पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा नेटुम्बो नंदी-नदैतवा यांची घेतली भेट
Posted On:
09 JUL 2025 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या अधिकृत दौऱ्या दरम्यान आज विंडहोक येथील स्टेट हाऊसमध्ये नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा डॉ.नेटुम्बो नंदी-नदैतवा यांची भेट घेतली. स्टेट हाऊसमध्ये आगमन झाल्यावर, राष्ट्राध्यक्षा नंदी-नदैतवा यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्नेहमय स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान स्तरावर भारताकडून तब्बल 27 वर्षांनंतर नामिबियाचा हा दौरा होत आहे. या वर्षी मार्चमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती नंदी-नदैतवा यांनी आयोजित केलेली ही पहिलीच द्विपक्षीय राजकीय भेट होती.
नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नंदी-नंदैतवा यांचे अभिनंदन केले. उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करणाऱ्या अभिमानास्पद इतिहासाचे दोन्ही नेत्यांनी स्मरण केले. नामिबियाचे संस्थापक डॉ. सॅम नुजोमा यांच्या निधनाबद्ल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि यूपीआय, कृषी, आरोग्य आणि फार्मा, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
द्विपक्षीय व्यापारामधील वृद्धीबद्दल समाधान व्यक्त करून, या क्षेत्रातील पूर्ण क्षमतांचा वापर अद्याप झाला नसल्याचे उभय नेत्यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी भारत-एसएसीयू पीटीए (SACU PTA)वरील चर्चेला गती देण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधानांनी नमूद केले की भारत नामिबियामधील तज्ञांसाठी क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करून विकास सहकार्याच्या प्रयत्नांना गती देईल आणि नामिबियामध्ये उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी भागीदारीच्या शक्यतांचा शोध घेईल. कृषी, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण या क्षेत्रांमध्ये जलद परिणाम विकास प्रकल्पांसाठी भारताचे सहकार्य राहील असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले. पंतप्रधानांनी शेतीसाठी ड्रोन वापरण्याचा भारताचा अनुभव सांगितला, हा प्रकल्प नामिबियासाठी मोलाचा ठरू शकतो.
भारतातील चित्ता संवर्धन प्रकल्पाला नामिबियाने पाठबळ दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्षा नंदी-नंदैतवा यांचे आभार मानले.त्यांनी नामिबियाला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नामिबियाने भारतीय जनतेला दिलेला भक्कम पाठिंबा आणि एकतेची भावना, याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. दहशतवादाविरोधातील जागतिक लढा अधिक बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यांनी ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता दर्शवली.
या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी आरोग्य आणि उद्योजकता या क्षेत्रांमधील सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. याशिवाय, नामिबिया आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि जागतिक जैवइंधन गटात सहभागी झाल्याचे, तसेच यूपीआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी परवाना करार करणारा पहिला देश असल्याचे घोषित करण्यात आले.
नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा नंदी-नंदैतवा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी त्यांना परस्परांच्या सुविधेनुसार भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143587)