वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते "कार्बन फूटप्रिंट असेसमेंट इन द इंडियन हँडलूम सेक्टर" या पुस्तकाचे प्रकाशन
Posted On:
06 AUG 2025 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज "कार्बन फूटप्रिंट असेसमेंट इन द इंडियन हँडलूम सेक्टर: मेथड्स अँड केस स्टडीज" या पुस्तकाचे अधिकृतरित्या प्रकाशन केले. हे पुस्तक वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हातमाग विकास आयुक्त कार्यालय आणि आयआयटी, दिल्लीच्या वस्त्रोद्योग आणि फायबर अभियांत्रिकी विभागाने संयुक्तपणे तयार केले आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज भारत सरकारच्या पर्यावरणपूरक हातमाग उत्पादन आणि शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेला बळकटी देतो, तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक क्षेत्र आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या हातमाग उद्योगाच्या कार्बन ठशाचे मोजमाप करून तो कमी करण्यासाठी स्पष्ट, व्यावहारिक पद्धती उपलब्ध करतो.

हातमाग क्षेत्र हे ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण उपजीविकेचा अविभाज्य भाग आहे ज्यामध्ये 35 लाखांहून अधिक लोक काम करतात. या क्षेत्रात 25 लाखांहून अधिक महिला विणकर आणि संबंधित कामगार काम करतात. यामुळे ते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा स्रोत बनले आहे. कमी भांडवलाची गरज, कमीत कमी वीज वापर, पर्यावरणपूरक, लघु उत्पादनाची लवचिकता, नवोन्मेषांप्रति खुलेपणा आणि बाजाराच्या गरजांशी जुळवून घेण्याची क्षमता हे या क्षेत्राचे फायदे आहेत.

हातमागाचे वेगळेपण, छोट्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता तसेच पर्यावरणपूरक असल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत या हातमाग उत्पादनांना मोठी मागणी आहे. हे पुस्तक भारतीय हातमागाच्या चैतन्यशील आणि गुंतागुंतीच्या पद्धती आणि शाश्वत फॅशन आणि जागरूक वापरात त्याची महत्त्वाची भूमिका यावर लक्ष केंद्रित करते.
या पुस्तकात भारतातील वास्तव-जगातील प्रकरणांच्या अभ्यासाद्वारे कार्बन ठसा मोजण्यासाठी सोप्या पायऱ्यांचा समावेश आहे, यात कापसाच्या चादरी, पायपुसणी, इकत साड्या, बनारसी साड्या आणि इतर प्रतिष्ठित हातमाग वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये कमी किमतीच्या डेटा संकलनासाठीच्या पद्धती आणि पर्यावरणपूरक उत्पादन वाढविण्यासाठी विशेषतः हातमाग क्षेत्रासाठी डिझाइन केलेल्या उत्सर्जन मापन पद्धतींचा देखील समावेश आहे.
हा अहवाल/पुस्तक आयआयटी दिल्ली येथील हातमाग आणि वस्त्रोद्योग विकास आयुक्त कार्यालयाच्या संशोधन सहकार्यातून तयार करण्यात आला आहे. या कामात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था, विणकर सेवा केंद्रे , तळागाळातील विणकर गट, ग्रीनस्टिच प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रमुख सरकारी संस्थांमधील तज्ञांशी व्यापक सल्लामसलत आणि निकटचे सहकार्य समाविष्ट होते. हे पुस्तक जागतिक हवामान अहवाल मानकांना भारताच्या अद्वितीय कार्यान्वयन संदर्भानुसार अनुकूलित करताना एकत्रित करते आणि शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी क्षेत्राला सक्षम बनवते.
मंत्रालयाने सर्व भागधारकांना,माध्यम प्रतिनिधींना आणि जनतेला या ऐतिहासिक अहवालातील निष्कर्षांचा शोध घेण्याचे आणि ते लागू करण्याचे आवाहन केले आहे- हरित , अधिक लवचिक भारतीय वस्त्रोद्योगाच्या दिशेने प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153038)