पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम येथे आदि थिरुवादिरई महोत्सवाला केले संबोधित
पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या महान सम्राटांपैकी एक असलेल्या राजेंद्र चोल 1 यांना आदरांजली म्हणून एका स्मृती नाण्याचे प्रकाशन
राजराजा चोल आणि राजेंद्र चोल हे भारताची ओळख आणि अभिमानाचे प्रतीक आहेत : पंतप्रधान
चोल साम्राज्याचा इतिहास आणि वारशातून आपल्या महान राष्ट्राचे सामर्थ्य आणि खऱ्या क्षमतेचे दर्शन घडते - पंतप्रधान
चोल युग हे भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगांपैकी एक होते; हा काळ त्यांच्या प्रचंड लष्करी सामर्थ्यासाठी ओळखला जातो - पंतप्रधान
राजेंद्र चोल यांनी गंगैकोंड चोळपुरम मंदिराची स्थापना केली; आजही हे मंदिर जगभरात स्थापत्यकलेतील एक अद्भुत चमत्कार म्हणून आपले स्थान राखून आहे - पंतप्रधान
चोल सम्राटांनी भारताला सांस्कृतिक एकतेच्या धाग्यात गुंफले आणि आज आपले सरकारही चोल युगाचा हाच दृष्टीकोन पुढे नेत आहे; काशी-तामिळ संगमम आणि सौराष्ट्र-तामिळ संगमम सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण शतकानुशतकांचे हे जुने एकतेचे बंध अधिक दृढ करत आहोत - पंतप्रधान
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी आपल्या शैव अधिनमच्या संतांनी धार्मि
Posted On:
27 JUL 2025 4:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम मंदिरात झालेल्या आदि थिरुवादिरई महोत्सवाला संबोधित केले. सर्वशक्तिमान भगवान शिव यांना त्यांनी वंदन केले. इलायराजा यांच्या संगीताच्या आणि ओदुवार यांच्या पवित्र मंत्रोच्चाराच्या साथीने, राजराजा चोल यांच्या पवित्र भूमीत दिव्य शिवदर्शनातून अनुभवायला मिळालेल्या गहन आध्यात्मिक ऊर्जेचे त्यांनी स्मरण केले. या आध्यात्मिक वातावरणामुळे आपले मन भारले गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
आपल्या संबोधनातून त्यांनी पवित्र श्रावण महिन्याचे महत्त्व विषद केले, तसेच बृहदीश्वर शिव मंदिराच्या बांधकामाला 1,000 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी भगवान बृहदीश्वर शिव यांच्या चरणी उपस्थित राहून या पवित्र मंदिरात पूजा करण्याची संधी मिळणे हे आपले अहोभाग्य असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी या ऐतिहासिक बृहदीश्वर शिव मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना केली. भगवान शिव यांचे पवित्र मंत्रोच्चार करत त्यांनी भगवान शिवाचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावा अशी प्रार्थनाही केली.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मानवी कल्याण आणि समृद्धीसाठी आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या मार्गदर्शक आराखड्याशी संबंधित 1,000 वर्षांच्या इतिहासाविषयीचे प्रदर्शन आयोजित केले आहे, जनतेने हे प्रदर्शन आवर्जून पाहावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. चिन्मय मिशनने भगवद्गीतेच्या तयार केलेल्या तमिळ भाषेतील तमीळ गीता अल्बम या आवृत्तीच्या उद्घाटन कार्यक्रमातही ते सहभागी झाले. हा उपक्रम राष्ट्राचा वारसा जपण्याच्या संकल्पाला ऊर्जा देतो, असे ते म्हणाले. या प्रयत्नांसोबत जोडलेल्या सर्व व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले.
पुढे, पंतप्रधानांनी नमूद केले की, चोल शासकांनी श्रीलंका, मालदीव आणि आग्नेय आशिया यांच्याशी आपले राजनैतिक आणि व्यापारी संबंध वाढवले होते. पंतप्रधानांनी सांगितले की कालच मालदीवहून परत आल्याची आणि आज तामिळनाडूमध्ये या कार्यक्रमाचा सहभागी होण्याची ही एक सुंदर योगायोगाची घटना आहे.
भगवान शिवाचे ध्यान करणारे त्यांच्यासारखेच शाश्वत होतात असे सांगणारे एक वचन उद्धृत करून मोदी यांनी म्हटले की शिवावरील अढळ शिवभक्तीमध्ये रुजलेल्या भारतातील चोल वंशाच्या वारश्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. "राजराजा चोल आणि राजेंद्र चोल यांची परंपरा ही भारताच्या ओळखीचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले, चोल साम्राज्याचा इतिहास आणि वारसा भारताची खरी क्षमता दर्शवितो, असे ते म्हणाले. चोल राजांचा वारसा विकसित भारताच्या उभारणीच्या राष्ट्रीय आकांक्षेला प्रेरणा देतो, यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी महान राजा राजेंद्र चोल यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या शाश्वत वारसा अधोरेखित केला. नुकताच आषाढी तिरुवाधिरै (आदि तिरुवतिराय) उत्सव पार पडल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आजचा भव्य कार्यक्रम हा या उत्सवाचा समारोप असल्याचे सांगितले. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.
"इतिहासकार चोल कालखंडाला भारताच्या सुवर्णयुगांपैकी एक मानतात, तो काळ चोल घराण्याच्या लष्करी सामर्थ्याने ओळखला जातो", हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. चोल साम्राज्याने भारताच्या लोकशाही परंपरा पुढे नेल्या, ज्या जागतिक कथांमध्ये अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात, असे ते म्हणाले.जरी लोकशाहीच्या संदर्भात इतिहासकार ब्रिटनच्या मॅग्ना कार्टाचा उल्लेख लोकशाहीच्या संदर्भात करतात, तरी चोल साम्राज्याने शतकानुशतके आधी कुडावोलाई अमैप्पू प्रणालीद्वारे लोकशाही निवडणूक पद्धती लागू केल्या होत्या, असे पंतप्रधान म्हणाले. आज जागतिक चर्चा बहुतेकदा पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाभोवती केंद्रित असते, भारताच्या पूर्वजांना या मुद्द्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी उदाहरण दिले की अनेक राजांना इतर प्रदेशांमधून सोने, चांदी किंवा पशुधन मिळवण्यासाठी स्मरणात ठेवले जाते, मात्र राजेंद्र चोल यांना पवित्र गंगाजल आणण्यासाठी ओळखले जाते. पंतप्रधानांनी आठवण करून दिली की राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतातून गंगेचे पाणी वाहून नेले आणि दक्षिणेत ते स्थापित केले. त्यांनी "गंगा जलमयं जयस्तंभम्" याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की ते पाणी चोल गंगा सरोवरात प्रवाहित करण्यात आले जे आता पोन्नेरी सरोवर म्हणून ओळखले जाते.
राजेंद्र चोल यांनी बांधलेले गंगैकोंडा चोलपुरम मंदिर आजही जागतिक पातळीवर स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते, यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की, माता कावेरीच्या भूमीवर गंगेचा उत्सव साजरा केला जाणे हहा देखील चोल साम्राज्याच्या परंपरेचा एक भाग आहे. या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मृतीप्रित्यर्थ काशीवरून गंगाजल पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये आणण्यात आले असून त्या स्थळी त्याची विधिवत पूजा केल्याचे त्यांनी सांगितले.
काशीचे लोकप्रतिनिधी म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा मातेशी असलेल्या आपल्या खोल भावनिक नात्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, चोल राजवटीशी संबंधित उपक्रम आणि कार्यक्रम हे “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेचे पवित्र रूप आहेत, जे या मोहिमेला नवसंजीवनी देतात.
पंतप्रधान म्हणाले, “चोल सम्राटांनी भारताला सांस्कृतिक ऐक्याच्या सूत्रात गुंफले होते. आज आमचे सरकार त्याच मूल्यांना पुढे नेत आहे.” त्यांनी नमूद केले की काशी-तामिळ संगमम् आणि सौराष्ट्र-तामिळ संगमम् सारखे उपक्रम शतकानुशतके टिकून असलेली सांस्कृतिक एकात्मतेची नाती अधिक दृढ करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, गंगैकोंडा चौलपूरम सारखी प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत संवर्धित केली जात आहेत.नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी शिव अधीनमच्या संतांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले होते, याची आठवण करत पंतप्रधानांनी सांगितले की, तामिळ परंपरेशी संबंधित ‘पवित्र सेन्गोल’ संसदेत विधिपूर्वक स्थापित करण्यात आला, आणि हा गौरवपूर्ण क्षण आजही त्यांच्या स्मरणात आहे.
चिदंबरम येथील नटराज मंदिरातील दीक्षितारांशी झालेल्या भेटीचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील देवालयातील पवित्र प्रसाद त्यांना भेट दिला होता. पंतप्रधान म्हणाले, “नटराजाचे हे स्वरूप भारताच्या तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिक मूल्यांचे प्रतीक आहे.” त्यांनी नमूद केले की, दिल्लीतील भारत मंडपममध्येही अशाच आनंद तांडव रूपातील नटराजाची मूर्ती आहे, जिथे जी-20 परिषदेवेळी जगभरातील नेते एकत्र आले होते.
पंतप्रधान म्हणाले की, भारतीय सांस्कृतिक ओळखीच्या घडणीत शैव परंपरेचे मोलाचे योगदान राहिले आहे. चोल सम्राटांनी या सांस्कृतिक विकासाचे शिल्पकार म्हणून कार्य केले, आणि आजही तामिळनाडू हे समृद्ध शैव परंपरेचे प्रमुख केंद्र आहे. त्यांनी नायनार संत, भक्तिपर साहित्य, तामिळ काव्यपरंपरा, आणि अधीनमांचा अध्यात्मिक प्रभाव यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला आणि सांगितले की, या सर्वांनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात नवा अध्याय सुरू केला.
आज जगभरात अस्थिरता, हिंसा आणि पर्यावरण संकटांसारख्या समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, शैव तत्त्वज्ञान या समस्यांवर अर्थपूर्ण उपाय प्रदान करते. त्यांनी तिरुमूलर यांचा उल्लेख करताना ‘अनबे शिवम्’ (प्रेमच शिव आहे) हे तत्त्वज्ञान सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “जगाने हे विचार आत्मसात केले तर अनेक संकटे आपोआपच सुटू शकतील. भारत ' एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भविष्य' या मंत्राद्वारे हेच तत्त्वज्ञान पुढे नेत आहे.”
"आजचा भारत ‘विकासही आणि परंपराही’ या मंत्राने प्रेरित आहे आणि आधुनिक भारत आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगत आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. गेल्या दशकात देशाने आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी अभियान म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले. प्राचीन मूर्ती आणि कलाकृती ज्या चोरल्या गेल्या होत्या आणि परदेशात विकल्या गेल्या होत्या, त्या पुन्हा भारतात परत आणण्यात आल्या आहेत. 2014 पासून विविध देशांतून 600 हून अधिक प्राचीन वस्तू भारतात परत आल्या असून, त्यापैकी 36 कलावस्तू तमिळनाडूमधील आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. नटराज, लिंगोद्भव, दक्षिणमूर्ती, अर्धनारीश्वर, नंदिकेश्वर, उमा परमेश्वरी, पार्वती आणि संबंदर यांसारख्या मौल्यवान वारसासंपत्तींचा पुन्हा भारतभूमीवर विराजमान होण्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
भारताचा वारसा आणि शैव तत्वज्ञानाचा प्रभाव केवळ भौगोलिक मर्यादांपुरता राहिलेला नसून, तो आता जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भारत जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला, तेव्हा त्या स्थानाचे नामकरण ‘शिव-शक्ती’ असे करण्यात आले आणि आज ते जागतिक स्तरावर ओळखले जाते, असेही त्यांनी सांगितले.
"चोल साम्राज्याच्या काळातील आर्थिक आणि सामरिक प्रगती ही आधुनिक भारतासाठी प्रेरणास्थान आहे. राजराजा चोल यांनी बलाढ्य नौदलाची स्थापना केली आणि राजेंद्र चोल यांनी ते आणखी मजबूत केले," असे पंतप्रधानांनी सांगितले. चोल काळात स्थानिक स्वराज्य व्यवस्था सशक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रशासनिक सुधारणा आणि सक्षम महसूल प्रणाली राबवण्यात आली होती. व्यापारी प्रगती, समुद्रमार्गांचा उपयोग आणि कला-संस्कृतीच्या प्रसारामुळे भारत सर्व दिशांनी पुढे जात होता. हे चोल साम्राज्य नव्या भारताच्या उभारणीसाठी एक प्राचीन मार्गदर्शक ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. एक विकसित राष्ट्र होण्यासाठी, भारताने एकतेला प्राधान्य द्यावे, नौदल व संरक्षण क्षेत्र मजबूत करावे, नव्या संधी शोधाव्यात आणि आपल्या मूल्यांचे रक्षण करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले. या दिशेने देश आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे, हे पाहून समाधान वाटते, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आजचा भारत राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो, हे सांगताना पंतप्रधानांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कसे ठाम उत्तर दिले जाते, हे जगाने पाहिले आहे, असे ते म्हणाले. या कारवाईमुळे दहशतवाद्यांसाठी आणि शत्रूसाठी कोठेही सुरक्षित जागा राहिलेली नाही, हा संदेश जगाला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीय जनतेमध्ये नव्या आत्मविश्वासाचा उदय झाला आहे आणि संपूर्ण जग हे पाहत आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.पुढे बोलताना त्यांनी राजेंद्र चोल यांनी गंगैकोंड चोलपूरमची निर्मिती केली तेव्हा त्यांच्या वडिलांच्या तंजावूर येथील बृहदेश्वर मंदिराच्या गोपुरापेक्षा स्वतःच्या मंदिराचा गोपूर उंचीने कमी ठेवला, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. अपार यश मिळवूनही त्यांनी नम्रता जपली. "आजचा नवा भारतही हीच भावना जपत आहे—बळकट होत असतानाही, वैश्विक कल्याण आणि एकतेच्या मूल्यांशी बांधिल राहणारा," असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान वृद्धिंगत करण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा दृढ करत तमिळनाडूमध्ये महान राजराजा चोल आणि त्यांचे पुत्र, प्रख्यात शासक राजेंद्र चोल प्रथम यांचे भव्य पुतळे उभारले जातील, अशी घोषणा केली. हे पुतळे भारताच्या ऐतिहासिक जाणिवेचे आधुनिक स्तंभ ठरतील, असेही मोदी यांनी म्हटंले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या पार्श्नभुमीवर पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी डॉ. कलाम आणि चोल राजांसारख्या लाखो युवकांची देशाला गरज आहे. अशा युवकांच्या सामर्थ्य आणि निष्ठेमुळे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ, असे सांगत त्यांनी या प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आध्यात्मिक साधू संत, तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्नभुमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गंगैकोंड चोळपुरम् मंदिरात पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात, भारताच्या इतिहासातील महान सम्राटांपैकी एक असलेल्या राजेंद्र चोल (प्रथम) यांच्या सन्मानार्थ एक स्मरणिका नाणे प्रसिद्ध केले. या सोहळ्याद्वारे आदि तिरुवतिराय उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ही विशेष उत्सवपरंपरा राजेंद्र चोल (प्रथम) यांच्या आग्नेय आशिया सागरी अभियानाच्या 1 हजार व्या वर्षपूर्तीनिमित्त, तसेच त्यांनी उभारलेले ऐतिहासिक गंगैकोंड चोळपुरम् मंदिर या अद्वितीय स्थापत्यकलेच्या प्रकल्पाच्या आरंभाच्या स्मरणार्थही साजरी करण्यात आली.
राजेंद्र चोल प्रथम (1014–1044) हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत सामर्थ्यशाली व दूरदृष्टी असलेले सम्राट होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चोल साम्राज्याने दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव विस्तारला. त्यांच्या विजयानंतर त्यांनी गंगैकोंड चोळपुरम् या शहराला आपली राजधानी म्हणून स्थापन केले. येथील मंदिर 250 वर्षांहून अधिक काळ शैव श्रद्धा, भव्य स्थापत्य व उत्कृष्ट प्रशासनाचे प्रतीक राहिले. हे मंदिर सध्या युनोस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते, त्यातील सुंदर कोरीव काम, चोल काळातील कांस्यशिल्पे आणि प्राचीन शिलालेखांमुळे प्रसिद्ध आहे.
आदि तिरुवतिराय हा सण तमिळ शैव भक्ती परंपरेचे प्रतीक मानला जातो, ज्याला चोल राजांनी भरभरून पाठबळ दिले होता. या परंपरेला 63 नयनमार्स – तमिळ शैव संतकवींनी अजरामर केले. विशेष म्हणजे राजेंद्र चोल यांचे जन्म नक्षत्र तिरुवतिराय (आर्द्रा) असून, यंदा 23 जुलैपासून याची सुरुवात झाल्यामुळे यावर्षीचा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/नितीन गायकवाड/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2149120)