रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांनी भावनगर-अयोध्या साप्ताहिक रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

Posted On: 03 AUG 2025 7:56PM by PIB Mumbai

 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज गुजरातच्या भावनगर येथून तीन नवीन एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यामध्ये भावनगर-अयोध्या एक्स्प्रेस, रेवा-पुणे (हडपसर) एक्स्प्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

भावनगर-अयोध्या साप्ताहिक रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्याला रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव, केंद्रीय कामगार आणि रोजगार, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव म्हणाले की, या तीन गाड्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. भावनगर-अयोध्या एक्स्प्रेस संस्कृती आणि भक्ती यांना जोडेल आणि भावनगरमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना देईल. पुणे आज एक प्रमुख औद्योगिक शहर आहे आणि ते रेवा, जबलपूर, सतना आणि मैहरशी जोडले गेले आहे. ही गाडी या आदिवासी भागासाठी देखील खूप महत्त्वाची ठरेल.

ते पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे रेल्वेसोबत भावनिक नाते आहे आणि नवीन तंत्रज्ञान आणत आणि जाळ्याचा विस्तार करत ते नेहमीच रेल्वेच्या विकासावर भर  देतात. गेल्या 11 वर्षांत रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. या काळात 34,000 किलोमीटरचे नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात आले आहेत, म्हणजेच दररोज सरासरी 12 किलोमीटर. असा वेग इतिहासात कधीही दिसला नव्हता. सध्या 1,300 स्थानकांचा  पुनर्विकास सुरू आहे, जो जगातील सर्वात मोठा स्थानक आधुनिकीकरण कार्यक्रम आहे. परदेशात, जिथे नूतनीकरणाच्या वेळी स्थानके आणि गाड्या बंद केल्या जातात, तिथे भारतात मात्र हे काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय वेगाने प्रगती करत आहे.

देशातील मुंबई ते अहमदाबाद  ही पहिली बुलेट ट्रेन  लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचे बांधकाम वेगाने सुरू असून, ती सुरू झाल्यावर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाला फक्त 2 तास आणि 7 मिनिटे लागतील. वाढत्या प्रवासी सुविधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, नवीन 'अमृत भारत' ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा जवळपास आठ गाड्या सुरू झाल्या आहेत. 'अमृत भारत' गाड्यांमध्ये वंदे भारतसारख्याच सुविधा आहेत, पण त्यांचे भाडे खूप कमी आहे, ज्यामुळे त्या जास्तीत जास्त प्रवाशांसाठी किफायतशीर आहेत.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगाने बदल आणि प्रगती होत आहे. एक नवीन भारत उदयाला येत आहे आणि या परिवर्तनासोबतच रेल्वेमध्येही क्रांतिकारक बदल होत आहेत. आधुनिकीकरणामुळे, नागरिकांना आता वेळेवर आणि सुसज्ज रेल्वे सेवा मिळत आहेत. रेल्वे क्षेत्रातील हा बदल विकसित भारत घडवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते पुढे म्हणाले की, सौराष्ट्र ही संतांची, ऋषींची आणि भक्तीची भूमी आहे. अयोध्या ट्रेनमुळे या भागातील लोकांना आता राम लल्लाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले.

***

निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2152000)