वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि ब्रिटन दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक व व्यापारी करार (CETA)

ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी – भारत आणि ब्रिटनची महत्त्वाच्या व्यापार करारावर स्वाक्षरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वात आर्थिक भागीदारी व संधींच्या नव्या युगाकडे पुढचे पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीत वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार विभागाचे मंत्री जोनाथन रेनॉल्डस यांची करारावर स्वाक्षरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि ब्रिटनचे अर्थमंत्री राचेल रीव्ज हेदेखील उपस्थित

या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, पादत्राणे, मौल्यवान खडे व दागिने, सागरी उत्पादने आणि खेळणी यासह श्रम क्षेत्रात निर्यातीच्या संधी खुल्या, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन हस्तकलाकार, महिला उद्योग आणि एमएसएमइ उद्योगांचे सक्षमीकरण

भारतीय उत्पादनांसाठी अभूतपूर्व अशी बाजारपेठ उपलब्ध; कर लागू असणाऱ्या 99 टक्के उत्पादनांसाठी कोणतेही शुल्क लागू असणार नाही, जवळपास 100 टक्के व्यापार मूल्याचा समावेश

महत्त्वाकांक्षी सेवा वचनबद्धता – ब्रिटनकडून प्रथमच

एक विशाल व्याप्तीचे पॅकेज, ज्यामध्ये आयटी/आयटीइएस, वित्तीय व व्यावसायिक सेवा, व्यवसाय मार्गदर्शन, शिक्षण, दूरसंवाद, वास्तुरचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रांचा समावेश, उच्च दर्जाच्या संधी उपलब्ध, रोजगार निर्मितीत वाढ

भारतीय व्यावसायिकांसाठी जागतिक स्तरावरील संधींमध्ये वाढ

कंत्राटी सेवा पुरवठादार, व्यवसाय भेटी, कॉर्पोरेटअंतर्गत बदली, स्वतंत्र व्यावसायिक (उदा. योग प्रशिक्षक, शेफ आणि संगीतकार) यांच्यासाठी मार्ग प्रशस्त. विद्वत्तेचे आदानप्रदान आणि सहकार्य सुलभ

दुहेरी भागीदारी संघटन (डीसीसी) – एक मोठी संधी – यामुळे भारतीय कामगार आणि त्यांचे नियुक्ते यांना ब्रिटनमधील सामाजिक सुरक्षा योगदानातून तीन वर्षांपर्यंत सवलत मिळेल. यामुळे त्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या वेतनात लक्षणीय वाढ होईल तसेच भारतीय कंपन्यांचा खर्च कमी होईल

Posted On: 24 JUL 2025 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2025

भारत आणि ब्रिटन यांनी आपल्यातील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वात दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापारी करारावर (CETA) आज स्वाक्षरी केली. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार विभागाचे मंत्री जोनाथन रेनॉल्डस यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

हा करार प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांसोबतच्या भारताच्या संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असून तो आर्थिक एकात्मता मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. जगातील अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना जागतिक आर्थिक महत्त्व आहे. 6 मे 2025 रोजी जाहीर झालेल्या वाटाघाटींच्या यशस्वी फलनिष्पत्तीनंतर या भारत-ब्रिटन सेटा करारावर स्वाक्षरी झाली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 56 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला असून 2030 पर्यंत हा आकडा दुप्पट करण्याचे संयुक्त उद्दिष्ट आहे.

सेटामुळे भारताकडून ब्रिटनला होणाऱ्या निर्यातीपैकी 99% निर्यातीला अभूतपूर्व शुल्कमुक्त प्रवेश मिळतो, जो जवळपास संपूर्ण व्यापारी टोपली व्यापतो. यामुळे अभियांत्रिकी वस्तू, वाहनांचे सुटे भाग आणि सेंद्रिय रसायने यासारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांसह कापड, सागरी उत्पादने, चामडे, पादत्राणे, क्रीडा वस्तू, खेळणी तसेच रत्ने आणि दागिने यासारख्या कामगार-केंद्रित उद्योगांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडण्याची अपेक्षा आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत चालक असलेल्या सेवा क्षेत्रालाही व्यापक फायदे मिळतील. या करारामुळे आयटी आणि आयटी-सक्षम सेवा, आर्थिक आणि कायदेशीर सेवा, व्यावसायिक आणि शैक्षणिक सेवा तसेच डिजिटल व्यापारासाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होईल. विविध कंपन्यांनी युकेमधील सर्व सेवा क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी वास्तुविशारद, अभियंते, शेफ, योग प्रशिक्षक आणि संगीतकार यांसारख्या करारांवर नियुक्त केलेल्या व्यावसायिकांसह भारतीय व्यावसायिकांना सुलभ व्हिसा प्रक्रिया आणि उदारीकृत प्रवेश श्रेणींचा फायदा होऊन प्रतिभावंतांना युकेमध्ये काम करणे सोपे होईल.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि दृढ वचनबद्धतेसाठी आभार मानले, ज्यामुळे हा ऐतिहासिक करार साध्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असे  ते म्हणाले:

"हा सेटा करार म्हणजे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्यापार संबंधांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो एक महत्त्वाकांक्षी आणि संतुलित चौकट स्थापित करतो. यामुळे युकेला होणाऱ्या 99% भारतीय निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेशाची संधी मिळाली असून त्यात 'मेक इन इंडिया' उपक्रमाला चालना देणारी कामगार-केंद्रित क्षेत्रे आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी पायाभूत सुविधा यांच्यापैकी जवळपास 100 %व्यापारमूल्याचा समावेश आहेत. यामध्ये विविध क्षेत्रांमधील वस्तू आणि सेवांची महत्त्वाकांक्षी वचनबद्धता समाविष्ट आहेत, तसेच कंत्राटी सेवा प्रदाते, व्यवसाय अभ्यागत आणि स्वतंत्र व्यावसायिकांसाठी प्रवेश सुलभ करून भारतीय व्यावसायिकांसाठी गतिशीलता वाढविण्याचा समावेश आहे."

यातील अभिनव दुहेरी योगदान कराराअंतर्गत भारतीय कामगारांना आणि त्यांच्या नियोक्त्यांना ब्रिटनच्या सामाजिक सुरक्षा योगदानातून तीन वर्षांसाठी सूट दिली जाणार आहे. यामुळे स्पर्धात्मकता आणि उत्पन्नातही वाढ होणार आहे. हा मुक्त व्यापार करार सर्वसमावेशक प्रगतीसाठी उत्प्रेरक म्हणून कामी येणार आहे. शेतकरी, कारागीर, कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषक यांना हा  करार लाभदायक ठरणार आहे. यासोबतच या करारातून भारताच्या मुख्य हितांचे संरक्षण केले जाईल, तसेच जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या आपल्या वाटचालीलाही यामुळे गती मिळू शकेल.

भारताने दुहेरी योगदान करारावर सहमती मिळवली आहे. या कराराअंतर्गत भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या नियोक्त्यांना ब्रिटनमधील सामाजिक सुरक्षा पेमेंटमधून तीन वर्षांपर्यंत  सूट दिली जाणार आहे. यामुळे भारतीय प्रतिभेच्या खर्चविषयक स्पर्धात्मकतेतही मोठी सुधारणा घडून येणार आहे.

व्यापाराला अधिक सर्वसमावेशक रुप देता यावे अशा अनुषंगानेच या कराराची आखणी केली गेली आहे. यामुळे  महिला आणि युवा उद्योजक, शेतकरी, मच्छीमार, स्टार्टअप्स तसेच सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांनाही जागतिक मूल्य साखळीत नव्याने प्रवेश करता येणार आहे. या कराअंतर्गतच्या तरतुदी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या, शाश्वत पद्धतींना चालना देणाऱ्या आणि बिगर-शुल्क अडथळे कमी करणाऱ्या या तरतुदींचे पाठबळही त्याला लाभले आहे. 

सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे (CETA) आगामी वर्षांमध्ये व्यापाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकेल, रोजगार निर्माण होतील, निर्यातीत वाढ होईल तसेच या करारामुळे भारत आणि ब्रिटन  यांच्यात अधिक गहीरे, अधिक लवचिक आर्थिक संबंध प्रस्थापित होण्यालाही मोठे पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे.


 
जयदेवी पुजारी-स्वामी/निलीमा चितळे/सुरेखा जोशी/नंदिनी मथुरे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2147935)