माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्ट अप अ‍ॅक्सिलरेटर वेव्हएक्स मधील सहभाग वाढवण्यासाठी आणि एआय-आधारित बहुभाषिक उपाय शोधण्यासाठी ‘भाषा सेतू’ आव्हानाची अंतिम मुदत 30 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली


सरकारच्या या उपक्रमाद्वारे समावेशक आणि स्वदेशी डिजिटल प्रशासनासाठी रिअल-टाइम भाषांतराच्या उपायांना गती देण्याचे उद्दिष्ट

Posted On: 22 JUL 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025

 

भारत डिजिटल प्रशासनात प्रगती करत असताना, नागरिकांना स्वतःच्या भाषेत तात्काळ संवाद करता येणे महत्वाचे आहे. जनसंपर्काचे प्रमाण आणि वेग लक्षात घेता, भाषिक तफावत दूर करण्यासाठी, आणि माहिती समावेशक पद्धतीने कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ए-आय, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय महत्वाचे आहेत.

भारताच्या भाषिक विविधतेसाठी एआय च्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या वेव्हएक्स (WaveX) स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटरने आपल्या ‘भाषासेतु (BhashaSetu) चॅलेंज” स्पर्धेसाठी प्रोटोटाइप दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख आता 30 जुलै 2025 आहे.

'भाषासेतू रिअल टाइम लँग्वेज टेक फॉर भारत', ही स्पर्धा, स्टार्टअप्सना कोणत्याही 12 भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम (तात्काळ) भाषांतर, लिप्यंतरण आणि व्हॉइस लोकलायझेशनसाठी एआय-संचालित साधने तयार करण्यासाठी आमंत्रित करत आहे. या मुदतवाढीमुळे उदयोन्मुख उपक्रम आणि नवोन्मेशींना त्यांच्या उपायांमध्ये अधिक उत्तमता  आणण्यासाठी आणि ते सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

भाषा सेतू (BhashaSetu) चॅलेंज

30 जून 2025 रोजी सुरू करण्यात आलेल्या भाषासेतू चॅलेंजने देशभरातील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपर्स (तंत्रज्ञान विकासक) मध्ये लक्षणीय रस निर्माण केला आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक सहभागाला प्रोत्साहन देतो आणि ओपन-सोर्स किंवा कमी किमतीच्या एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देतो, तसेच स्केलेबल आणि सहज उपलब्ध असलेल्या स्व-मालकीच्या मॉडेल्सचे स्वागत करतो.

इच्छुक सहभागी पुढील अधिकृत वेव्हएक्स (WaveX) पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतील आणि त्यांचे प्रोटोटाइप दाखल करू शकतील : https://wavex.wavesbazaar.com

वेव्हएक्स (WaveX)

वेव्हएक्स (WaveX) हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज  (WAVES) उपक्रमांतर्गत समर्पित स्टार्टअप एक्सीलरेटर (स्टार्टअपना प्रोत्साहन देणारे) व्यासपीठ आहे. प्रसारमाध्यमे, मनोरंजन आणि भाषा तंत्रज्ञानातील नवोन्मेशाला प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. मुंबईत झालेल्या वेव्हज  (WAVES) परिषद 2025 मध्ये 30 हून अधिक स्टार्टअप्सनी गुंतवणूकदार, सरकारी संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वासमोर थेट सादरीकरण केले. वेव्हएक्स हॅकेथॉन, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय व्यासपीठ, याच्या एकत्रीकरणातून पुढील पिढीतील नवोन्मेशींना सक्षम बनवत आहे.

सध्या वेव्हएक्स उपक्रमांतर्गत भाषा सेतू (एआय-आधारित भाषा अनुवाद) आणि कला सेतू (एआय-आधारित सामग्री निर्मिती) या दोन स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या दोन्ही अंतर्गत अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2025 ही तारीख अंतिम मुदत म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147088) Visitor Counter : 2