संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व प्रकारच्या दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध : राज्यसभेत संरक्षण मंत्र्यांची ग्वाही
“पाकिस्तानव्याप्त काश्मीर पुन्हा भारताचा भाग होईल, आता तो दिवस दूर नाही”
सामूहिक शांतता, विकास आणि समृद्धीसाठी दहशतवादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे राजनाथ सिंह यांनी केले आवाहन
“भारताची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीची जननी अशी; तर पाकिस्तानचा जागतिक दहशतवादाचा जनक असा परिचय”
“पाकिस्तान आणि वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे की, भारताकडे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आणि क्षमता आहे”
Posted On:
29 JUL 2025 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2025
“आज, भारत दहशतवादाच्या मुळाशी जाऊन त्याचे संपूर्ण उच्चाटन करण्यास सक्षम आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज- 29 जुलै 2025 रोजी राज्यसभेत स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व स्वरूपातील दहशतवादाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि दहशतवादाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक नवीन रणनीती स्वीकारली आहे. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या लष्करी क्षमता, राष्ट्रीय दृढनिश्चय, नैतिकता आणि राजकीय सजग बुद्धीचे प्रदर्शन असल्याचे स्पष्ट केले.
संरक्षणमंत्र्यांनी यावर भर दिला की, सरकार केवळ सीमांचे रक्षण करत नाही तर एक अशी व्यवस्था देखील तयार करत आहे जी राष्ट्राला धोरणात्मक, आर्थिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून मजबूत बनवत आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत आता काहीही सहन करत नाही,तर तो योग्य प्रत्युत्तर देतो. कोणत्याही प्रकारच्या आण्विक हल्ल्याची भीती दाखवली गेली किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला तरी भारत आता कुणापुढेही झुकणार नाही,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला की, ऑपरेशन सिंदूर फक्त काही काळासाठी थांबवण्यात आले आहे, ही मोहीम संपलेली नाही आणि जर पाकिस्तानने पुन्हा कोणतीही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर भारत आणखी तीव्र आणि निर्णायक कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे. "पाकिस्तान किंवा इतर जो कोणी वाईट हेतून देशाकडे पाहण्याचा प्रयत्न करेल; त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारतीय सशस्त्र दलांकडे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आणि क्षमता आहे," असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घ्यायला हवा होता अशा काही गटांनी केलेल्या टिप्पण्यांवर, संरक्षण मंत्री म्हणाले की, “तो दिवस दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरचे लोक पुन्हा भारताचा भाग बनतील”.
राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांनी दहशतवादाला एक महामारी म्हणून संबोधले. ‘दहशतवाद नष्ट होणारच आहे, पण तो आपोआप संपेल म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही कारण त्याचे अस्तित्वच सामूहिक शांतता प्रगती आणि समृद्धीला आव्हान देते’ असे संरक्षण मंत्री म्हणाले. कोणतेही धार्मिक, वैचारिक किंवा राजकीय कारण दहशतवादाला योग्य ठरवू शकत नाही कारण रक्तपात आणि हिंसाचारातून काहीही साध्य होऊ शकत नाही, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.
संरक्षण मंत्री यांनी निदर्शनास आणून दिले की भारत आणि पाकिस्तानला एकाच वेळी स्वातंत्र्य मिळाले, परंतु आज भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर "लोकशाहीची जननी" ओळख मिळाली आहे तर पाकिस्तानला "जागतिक दहशतवादाचा जनक" म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे आणि पहलगाम हे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या लांब यादीचे हे केवळ एक उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
"पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला समर्थन देण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत केवळ दहशतवाद्यांचाच नव्हे तर संपूर्ण दहशतवादी पायाभूत सुविधांचा नाश करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणतात की, “ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे," असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी, पाकिस्तानला दहशतवादाचे पाळणाघर संबोधत त्याचे पोषण केले जाऊ नये, असे सांगून आंतरराष्ट्रीय समुदायाला परदेशी निधी थांबवण्याचे आवाहन केले. पाकिस्तानला निधी देणे म्हणजे दहशतवादाच्या पायाभूत सुविधांना निधी देणे होय, असेही त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला दहशतवादविरोधी पॅनेलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की 9/11 च्या हल्ल्यानंतर या पॅनेलची स्थापना करण्यात आली होती आणि हे सर्वश्रुत आहे की त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तान मध्ये लपून बसलेला होता. हा निर्णय म्हणजे "दुधाचे रक्षण करण्यासाठी मांजरीला नेमणे” असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की हाफिज सईद आणि मसूद अझहर यांसारखे घोषित दहशतवादी पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत आहेत. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसतात. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईची ही थट्टाच आहे की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाविरुद्ध नेतृत्वाची अपेक्षा करावी,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्री म्हणले, “पाकिस्तानच्या नेतृत्वाने त्यांच्या नागरिकांना विनाशाच्या वाटेवर ढकलले आहे, जे स्वतः आपल्या देशातून दहशतवादाचा अंत होण्याची अपेक्षा बाळगून आहेत.” त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, “जर पाकिस्तान दहशतवादावर प्रभावी कारवाई करू शकत नसेल, तर त्याने भारताची मदत घ्यावी. भारतीय सशस्त्र दल दहशतवादाविरुद्ध सीमेबाहेर आणि सीमेसमोरही प्रभावी कारवाई करण्यास सक्षम आहे. पाकिस्तानने ही क्षमता ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाहिली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी जागतिक समुदायाने सर्व प्रकारचे धोरणात्मक, राजकीय आणि आर्थिक दडपण आणणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
सुरक्षा दलांनी काल जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफचे (द रेसिस्टन्स फ्रंट) तीन दहशतवादी ठार केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. “या टीआरएफ दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे 26 निष्पाप नागरिकांची अमानुष हत्या केली होती. या हल्ल्यानंतरच्या तपासात आपल्या सुरक्षा यंत्रणांना अनेक महत्त्वाच्या धागेदोरे सापडले, त्याच आधारे प्रत्युत्तर म्हणून दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. या दहशतवाद्यांकडून सापडलेल्या शस्त्रास्त्रांचे फॉरेन्सिक विश्लेषण स्पष्टपणे दाखवते की तीच शस्त्रे पहलगाम हल्ल्यात वापरण्यात आली होती. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणांचे योगदान अपार आहे,” असे त्यांनी सांगितले.
“पहलगाम दहशतवादी हल्ल्याने दाखवून दिले की, सीमेपलीकडून भारताला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 6 आणि 7 मे 2025 रोजी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, जी केवळ एक लष्करी कारवाई म्हणून मर्यादित नव्हती, तर दहशतवादाविरुद्ध भारत सरकारच्या धोरणाचे आणि भारताच्या सार्वभौमत्वाविषयीच्या वचनबद्धतेचे प्रभावी दर्शन होते… आपल्या लष्करी नेतृत्वाने केवळ प्रगल्भताच दाखवली नाही, तर जबाबदार जागतिक शक्ती म्हणून भारताकडून अपेक्षित असलेले धोरणात्मक शहाणपणही दाखवून दिले,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सिंह यांनी संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर भारताचा एक बळकट स्तंभ म्हणून संबोधले आहे. भारतात आता विमानवाहू नौका, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांसारखी संरक्षण उपकरणे स्वदेशी पद्धतीने तयार केली जात आहेत. पूर्वी आपल्याला संरक्षण उपकरणांसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु, आज भारत संरक्षण क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भर होत आहे, असे सिंह म्हणाले. आपल्या सशस्त्र दलांकडे केवळ आयात केलेलीच शस्त्रास्त्र नाहीत, तर क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि इतर प्रणालीही आपल्या देशात तयार करण्यात आलेली आहे. आपली अग्नी, पृथ्वी, ब्रह्मोस यांसारखी क्षेपणास्त्रे शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत त्यांची निर्मिती देखील देशातच झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत संरक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या उल्लेखनीय बदलांचा उल्लेख करताना संरक्षणमंत्री म्हणाले की, वित्तीय वर्ष 2013-14 मध्ये 2,53,346 कोटी रुपये असलेल्या संरक्षण अर्थसंकल्पात तिप्पट वाढ होऊन वर्ष 2024-25 मध्ये जवळपास 6,21,941 कोटी रुपये झाला आहे. 2014 च्या तुलनेत संरक्षण निर्यातीमध्ये सुमारे 35 पट वाढली झाली असून, आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये संरक्षण क्षेत्रातील निर्यात केवळ 686 कोटी रुपये होती, जी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वाढून 23,622 कोटी रुपये झाली आहे, असे सिंह यांनी सांगितले. ‘मेड इन इंडिया’ संरक्षण उत्पादने सुमारे 100 देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. यावर्षी निर्यातीचे उद्दिष्ट 30 हजार कोटी रुपये असून, 2029 पर्यंत हे उद्दिष्ट 50 हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट आपण निश्चितच साध्य करू, असा मला आत्मविश्वास आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांना बळकट करण्याच्या दृष्टीने सरकारने आपत्कालीन खरेदीला परवानगी दिली आहे, अशी माहिती सिंह यांनी यावेळी दिली.
* * *
सोनाली काकडे/ सुवर्णा/ श्रद्धा/ गजेंद्र/ राज/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149934)