गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत भारत विकास परिषदेच्या 63 व्या वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित


स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुरूप वाटचाल करत समर्पण, संघटन आणि संस्कार या गुणांचा अंगिकार करून 'भारत विकास परिषद' समाजात सज्जन सामर्थ्य निर्माण करत आहे

मोदी सरकारने जेव्हा नौदलात इंग्रजांचे चिन्ह बदलून छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा अंगिकारली तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली

Posted On: 14 JUL 2025 10:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे भारत विकास परिषदेच्या 63 व्या वर्धापन दिवस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारत विकास परिषदेचा 63 वा वर्धापन दिवस हा भारताचा विकास भारतीय दृष्टिकोनातून इच्छिणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. अमित शाह पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या  विचारांनुरूप वाटचाल करत, ‘समर्पण’, ‘संघटना’ आणि ‘संस्कार’ या गुणांना जोपासून ‘भारत विकास परिषद’ समाजात सज्जन शक्तीची निर्मिती करत आहे.

त्यांनी सांगितले की संघटनेच्या शक्तीतून निर्माण झालेल्या ऊर्जेने भारतातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य केले आहे आणि समाजाच्या संघटनेच्या शक्तीची सर्वाधिक गरज आहे अशा लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. अमित शाह यांनी सांगितले की भारत विकास परिषदेने सेवा देणारे आणि सेवेची गरज आहे अशा लोकांना जोडण्याचे कार्य केले आहे. भारत विकास परिषद ही केवळ संस्था नाही तर ती एक विचारधारा आहे. हा भारतातील प्रत्येक नागरिकाला भारताच्या मूल्यांशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे.

   

केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की स्थापनेला सहा दशके उलटून गेल्यावरही भारत विकास परिषद उपयुक्त आणि सुसंगत कार्य करत आहे.

गृह मंत्र्यांनी सांगितले की आज भारत विकास परिषद एक मोठी संघटना बनली आहे. देशातील 412 जिल्ह्यांमध्ये तिच्या 1600 हून अधिक शाखा आहेत आणि 84 हजारांहून अधिक कुटुंबे या सेवाकार्यात सहभागी झाली आहेत.

ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला वसाहतवादाच्या वारशातून मुक्त करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, 'राज पथ'चे नाव बदलून 'कर्तव्य पथ' करण्यात आले, यामुळे कोट्यवधी नागरिकांना भारतीय संविधानात नमूद केलेल्या कर्तव्यांची आठवण होते. शाह म्हणाले की लोकशाहीत अधिकारांचा वापर केवळ राजकारणासाठी करणाऱ्यांमध्ये एखादी व्यक्ती कर्तव्यांची आठवण करून देते तेव्हा संविधानाची खरी भावना प्रत्यक्षात उतरते. त्यांनी सांगितले की, “जेव्हा देशाचे नौदल इंग्रजांच्या सैन्याचे चिन्ह बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे चिन्ह स्वीकारते, तेव्हा प्रत्येक भारतीयाला  याचा अभिमान वाटतो”.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “आता वेळ आली आहे की आपण आपल्या वारशाला विसरून न जाता, विकासाच्या आधारावर पुढे जावे आणि आपल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्याचे  निर्माण करावे ”.

ते पुढे म्हणाले की, “केवळ सरकार सर्व समस्या सोडवू शकत नाही. तर यासाठी  सेवाभावी संस्था आणि संघटनाही याच  ध्येयाने प्रेरित होऊन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. भारत विकास परिषदेने हा मार्ग  पूर्वीपासून निवडला असून आजही ती  याच मार्गावर पुढे वाटचाल  करत आहे आणि पुढेही करत राहील”.

 

* * *

S.Kakade/Shailesh/Reshma/Gajendra/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144726)