श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनधिकृत एजंटशी संपर्क न साधता मोफत आणि सुरक्षित ऑनलाइन सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करण्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सदस्यांना आवाहन

Posted On: 16 JUN 2025 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2025

आपल्या सर्व भागधारकांना अधिक जलद, पारदर्शी आणि अनुकूल सेवा देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)  अनेक सुधारणा राबवल्या आहेत. भागधारकांना कोणताही त्रास न होता त्यांना सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा मिळावी यासाठी ईपीएफओच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

केवायसी किंवा सदस्यांच्या तपशीलांमध्ये सुलभपणे सुधारणा  करण्यासाठी आणि हस्तांतरण दावे सादर करण्यासाठी, 1 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ दाव्यांचा कार्यक्षमतेने आपोआप निपटारा व्हावा यासाठी आणि सेवानिवृत्ती (पेन्शन) वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) साठी ईपीएफओने अलीकडे परिपत्रके जारी केली आहेत.

आधार प्रमाणीकरण वापरून सदस्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. सदस्याची माहिती अद्ययावत करण्यासाठी आता बहुतांश वेळा सदस्य आणि ईपीएफओ या दोघांवर अवलंबून रहावे लागत नाही.  

फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान (फॅट) वापरून उमंग अॅपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर चे वाटप करून तो सक्रिय केला जातो.

ऑनलाइन दाव्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी आणि दावे नाकारण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ईपीएफओने चेक लीफ/प्रमाणित बँक पासबुकची प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता काढून टाकली आहे.

अनेक सायबर कॅफे ऑपरेटर/फिनटेक कंपन्या, अधिकृतपणे मोफत असलेल्या सेवांसाठी ईपीएफओ सदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलचा वापर कोणत्याही सदस्याला मोफत घरबसल्या करता येऊ शकतो त्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये ऑपरेटर पैसे आकारत आहेत. ईपीएफओशी संबंधित सेवांसाठी तिऱ्हाईत कंपन्या किंवा एजंटना भेट देण्यासंदर्भात संबंधिताना सावधगिरीचा  इशारा देण्यात येत आहे कारण  अशा कंपन्या किंवा  ऑपरेटरशी  संपर्क साधताना भागधारकांचा आर्थिक डेटा त्यांच्यासमोर उघड होऊ शकतो. या बाह्य संस्था ईपीएफओ अधिकृत नाहीत. त्या अनावश्यक शुल्क आकारतात किंवा सदस्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेशी तडजोड करू शकतात.

ईपीएफओकडे एक मजबूत तक्रार देखरेख आणि निवारण प्रणाली आहे. त्यावर सदस्यांच्या तक्रारी CPGRAMS किंवा EPFiGMS पोर्टलवर नोंदवल्या जातात आणि कालबद्ध पद्धतीने त्यांचे निराकरण होईपर्यंत निरीक्षण केले जाते. सर्व सदस्यांना, नियोक्त्यांना आणि पेन्शनधारकांना ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सेवांचा वापर करण्याचा सल्ला ईपीएफओने दिला आहे. दावा दाखल करणे, हस्तांतरण, केवायसी अपडेट करणे आणि तक्रार प्रक्रिया यासह सर्व ईपीएफओ सेवा पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि सदस्यांनी सहजपणे उपलब्ध ऑनलाइन सेवांसाठी निराळे एजंट किंवा सायबर कॅफेला कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी सदस्यांनी www.epfindia.gov.in या ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या प्रादेशिक मदत कक्ष /जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

जागतिक दर्जाच्या, तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक सुरक्षा सेवांसह भारतातील कामगारांना सक्षम करण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.


N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2136684)