पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या चळवळीचे नेतृत्त्व केले : पंतप्रधान
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांनी जैवविविधतेच्या पलीकडे जाऊन जैव-आनंद ही दूरदर्शी संकल्पना दिली : पंतप्रधान
भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताबाबत कधीही तडजोड करणार नाही : पंतप्रधान
शेतकऱ्यांची ताकद हाच राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे, हे सरकारने जाणले आहे : पंतप्रधान
अन्नसुरक्षेच्या आदर्श पायावर कळस रचत सर्वांसाठी पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे हे आपल्या पुढील पिढीतील कृषिशास्त्रज्ञांसमोरील आव्हान असेल : पंतप्रधान
Posted On:
07 AUG 2025 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी यावेळी आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनाचाही उल्लेख केला. गेल्या दहा वर्षात हातमाग क्षेत्राने संपूर्ण देशभरात एक नवीन ओळख आणि सामर्थ्य प्राप्त केले आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्यांनी सर्वांना विशेषतः या क्षेत्राशी संबंधितांना शुभेच्छा दिल्या.
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांच्यासोबतच्या कित्येक वर्षांच्या संबंधांना उजाळा देत पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळी गुजरातमध्ये असलेल्या स्थितीबद्दल सांगितले, ज्यावेळी दुष्काळ आणि वादळांमुळे तेथील कृषिक्षेत्रासमोर मोठे आव्हान असायचे. त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मृदा आयोग्य पत्रिका या उपक्रमावर कार्य सुरु झाले असे सांगून या उपक्रमात प्राध्यापक स्वामिनाथन यांनी खूप स्वारस्य दाखवले तसेच खुल्या दिलाने अनेक शिफारसी केल्या आणि या योजनेच्या यशस्वितेत मोठे योगदान दिले, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी जवळजवळ वीस वर्षांपूर्वी, तामिळनाडूतील प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या रिसर्च फाउंडेशन सेंटरला, भेट दिल्याचा उल्लेख केला. 2017 मध्ये त्यांना प्राध्यापक स्वामीनाथन यांचे 'द क्वेस्ट फॉर अ वर्ल्ड विदाऊट हंगर' हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाली. 2018 मध्ये वाराणसी येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या प्रादेशिक केंद्राच्या उदघाटनप्रसंगी प्राध्यापक स्वामिनानाथन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्राध्यापक स्वामीनाथन यांच्याबरोबर झालेली प्रत्येक भेट हा शिकण्याचा अनुभव होता असे सांगून त्यांनी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी एकदा "विज्ञान हे केवळ शोधापुरते मर्यादित नव्हे तर सर्वांपर्यंत पोहचवणे आहे" असे म्हटल्याचे नमूद केले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी आपले विचार आपल्या कृतीतून सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी केवळ संशोधन केले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना कृषीपद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यास प्रवृत्त केले. आज देखील प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन भारताच्या कृषी क्षेत्रात रुजलेला असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. भारतमातेचे खरे रत्न असे वर्णन करून, पंतप्रधानांनी प्राध्यापक स्वामीनाथन यांना त्यांच्या सरकारच्या काळात भारतरत्न प्रदान करण्यात येणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या चळवळीचे नेतृत्त्व केले असे सांगून प्राध्यापक स्वामीनाथन यांची ओळख हरितक्रांतीच्याही पलीकडे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी रसायनांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम आणि एकाच पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जागरूकता निर्माण केली. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी अन्नधान्य उत्पादन वृद्धीसाठी कार्य केले असले तरी पर्यावरण आणि धरणीमातेप्रती त्यांना नेहमीच कळकळ वाटत असे. या दोन्हींमध्ये संतुलन राखत असतानाच नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी सदाहरित क्रांतीची संकल्पना मांडली. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी सामुदायिक बियाणे बँका आणि लाभदायी पिके यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले, असे पंतप्रधान म्हणाले.
हवामान बदल आणि पोषणासंबंधित आव्हानांवर विस्मृतीत गेलेल्या पिकांमध्येच उत्तर दडलेले आहे यावर प्राध्यापक स्वामीनाथन यांचा गाढ विश्वास होता असे सांगून प्राध्यापक स्वामीनाथन यांचा शेतीमध्ये दुष्काळ सहनशीलता आणि क्षार सहनशीलता यावर कटाक्ष होता, असे पंतप्रधान म्हणाले. भरड धान्य किंवा श्री अन्न यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याच्या काळात प्राध्यापक स्वामीनाथन यांनी त्यावर कार्य केले, असे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी खारफुटीच्या अनुवांशिक गुणांचे धानामध्ये रूपांतर करण्याचे सुचवले होते, ज्यामुळे पिके अधिक हवामान-लवचिक बनण्यास मदत होईल, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. आजच्या काळात जेव्हा हवामान बदलाशी संबंधित कृतींचा अंगीकार करणे हे जागतिक प्राधान्य बनले असताना प्राध्यापक स्वामीनाथन यांचे विचार किती दूरदर्शी होते त्याचा प्रत्यय येतो, असे त्यांनी सांगितले.
जैवविविधता हा जागतिक पातळीवर चर्चेचा मुद्दा असून त्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना जैव आनंद ही संकल्पना विकसित करणारे प्राध्यापक स्वामीनाथन काळाच्या पुढे विचार करणारे होते हे दिसून येते, असे ते म्हणाले. आजचा मेळावा हा त्याच कल्पनेचा उत्सव आहे असे त्यांनी नमूद केले. जैवविविधतेच्या शक्तीमुळे स्थानिक समुदायांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडू शकतात हे डॉ. स्वामीनाथन यांचे म्हणणे उद्धृत करून, स्थानिक संसाधनांच्या वापराद्वारे लोकांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करता येतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. डॉ. स्वामीनाथन यांच्यात नवकल्पनांचा अविष्कार तळागाळातील प्रत्यक्ष कृतीत साकारण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता होती. डॉ. स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन शोधांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी सातत्याने काम केले, डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांचा छोटे शेतकरी, मच्छीमार आणि आदिवासी समुदायांना मोठा फायदा झाला, असे पंतप्रधान म्हणाले.
प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एम. एस. स्वामीनाथन अन्न आणि शांतता पुरस्कार सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की अन्नसुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विकसनशील राष्ट्रातील व्यक्तींना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाईल. अन्न आणि शांती यांच्यातील नाते हे केवळ तात्विकच नाही तर ते व्यावहारिक देखील आहे, असे ते म्हणाले. उपनिषदांमधील एका श्लोकाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी अन्नाचे पावित्र्य अधोरेखित केले, अन्न हे जीवन आहे आणि त्याचा कधीही अनादर किंवा दुर्लक्ष करता कामा नये असे ते म्हणाले. अन्नाचे कोणतेही संकट अपरिहार्यपणे जीवनाच्या संकटाला कारणीभूत ठरते आणि जेव्हा लाखो लोकांचे जीवन धोक्यात येते तेव्हा जागतिक अशांतता अपरिहार्य बनते, असा इशारा देत, पंतप्रधानांनी आजच्या जगात अन्न आणि शांततेसाठी एम. एस. स्वामीनाथन पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधानांनी या पुरस्काराचे पहिले मानकरी नायजेरियाचे प्राध्यापक आडेनले यांचे अभिनंदन केले आणिते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ असून त्यांचे कार्य या सन्मानाच्या भावनेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
भारत आज दूध, डाळी आणि तागाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे हे अधोरेखित करुन देशातील कृषिक्षेत्राने सध्या गाठलेली उंची पाहता डॉ एम.एस.स्वामीनाथन यांना नक्कीच अभिमान वाटला असता, असे पंतप्रधान म्हणाले. भारत तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने गेल्या वर्षी आपले सर्वोच्च अन्नधान्य उत्पादन केले असे पंतप्रधान म्हणाले. सोयाबीन, मोहरी आणि भुईमूग उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याने भारत तेलबियांमध्येही विक्रम प्रस्थापित करत आहे यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांचे हित हे देशाचे सर्वोच्च प्राधान्य असून देश कधीही शेतकऱ्यांच्या, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
शेतकऱ्यांची शक्ती हीच राष्ट्राच्या प्रगतीचा पाया असल्याची सरकारची सातत्याने धारणा राहिली आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात आखण्यात आलेली धोरणे ही फक्त मदतीसाठी नसून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास दृढ करण्याच्या दृष्टीने आखली होती असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी मुळे थेट आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळाले तर पंतप्रधान पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीमसंदर्भात तर पंतप्रधान कृषी सिंचन योजनेने शेतीला पाणी मिळण्यासंदर्भातील आव्हानांच्या बाबतीत शेतकऱ्यांना बळ दिले ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. दहा हजार शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती केल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांच्या एकत्रित शक्तीला अधिक बळ लाभले, यावरही पंतप्रधानांनी भर दिला. सहकारी संस्था तसेच स्वयंसहायता गट यांना आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळाली, असंही ते म्हणाले. ई-नाम मंचाचा उल्लेख करत मोदी यांनी सांगितले की यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने विकण्याची प्रक्रिया अधिक सोपी करून मिळाली तर पीएम किसान संपदा योजनेतून नवीन अन्न प्रक्रिया केंद्रांचा विकास आणि साठवणुकीसाठीच्या पायाभूत सुविधा यांनाही वेग आला. नुकतीच मंजूर झालेली पीएम धन योजना ही ज्या जिल्ह्यांमध्ये शेतीक्षेत्र मागे पडले आहे अशा 100 जिल्ह्यांच्या उत्थानाच्या उद्देशाने आखण्यात आली आहे. या जिल्ह्यांना सुविधा तसेच आर्थिक सहाय्य यांचा पुरवठा करून सरकार शेती क्षेत्रासाठी नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहे.
“21 व्या शतकातील भारत हा विकसित देश होण्यासाठी कटीबद्ध आहे आणि समाजातील प्रत्येक व्यवसाय आणि प्रत्येक क्षेत्र यांच्या योग्य त्या सहभागातूनच हे लक्ष्य साध्य करता येईल.”, असे पंतप्रधान म्हणाले. डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याकडून प्रेरणा घेऊन नवीन इतिहास रचण्यासाठी आता भारतीय शास्त्रज्ञांना ही अजून एक संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आधीच्या पिढीतील शास्त्रज्ञांनी अन्नसुरक्षेची खात्री दिली असे सांगून सध्या हे लक्ष्य पोषण सुरक्षा असायला हवे यावर पंतप्रधानांनी भर दिला. सार्वजनिक आरोग्याच्या सुधारासाठी जैव-अनुकूल आणि पोषणमूल्य अधिक असणाऱ्या पिकांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले . याबरोबरच शेतीमध्ये रसायनांचा वापर कमी करण्याचेही आवाहन केले. नैसर्गिक शेतीला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत त्यांनी या दिशेने अधिक तातडीचे आणि शाश्वत प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले.
हवामान बदलाने आपल्यासमोर उभी केलेली आव्हाने आपल्याला परिचित आहेत असे सांगत पंतप्रधानांनी हवामान बदलाला तोंड देऊ शकतील अशा प्रकारच्या कृषी वाणांची अधिकाधिक निर्मिती करण्याची गरज आहे यावर भर दिला. दुष्काळात टिकाव धरतील, वातावरणातील उष्णतेला तोंड देतील आणि पूर परिस्थितीशी जुळवून घेतील अशा पिकांना महत्त्व देण्यावर त्यांनी भर दिला. पीक फिरवणे आणि मातीशी संबंधित मातीच्या प्रकाराशी जुळवून घेणारी वाणे यावर संशोधनाची गरज असल्याचे व्यक्त करत त्यांनी पोषण व्यवस्थापन पद्धती तसेच माती परीक्षणाची साधने याबद्दल आग्रही भूमिका मांडली. सौरऊर्जा संचालित सूक्ष्म सिंचनच्या दिशेने प्रयत्न वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ठिबक सिंचन आणि अचूक सिंचन सर्व दूर नेले पाहिजे आणि त्यांची परिणामकारकता वाढवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात सॅटॅलाइट डाटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांच्या वापरासंबंधी चर्चा करताना पंतप्रधान मोदी यांनी या व्यवस्थेतून पिकांच्या उत्पादनाबद्दल भाकीत करणे, कीड नियंत्रण आणि पेरा करण्यासंदर्भातील मार्गदर्शन यासंबंधी व्यवस्था उभी करणे शक्य होईल का, अशी विचारणा केली. प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची वास्तविक वेळेत निर्णय प्रक्रिया उपलब्ध करून देता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला. कृषी तंत्रज्ञानाधारित स्टार्ट अप्सना मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांनी तज्ञांना केली. नवोन्मेषशाली युवक मोठ्या संख्येने कृषी क्षेत्रासमोरची आव्हाने सोडवण्यासाठी काम करत आहेत असा उल्लेख करून त्यांनी अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळाले तर युवक विकसित करत असलेली उत्पादने अधिक उपयुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला.
“भारताच्या कृषक समुदायाकडे पारंपारिक ज्ञानाची खाण आहे. पारंपारिक भारतीय शेती पद्धती आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून समग्र ज्ञानाधारीत पाया घालता येईल”, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पीक विविधता ही सध्या राष्ट्रीय प्राधान्यक्रम असल्याचे अधोरेखित करत मोदी यांनी याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची गरज अधोरेखित केली. पिक विविधतेच्या फायद्यांबाबत शेतकऱ्यांना सजग करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्या पद्धतीचा अवलंब न केल्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी देखील त्यांना सजग करायला हवे असे ते म्हणाले. या संदर्भात तज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी असे ते म्हणाले. PUSA परिसराला 11 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या आपल्या भेटीचा उल्लेख करून ते म्हणाले की त्यावेळी आपण कृषी तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून जमिनीपर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली होती. मे आणि जून 2025 मध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात झाल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. प्रथमच शास्त्रज्ञांच्या 2200 टीम्स देशभरात 700 जिल्ह्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. याशिवाय याबाबतीत साठ हजारहून अधिक कार्यक्रम घेण्यात आल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की या प्रयत्नांच्या माध्यमातून जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांशी वैज्ञानिक थेट जोडले गेले. विज्ञानाची जाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते अतिशय स्तुत्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शेती ही फक्त उत्पन्नापुरती मर्यादित नसून ते जीवन असल्याची शिकवण आपल्याला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी दिल्याचे सांगून मोदी यांनी शेती हा लोकांचा रोजगार आहे यावर भर दिला. प्रत्येक व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा ही आपल्या शेतीशी जोडलेली असते आणि प्रत्येक समुदायाची समृद्धी तसेच निसर्गाच्या लहरी पासून मिळणारे संरक्षण यामुळे सरकारच्या कृषी धोरणाला बळकटी येते., मोदी यांनी सांगितले. विज्ञान आणि समाज यांची जोडी आवश्यक असल्यावर भर देत पंतप्रधान छोट्या शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले. शेतात राबणाऱ्या महिला वर्गाला सबल करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना प्रधानमंत्र्यांनी ही खात्री दिली की देश या दृष्टिकोनासह पुढे जाणार आहे आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या कार्यातून मिळणाऱ्या प्रेरणेने सर्वांना मार्गदर्शन मिळत राहील.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, नीती आयोगाचे डॉक्टर रमेश चंद्र, एम एस स्वामीनाथन प्रतिष्ठानच्या सौम्या स्वामीनाथन आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ICAR PUSA येथे एम एस स्वामीनाथन शतक महोत्सवी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. “सदाहरित क्रांती, जैव आनंदाचा मार्ग” ही या परिषदे मागची संकल्पना आहे. ही संकल्पना सर्वांना अन्नाची खात्री देण्यासाठी आपले जीवन वेचणारे स्वामीनाथन यांच्या कार्याशी संलग्न आहे. या परिषदेच्या माध्यमातून वैज्ञानिक धोरणकर्ते विकास व्यावसायिक आणि इतर संबंधितांना सदाहरित क्रांतीबाबत तत्त्वांवर चर्चा तसेच ही तत्वे पुढे नेणे सुलभ होईल. जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी शाश्वत कृषी हवामान बदलाशी जुळवून घेऊन हवामान संदर्भातील लवचिकता वाढवणे, शाश्वत आणि न्याय्य उपजीविकेसाठी सुयोग्य तंत्रज्ञान वापर तसेच विकासाच्या वाटेवर युवा महिला आणि उपेक्षित समुदायांना सामील करून घेणे या मुख्य संकल्पनांचा यामध्ये समावेश आहे. एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सने या परंपरेची जपणूक करण्यासाठी अन्न आणि शांततेसाठी एम एस स्वामीनाथन पुरस्कार सुरु केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान यांनी पहिला पुरस्कार वितरित केला. वैज्ञानिक संशोधन, धोरण विकास, तळागाळातील सहभाग किंवा स्थानिक क्षमता वाढीतून अन्नसुरक्षा सुधारणा तसेच असुरक्षित आणि उपेक्षित समुदायासाठी हवामान न्याय, समता आणि शांतता यांच्या वाढीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विकसनशील देशातील व्यक्तींना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
* * *
सुषमा काणे/भक्ती/विजया/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153486)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam