभाग

मन की बात’ मध्ये  पारंपरिक तसेच डिजिटल माध्यमांद्वारे विविध प्रकारे प्रेक्षक सहभागी होतात.

मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आकाशवाणीवरील हा कार्यक्रम  ऐकतात, जो  राष्ट्रीय तसेच प्रादेशिक नेटवर्कवर प्रसारित केला जातो. स्थानिक भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी  प्रादेशिक भाषांतील आवृत्त्याही प्रसारित केल्या जातात.

हा कार्यक्रम दूरदर्शनच्या राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वाहिन्यांवर प्रसारित केला जातो. तसेच दूरदर्शन फ्री डिशवर 48 आकाशवाणी रेडिओ वाहिन्या आणि 92 खाजगी वाहिन्या उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील प्रेक्षकांपर्यंत कार्यक्रम पोहोचतो. त्याचबरोबर ‘मन की बात’ च्या दृश्यमाध्यम स्वरूपामुळे सामूहिक चिंतन व चर्चेला चालना मिळते.

डिजिटल माध्यमांवर प्रेक्षक सहभागात मोठी वाढ झाली आहे. हा कार्यक्रम यूट्यूबवरील (पंतप्रधान कार्यालय, आकाशवाणी आदी चॅनेल्स), प्रसार भारतीचे ओटीटी व्यासपीठ ‘वेव्ह्ज’ तसेच “न्यूजऑनएअर” मोबाईल अ‍ॅपवर (ज्यात 260 हून अधिक आकाशवाणी वाहिन्या आहेत) उपलब्ध असतो. तसेच प्रसार भारतीच्या ‘पीबी शब्द’ वरही हा कार्यक्रम उपलब्ध होतो.

सोशल मीडियावर फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम या कार्यक्रमाचा व्यापक प्रसार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षक तो ऐकतात. तसेच नागरिक ‘मायगव्ह’ पोर्टलवरून सूचना पाठवून, पंतप्रधानांना पत्र किंवा ई-मेल करून, तसेच ध्वनी संदेश नोंदवून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात.

त्याचबरोबर संस्थात्मक व ग्रामीण पातळीवर शाळा, ग्रामपंचायती, स्वयं-साहाय्य गट आणि स्वयंसेवी संस्था सामूहिक श्रवण /किंवा दूरचित्रवाणीवर पाहण्याची व्यवस्था  करून  नागरीक  जागरूकता आणि सामुदायिक चर्चा घडवून आणतात.

माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

***

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2154499)