पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
भारतात, हा आपल्या पूर्वेकडील राज्यांचा काळ आहे: पंतप्रधान
देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे: पंतप्रधान
मागासांना आमचे प्राधान्य, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली असून शेतीच्या बाबतीत सर्वात मागास 100 जिल्ह्यांमध्ये ती राबवली जाईल : पंतप्रधान
Posted On:
18 JUL 2025 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही चंपारणची भूमी आहे, या भूमीने इतिहासाला आकार दिला आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, या भूमीने महात्मा गांधींना एक नवीन दिशा दिली. याच भूमीतील प्रेरणा आता बिहारचे नवे भविष्य घडवेल, असे ते म्हणाले. या विकास उपक्रमांसाठी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि बिहारच्या जनतेला अभिनंदन केले.
21 वे शतक वेगवान जागतिक प्रगतीचे साक्षीदार असून एकेकाळी असलेले पाश्चात्य देशांचे वर्चस्व आता वाढत्या प्रमाणात पूर्वेकडे झुकत असून जागतिक विकासात पूर्वेचा सहभाग आणि प्रभाव वाढत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पूर्वेकडील राष्ट्रे आता विकासात नवी गती साध्य करत आहेत. जे चित्र जगात आहेत, ते देशातही असल्याकडे लक्ष वेधत, भारतातही हे युग पूर्वेकडच्या राज्यांचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. येणाऱ्या काळात पूर्वेकडील मोतीहारी हे पश्चिमेकडील मुंबईइतकेच महत्त्वपूर्ण होईल, याची सुनिश्चिती करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे, ते म्हणाले. गुरुग्रामप्रमाणेच गयामध्ये समान संधी, पाटणा येथे पुण्यासारख्या औद्योगिक विकास आणि सुरतप्रमाणे संथाल परगणातील विकासाच्या समान संधींची संकल्पना त्यांनी मांडली. जलपायगुडी आणि जाजपूरमधील पर्यटन जयपूरसारखे नवीन विक्रम प्रस्थापित करेल आणि बीरभूममधील लोक बेंगळुरूप्रमाणेच प्रगती करतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
"पूर्व भारताच्या प्रगतीसाठी बिहारचे रूपांतर विकसित राज्यात होणे आवश्यक आहे," यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे बिहारच्या विकासासाठी वचनबद्ध सरकारे असल्याने आज बिहारमध्ये जलद प्रगती शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. पूर्वीच्या सरकारच्या 10 वर्षांच्या काळात केंद्रात सत्तेवर असलेल्यांकडून तेव्हा बिहारला फक्त ₹2 लाख कोटी मिळाले होते. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध हा राजकीय सूड उगवण्याचा एक प्रकार होता, असे पंतप्रधान म्हणाले. वर्ष 2014 मध्ये आपले सरकार सत्तेवर आल्यावर बिहारविरुद्धचे सुडाचे राजकारण थांबले, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या कार्यकाळात गेल्या 10 वर्षात बिहारच्या विकासासाठी सुमारे ₹9 लाख कोटींची तरतूद बिहारसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, पूर्वीच्या सरकारच्या काळात दिल्या गेलेल्या तरतुदीपेक्षा हे चौपट असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा वित्तपुरवठा संपूर्ण बिहारमधल्या विकास प्रकल्पांसाठी आणि सार्वजनिक कल्याणासाठी वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दशकांपूर्वी बिहारने अनुभवलेली निराशा आजच्या पिढीला समजणे, महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी सांगितले. पूर्वीच्या सरकारांच्या काळात विकास थंडावला होता आणि गरिबांसाठी तरतूद केलेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य होते. तत्कालीन नेतृत्वाने केवळ गरिबांसाठी असलेले पैसे लुटण्यावर लक्ष केंद्रित केल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधानांनी बिहारच्या लोकांच्या विजिगीषू वृत्तीचे कौतुक केले. अशक्य ते शक्य, या भूमीत होते, असे ते म्हणाले. बिहारला त्या काळच्या सरकारच्या जोखडातून मुक्त केल्याबद्दल आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे शक्य केल्याबद्दल त्यांनी लोकांचे कौतुक केले. मोदी यांनी असेही नमूद केले की, गेल्या 11 वर्षांत देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटींपेक्षा जास्त घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे 60 लाख घरे एकट्या बिहारमध्ये बांधण्यात आली आहेत. त्यांनी असे नमूद केले की, घरांची ही संख्या नॉर्वे, न्यूझीलंड आणि सिंगापूरसारख्या देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. "एकट्या मोतिहारी जिल्ह्यात सुमारे 3 लाख कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत आणि ही संख्या वेगाने वाढत आहे. या प्रदेशातील 12,000 हून अधिक कुटुंबांना आज त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत." असे मोदी म्हणाले. याव्यतिरिक्त, 40,000 हून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी मिळाला आहे, ज्यात बहुसंख्य दलित, महादलित आणि मागासवर्गीय समुदायांतील आहेत. मागील सरकारांच्या राजवटीत अशा प्रकारच्या घरांची कल्पना देखील करता येत नव्हती, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. त्या सरकारांच्या कार्यकाळात लोक स्वतःच्या घरांना रंग काढायला देखील घाबरत होते कारण असे केल्याने घरमालकांना लक्ष्य केले जाईल, अशी भीती त्यांना वाटत राहायची, अशी आठवण मोदी यांनी करून दिली. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी लोकांना कधीच पक्की घरे दिली नसती, असे ते म्हणाले.
बिहारच्या प्रगतीचे श्रेय तिथल्या माता आणि भगिनींना देत मोदी यांनी सांगितले की बिहारच्या महिलांना त्यांच्या सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाचे महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याची त्यांनी दखल घेतली आणि ज्या काळात महिलांना बँक खाती नसल्यामुळे 10 रुपये देखील लपवावे लागत होते आणि त्यांना बँकांमध्ये प्रवेश नाकारला जात होता, त्या दिवसांची आठवण करून दिली. गरिबांच्या आत्मसन्मानाची आपल्याला जाणीव होती आणि त्या जाणीवेतूनच त्यांनी बँकांना त्यांची दारे गरिबांसाठी का बंद आहेत, असा प्रश्न विचारला होता, याची आठवण करून दिली. त्यांनी जन धन खाती उघडण्यासाठी सुरू केलेल्या मोठ्या मोहिमेला अधोरेखित केले, ज्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. त्यामुळे बिहारमध्ये सुमारे 3.5 कोटी महिलांची आता जन धन खाती आहेत. मोदींनी यावर जोर दिला की, सरकारी योजनांचा निधी आता थेट या खात्यांमध्ये जमा केला जात आहे. त्यांनी पुढे नमूद केले की,नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने नुकतीच वृद्ध, दिव्यांग आणि विधवा मातांसाठीची मासिक पेन्शन रु. 400 वरून रु. 1,100 पर्यंत वाढवली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, गेल्या दीड महिन्यातच बिहारमधील 24,000 हून अधिक बचत गटांना रु. 1,000 कोटींहून अधिक मदत मिळाली आहे. त्यांनी याचे श्रेय माता आणि भगिनींच्या जन धन खात्यांमुळे मिळालेल्या आर्थिक सक्षमीकरणाला दिले.
महिला सक्षमीकरण उपक्रमांच्या शक्तिशाली परिणामांवर भर देत, देशभरात आणि बिहारमध्ये 'लखपती दीदीं'ची वाढती संख्या लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी सांगितले की, 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य आहे आणि आतापर्यंत 1.5 कोटी महिलांनी हा टप्पा गाठला आहे. बिहारमध्ये 20 लाखांहून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत, तर एकट्या चंपारणमध्ये 80,000 हून अधिक महिला बचत गटांमध्ये सामील होऊन हे स्थान प्राप्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी 'नारी शक्ती'ची ताकद मजबूत करण्याच्या उद्देशाने रु. 400 कोटींचा सामुदायिक गुंतवणूक निधी जाहीर केला. त्यांनी नितीश कुमार यांनी सुरू केलेल्या “जीविका दीदी” योजनेचे कौतुक केले, ज्यामुळे बिहारमधील लाखो महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळाला आहे.
'बिहारची प्रगती भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे' या आपल्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करत, मोदी यांनी यावर भर दिला की, बिहारची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा तेथील तरुण पुढे जातील. त्यांनी समृद्ध बिहार आणि प्रत्येक तरुणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.अलीकडच्या काळात बिहारमध्येच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न झाल्याचे नमूद करून नितीशकुमार यांच्या सरकारने लाखो तरुणांना पारदर्शक पद्धतीने सरकारी पदांवर नियुक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. बिहारच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी नवा संकल्प केल्याची त्यांनी नोंद घेतली आणि केंद्र सरकार या प्रयत्नांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र सरकारने अलीकडेच खासगी क्षेत्रात प्रथमच नोकरी मिळविणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी एक मोठी योजना मंजूर केल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले. या योजनेअंतर्गत, खासगी कंपनीत पहिली नियुक्ती मिळवणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून 15,000 रुपये दिले जातील. ही योजना 1 ऑगस्टपासून लागू केली जाईल आणि केंद्राकडून त्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली आणि या उपक्रमाचा विशेषतः बिहारमधील तरुणांना लाभ मिळेल यावर त्यांनी भर दिला. मुद्रा योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून बिहारमध्ये स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांवरही मोदी यांनी प्रकाश टाकला. गेल्या केवळ दोन महिन्यांत बिहारमध्ये मुद्रा योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले, विशेषतः चंपारणमध्ये, 60,000 तरुणांना त्यांच्या स्वयंरोजगार उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी मुद्रा कर्ज मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
इतर पक्षांचे नेते, विशेषतः जे नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांच्या जमिनी बळकावतात, ते कधीही रोजगार देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केले की, त्यांनी कंदीलांचा काळ आणि नवीन आशांनी उजळलेला आजचा बिहार याच्यातील फरक लक्षात घ्यावा.त्यांनी या परिवर्तनाचे श्रेय बिहारच्या, त्यांच्या युती सरकार बरोबरच्या प्रवासाला दिले, आणि युतीला पाठिंबा देण्याबाबत बिहारचा निर्धार दृढ आणि अढळ असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी अलीकडच्या काळात नक्षलवादा विरोधात केलेल्या निर्णायक कारवाईवर प्रकाश टाकला, ज्याचा बिहारच्या तरुणांना मोठा फायदा झाला आहे. एकेकाळी माओवाद्यांच्या प्रभावाने पिछाडीवर असलेल्या चंपारण, औरंगाबाद, गया आणि जमुई यासारख्या जिल्ह्यांमध्ये आता अतिरेकी कारवायांचे प्रमाण कमी होत असल्याचे ते म्हणाले. एकेकाळी माओवादी हिंसाचाराच्या छायेत झाकोळलेल्या भागातील, तरुण आता मोठी स्वप्ने पाहत आहेत यावर त्यांनी भर दिला आणि भारताला नक्षलवादाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
"हा एक नवा भारत आहे. एक असा भारत, जो शत्रूंना शासन करण्यात, आकाश पातळ एक करण्यात कोणतीही कसर ठेवत नाही", मोदी म्हणाले, आणि बिहारच्या भूमीवरूनच त्यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा संकल्प केला होता, असे सांगितले. आज त्या ऑपरेशनचे यश संपूर्ण जग पाहत आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पंतप्रधानांनी सांगितले की बिहारमध्ये क्षमता अथवा साधन संपत्ती, कशाचीही कमतरता नाही, आणि आज बिहारची साधन संपत्ती त्याच्या प्रगतीचे साधन बनत आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतर मखाणा पिकाच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगून, त्यांनी याचे श्रेय मखाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याला दिले. या क्षेत्राला अधिक पाठबळ देण्यासाठी मखाणा मंडळाची स्थापना केल्याचा त्यांनी उल्लेख केला. बिहारच्या कृषी समृद्धीचे उदाहरण म्हणून, केळी, लिची, मर्चा तांदूळ, कटारणी तांदूळ, जर्दालू आंबा आणि मघई पान, यासारख्या अनेक प्रमुख उत्पादनांचा मोदी यांनी उल्लेख केला. ही आणि इतर अनेक उत्पादने बिहारचे शेतकरी आणि तरुणांना जागतिक बाजारपेठेशी जोडतील, यावर त्यांनी भर दिला.
शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे सांगून, पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांना अंदाजे 3.5 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. एकट्या मोतिहारीमध्ये पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 1,500 कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, सरकार केवळ घोषणा अथवा आश्वासने देऊन थांबत नाही, तर ते कृतीतून सिद्ध करते. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांचे सरकार मागास आणि अती मागास समुदायांसाठी काम करत असल्याचे म्हणते, तेव्हा ही वचनबद्धता त्यांची धोरणे आणि निर्णयांमधून दिसून येते.मिशन स्पष्ट आहे प्रत्येक मागास व्यक्तीला प्राधान्य,मग ते मागासलेल्या प्रदेशातील असोत अथवा मागासलेल्या वर्गातील असोत, अशा सर्व व्यक्ती सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या अनेक दशकांपासून देशभरातील 110 पेक्षा जास्त जिल्ह्यांची मागासलेले तसेच दुर्लक्षित जिल्हे अशीच कायमची ओळख झाली होती, मात्र आपल्या नेतृत्वातील सरकारने या जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हे अशी ओळख दिली आणि या जिल्ह्यांच्या विकासाला चालना दिली असे त्यांनी अधोरेखित केले. भारताची सीमावर्ती गावे देखील दीर्घकाळापासून शेवटची गावे म्हणूनच ओळखली जात होती, तसेच ती मागे राहिली होती, मात्र आपल्या सरकारने या गावांना पहिली गावे अशी नवी ओळख दिली आणि या गावांच्या विकासाला प्राधान्य दिले, असे पंतप्रधानांनी नमूद केले. इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा अशी मागणी इतर मागासवर्गीय समुदाय दीर्घकाळापासून करत होता, ही मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पूर्ण केली, असे त्यांनी अधोरेखित केले. आदिवासी समुदायांमधील सर्वात वंचित लोकांसाठी जनमन योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत या समुदायाच्या विकासासाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या याच या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना या एका नवीन मोठ्या उपक्रमाची घोषणा पंतप्रधानांनी केली. या योजनेला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत, शेतीची समृद्ध क्षमता असूनही, उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यात मागे पडलेले 100 जिल्हे निश्चित केले जातील आणि त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लक्ष्यित मदत पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. या योजनेचा देशभरातील सुमारे 1.75 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, आणि त्यातही बिहारमधील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्याचाही उल्लेख केला. या प्रकल्पांमुळे बिहारच्या नागरिकांसाठीच्या सोयी आणि सुलभतेत लक्षणीय वाढ होईल, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील चार वेगवेगळ्या मार्गांवरील अमृत भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. अमृत भारत एक्सप्रेस आता मोतिहारी-बापूधामहून थेट आनंद विहार, दिल्लीपर्यंत धावेल, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. मोतिहारी रेल्वे स्थानकाचा आधुनिक सुविधांसह आणि नवीन स्वरूपात पुनर्विकास केला जात आहे,असेही त्यांनी नमूद केले. दरभंगा-नरकटियागंज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्याने या मार्गावरील प्रवासाच्या सोयीत मोठी वाढ होईल , असेही त्यांनी सांगितले.
चंपारणचे भारताच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाशी असलेले गहिरे नातेही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. राम-जानकी पथ मोतिहारीतील सत्तरघाट, केसरिया, चकिया आणि मधुबनमधून जाईल, असे त्यांनी सांगितले. सीतामढी ते अयोध्या असा नवा रेल्वे मार्ग विकसित केल्यामुळे चंपारणमधील भाविकांना अयोध्येत दर्शनासाठी प्रवास करणे शक्य होईल, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या उपक्रमांमुळे बिहारमधील दळणवळण जोडणीत लक्षणीय वाढ होईल आणि या प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.
या पूर्वीच्या सरकारांनी गरीब, दलित, मागासलेले वर्ग आणि आदिवासी समुदायांच्या नावावर दीर्घकाळ राजकारण केले, त्यांनी समानतेचा अधिकार तर नाकारला, त्यासोबतच आपल्या स्वतःच्या कुटुंबाबाहेरील लोकांना कधी आदरही दिला नाही अशी टीका त्यांनी केली. बिहार आज त्यांचा अहंकार ठळकपणे पाहत आहे, असे ते म्हणाले. बिहारला त्यांच्या दुर्भावनापूर्ण हेतूपासून वाचवायचे आहे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सध्याच्या बिहार सरकारच्या समर्पित प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली आणि सर्वांनी बिहारच्या विकासाला सामूहिकरित्या गती देण्याचे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशिने वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोबतच एक नवीन बिहार घडवण्यासाठी एकत्रित संकल्प करू या असे आवाहन त्यांनी केले. आज उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी जनतेचे अभिनंदनही केले.
या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, गिरिराज सिंह, राजीव रंजन सिंह, चिराग पासवान, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, सतीश चंद्र दुबे, डॉ. राज भूषण चौधरी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन करून त्यांचे लोकार्पण केले.
दळणवळणाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी अनेक रेल्वे प्रकल्प यावेळी राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये समस्तीपूर-बछवारा रेल्वे मार्गादरम्यान असलेल्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा समावेश आहे; ज्यामुळे या विभागातील रेल्वे वाहतूक सक्षम होईल. सुमारे 580 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या, दरभंगा-थलवारा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा एक भाग असलेल्या, दरभंगा-समस्तीपूर मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पामुळे,रेल्वेची वाहतूक क्षमता वाढेल आणि वेळेची बचत होईल.
पंतप्रधानांनी अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही यावेळी केली.या रेल्वे प्रकल्पांमध्ये पाटलीपुत्र येथील वंदे भारत गाड्यांच्या देखभालीसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांचा विकास समाविष्ट आहे. रेल्वेची कार्यक्षमता सक्षम करण्यासाठी भटनी-छपरा ग्रामीण रेल्वे मार्गावर (114 किमी) स्वयंचलित सिग्नलिंग, ट्रॅक्शन सिस्टम पायाभूत सुविधा मजबूत करून आणि ऊर्जा कार्यक्षमता सक्षम करून गाड्यांचा वेग वाढेल. सुमारे 4080 कोटी रुपये खर्चाच्या भटनी-छपरा ग्रामीण विभागात ट्रॅक्शन सिस्टमचे अपग्रेडेशन दरभंगा-नरकटियागंज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण प्रकल्प या कामाचा समावेश आहे ज्यामुळे विभागीय क्षमता वाढेल, अधिक प्रवासी आणि मालवाहू गाड्यांचे संचालन सक्षम होईल, तसेच उत्तर बिहार आणि देशाच्या उर्वरित भागांमधील संपर्क मजबूत होईल.
या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्ग-319 आणि पाटणा-बक्सर राष्ट्रीय महामार्ग-922 ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-319 च्या आरा बायपासच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली,ज्यामुळे अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-319 च्या पारारिया ते मोहनिया विभागाच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन देखील केले, ज्याचा खर्च 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा राष्ट्रीय महामार्ग-319 चा एक भाग आहे जो आरा टाउनला राष्ट्रीय महामार्गाला-02 (सुवर्ण चतुष्कोण) जोडतो ज्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासीवाहतूक सुधारेल. इतर गोष्टींबरोबरच, राष्ट्रीय महामार्ग-333C च्या सारवन ते चकाई पर्यंत 2-पदरी पेव्ह शोल्डर मार्ग, वस्तू आणि लोकांची वाहतूक सुलभ करेल आणि बिहार आणि झारखंड दरम्यान एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल.
पंतप्रधानांनी दरभंगा येथे न्यू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) सुविधेचे आणि आयटी/आयटीईएस/ईएसडीएम उद्योग आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पटना येथे एसटीपीआयच्या अत्याधुनिक इन्क्युबेशन सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधा आयटी सॉफ्टवेअर आणि सेवा निर्यातीला चालना देण्यास मदत करतील. यामुळे नवोदित उद्योजकांसाठी टेक स्टार्टअप इकोसिस्टमला देखील चालना मिळेल, नवोन्मेष, आयपीआर आणि उत्पादन विकासाला प्रोत्साहन मिळेल .
बिहारमधील मत्स्यपालन आणि जलचर विकास क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत (PMMSY) मंजूर केलेल्या मत्स्यपालन विकास प्रकल्पांच्या मालिकेचेही यावेळी उद्घाटन केले. यानिमित्ताने बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन मत्स्यपालन केंद्रे, बायोफ्लॉक युनिट्स, शोभेचे मासे यासाठीची मत्स्यपालन केंद्रे, एकात्मिक मत्स्यपालन युनिट्स आणि मत्स्य खाद्य गिरण्यांसह आधुनिक मत्स्यपालन पायाभूत सुविधांचा शुभारंभ होईल. मत्स्यपालन प्रकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास, मत्स्य उत्पादन वाढविण्यास, उद्योजकतेला चालना देण्यास आणि बिहारच्या ग्रामीण भागात सामाजिक-आर्थिक विकासाला गती देण्यास मदत करतील.
भविष्यात तयार होणाऱ्या रेल्वे नेटवर्कसाठी पंतप्रधानांनी आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, राजेंद्र नगर टर्मिनल (पाटणा) ते नवी दिल्ली, बापुधाम मोतिहारी ते दिल्ली (आनंद विहार टर्मिनल), दरभंगा ते लखनऊ (गोमती नगर) आणि मालदा टाउन ते लखनऊ (गोमती नगर) मार्गे भागलपूर दरम्यान चार नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला ज्यामुळे या प्रदेशातील दळणवळण व्यवस्था सुधारेल.
पंतप्रधानांनी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) योजनेअंतर्गत बिहारमधील सुमारे 61,500 बचत गटांना 400 कोटी रुपये जारी दिले. महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत होणाऱ्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करत, 10 कोटींहून अधिक महिला या महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.
पंतप्रधानांनी 12,000 लाभार्थ्यांना गृहप्रवेश करण्यासाठी घराच्या चाव्या सुपूर्द केल्या आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या 40,000 लाभार्थ्यांना 160 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित केला.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/शैलेश पाटील/राजश्री आगाशे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145870)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam