नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जपानमध्ये सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती


केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नॉर्वेतील ओस्लो येथे जपानचे उपमंत्री तेराडा योशिमिची यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली

जागतिकदृष्ट्या शाश्वत भविष्यासाठी भारत आणि जपान यांच्यात जहाजबांधणी, बंदरे, स्मार्ट द्वीपकल्प आणि सागरी प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा

Posted On: 02 JUN 2025 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2025

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज ओस्लो, नॉर्वे येथे जपानचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे उपमंत्री तेराडा योशिमिची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश भारत आणि जपानमधील सागरी संबंध अधिक बळकट करणे हा होता. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये जपानी शिपयार्ड्सची गुंतवणूक, बंदर डिजिटायझेशन आणि हरित बंदर उपक्रम सहकार्य, संशोधन व विकास सहकार्यात वाढ, मनुष्यबळाचे कौशल्यवर्धन आणि भारतीय खलाशांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी यावर चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांनी अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना 'स्मार्ट आयलंड्स' म्हणून विकसित करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि वाढीव संपर्क आणि वाहतुक यांचा वापर यावर चर्चा केली. जपानच्या बेट विकासातील समृद्ध अनुभवाचा उल्लेख करत सोनोवाल यांनी सांगितले की, “या क्षेत्रातील जपानचा अनुभव अतिशय मौल्यवान आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा, स्मार्ट मोबिलिटी प्रणाली आणि डिजिटल पायाभूत सुविधा यामध्ये एकत्रित  कामाची संधी आहे. हे उपक्रम पर्यावरणीय संवर्धन आणि प्रादेशिक सागरी सुरक्षेसाठी आमच्या सामायिक बांधिलकीला बळ देतील.”

बैठकीत भारतीय आणि जपानी शिपयार्ड्समधील भागीदारी, ग्रीनफिल्ड गुंतवणुकीच्या संधी, आणि स्वच्छ ऊर्जा केंद्र म्हणून बंदरे व सागरी औद्योगिक समूहाचे सहविकसन यावर चर्चा झाली. सोनोवाल यांनी इमाबारी शिपबिल्डिंग, जेएमयूसी, कनागावा डॉकयार्ड आणि मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज यांसारख्या आघाडीच्या जपानी कंपन्यांना भारतीय शिपयार्ड्ससोबत सहयोग करण्याचे आमंत्रण दिले.

सोनोवाल म्हणाले, “जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्षेत्रातील जपानचा अनुभव सर्वज्ञात आहे. भारताच्या वाढत्या सागरी उद्योगात जपानी कंपन्यांसाठी गुंतवणुकीची मोठी संधी आहे. बंदर डिजिटायझेशन आणि हरित बंदर उपक्रमांतील सहकार्यामुळे आपली लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम व शाश्वत बनेल.” त्यांनी एनवायके लाइन, एमओएल आणि के लाइन या जपानी समुद्री कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचे आणि सहयोगाचे आवाहन केले.

जपानचे उपमंत्री तेराडा योशिमिची म्हणाले की, “भारत आणि जपानमध्ये अतिशय प्रगाढ संबंध आहेत. आतापर्यंत जपान भारतात रेल्वे पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत होता, पण आता सागरी क्षेत्रात विशेष रस घेत आहे.” आम्ही जहाजबांधणी व खलाशी प्रशिक्षण यामधील सहकार्याच्या संधी यावर सकारात्मक चर्चा आणि विचार झाला असे सांगून त्यांनी या बैठकीबाबत समाधान व्यक्त केले.

दोन्ही देशांनी सागरी प्रशिक्षण, संशोधन आणि विकासातील सहकार्य तसेच शाश्वत सागरी तंत्रज्ञान आणि पुढील पिढीच्या जहाज डिझाइन यामध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहमती दर्शवली.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133385)