पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत  संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 25 JUL 2025 7:10PM by PIB Mumbai

 

राष्ट्राध्यक्ष महोदय,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांमधील मित्रांनो,

नमस्कार!

सर्वप्रथम सर्व भारतीयांच्या वतीने मी मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षाच्या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष आणि मालदीवच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

या ऐतिहासिक प्रसंगी मला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचे मनापासून आभार मानतो.

या वर्षी भारत आणि मालदीव आपल्या राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी करत आहेत. पण आपल्या नात्याची पाळेमुळे इतिहासापेक्षा जुनी आहेत आणि समुद्राइतकी खोल आहेत. आज प्रकाशित झालेले ,‌ दोन्ही देशांच्या पारंपरिक नौकांची चित्रे असलेले टपाल तिकीट हेच दर्शविते की आपण केवळ शेजारीच नाही तर सहप्रवासी देखील आहोत.

मित्रांनो,

भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आहे. भारताचे "शेजारी प्रथम" हे धोरण आणि महासागर दृष्टिकोन, या दोन्हीमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. भारताला मालदीवचा सर्वात विश्वासू मित्र असल्याचा अभिमान आहे. आपत्ती असो किंवा महामारी, भारत नेहमीच 'प्रथम प्रतिसाद देणारा’ म्हणून उभा राहिला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो किंवा कोविडनंतर अर्थव्यवस्था सावरणे  असो, भारताने नेहमीच मिळून काम केले आहे.

आमच्यासाठी, मैत्री नेहमीच प्रथम स्थानी असते.

मित्रांनो,

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, राष्ट्रपतींच्या भारत भेटीदरम्यान आम्ही व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन  सामायिक केला  होते. आता हे वास्तवात येत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपले संबंध नवीन उंची गाठत आहेत. अनेक प्रकल्पांचे लोकार्पण शक्य झाले आहे.

भारताच्या  सहकार्याने बांधलेली चार हजार सामाजिक गृहनिर्माण एकके आता मालदीवमधील अनेक कुटुंबांसाठी नवीन आरंभ बनतील. ती नवीन घरे असतील. ग्रेटर माले जोडणी प्रकल्प, अड्डू रस्ता विकास प्रकल्प आणि पुनर्विकसित होतं असलेला हनिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे हा संपूर्ण प्रदेश एक महत्त्वाचे वाहतूक आणि आर्थिक केंद्र म्हणून उदयास येईल.

लवकरच सुरू होत असलेल्या जलवाहतुकीमुळे वेगवेगळ्या बेटांमधील प्रवास सुलभ होईल.त्यानंतर बेटांमधील अंतर जीपीएसने नव्हे, तर केवळ फेरी च्या वेळेनुसार मोजले जाईल!

आमच्या विकास भागीदारीला एक नवीन चालना देण्यासाठी, आम्ही मालदीवला $565 दशलक्ष किंवा अंदाजे 5,000 कोटी रुपयांची "पतमर्यादा " देण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीवच्या जनतेच्या प्राधान्यांनुसार पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांसाठी याचा वापर केला जाईल.

मित्रहो,

आमच्या आर्थिक भागीदारीला चालना देण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. परस्पर गुंतवणुकीला गती देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय गुंतवणूक कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेने काम करणार आहोत. मुक्त व्यापार करारावरही वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. आता आमचे ध्येय आहे – कागदपत्रांपासून, ते समृद्धीपर्यंत!

स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टममुळे रुपया आणि रुफिया यांच्यात थेट व्यापार होऊ शकेल. मालदीवमध्ये ज्या वेगाने यूपीआयला चालना मिळत आहे, त्यामुळे पर्यटन आणि किरकोळ या दोन्ही क्षेत्रांना बळ मिळेल.

मित्रहो,

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्य हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ज्या इमारतीचे आज उद्घाटन होत आहे, ती विश्वासाची भक्कम इमारत आहे. आमच्यातील मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे.

आमची भागीदारी आता हवामान विज्ञानापर्यंतही विस्तारेल. हवामान कसेही असो, आमच्यातील  मैत्री नेहमीच उज्ज्वल आणि स्पष्ट राहील!

मालदीवच्या संरक्षण क्षमतांच्या विकासात भारत नेहमीच पाठिंबा देत राहील. हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी हे आमचे सामायिक उद्दिष्ट आहे. कोलंबो सुरक्षा परिषदेत आम्ही एकत्रितपणे प्रादेशिक सागरी सुरक्षा मजबूत करू. हवामान बदल हे आम्हा  दोघांसाठी मोठे आव्हान आहे. आम्ही अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत मालदीव बरोबर या क्षेत्रातील आपला अनुभव सामायिक  करेल.

महामहिम,

या ऐतिहासिक प्रसंगी मी पुन्हा एकदा आपले आणि मालदीवच्या जनतेचे अभिनंदन करतो. आणि तुमच्या स्नेहपूर्ण  स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानतो.

मी आपल्याला पुन्हा एकदा खात्री देतो की, भारत मालदीवचा विकास आणि समृद्धीसाठी प्रत्येक पावलावर साथ देईल.

खूप-खूप धन्यवाद!

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2148708)