पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत – ब्रिटन व्हिजन 2035

Posted On: 24 JUL 2025 7:12PM by PIB Mumbai

 

भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 24 जुलै 2025 रोजी लंडन इथे झालेल्या बैठकीदरम्यान नव्या भारत-ब्रिटन व्हिजन 2035ला मान्यता दिली. नवी उर्जा लाभलेल्या भागीदारीच्या संपूर्ण संधी प्राप्त करण्याच्या सामायिक कटिबद्धतेची यातून पुष्टी होते. झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक स्थितीच्या काळात परस्पर विकास, समृद्धी त्याचबरोबर समृद्ध, सुरक्षित आणि शाश्वत जगताला आकार देण्यासाठी एकत्र काम करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार या महत्वाकांक्षी आणि भविष्यवेधी करारातून प्रतीत होतो.

विस्तारित महत्वाकांक्षा: भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध समावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरापर्यंत उंचावल्यापासून सर्व क्षेत्रात उभय देशातली भागीदारी आणि विकासाला वेग मिळाला आहे. नवा दृष्टीकोन ही भागीदारी पुढे नेत द्विपक्षीय सहकार्य अधिक सखोल आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करतो.

धोरणात्मक दृष्टीकोन: 2035 पर्यंत दोन्ही देशातली महत्वाची भागीदारी भारत-ब्रिटन संबंध नव्याने पुनर्भाषित करणार असून दोन्ही देशांसाठी परिवर्तनात्मक संधी आणि मूर्त लाभ प्रदान करेल.

व्यापक फलनिष्पत्ती: परस्परांना बळकट करण्याच्या दृष्टीने भारत- ब्रिटन व्हिजन 2035 चे स्तंभ साकारण्यात आले आहेत यातून एक अशी संयुक्त भागीदारी निर्माण होईल जी, व्यापक परिणामांच्या विस्तृत आणि सखोल श्रुंखलेमध्ये आपल्या वाट्यापेक्षा अधिक मोठी असेल यामध्ये याचा समावेश असेल.

..ब्रिटन आणि भारतात विकास आणि रोजगार महत्वाकांक्षी व्यापार करारावर आधारित असून दोन्ही देशांसाठी बाजारपेठा आणि संधी यामुळे खुल्या होणार आहेत.

.. पुढच्या पिढीतील जागतिक प्रतिभेची जोपासना करण्याच्या दृष्टीने, परस्परांच्या देशात आघाडीच्या विद्यापीठांची विद्यासंकुले सुरु करण्यासह ब्रिटन आणि भारतीय विद्यापीठांमधील, आंतरराष्ट्रीय शिक्षण सहयोग अधिक दृढ करण्यासाठी, शिक्षण आणि कौशल्य भागीदारी.

.. तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमावर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन विकसित करणे, जे भविष्यातील  दूरसंवाद, कृत्रिम प्रज्ञा आणि महत्वाची खनिजे यांच्यावर केंद्रित असेल आणि सेमी कंडक्टर, क्वांटम, जैव तंत्रज्ञान  आणि प्रगत सामग्री यांसाठी भविष्यातल्या सहयोगाकरिता आधार तयार करेल. 

..स्वच्छ उर्जेला गती देण्यावर,व्यापक प्रमाणात हवामान बदलासाठी निधी जमा करण्यावर आणि लवचिकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणारी परिवर्तनात्मक हवामान भागीदारी.

..हिंद प्रशांत क्षेत्र आणि त्या पलीकडे शांतता, सुरक्षा आणि समृद्धी यासाठीच्या सामायिक कटिबद्धतेसह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य.

भारत ब्रिटन दृष्टिकोन 2035, शाश्वत उच्च स्तरीय राजकीय संवादावर आधारित असेल. धोरणात्मक दृष्टिकोन आणि देखरेख पुरविण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या नियमित बैठका घेण्याच्या वचनबद्धतेचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. भारत - ब्रिटन दृष्टिकोन 2035 च्या अंमलबजावणीचा भारत आणि ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री  वार्षिक आढावा घेतील. तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्र सहकार्य यासह विविध क्षेत्रातल्या मुद्द्यांची मंत्री स्तरीय यंत्रणा दखल घेईल. भागीदारी गतिमान, उत्तरदायी आणि सामायिक धोरणात्मक हित जपणारी राहील, याची सुनिश्चीती यातून होईल.

भारत-ब्रिटन यांनी नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि अर्थवाही सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवाद बळकट करण्याच्या सामायिक वचन बद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही देश, सुरक्षा परिषद,जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँक यासारख्या बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणांना  प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करतील. जेणेकरून या संस्थांमध्ये समकालीन जागतिक वास्तव प्रतिबिंबित होईल आणि नव्याने सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या सज्ज राहतील.

जनतेचा परस्परांशी संबंध हा ब्रिटन - भारत संबंधांच्या प्रत्येक पैलूचा आधार आहे. आपले नागरिक आणि अनिवासी समुदायांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी दोन्ही देश शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजनैतिक बाबींमध्ये सहकार्य वाढवतील.

भारत आणि ब्रिटन, दृष्टीकोन 2035 च्या विविध स्तंभाअंतर्गत  आपले द्विपक्षीय सहकार्य अधिक सखोल आणि विविधांगी करण्यासाठी कटिबद्ध आहेत त्याचबरोबर व्यवसाय, संशोधन, नवोन्मेश, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान यावर आधारित भविष्यवेधी भागीदारीसाठी दोन्ही देश सज्ज होत आहेत.

वृद्धी

भारत-ब्रिटन द्विपक्षीय व्यापारात गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. भारत-ब्रिटन समावेशक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) आणि दुहेरी योगदान कराराकरिता वाटाघाटी करण्यासाठीचा करार हा आपल्या द्विपक्षीय संबंधांमधला महत्वाचा टप्पा आहे. हा व्यापार करार  दोन्ही देशातल्या आर्थिक विकासाला चालना देईल आणि रोजगार आणि समृद्धीसाठी सहाय्य करेल. द्विपक्षीय गुंतवणूक कराराला (बीआयटी) लवकरच अंतिम  स्वरूप देण्याच्या दृष्टीने उभय पक्षांनी कटिबद्धता  दर्शवली. मान्यता देण्यात आलेला मुक्त व्यापार करार, आपल्या संयुक्त महत्वाकांक्षी भागीदारीच्या विकासाची केवळ सुरवात आहे. दोन्ही देशांसाठी शाश्वत दीर्घकालीन विकास आणि रोजगार निर्मिती यांना चालना देणारे उपक्रम पुढे नेण्यासाठी  ब्रिटन आणि भारताने संमती दिली आहे. नवोन्मेश, संशोधन आणि नविकरणीय उर्जा, आरोग्य आणि जीव विज्ञान, महत्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, व्यावसायिक आणि व्यापार सेवा, वित्तीय सेवा, सर्जनशील उद्योग आणि संरक्षण यासारख्या  प्राधान्याच्या विकास क्षेत्रात नियामक सहयोगाला दोन्ही पक्ष पाठींबा देतील. उभय पक्ष यासाठी एकत्रित काम करतील:

1. भारत - ब्रिटन समावेशक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) अनुसरत दोन्ही दिशेने अधिक महत्वाकांक्षी ओघ ठेवण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हींमध्ये द्विपक्षीय व्यापार वृद्धी जारी राखणे.

2. नवी झळाळी लाभलेल्या संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती (जेईटीसीओ) द्वारे व्यापार आणि गुंतवणूक यासंदर्भातले ब्रिटन आणि भारत संबंध पुढे नेणे यातून भारत ब्रिटन समावेशक आर्थिक व्यापार कराराची (सीईटीए) अंमलबजावणी सुनिश्चित होईल. आर्थिक आणि वित्तीय संवाद (ईएफडी) आणि बळकट वित्तीय बाजारपेठ संवाद (एफएफडी) हे व्यापक आर्थिक धोरण, वित्तीय नियमन आणि गुंतवणूक वृद्धींगत करण्याकरिता महत्वाचे मंच म्हणून काम जारी ठेवतील. हे उपक्रम भारत आणि ब्रिटन दरम्यान अधिक लवचिक, समावेशक आणि विकासाभिमुख आर्थिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतील. 

3. व्यवसाय धुरिणांना नियमितपणे भेटण्यासाठी व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून देत ब्रिटीश आणि भारतीय उद्योग समुदायामध्ये भक्कम भागीदारी उभारणे.

4. भारत आणि ब्रिटन दरम्यान भांडवली बाजार कनेक्टीव्हिटी आणि विमा, निवृत्तीवेतन आणि मालमत्ता व्यवस्थापन या क्षेत्रात सहयोग वाढविणे.

5. भारत- ब्रिटन वित्तीय भागीदारी (आययुकेएफपी) मध्ये वित्तीय सेवांमध्ये नवोन्मेश आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), हरित वित्त पुरवठा, मालमत्ता व्यवस्थापन आणि गुंतवणूक  यासारख्या नव्या क्षेत्रांचा सहकार्यासाठी समावेश करत काम जारी राखणे. निवडक क्षेत्रात द्विपक्षीय व्यवसाय ओघ वाढविण्यासाठी आणि भारतात पायाभूत सुविधा  क्षेत्रात गुंतवणूक संधी खुल्या करण्याच्या दृष्टीने ब्रिटन-भारत पायाभूत सुविधा वित्तीय पूल (युकेआयआयएफबी) उभारणे.

6. उभय देशांनी निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळी लवचिकतेबाबत नियमित संवाद यंत्रणेद्वारे मुख्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुरक्षित आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणे.

7. स्थापन करण्यात आलेल्या यूके-भारत कायदेशीर व्यवसाय समितीच्या माध्यमातून दृढ द्विपक्षीय सहकार्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून भारत आणि यूकेमधील कायदेशीर व्यवसायांमधील संबंध अधिक मजबूत करणे.

8. यूके आणि भारत यांच्यातील संपर्क सुधारणे, दोन्ही देशांमधील हवाई प्रवास आणि मार्गांचा विस्तार करणे, यूके-भारत हवाई सेवा कराराचे नूतनीकरण करण्यासाठी काम करणे आणि वाहतूक पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य वाढवणे.

9. आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर वित्तपुरवठा तसेच आणि आंतरराष्ट्रीय कर सहकार्य आणि कर पारदर्शकता मानकांची रचना करण्यासाठी बहुपक्षीय मंच आणि सर्वोत्तम कार्य पद्धतींमध्ये काम करण्याच्या परिस्थितीचा वापर करून एका लवचिक जागतिक आर्थिक आणि वित्तीय प्रणालीचे संरक्षण करणे आणि या प्रणालीची व्याप्ती वाढवणे. जागतिक व्यापार संघटनेला केंद्रस्थानी ठेवतनियम-आधारित, भेदभावरहित, निष्पक्ष, खुल्या, समावेशक, न्याय्य आणि पारदर्शक बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठी आपल्या वचनबद्धतेची ग्वाही उभय देश देतात. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आणि संघटनेच्या करारांचा अविभाज्य भाग म्हणून विकसनशील सदस्य आणि अल्पविकसित देशांना विशेष आणि वेगळी वागणूक देण्याच्या, जागतिक आरोग्य संघटनेच्या तरतुदींची उभय देशांनी पुन्हा एकदा खातरजमा केली.

10. हरित विकासासारख्या परस्पर हिताच्या बाजारपेठा आणि क्षेत्रे निर्माण करण्यासाठी आणि यूके-इंडिया इन्व्हेस्टमेंट कॉरिडॉरला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने यूके डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII) आणि यूके-इंडिया ग्रोथ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यांच्या भागिदारीच्या माध्यमातून, गुंतवणुकीद्वारे समावेशक विकासाला प्रोत्साहन देणे. दोन्ही सरकारे द्विपक्षीय गुंतवणूक भागीदारीची क्षमता जाणून आहेत, आणि हरित उद्योग, हवामानातील बदलांचे दुष्परिणाम कमी करणे, तंत्रज्ञान स्टार्ट-अप आणि हवामान अनुकूलन अशा क्षेत्रांमध्ये नवीन गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने काम करतील.

11. यूके आणि भारत हे दोन्ही देश त्रिपक्षीय विकास सहकार्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत, ज्यात शाश्वत, हवामान स्मार्ट इनोव्हेशन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच डिजिटल गव्हर्नन्स अशा यशोगाथांचा समावेश आहे.

12. सहयोगी संशोधन, उच्च-स्तरीय द्विपक्षीय सहभाग, क्षमता निर्माण, आघाडीच्या संस्थांमधील सहकार्य आणि भारत-यूके 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी वीक' मालिकेसारख्या समावेशक व्यासपीठांच्या माध्यमातून सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगांच्या परस्पर वाढीला प्रोत्साहन देणे. नवोपक्रम, उद्योजकता तसेच सांस्कृतिक वस्तू आणि सेवांच्या क्षेत्रात वाढीव गुंतवणूकीद्वारे आर्थिक वाढ आणि संधींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक सहकार्य कराराचा कार्यक्रम राबवणे.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

ही धोरणात्मक भागीदारी नवोन्मेष-प्रणित विकासाला चालना देईल आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला आकार देण्याच्या कामी दोन्ही देशांची भूमिका मजबूत करेल. सुरक्षित, शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडविण्यासाठी यूके आणि भारत हे दोन्ही देश तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षमतेचा वापर करतील. यूके-भारत हे उभय देश तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम, विज्ञान आणि नवोन्मेष परिषद आणि आरोग्य आणि जीवन विज्ञान भागीदारीवर काम करतील. दोन्ही देश महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य वाढवतील, परिणामी राष्ट्रीय लवचिकता वाढेल, तसेच व्यापार आणि गुंतवणूक वाढेल. या प्रयत्नांमुळे उच्च मूल्ये आणि दर्जेदार नोकऱ्या निर्माण होतील. हे सहकार्य पुढे नेण्यासाठी उभय देश...

1. यूके-इंडिया रिसर्च अँड इनोव्हेशन कॉरिडॉरचा वापर करून संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देतील. दोन्ही देशांमधील परिसंस्था एकत्रित करून, आणि दोन्ही देशांमधील नागरिकांबरोबरच कॅटपल्ट्स, इनोव्हेशन हब, स्टार्ट-अप्स, इनक्यूबेटर, रिसर्च अँड इनोव्हेशन सुपरग्रुप आणि अॅक्सिलरेटर प्रोग्राम्स अशा कार्यक्रमांमध्ये भागीदारी निर्माण करून संशोधन आणि नवोपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न करतील.

2. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जागतिक क्रांतीचे फायदे एकत्रितपणे समजून घेणे, आणि एआयसाठीच्या यूके-भारत संयुक्त केंद्राच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देतील. यामुळे वास्तविक जगातील विश्वासार्ह एआय नवकल्पना आणि त्यांच्या व्यापक स्वीकाराला प्रोत्साहन मिळेल. प्रभावी एआय उपाययोजना तयार करण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी, यूके आणि भारतातील व्यवसायांतर्फे वापरल्या जाणाऱ्या ओपन सोर्स उपाययोजना तयार करण्यासाठी सहयोग करतील.

3. संयुक्त संशोधन, विकास आणि नवोपक्रमांचा वापर करून अत्याधुनिक आणि सुरक्षितपणे रचना केलेल्या दूरसंचार यंत्रणेचे विकसन करतील, प्रगत जोडणी आणि सायबर लवचिकतेबाबत धोरणात्मक सहकार्य वाढवतील. दोन्ही देशांमध्ये डिजिटल समावेशन वाढविण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी भारत-यूके कनेक्टिव्हिटी इनोव्हेशन सेंटरची स्थापना करतील. 6G साठी आयटीयू आणि 3GPP सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र काम करतील.

4. चौथ्या औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी लवचिक आणि शाश्वत अशा महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा श्रुंखलांची खातरजमा करतील. वित्तपुरवठा संबंधी मानके आणि नवोपक्रमात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या खनिजांसाठी यूके-भारत संयुक्त उद्योग गिल्डची स्थापना करतील. पुरवठा श्रुंखलांसाठीच्या प्रक्रिया, संशोधन आणि विकास, पुनर्वापर, जोखीम व्यवस्थापन आणि बाजार विकासाला प्राधान्य देण्यासाठी तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ट्रेसेबिलिटी वाढवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील.

5. जैवउत्पादन, जैव-आधारित साहित्य आणि प्रगत जैवविज्ञान क्षमतेचा वापर करण्यासाठी, आणि आरोग्य, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत शेतीच्या क्षेत्रात नवोपक्रमांना चालना देण्यासाठी यूके-भारत जैवतंत्रज्ञान भागीदारीचा वापर केला जाईल. बायोफाउंड्रीज, बायोमॅन्युफॅक्चरिंग, बायोप्रिंटिंग, फेमटेक तसेच सेल आणि जीन थेरपीसह अत्याधुनिक नवोपक्रमांचा वापर करत जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देतील आणि आरोग्य प्रणाली मजबूत करतील.

6. सेमीकंडक्टर, क्वांटम, प्रगत साहित्य आणि सायबर सुरक्षेमध्ये TSI च्या माध्यमातून नवोपक्रम-प्रणित विकासाला प्रोत्साहन देतील.

7. अवकाश संशोधन आणि नवोपक्रम तसेच व्यावसायिक संधींच्या बाबतीत सहकार्याचा शोध घेण्यासाठी आपल्या संबंधित अंतराळ समुदायांना एकत्र आणतील.

8. भविष्यातील साथरोगांना रोखण्यासाठी आणि लवचिक वैद्यकीय पुरवठा साखळ्यांचे रक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य सुरक्षा अबाधित राखण्यासाठी यूके-भारत नेतृत्वाची भूमिका बजावतील. आरोग्य आणि जीवन विज्ञान संयुक्त कार्यगट अशा साथरोगांशी दोन हात करण्यासाठीची सुसज्जता, डिजिटल आरोग्य, प्रतिजैविक प्रतिकार यावर भर देत संयुक्तपणे कृती करेल, आणि नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य वाढवेल. दोन्ही देश मजबूत आणि गतिमान पुरवठा साखळ्या तयार करण्यासाठी एकत्र काम करतील, तसेच लसी, औषधे आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जलद विकास, उत्पादन आणि पोहोच सक्षम करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी आणि जागतिक लवचिकता मजबूत करण्यासाठी नियामक चौकटींमध्ये राहून अधिक सहकार्यासाठी काम करतील.

9. सामायिक समृद्धी, पुरवठा साखळीतील लवचिकता आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी यूके आणि भारत यांच्यातील धोरणात्मक व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवले जाईल. परवाना आणि निर्यात नियंत्रण समस्यांचे निराकरण करण्यासाठी, संरक्षण, सुरक्षा आणि अवकाश क्षेत्रांसह महत्त्वाच्या, उदयोन्मुख आणि इतर उच्च-स्तरीय तंत्रज्ञानांमध्ये उच्च-मूल्याचा व्यापार खुला करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी नियमित धोरणात्मक निर्यात आणि तंत्रज्ञान सहकार्य संवाद आयोजित केले जातील.

संरक्षण आणि सुरक्षा

भारत-ब्रिटन यांच्यातील संरक्षण भागीदारी मजबूत केल्याने आंतरराष्ट्रीय वातावरण अधिक सुरक्षित होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा बळकट होईल. भारतीय आणि ब्रिटनच्या संरक्षण उद्योगांच्या परस्पर - पूरक सक्षमतेमुळे सहकार्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध होतील. दोन्ही देशांनी परस्परांच्या सशस्त्र दलांसोबत संबंध वाढवण्यास आणि संरक्षण क्षमता सहकार्याला पुढीलप्रमाणे प्रोत्साहन देण्यास सहमती दर्शविली आहे:

1. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर संयुक्त यंत्रणेद्वारे धोरणात्मक आणि संरक्षण उद्योग सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून दहा वर्षांचा संरक्षण औद्योगिक आराखडा स्वीकारता येईल, आणि त्याची अंमलबजावणी आणि प्रगतीचे निरीक्षण करता येईल.

2. इलेक्ट्रिक प्रोपल्शन कॅपॅबिलिटी पार्टनरशिप (EPCP) आणि जेट इंजिन अॅडव्हान्स्ड कोअर टेक्नॉलॉजीज (JEACT) सारख्या सहकार्य कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या क्षेत्रात सहकार्य, नवोपक्रम आणि सह-विकसनाचे प्रमाण वाढवले जाईल.

3. विद्यमान परराष्ट्र आणि संरक्षण 2+2 वरिष्ठ अधिकारी पातळीवरील संवादात सुधारणा करून, धोरणात्मक आणि परिचालनात्मक संरक्षण बाबींवर समन्वयात सुधारणा केली जाईल.

4. अपारंपारिक सागरी सुरक्षा धोके लक्षात घेत हिंदी महासागरातील क्षमता आणि लवचिकता वाढविण्यासाठी प्रादेशिक सागरी सुरक्षा केंद्र (RMSCE) स्थापन करून इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमांतर्गत (IPOI) सहकार्य केले जाईल.

5. तिन्ही दलांमध्ये संयुक्त लष्करी सराव सुरू ठेवून आणि प्रशिक्षणाच्या संधी वाढवून परस्पर कार्यक्षमता आणि सुसज्जता वाठवली जाईल. परस्परांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये लष्करी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल. हिंद महासागर क्षेत्रात ब्रिटिश सशस्त्र दलांच्या उपस्थितीला लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करण्यासाठी भारताला एक प्रादेशिक केंद्र म्हणून पुनर्स्थापित केले जाईल.

6. पाण्याखाली कार्यरत राहू शकेल अशी प्रणाली आणि अत्याधुनिक  शस्त्रांसह नवीन क्षमता विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकास मजबूत करणे आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध विकसित करणे.

7. सर्व प्रकारच्या आणि प्रत्यक्ष केल्या जाणा-या दहशतवादी कृत्यांचा निषेध करणे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदीप्रमाणे तसेच  आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार व्यापक आणि शाश्वत पद्धतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे. कट्टरतावाद आणि हिंसक अतिरेकीपणाचा मुकाबला करणे; दहशतवादाला अर्थ पुरवठा आणि दहशतवाद्यांच्या सीमापार हालचालींचा सामना करणे; दहशतवादी कृत्यांच्या अंमलबजावणीच्या हेतूंसाठी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर रोखणे; दहशतवादी कृत्यासाठी केली जाणारी भर्ती यांचा सामना करणे; यासंबंधीची माहिती सामायिक करणे, न्यायालयीन सहकार्य, क्षमता बांधणीसह या क्षेत्रात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य मजबूत करणे. जागतिक स्तरावर प्रतिबंधित दहशतवादी, दहशतवादी संस्था आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध निर्णायक आणि एकत्रित कारवाई करण्यासाठी सहकार्य मजबूत करणे.

8. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीपासून नागरिकांचे संरक्षण करणे; सायबर-गुन्हेगारी आणि बेकायदा आर्थिक व्यवहार यातून  निर्माण होणारे गुन्हेगारीचे धोके लक्षात घेवून ते होवू नयेत यासाठी गुन्हेगारांना रोखणे. या कार्यासाठी सर्वोत्तम कार्यपध्‍दती सामायिक करणे आणि कायदे-नियमांचे राज्य कायम ठेवणे.

9. सायबर सुरक्षेविषयक धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांचे आणि प्रमुख सेवांचे संरक्षण करण्यासाठी आपआपसांमध्‍ये सखोल माहिती देणे आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करून सायबर लवचिकता निर्माण करणे. सायबर सुरक्षा कंपन्यांसाठी समर्थन आणि संधींद्वारे वाढीला चालना देणे.  सायबर आणि डिजिटल प्रशासनाबाबत  सहकार्य करणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या सुरक्षित विकासासाठी टीएसआय  अंतर्गत भागीदारी करणे.

10. स्थलांतर आणि गतिशीलता यामधील भागीदारीची पूर्णपणे अंमलबजावणी करून, सुरक्षिततेविषयी पुष्‍टी केली. तसेच  अनियमित- नियमबाह्य स्थलांतर रोखण्यासाठी आपआपसांमध्‍ये सहकार्य  करण्‍याबाबत  पुष्टी केली. भारत आणि यूके एकत्रितपणे गुन्हेगारी संघटनांकडून होणारे शोषण रोखण्याचे काम करेल तसेच  यूके-भारत यांच्यामधील संपर्क सेतू सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे, जे आपल्या लोकांमधील शाश्वत संबंध प्रतिबिंबित करते.

हवामान आणि स्वच्छ ऊर्जा

हवामान कृतीसंबंधी भागीदारी शाश्वत, लवचिक विकास आणि पृथ्‍वी ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेचे उदाहरण देते. हवामान बदल कृतीवरील सहकार्य भारत आणि ब्रिटनच्या संबंधित महत्त्वाकांक्षी निव्वळ शून्यउद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल, जागतिक हवामान कार्यक्रम पत्रिकेवर नेतृत्व प्रदान करेल. हे ध्‍येय गाठण्‍यासाठी उभय देश  हरित वस्तू आणि सेवांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे  समर्थन करतील आणि हरित उत्पादन वाढवतील. स्वच्छ ऊर्जा आणि हवामानावरील भागीदारी:

1. भारतात हवामान कृतीसाठी वेळेवर, पुरेसा आणि परवडणारा  निधि  जमा केला जाईल. विकसनशील देशांद्वारे हवामान कृतीसाठी परवडणाऱ्या वित्तपुरवठ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आम्ही जागतिक वित्तीय प्रणालींमध्ये चांगल्या, मोठ्या आणि अधिक प्रभावी एमडीबीसाठी सुधारणा घडवून आणण्यासाठी सहयोग करणार.

2. ऊर्जा साठवणूक आणि ग्रिड’  परिवर्तनावर सहकार्यासह महत्वाकांक्षी ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टे गाठण्‍यात येईल. यूकेच्या गॅस अँड इलेक्ट्रिसिटी मार्केट्स ऑफिस (ओएफजीईएम) आणि भारताचा मध्‍यवर्ती विद्युत नियामक  आयोग (सीईआरसी) यांच्यामध्‍ये  कृतिदलासाठी  काम करणे; भारत-यूके ऑफशोअर विंड टास्कफोर्सची स्थापना; उद्योगासाठी कमी कार्बन उत्सर्जनाचे मार्ग अधिक अवलंबण्‍यासाठी सीसीटीसी म्हणजेच कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीमचा अर्थात कार्बन पत व्यापार योजनेचा विकास करणेभारत-यूके अणु सहकार्य करारांतर्गत लहान मॉड्यूलर’  अणुभट्ट्यांसारख्या अत्याधुनिक अणु तंत्रज्ञानाच्या सहभागासह अणु सुरक्षा आणि कचरा निर्मूलन यावरील नागरी अणु सहकार्याला चालना देणे. संपूर्ण भारत-यूके अणु सहकार्य खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संधींचा फायदा घेईल आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्यास समर्थन देईल.

3. स्वच्छ वाहतूक, ऊर्जा आणि जीवन विज्ञानांमध्ये सहकार्य वाढवून, एआय, अक्षय ऊर्जा, हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक, बॅटरी आणि कार्बन संबंधी  संयुक्त कार्य पुढे नेऊन, हरित वाढ आणि शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी प्रमाणित  नवकल्पनांना गती देणे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि वाढीसाठी नवीन बाजारपेठा तयार करण्यासाठी सखोल तंत्रज्ञानाचा उपाय विकसित करण्यासाठी फ्लॅगशिप नेट झिरो इनोव्हेशन पार्टनरशिपद्वारे उद्योजकांना संयुक्तपणे पाठिंबा देणे.

4. अनुकुलता वाढविण्‍यासाठी नियोजन मजबूत करून, वित्तपुरवठा करून, तंत्रज्ञानाला चालना देऊन आणि आपत्ती रोधकाची तयारी वाढवून हवामान बदलाचे दुष्‍परिणाम कमी करण्यासाठी आणि  त्यामधील वाढीमध्‍ये लवचिकता आणण्‍यासाठी  सर्वोत्तम पद्धतींमध्ये सहयोग आणि देवाणघेवाण करणे. हवामान विषयक आपत्तीबाबत शक्य तितक्या लवकर चेतावणी मिळावी यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे. यासाठी  सागरी परिसंस्था आणि निळ्या कार्बनवर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून हवामान लवचिकता आणि जैवविविधतेवर जागतिक वैज्ञानिक कृतीचे नेतृत्व करतील.

5. भारत-यूके वन भागीदारी अंतर्गत कृषी वनीकरण आणि वन उत्पादनांच्या शोधक्षमतेवरील सहकार्यासहनिसर्गाच्या  पुनर्संचयनासाठी  आणि शाश्वत जमिनीच्या वापरासाठी सहकार्य करणे.

6. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती, एक सूर्य एक जागतिक एक ग्रिड (ओएसओडब्ल्यूओजी), रस्ते वाहतूक, शून्य कार्बन उत्सर्जन वाहन संक्रमण परिषद (झेडईव्हीटीसी) यावरील सखोल सहकार्याद्वारे हवामान आणि ऊर्जा संक्रमणावर सहकार्य मजबूत करणे. ग्लोबल क्लीन पॉवर अलायन्स’ (जीसीपीए) अर्थात वैश्विक स्वच्छ उूर्जा आघाडीद्वारे संयुक्त काम करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे.

शिक्षण क्षेत्र

यूके आणि भारताची  शिक्षण प्रणाली तसेच आपल्या लोकांमधील आणि संस्कृतींमधील समृद्ध देवाणघेवाण आमच्या सहकार्याच्या इतर सर्व क्षेत्रांना आधार देते. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत आणि मे 2025 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सांस्कृतिक सहकार्य कार्यक्रमाद्वारे परस्परांमध्‍ये  शिक्षण क्षेत्रामध्‍ये  वाढ आणि प्रभाव प्रदान करण्यात यूके हा भारताच्या पसंतीच्या भागीदारांपैकी एक आहे. लोकांमध्‍ये थेट संबंध हे भारत-यूके भागीदारीचा सुवर्ण धागा आहे. भारत आणि यूकेमध्ये मजबूत पायावर बांधलेली बौद्धिक भागीदारी उदयोन्मुख संधींना प्रतिसाद देणारी असेलतंत्रज्ञानाची होणारी वेगवान  प्रगतीबरोबर ही भागीदारी  जुळवून घेईल आणि शिक्षण आणि संशोधनात सहकार्य आणखी मजबूत करेल. यामुळे एक कुशल आणि दूरदर्शी प्रतिभा समूह तयार होईल, जो जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्यासाठी तयार असेल. दोन्ही बाजूंकडून केले जाणारे कार्य -

1. वार्षिक मंत्रिस्तरीय भारत-यूके शिक्षण संवादाद्वारे आमच्या शैक्षणिक दुव्यांसाठी धोरणात्मक दिशा निश्चित करेल. यामुळे  सहकार्याच्या नवीन क्षेत्रांना चालना दिली जाईल  आणि आमच्या शैक्षणिक भागीदारी अधिक दृढ करेल. दोन्ही बाजू परस्पर मान्यताप्राप्त पात्रतेचा आढावा घेण्यासाठी आणि यूकेमधील एज्युकेशन वर्ल्ड फोरमआणि भारतातील राष्ट्रीय शिक्षण धोरण मंच यासारख्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्ञान सामायिक करण्यासाठी उभय देश एकत्र काम करतील.

2. यूकेमधील आघाडीची विद्यापीठे आणि संस्थांचे आंतरराष्ट्रीय शाखांचे परिसर भारतामध्‍ये उघडण्यास आणि दोन्ही देशांच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या विषयांमध्ये संयुक्त आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारींना प्रोत्साहन देण्यात येईल.

3. भारत-यूके हरित कौशल्य  सहभागीतेद्वारे तरुणांमध्ये गुंतवणूक करणे आणि त्यांना भविष्यासाठी कौशल्ये प्रदान करणे. यासाठी भारतीय आणि यूके आपल्याकडील कौशल्यांचे  संयुक्तिकरण करेल.  दोन्ही देशांमधील कौशल्यातील तफावत ओळखेल आणि ती भरून काढेल आणि परस्पर फायदेशीर, शाश्वत, विकासाच्या संधी निर्माण करणारे आणि सकारात्मक पर्यावरणीय परिणाम करणारे संयुक्त उपक्रम स्थापित करेल. पात्रतेच्या परस्पर मान्यताबाबत विद्यमान भारत-यूके सामंजस्य कराराची अंमलबजावणी सुरू ठेवेल.

4. यंग प्रोफेशनल्स स्कीमआणि स्टडी इंडिया प्रोग्रॅमसारख्या विद्यमान योजनांच्या यशाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारीत काम करणारे तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण आणि सामंजस्याला प्रोत्साहन दिले जाईल.

***

शिल्पा पोफळे/निलिमा चितळे/माधुरी पांगे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149028)