वस्त्रोद्योग मंत्रालय
हातमाग पारितोषिके 2024: हातमाग क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान
Posted On:
21 JUL 2025 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 21 जुलै 2025
हातमाग क्षेत्रातील हातमाग विणकर, डिझायनर्स, विपणनकर्ते, स्टार्ट अप उद्योग आणि उत्पादक कंपन्या यांनी हातमाग क्षेत्रासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करत, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 2024 या वर्षासाठीच्या प्रतिष्ठीत संत कबीर हातमाग पुरस्कार तसेच राष्ट्रीय हातमाग पुरस्कार विजेत्यांच्या नावाची अभिमानपूर्वक घोषणा केली आहे.
या वर्षी 5 संत कबीर पुरस्कार विजेते आणि 19 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार विजेत्यांसह एकूण 24 विजेत्यांना हातमाग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात येणार आहे. 11 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
संत कबीर हातमाग पुरस्कार
हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी लक्षणीयरित्या योगदान देणाऱ्या उत्कृष्ट हातमाग विणकरांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. पात्र विणकरांना राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील पुरस्कार, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्रके मिळालेली असावीत अथवा हातमागावरील विणकामाच्या परंपरेला चालना देऊन तिचे जतन करणे, विणकर समुदायाचे कल्याण आणि या क्षेत्राचा विकास यांतील असामान्य कौशल्ये आणि योगदानासाठी त्यांना मान्यता मिळालेली असावी.
पुरस्कारामध्ये खालील घटकांचा समावेश:
• 3.5 लाख रुपये रोख
• सुवर्ण मुद्रा (आरोहित)
• ताम्रपत्र (प्रमाणपत्र)
• शाल
• मानपत्र
राष्ट्रीय हातमाग पुरस्कार:
राष्ट्रीय हातमाग पुरस्कार विणकरांमधील उत्कृष्ट कारागिरी, समर्पण वृत्ती आणि नाविन्यपूर्णता साजरी करतो. विजेत्या विणकरांना हा पुरस्कार त्यांचे उल्लेखनीय कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी आणि या क्षेत्रातील इतरांना प्रेरणा देण्यासाठी उत्तेजन देतो.
पुरस्कारामध्ये खालील घटकांचा समावेश:
• 2.00 लाख रुपये रोख
• ताम्रपत्र
• शाल
• प्रमाणपत्र
निवड प्रक्रिया
विणकर श्रेणीतील विजेत्यांच्या निवडीमध्ये विणकरांसाठी कठोर त्रिस्तरीय प्रक्रिया राबवण्यात येते. त्यात विभागीय, मुख्यालय स्तर आणि केंद्रीय स्तरावरील समित्यांचा समावेश असून प्रत्येकी 11 सदस्य असलेल्या या समित्यांचे अध्यक्ष अनुक्रमे विभागीय संचालक, विकास आयुक्त (हातमाग) आणि केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव असतात. या समित्यांमध्ये हातमाग क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा समावेश असतो आणि ते स्थापित पात्रता निकषांनुसार अर्जांचे मूल्यांकन करतात.
डिझाईन विकसन, विपणन, स्टार्ट-अप उद्योग आणि उत्पादक कंपन्यांसाठी मुख्यालये आणि केंद्रीय स्तर अशा दोन पातळ्यांवर निवड प्रक्रिया राबवली जाते. या दोन्ही पातळ्यांवरील परीक्षक पथकात प्रत्येकी 11 सदस्य असतात आणि अनुक्रमे विकास आयुक्त (हातमाग) आणि केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालते.
पीडीएफ फाईल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146597)