पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
Posted On:
07 JUL 2025 8:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी फलदायी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
जागतिक प्रशासनात सुधारणा तसेच शांतता आणि सुरक्षा " या विषयावरील उद्घाटनपर सत्राला पंतप्रधानांनी संबोधित केले. त्यानंतर, पंतप्रधानांनी "बहुपक्षीय -आर्थिक व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना सक्षम करणे" या विषयावरील सत्रालाही संबोधित केले. या सत्रात ब्रिक्स भागीदार आणि आमंत्रित देशांचा सहभाग होता.
जागतिक प्रशासन आणि शांतता, सुरक्षा या विषयांवरील सत्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर ग्लोबल साउथ देशांचा आवाज बुलंद करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हवामानबदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी वित्त पाठबळ आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेच्या बाबतीत शाश्वत विकासाकरिता विकसनशील देशांना अधिक सहयोग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.विसाव्या शतकातील जागतिक संघटनांमध्ये एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेचा अभाव असल्याचे नमूद करत,त्यामधील सुधारणांची गरज त्यांनी अधोरेखित केली. बहुध्रुवीय आणि सर्व समावेशक जागतिक व्यवस्थेसाठी आवाहन करताना, पंतप्रधानांनी म्हणाले, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटनेसारख्या जागतिक प्रशासन संस्थांमधून समकालीन वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सुधारणांची निकड अधोरेखित केल्याबद्दल आणि शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांवर ठोस भाषा स्वीकारल्याबद्दल त्यांनी नेत्यांचे आभार मानले.
दहशतवाद हा मानवतेसमोरील एक गंभीर धोका आहे, असे शांतता आणि सुरक्षेबाबत बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ भारतावरचा हल्ला नव्हता तर संपूर्ण मानवतेवर हल्ला होता, असे त्यांनी यावेळी नमूद केले. दहशतवाद्यांना निधी पुरविणाऱ्या , प्रोत्साहन देणाऱ्या किंवा आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे असे सांगून दहशतवादाविरुद्ध जागतिक स्तरावर कठोर कारवाई हवी असे आवाहन त्यांनी केले.दहशतवादाचा सामना करताना दुटप्पीपणा नसावा यावर त्यांनी भर दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केल्याबद्दल त्यांनी ब्रिक्स नेत्यांचे आभार मानले. दहशतवादाविरुद्ध जागतिक लढा बळकट करण्याचे आवाहन करत त्यांनी ब्रिक्स देशांना या धोक्याचा सामना करताना जराही सहनशीलता बाळगू नये असेही आवाहन पंतप्रधानांनी केले.
या विषयावर विस्ताराने बोलताना , पंतप्रधानांनी नमूद केले की पश्चिम आशियापासून युरोपपर्यंतचे संघर्ष हा तीव्र चिंतेचा विषय आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले की भारताने नेहमीच अशा संघर्षांचे निराकरण करण्यासाठी चर्चा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीचे आवाहन केले आहे आणि अशा प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास कायम तयारी दर्शवली आहे.
"बहुपक्षवाद, आर्थिक-वित्तीय व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता बळकट करणे" या विषयावरील सत्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी विविधता आणि बहुध्रुवीयता ही ब्रिक्सची मौल्यवान ताकद असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, जेव्हा जागतिक व्यवस्था दबावाखाली आहे आणि जागतिक समुदाय अनिश्चितता आणि आव्हानांना तोंड देत असताना ब्रिक्सची प्रासंगिकता स्पष्ट झाली. त्यांनी पुढे असेही म्हटले की, ब्रिक्स बहुध्रुवीय जग घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या संदर्भात, त्यांनी चार सूचना केल्या: एक, ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेने प्रकल्पांना अनुदान देण्यासाठी मागणी-चालित तत्त्व आणि दीर्घकालीन शाश्वततेचे पालन केले पाहिजे; दुसरे, ब्रिक्सने विज्ञान आणि संशोधन भांडार स्थापन करण्याचा विचार केला पाहिजे ज्यामुळे ग्लोबल साउथ देशांना फायदा होऊ शकेल; तीन, महत्त्वपूर्ण खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित आणि लवचिक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे; आणि चौथी सूचना म्हणजे ब्रिक्सने जबाबदार एआयसाठी काम केले पाहिजे - एआय प्रशासनाच्या चिंतांकडे लक्ष देताना, या क्षेत्रातील नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यास देखील समान महत्त्व दिले पाहिजे.
नेत्यांच्या सत्राच्या समाप्तीनंतर, सदस्य देशांनी 'रिओ दि जानेरो घोषणापत्र' स्वीकारले.
***
NilimaC/SampadaP/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142853)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam