पंतप्रधान कार्यालय
ब्रिक्स सत्रात पर्यावरण, सीपीओ-30 आणि जागतिक आरोग्य विषयावर पंतप्रधानांचे निवेदन
Posted On:
07 JUL 2025 11:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2025
महामहीम,
मान्यवर हो,
मला आनंद आहे की ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सने (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उच्च प्राधान्य दिले आहे. हे विषय केवळ परस्पर संबंधित नाहीत, तर मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मित्रांनो,
यावर्षी सीपीओ-30 ची परिषद ब्राझीलमध्ये होत आहे, त्यामुळे ब्रिक्समध्ये पर्यावरणावर होणारे चर्चासत्र सुसंगत आणि योग्य वेळी होत आहे. तसंच हवामान बदल आणि पर्यावरण सुरक्षा हे भारताचे कायमच अग्रक्रम राहिले आहेत. आमच्यासाठी हा केवळ ऊर्जेचा प्रश्न नाही, तर जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखण्याचा प्रश्न आहे. काहीजण त्याकडे आकड्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात, परंतू भारतात त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि परंपरांचा भाग समजतो. आपल्या संस्कृतीत पृथ्वीला माता मानले जाते. म्हणूनच जेव्हा पृथ्वीमाता आपल्याला हाक देते, तेव्हा आपण नेहमीच प्रतिसाद देतो. व त्याप्रमाणे आपण आपल्या विचारसरणी, वर्तन आणि जीवनशैलीत बदल घडवून आणतो.
"पीपल प्लॅनेट अँड प्रोग्रेस" या भावनेने प्रेरित होऊन भारताने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत, जसे की LiFE (लाईफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट) मोहीम, 'एक पेड माँ के नाम', आंतरराष्ट्रीय सौर उर्जा आघाडी, आपत्ती प्रतिकारक पायाभूत सुविधा आघाडी, ग्रीन हायड्रोजन मिशन, जागतिक जैवइंधन आघाडी आणि बिग कॅट्स अलायन्स इत्यादींची नावे घेता येतील.
भारताच्या जी20 अध्यक्षतेदरम्यान, आम्ही शाश्वत विकासावर आणि ग्लोबल नॉर्थ आणि साउथ यांच्यातील दरी भरून काढण्यावर भर दिला. याच उद्देशाने, आम्ही सर्व देशांमध्ये ग्रीन डेव्हलपमेंट पॅक्टवर सहमती मिळवली. तसंच पर्यावरणपूरक कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हरित क्रेडिट उपक्रम सुरू केले.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असूनही, भारताने आपल्या पॅरिस करारातील बांधिलकी वेळेपूर्वीच पूर्ण केली आहे. तसेच आम्ही 2070 पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्याच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. मागील दशकात भारताच्या सौर उर्जा स्थापनेच्या क्षमतेत 4000% वाढ झाली आहे. या प्रयत्नांतून आपण शाश्वत आणि हरित भविष्याची मजबूत पायाभरणी करत आहोत.
मित्रांनो,
भारतासाठी हवामान न्याय हा केवळ पर्याय नसून ते नैतिक कर्तव्य आहे. भारताचा ठाम विश्वास आहे की, जर गरजू देशांना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि परवडणारा वित्तपुरवठा मिळाला नाही, तर हवामान कृती ही केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहील. त्याचबरोबर हवामानविषयक आकांक्षा आणि हवामान वित्तपुरवठा यामधील दरी भरून काढणे ही प्रगत देशांची एक विशेष आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आम्ही सर्व राष्ट्रांना सोबत घेऊन चालतो, विशेषतः ते देश जे जागतिक आव्हानांमुळे अन्न, इंधन, खत आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.
तसेच या देशांनाही त्यांच्या भविष्यासंदर्भात तितकाच आत्मविश्वास असावा, जितका प्रगत देशांमध्ये आहे. जोपर्यंत दुहेरी निकष अस्तित्वात आहेत, तोपर्यंत मानवतेचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य होऊ शकत नाही. आज प्रसिद्ध होणारे 'हवामान वित्तासाठी रूपरेषा जाहीरनामा ' हे या दिशेने एक स्तुत्य पाऊल आहे. भारत या उपक्रमाला पूर्णपणे पाठिंबा देतो.
मित्रांनो,
"आपल्या ग्रहाचे आरोग्य आणि मानवतेचे आरोग्य हे एकमेकांशी अतिशय घट्टपणे जोडलेले आहे. कोविड-19 महामारीने आपल्याला शिकवले की विषाणूंना व्हिसाची गरज नसते, आणि उपाययोजना पासपोर्ट पाहून ठरवता येत नाहीत. सामायिक आव्हानांना केवळ सामूहिक प्रयत्नांनीच सामोरे जाता येते."
"एक पृथ्वी एक आरोग्य " या मंत्राने प्रेरित होऊन भारताने सर्व देशांशी सहकार्य वाढवले आहे. आज भारताकडे 'आयुष्मान भारत' ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे, जी 50 कोटींपेक्षा अधिक लोकांसाठी जीवनरेखा ठरली आहे. आयुर्वेद, योग, युनानी आणि सिद्ध यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालींसाठी एक संपूर्ण परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण करण्यात आली आहे. डिजिटल स्वरूपातील आरोग्य उपक्रमांद्वारे, आपण देशाच्या अगदी दुर्गम भागांपर्यंतही आरोग्यसेवा पोहोचवत आहोत. या सर्व क्षेत्रांतील भारताचे यशस्वी अनुभव आम्हाला इतर देशांना सांगताना आनंद होईल."
"मला आनंद आहे की ब्रिक्सने आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही विशेष भर दिला आहे. 2022 मध्ये सुरू झालेलं 'ब्रिक्स व्हॅक्सीन संशोधन व विकास केंद्र' हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आज प्रसिद्ध होणारे 'सामाजिक कारणांमुळे होणाऱ्या रोगांचे उच्चाटन ‘ब्रिक्स भागीदारी' या विषयावरचे नेत्यांचे निवेदन आपले परस्पर सहकार्य बळकट करण्यासाठी एक नवीन प्रेरणा ठरेल."
मित्रांनो,
आजच्या या महत्त्वपूर्ण आणि सर्जनशील चर्चेसाठी मी सर्व सहभागी सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. पुढील वर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली, आम्ही सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे कार्य करत राहू. ब्रिक्स या संकल्पनेला नव्याने अर्थ देणे म्हणजेच "Building Resilience and Innovation for Cooperation and Sustainability" हे आमचे ध्येय असेल. जसे आम्ही आमच्या जी-20 अध्यक्षतेदरम्यान सर्वसमावेशकतेवर भर दिला आणि ग्लोबल साउथच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवले, त्याचप्रमाणे ब्रिक्सच्या अध्यक्षतेदरम्यानही आम्ही हा मंच लोककेंद्रित दृष्टिकोन आणि ‘मानवतेला प्राधान्य’ या भावनेने पुढे नेऊ."
पुन्हा एकदा, या यशस्वी ब्रिक्स परिषदेसाठी मी राष्ट्रपती लुला यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद.
Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143478)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam