पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशिया प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 JUN 2025 11:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा केली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लष्कर आणि संरक्षण, सांस्कृतिक सहकार्य आणि नागरिकांमधील स्नेहबंध अशा विविध पैलूंवर द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. पायाभूत सेवासुविधा, बंदर आणि नौवहन, डिजिटलीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, औषधनिर्मण, पर्यटन आणि आदरातिथ्य अशा अनेक क्षेत्रातील आपसातले सहकार्य वाढवण्यासाठी अमाप संधी असल्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. क्रोएशिया मध्ये भारतीय संस्कृती, विचारधारा आणि योगाभ्यासाबद्दल असलेल्या लोकप्रियतेमुळे दोन्ही राष्ट्रांमधील नागरिक अधिक समीप आल्याचे त्यांनी नमूद केले. 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी क्रोएशियातील सर्व योगप्रेमींना शुभेच्छा दिल्या.
स्टार्ट अप उभारणी आणि नवोन्मेष भागीदारी क्षेत्रातील अलीकडच्या उपक्रमांबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत वृद्धीसाठी व्यापार ते व्यापार सहकार्याला चालना देण्याबरोबरच गुंतवणूक भागीदारी आणि संयुक्त प्रकल्पांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे या मुद्द्याकडे दोन्ही नेत्यांनी लक्ष वेधले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रोएशिया भारताच्या प्रतिभाकुशलतेचा लाभ घेऊ शकते असे सांगून पंतप्रधानांनी गतिशीलतेच्या क्षेत्रात संस्थात्मक सहकार्य स्थापित करण्याचे आवाहन केले. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर द्वारे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या महत्त्वावर त्यांनी सहमती दर्शविली. क्रोएशिया मध्य आणि आग्नेय युरोपमध्ये भारताचे प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते.
दोन्ही नेत्यांनी परस्पर लाभाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर देखील विचारविनिमय केला. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणा, हवामान बदल कृती आणि दहशतवादामुळे निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल विचारांची देवाणघेवाण केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत क्रोएशियाने भारताला दिलेल्या मजबूत पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान प्लेनकोविक यांचे आभार मानले. भारत-युरोपियन युनियन यांच्यातील दृढ संबंधाबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
या बैठकीनंतर, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रातील चार सामंजस्य करार आणि हिंदी चेअरच्या नूतनीकरणावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रसंगी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले [लिंक].
पंतप्रधान प्लेनकोविक यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते. पंतप्रधानांनी पंतप्रधान प्लेनकोविकला परस्परांना सोयीस्कर वेळी भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
***
PS/BS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137566)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam